घरफिचर्ससारांशकरोना लसीच्या दिशेने वाटचाल!

करोना लसीच्या दिशेने वाटचाल!

Subscribe

करोना विषाणूने जगभरात हाहा:कार उडवून दिलेला आहे. अमेरिका, इटली, रशिया, स्पेन अशा अनेक प्रगत देशांनीही करोनासमोर हात टेकले आहेत. अनेक देशांमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा पर्याय अवलंबण्यात आला. लॉकडाऊनमुळे विविध देशांमधील उलाढाल ठप्प झालेली आहे. भारतातही करोनामुळे गेले दोन महिने सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत. लॉकडाऊन करून करोनाचा प्रसार पूर्णपणे रोखता येईल असे वाटेनासे झाले आहे. त्यासाठी करोनावर लस शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिका, इस्त्राईल त्याच सोबत भारतातील शास्त्रज्ञही विविध प्रयोगशाळांमध्ये रात्रंदिवस संशोधन करत आहेत. यामुळे थोडा आशेचा किरण दिसू लागला आहे. लवकरच यावर लस मिळेल आणि करोनाला आळा बसेल अशी अपेक्षा करूया.

करोनाचा संसर्ग संपूर्ण जगात वाढत आहे. जगभरात करोनामुळे सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त जण बाधित असून सुमारे ३.५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन, विलगीकरण, अलगीकरण असे उपाय योजूनही त्याला अपेक्षित असे यश आलेले नाही. उलट या उपायांमुळे जगभरातून आता असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जगातील लहान-मोठा प्रत्येक व्यक्ती आता करोनावर लस अथवा औषध कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ करोनाविरोधात लस तयार करण्याच्या कामात गढून गेले असताना एक आशेचा किरण दिसला आहे. करोनाला रोखण्यासाठी मॉडेर्ना इंक या बायोटेक कंपनीच्या प्रायोगिक कोविड-१९ लसीमुळे निरोगी स्वयंसेवकांच्या छोट्या समूहामध्ये संरक्षक अ‍ॅण्टीबॉडिज निर्माण झाल्याची प्रारंभिक माहिती कंपनीने दिली. या लसीची चाचणी प्रथम अमेरिकेत होणार आहे. मार्चमध्ये ४५ सब्जेक्ट्सवर सुरू झालेल्या सुरक्षित चाचणीत भाग घेतलेल्या आठ लोकांमार्फत हा डेटा आला आहे. एकंदर ही लस सुरक्षित आहे, असे अभ्यासात दिसून आले आहे आणि सर्व सहभागींमध्ये या विषाणूविरोधात अ‍ॅण्टीबॉडिज निर्माण झाल्या आहेत.

या आठ व्यक्तींच्या शरीरांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, १०० मायक्रोग्रामचा डोस मिळालेल्या व्यक्तींमध्ये तसेच २५ मायक्रोग्रामचा डोस मिळालेल्या लोकांमध्ये आढळलेल्या विषाणूला रोखणार्‍या संरक्षक अ‍ॅण्टीबॉडिजचा स्तर हा कोविड-१९ या करोनाविषाणूमुळे होणार्‍या आजारातून बर्‍या झालेल्या लोकांच्या रक्तातील अ‍ॅण्टीबॉडिजच्या तुलनेत अधिक होता. अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार, मॉडेर्नाच्या समभागांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, लसीच्या विकास व उत्पादनासाठी १.२५ अब्ज डॉलर्सचे सामाईक समभाग विकण्याची योजना कंपनीने उघड केल्यानंतर नंतरच्या व्यवहारात समभाग १.६ टक्क्याने खाली आला. ही संशोधने महत्त्वपूर्ण आहेत, पण हा क्लिनिकल चाचणीचा पहिलाच टप्पा आहे आणि यात केवळ आठ व्यक्तींचा समावेश होता. हा टप्पा सुरक्षितता तपासण्यासाठी घेण्यात आला होता. ही लस विकासाच्या प्रगत टप्प्यावरील लसींपैकी एक असून, या प्रारंभिक माहितीमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे.

- Advertisement -

या लसीची चाचणी परिणामकारकतेच्या दृष्टीने हजारो लोकांवर घेतली जाईल तेव्हा त्यातील अनेक दोष समोर येऊ शकतात. करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी अ‍ॅण्टीबॉडिज नेमका कोणता स्तर संरक्षण ठरेल आणि हे संरक्षण किती काळ टिकेल हे समजून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. मॉडेर्नाच्या मते लस डोसनुसार वेगवेगळा परिणाम करत आहे. म्हणजे १०० एमसीजीचा डोस मिळालेल्यांमध्ये कमी क्षमतेचा डोस मिळालेल्यांच्या तुलनेत अधिक अ‍ॅण्टीबॉडिज तयार झालेल्या आढळल्या.

लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील नियामक यंत्रणांनी नियामक परीक्षणांचा वेग वाढवण्यासाठी लसीला फास्ट-ट्रॅक स्टेटसही दिला आहे. दुसर्‍या किंवा मधल्या टप्प्यातील चाचण्या या परिणामकारकतेची पडताळणी करण्याच्या तसेच योग्य डोस निश्चित करण्याच्या दृष्टीने घेतल्या जातात. मॉडेर्नाने २५० एमसीजी डोसची चाचणी न घेता ५० एमसीजी डोसची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक डोस कमी केल्यास प्रत्येक शॉटमध्ये लागणारे लसीचे प्रमाण कमी करण्यात ते उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ कंपनी अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन करू शकेल. साथीच्या पार्श्वभूमीवर मागणी पुरवठ्याच्या प्रमाणात प्रचंड जास्त असेल असे अपेक्षित आहे. डोस जेवढा कमी असेल तेवढ्या जास्त लोकांना ते लसीचे संरक्षण पुरवू शकतात.

- Advertisement -

अमेरिका सरकारने एप्रिलमध्ये मॉडेर्नावर मोठा विश्वास टाकत लसीच्या विकासासाठी ४८३ दशलक्ष डॉलर्सचे सहाय्य बायोमेडिकल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (बीएआरडीए) या अमेरिकेच्या आरोग्य व मानवी सेवा खात्याचा भाग असलेल्या यंत्रणेमार्फत दिले. या अनुदानामुळे २०२० सालात दर महिन्याला लक्षावधी डोसचा पुरवठा करणे शक्य होईल, असे कंपनीने सांगितले. आणखी गुंतवणूक केल्यास आणि लस यशस्वी ठरल्यास, २०२१ मध्ये दर महिन्याला कोट्यवधी लसी पुरवणे शक्य होईल, असेही कंपनीने नमूद केले. आम्ही उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी गुंतवणूक करत आहोत, जेणेकरून, आम्ही जास्तीत जास्त लसी पुरवण्याची शक्यता आहे.

करोनाविरुद्ध लस शोधण्याच्यादृष्टीने इस्रायलमध्ये झालेले एक संशोधन महत्त्वपूर्ण आहे. करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अँटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. अ‍ॅण्टीबॉडिज व्हायरसवर हल्ला करून व्हायरसला शरीरामध्येच संपवून टाकतात. त्या अ‍ॅण्टीबॉडिजच्या अनुषंगाने ही लस निर्मिती अंतिम टप्प्यात आल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे इस्रायलमधील हे इन्स्टिट्यूट आता लसरुपी अ‍ॅण्टीबॉडिजसाठी पेटंट मिळवण्याबरोबरच व्यावसायिक निर्मितीसाठी काँन्ट्रॅक्ट करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे ही इस्रायलमध्ये लस निर्मिती होतेय हे मानण्यास तथ्य आहे. अ‍ॅण्टीबॉडिज आधारित लसीच्या उंदरावर चाचण्या सुरू केल्याची माहिती मागच्या महिन्यात आयआयबीआरने दिली होती. ही इन्स्टिट्यूट करोनामधून बर्‍या झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मांचेसुद्धा कलेक्शन करत आहे. मिगव्हॅक्स ही इस्रायलमधली संशोधकांची दुसरी टीम सुद्धा करोना व्हायरसविरोधात लस आज जगभरात जवळपास ८० वेगवेगळे गट करोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. ही लस मिळाली तर लोकांच्या रोगप्रतिकार यंत्रणेला एखाद्या परकीय शक्तीविरोधात लढण्यास मदत मिळेल, जेणेकरून ते आजारी पडणार नाही. सध्या जगात ज्या ८० टीम्स करोना व्हायरसवर लस तयार करण्याचा प्रयत्न करतायत, त्यातल्या चार गटांनी याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. पहिला प्रयोग झाला तो अमेरिकेत. मार्च महिन्यात अमेरिकेतल्या seattle मधल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या लसीचे माणसांवर प्रयोग सुरू केले. साधारणपणे कुठल्याही लसीचा आधी प्राण्यांवर प्रयोग केला जातो, पण या गटाने ती पायरी गाळलीय. गेल्याच आठवड्यात इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी माणसांवर या लसीचे प्रयोग सुरू केले. ८०० लोकांवर हा प्रयोग केला जाणार आहे. त्यातल्या निम्म्या लोकांना करोनावर तयार करण्यात आलेली लस दिली जाईल तर उर्वरित मेनिंजायटिसवर काम करणारी लस दिली जाईल आणि मग याचे तुलनात्मक निकाल पाहिले जातील. सानोफी आणि GSK या औषध क्षेत्रातल्या दोन बड्या कंपन्या लस निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांनी दोन लसींचे प्राण्यांवर प्रयोग सुरू केलेत आणि या महिनाअखेरपर्यंत ते माणसांवर लसीची चाचणी घेऊ पाहतायत.

लस तयार करणे हे सोपे नाही. त्याचे दुष्परिणाम हे महत्त्वाचे असतात. मानवी शरीरातील पांढर्‍या पेशींचा रोग प्रतिकारशक्तीमध्ये सहभाग असतो. शरीरात अत्यंत कमी प्रमाणात व्हायरस किंवा बॅक्टेरिया सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण यंत्रणा या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला ओळखते, तेव्हा त्याच्याशी कसे लढायचे हे शरीराला कळते. पुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारचा व्हायरस आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची तयारी असते. गेल्या अनेक दशकांपासून एखाद्या विषाणूवर तयार करण्यात आलेल्या लसीकरणात त्याच विषाणूचा वापर होत आलेला आहे. गोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठी अशाच प्रकारच्या लसींचा वापर केला जातो. तसंच फ्लूवरच्या लसीकरणातही याचा वापर होतो, पण करोना व्हायरसबाबत अशाप्रकारे त्याच विषाणूंचा वापर करणे शक्य नाही. त्यामुळे लस बनवण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. याचे जिनेटिक कोड उपलब्ध असून याचे परीक्षण होणे बाकी आहे. जिनेटिक कोडचा काही भाग घेऊन लस बनवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत. शास्त्रज्ञांनी करोना व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेल्या टोकदार भागातली गुणसूत्रं काढून ती दुसर्‍या निरुपद्रवी विषाणूमध्ये सोडली आहेत. यातून ही लस तयार होतेय. ही लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते आणि मग शरीरात करोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेत शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते आणि मग रुग्णाच्या शरीरात अ‍ॅण्टीबॉडिजची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान टी सेलही कार्यरत होतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरातल्या पेशी करोना व्हायरसला ओळखतात आणि मग त्या व्हायरसचा नायनाट करतात.

भारतही लस बनवण्याच्या कामात मागे राहिलेला नाही. दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पाँपेओ यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका एकत्रितपणे करोना व्हायरसवर लस बनवण्याचे काम करत आहेत. भारतातल्या जवळपास अर्धा डझन कंपन्या करोना व्हायरसवर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात पुण्यात कारखाना असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही समावेश आहे. अमेरिकेतल्या कोडॅजेनिक्स या फार्मा कंपनीबरोबर ही कंपनी लस बनवण्याचं काम करतेय. उंदीर आणि इतर प्रायमेट्सवर या लसीची चाचणी यशस्वी झाली आहे. सप्टेंबरपर्यंत माणसांवरही चाचणी होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठात बनत असलेल्या लसीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर भागीदारी केलीय. ज्या कुठल्या लसीला हिरवा कंदील मिळेल तिचे अब्जावधी डोस जगभरात लागतील.

हे सर्वजरी खरे असले तरी आजच्या घडीला करोनावर लस उपलब्ध नाही. अजून सात-आठ महिने तरी करोनावर लस निर्माण होण्याची शक्यता नाही. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न करत आहेत, पण अद्याप लस पूर्ण झालेली नाही, हेही तितकेच सत्य आहे. करोना संसर्गाच्या काळात सात-आठ महिने म्हणूनच टिकाव धरून राहावे लागणार आहे. त्यासाठी एकमेव मार्ग हा सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा आहे. घरात राहिलो तर सुरक्षित राहू हेच आज करोनावरील औषध आणि लस आहे

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -