घरफिचर्ससारांशमनूला तिलांजली हाच उपाय

मनूला तिलांजली हाच उपाय

Subscribe

हाथरस प्रकरणाच्या तोंडावर जातीअंताची चळवळ आणि एक गाव एक पाणवटा ही आपली चळवळ खूप महत्वाची वाटते. काय होते त्याचे स्वरूप आणि ती का सुरू झाली?

– मी स्वतः ला सत्यशोधक मानतो. महाराष्ट्रात जातीअंताची चळवळ पुढे नेण्याचा सत्यशोधक चळवळीचा बिनीचा कार्यक्रम होता. समाज आणि अनुयायांसाठीच ही चळवळ असून त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी काही संबंध नाही, अशी ढोंगी भूमिका महात्मा फुले यांची नव्हती. तर व्यक्तिगत जीवनातही फुले यांनी सांगितले तसेच ते जगले. ब्राम्हण विधवेचा मुलगा यशवंत याला जोतीराव व सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेतला. त्याला डॉक्टर केलं. इतकंच काय आपली संपत्ती व स्वतःच्या मरणोत्तर संस्काराचे अधिकार पत्र करून त्याला दिले. सावित्रीबाईंनी तर फुल्यांच्या पश्चात क्रांतिकारी पद्धतीने त्यांचा वारसा पुढे चालवला. जोतिराव गेल्यावर त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यासाठी जातबंधू पुढे आले. त्यांना बाजूला सारत सावित्रीबाईंनी स्वतः टिटव हातात घेवून दुसर्या हाताला यशवंतला धरत त्याचा जात नाकारत असलेला हक्क मिळवून दिला. ही विलक्षण क्रांतिकारक घटना आहे. आपण फक्त बोलतो. मनू स्मृती, पुराण अशा विषमतेला जन्म देणार्या ग्रंथ, त्यावर आधारित रूढी- व्यवहार मात्र रोजच्या जगण्यात सहजभावाने पाळत असतो. जात निर्मित विषमतेची ठिकाणे तशीच ठेवली जातात. अशा पैकीच सवर्ण व अस्पृश्य यांचे वेगळे पाणवठे हे वास्तव टोचू लागले. त्यातून एक गाव एक पाणवठा चळवळीच्या विचाराचा जन्म झाला.

- Advertisement -

या चळवळीला किती प्रतिसाद मिळाला आणि त्याचे काय परिणाम समोर आले. सुरुवातीला लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?

सत्यशोधक चळवळ खर्‍या अर्थाने खेड्यात पोहचली का ? याचा शोध घेण्यासाठी आम्ही गावागावांत गेलो. काही ठिकाणी सवर्णना शिवाय कोणालाही पाणी पीता येणार नाही अशी ठिकाणे आढळली. आम्ही एक गाव एक पाणवठ्याचा आग्रह धरला. विदर्भ, मराठवाडा अशा अनेक ठिकाणी विरोध झाला. विदर्भातील पांगरीगाव या ठिकाणी डॉ. वसंत गायकवाड या अस्पृश्य समाजातील डॉक्टर झालेल्या मुलाला पण सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्यास विरोध झाला. प्राथमिक उपचार घ्यायला लोक येत असत, पण त्याला मात्र सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास विरोध होताना दिसत होता. या मोहिमेला सामाजिक चळवळीतील कमलताई विचारे, पन्नालाल सुराणा, ग.प्र प्रधान, विजय तेंडुलकर अशा अनेक सवर्ण समाजातील मंडळीनी पाठींबा दिला. त्याचे परिणाम असे झाले की खेडयातील अस्पृश्यता चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. अनेक मंडळी यात सहभागी होत होती.

- Advertisement -

जे महाराष्ट्रात जातीअंतासाठी प्रयत्न झाले, तसे ते इतर राज्यांमध्ये दिसले नाही. विशेष करून उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणात ते भीषणपणे समोर येते, याची काय कारणे दिसतात?

-महाराष्ट्र, काही प्रमाणात पश्चिम बंगाल, मोठ्या प्रमाणात पेरियारचा तामिळनाडू व बसवेश्वरांचा कर्नाटक येथे जाती अंताविषयी नक्की प्रयत्न झाले. पण आज तेथेही ब्राम्हण्याची प्रती क्रांती होताना दिसत आहे. मग उत्तर भारताची काय कथा ? उत्तरेत सरंजामी व ब्राम्हणी व्यवस्था घट्ट आहे. तिचा विळखा सैल करायचा असेल तर काशीरामांप्रमाणे केवळ राजकीय वा डाव्यांप्रमाणे केवळ वर्गीय कार्यक्रम घेवून चालणार नाही. फुल्यांप्रमाणे सांस्कृतिक पातळीवर पर्याय देता आला पाहिजे. आजही या घटकेला वेदसुक्त ( वेदातील सूत्र ) म्हणलं जातं. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत मनुस्मृतीमधील मंत्र म्हणतात. ज्यात ब्राम्हण नीतिचे धडे सर्वांना दिले जातील, असे जाहीर भाषणात सांगितले जाते. सत्यनारायण पूजेमध्ये आजही आपण वेदसूक्त एका बाजूला म्हणायचं ते मान्य करायचं आणि दुसर्‍या बाजूला अत्याचार चालले म्हणून मोर्चे काढायचे हे कसं चालणार. राजस्थानात जयपूर हायकोर्टात मनुचा उभारलेला पुतळा हा काय दर्शवतो. बाई भोगदासी आहे, स्त्रीला स्वातंत्र्य नाही, वेदमंत्राचा अधिकार नाही. तिचं कन्या दान करायचं. वाईट म्हणजे लग्नविधीमध्ये म्हणल्या जाणार्‍या सूत्रात तिला दुय्यमत्व मान्य करायला लावायचं. आता जे अत्याचार होतात त्यात ही मानसिकता आहे. राज्यकर्ते अत्याचार करणार्‍याच्या बाजूने उभे राहतात. कर्मविपाक सिध्दांत तसे सांगतात. घटनेत तुम्ही कितीही हक्क दिले तरी मानसिकतेला सांस्कृतिक पातळीवर बदलण्याचे प्रयत्न होत नाहीत, तोपर्यन्त परिवर्तन लांबचा पल्ला राहील.

आज शिक्षणाचा मोठा प्रचार प्रसार होऊन भारतभर जाती-पातीच्या दलदलीमधून आपण बाहेर का पडत नाही ?

– वर उल्लेख केल्याप्रमाणे हा फक्त आर्थिक,राजकीय,शैक्षणिक विषय नाही. मनाची मशागत व्हायला हवी. मनामध्ये मनुस्मृती ठेवून जात जाणार नाही. योनीशुचितेचा सिध्दांत बाईवर लादायचा, पण पुरुषाचे लिंगपिसाटपण संस्कृतीनेच स्वीकारले आहे. शिक्षण घेतलेल्या पिढीत सुध्दा याची चिकित्सा केली जात नाही, ही शोकांतिका आहे. विज्ञानाने जात आणि अस्पृश्यतेला शास्त्रीय आधार नाही हे सतत सांगितले पाहिजे

जातीच्या अंतावर काय तोडगा असू शकतो?

– हाथरस प्रकरण हे डोळ्यात अंजन घालणार आहे. पण याने दुरुस्ती होणार का ? हा मूळ प्रश्न आहे. हिंदू संस्कृती ही मुळातच विषमतेवर आधारलेली संस्कृती रुजवलेली दिसते. हिंदूचे धर्म ग्रंथ हे त्याचे आधारग्रंथ आहेत. या आधारग्रंथाना आव्हान देणं, ही जबाबदारी परिवर्तनवादी चळवळींनी स्वीकारली पाहिजे शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊनसुद्धा ब्राम्हणी पगडा असलेल्या अभ्यासक्रमाने पर्यायी सांस्कृतिक चळवळ खर्‍या अर्थाने पोहचली नाही. महाडच्या सत्याग्रहात तसेच २५ डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन करून ज्या प्रकारे इथल्या विषमतावादी संस्कृतीला आव्हान दिलं गेलं. तसेच जयपूर उच्च न्यायालयात उभा केलेला मनूचा पुतळा हटवावा, यासाठी आम्ही २१ वे शतक सुरू होताना महाडपासूनच पदयात्रा आयोजित केली होती. माणूस होण्यासाठी आधी भारतीयांच्या मनातील मनू हटवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मध्ये दाखवलेल्या मार्गाने जाण्याची गरज आहे.

-ओंकार मोरे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -