घरफिचर्ससारांशव्यावसायिक देशप्रेमाचा पर्दाफाश !

व्यावसायिक देशप्रेमाचा पर्दाफाश !

Subscribe

देशातील अंतर्गत प्रश्नाला बगल देऊन सुरू झालेल्या ढोबळ देशप्रेमपटांच्या प्रवाहाला समांतर चित्रपटांनी छेद द्यायला सुरुवात केली. गोविंद निहलानींनी नव्वदच्या दशकात द्रोहकाल बनवला. द्रोहकालने नक्षल आणि दहशतवादातील मूळ प्रश्नांच्या तत्वज्ञानाची चर्चा केली. मनोज कुमारने ऐंशीच्या दशकात क्लर्क, कलियुग और रामायण बनवून देशभक्तीपटांची परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात यश आले नाही. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने निव्वळ व्यावसायिक देशप्रेमपटांना लोक नकार देतात हेच दाखवून दिले.

बिमल रॉय यांची निर्मिती असलेला काबुलीवाला १९५७ मध्ये रिलिज होऊन स्वातंत्र्याला आता अवघी दहा वर्षे झाली होती. स्वतःचे नवे संविधान निर्माण करून त्या दिशेने नव्या आणि आनंदी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाने आपला मार्ग निवडला होता. ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन, तुझपे दिल कुरबाँ…देशाच्या फाळणीच्या जखमा या काळात ताज्या होत्या. हिंदी पडद्यावर देशप्रेमपट साकारण्याची ही सुरुवात होती. बलराज साहनी या अभिनयात कसलेल्या कलाकाराने हा देशप्रेमपट जिवंत केला. त्यानंतर जवळपास दशकानंतर ‘हकिकत’ रिलिज झाला. भारत आणि चीनच्या युद्धाची पार्श्वभूमी या हकिकतमध्ये होती. कर चले हम फिदा जान तन साथीओं..अब तुम्हारे हवाले वतन साथीयो म्हणत, या चित्रपटाने संवेदनशील देशभक्तीचा कळस गाठला. कैफी आझमींच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याने इतिहास घडवला होता. त्यानंतरच्या काळात ललकार, लिडर असे अनेक देशभक्तीपट साकार झाले. मात्र जे यश १९६० मधल्या ‘हम हिंदोस्तानी’ला मिळालं ते इतरांच्या वाट्याला आलं नाही. राम मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटातील छोडो कल की बाते…या गाण्याने प्रगतीच्या मार्गावर असलेल्या श्रमिक देशाचे स्वप्न मांडले होते. टीव्हीचा शोध लागल्यावर छायागीत, चित्रहार या चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी हे गाणं आवर्जून लावलं जात होतं.

प्रणयप्रेमपटात अडकलेल्या हिंदी चित्रपटांना देशप्रेमाकडे वळवण्याचं श्रेय मनोज अर्थात भारत कुमार यांच्याकडे जातं. पूरब और पश्चिम, उपकार, शहीद, क्रांती असे अनेक देशप्रेमपट त्यांनी दिले. पश्चिमेकडील संस्कृतीला चंगळवादाचं नाव देऊन पूर्वेकडच्या भारतातील शेती आणि कुटुंबव्यवस्थेतील महत्त्व पूरब और पश्चिममध्ये साकारलं होतं….जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है…म्हणत मनोज कुमारने धर्म आणि देश या दोन्ही संकल्पनांना एकाच पातळीवर आणून ठेवलं. है प्रित जहाँ की रित सदा…असं म्हणत त्याने भारत का रहने वाला हूँ…भारत की बात सुनाता हूँ….म्हटल्यावर सिनेमागृहे जयहिंद आणि भारत माता की जयच्या जयघोषाने दुमदूमुन जात होती. हे सत्तरचं दशक होतं. या हिंदी पडद्यासाठी वैविध्यपूर्ण चित्रपटांनी भारलेलं असं हे दशक होतं. शोले रिलिज झाल्यावर त्यासारखाच ब्लॉकबस्टर मल्टीस्टारर सिनेमा देशप्रेमपट साकारण्याची इच्छा मनोज कुमार यांना होती. त्यातून १९८१ मध्ये क्रांती बनवला गेला. ऐंशीच्या दशकापर्यंत देशप्रेमपटात प्रामुख्याने इंग्रजांविरोधातील लढा हेच मुख्य कथानक होतं. क्रांतीही त्याच सरधोपट मार्गाने गेला. पुढे सुभाष घईंचा कर्मा, वतन के रखवालेसारख्या निव्वळ व्यावसायिक देशप्रेमपटांनी ही परंपरा चालवली. त्याआधी महानायक अमिताभचे देशप्रेमपट हे चर्चेचे विषय होते; पण तिकीटबारीवर ते फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. देशप्रेमाच्या कथानकाला धर्म, सांप्रदाय, राष्ट्रीय एकात्मतेची फोडणी देऊन हे देशभक्तीपट देशप्रेमी, महान, इन्कलाब, मै आझाद हूँ हे सिनेमे पडद्यावर आले.

- Advertisement -

देशातील अंतर्गत प्रश्नाला बगल देऊन सुरू झालेल्या ढोबळ देशप्रेमपटांच्या प्रवाहाला समांतर चित्रपटांनी छेद द्यायला सुरुवात झाली होती. गोविंद निहलांनीनी नव्वदच्या दशकात द्रोहकाल बनवला. द्रोहकालने नक्षल आणि दहशतवादातील मूळ प्रश्नांच्या तत्वज्ञानाची चर्चा केली. तर वतन के रखवालेसारख्या चित्रपटांनी व्यावसायिक देशभक्तीपटांची परंपरा पुढे सुरू ठेवली होती. मनोज कुमारने ऐंशीच्या दशकात क्लर्क, कलियुग और रामायण बनवून देशभक्तीपटांची परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या देशातील सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ देशप्रेमाचे गोडवे गाण्याचे त्यापुढील प्रयत्न तकलादू ठरले. हे दोन्ही सिनेमे तिकीटबारीवर कमाल दाखवू शकले नाहीत. उपकार आणि पूरब और पश्चिममध्ये जे भारत कुमारांनी कमावले होते, ते दोन चित्रपटांनी गमावले.

सुभाष घईंच्या कर्मावर शोलेचा प्रभाव होता. जी.पी. सिप्पींच्या शोलेने हिंदी पडदा भव्यदिव्य चित्रपट आणि तद्दन डाकूपटांकडे वळवला होता. मात्र शोलेची उंची इतर कुणालाही गाठता आली नाही. क्रांतीवर शोलेचा प्रभाव होता, तसाच तो कर्मावरही होता. कर्माचं कथानकच शोलेच्या कथानकावरून प्रेरित असल्यासारखं होतं. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचा वापर करून ताकदीच्या खलनायकाला संपवण्याचे समान सूत्र या दोन्ही सिनेमांत होतं. असाच प्रयत्न नव्वदच्या दशकात आर्मी नावाच्या देशप्रेमपटात केला गेला. श्रीदेवी, शहारुख, डॅनीसारखे दिग्गज कलाकार असतानाही ढिसाळ कथानक आणि संवाद, पटकथेमुळे तो कमालीचा अपयशी ठरला. मात्र त्याआधी सुभाष घईंच्या कर्मानं उत्तम यश मिळवलं होतं. सुभाष घईंनी परदेस बनवून अनिवासी भारतीयांचं देशप्रेम नव्वदच्या दशकात पडद्यावर आणलं. त्याआधीच, ‘दिलवाले दुल्हनीया ले जाएंगे’,‘आ अब लौट चले‘पासून ‘नमस्ते लंडन’ असे एनआरआय मंडळींच्या देशप्रेमपटांनी हिंदी पडद्यावर मोठी जागा व्यापली होती.

- Advertisement -

दहशतवाद आणि त्याविरोधात लढणारा नायक…रितीक, सलमान, सैफने अलिकडच्या काळात साकारला. त्याआधी सन्नी देओलचे देशप्रेमपट हा स्वतंत्र विषय आहे. जेपी दत्तांच्या बॉर्डरपासून सुरू झालेला हा सिलसिला पुढे गदर, इंडियन, जाल असा पसरतच गेला. मात्र गदरमध्ये सन्नीने केलेली आक्रस्ताळी आरडाओरड पुढे त्याची ओळख होण्यासाठी हे त्यापुढील देशप्रेमपट कारण ठरले होते.

सरदार भगतसिंग या स्वातंत्र्यचळवळीतील महानायकावर सिनेमे बनवण्याची स्पर्धा नव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली होती. राजकुमार संतोषींनी द लिजेंड आफ भगतसिंग बनवल्यावर धर्मेंद्रच्या विजेता फिल्मने बॉबी देओलला भगतसिंग बनवून शहीद पुन्हा बनवला. मात्र त्याला अजय देवगनच्या भगतसिंगची सर नव्हती. तद्दन हाणामारीपट बनवणारा गुड्डू धनोआ विजेता फिल्मच्या भगतसिंगला न्याय देऊ शकला नाही. त्याच वर्षात जवळपास दोन ते तीन चित्रपट भगतसिंग यांच्या स्वातंत्र्यचळवळीवर आधारीत असलेले रिलिज झाले होते.

स्वप्नातल्या देशभक्तीपटावरून सामाजिक आशयाच्या वास्तववादी देशभक्तीपटांकडे हिंदी पडद्याला वळवण्याचं काम गोविंद निहलानी द्रोहकालमधून केलं होतं. नक्षलवादी समस्यांच्या कथानकावर आधारीत लाल सलाम, जॉन अब्राहमचे सत्यमेव जयते, मद्रास कॅफे या चित्रपटांनी गोविंद निहलानींच्या सामाजिक देशप्रेमाची संकल्पना पुन्हा नव्याने पडद्यावर आणली. आशुतोष गोवारीकरने लगानसारखा सुंदर देशप्रेमपट ही मागील दशकातील सर्वात मोठी देणगी ठरली. परंतु आमीरच्याच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने निव्वळ व्यावसायिक देशप्रेमपटांना लोक नकार देतात हेच दाखवून दिले. देशप्रेमाच्या भावनेला निव्वळ व्यावसायिक रंगात रंगवण्याचा प्रयत्न हिंदी पडद्यावर फारसा यशस्वी झालेला नाही. पा रंजिथचा कबाली, काला, अनुभव सिन्हाचे मुल्क, आर्टीकल १५ हे सामाजिक देशप्रेमपट ही नव्या देशप्रेमपटांची झालेली सुरुवात नव्या वर्षासाठी आशादायीच आहे….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -