रम्य गाणी, रम्य आठवणी

ती संध्याकाळ, ती रात्र संपली. जयकिशन आणि हसरत जयपुरी, दोघंही त्या हॉटेलातून बाहेर पडले. आपापल्या घरी गेले. दुसर्‍या दिवशी हसरत जयपुरींनी जे शब्द जयकिशनना सांगितले ते होते - बदन पे सितारे लपेटे हुए, वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाये. जयकिशन त्या शब्दांवर अक्षरश: फिदा झाले. त्यांनी त्या शब्दांना अशी दिलखेचक चाल लावली की ती ऑल टाइम ग्रेट ठरली. त्या गाण्याचा अंतरा तर मुखड्यापेक्षा धडाकेबाज केला. आजच्या काळातही हे गाणं लोकांनी लक्षात ठेवलं आहे.

Geetmitava

काही गाण्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात. गीतकाराने यथावकाश गाणं लिहून दिलं. संगीतकारापुढे त्याचा कागद आला. संगीतकाराने आपली बाजापेटी बाहेर काढली. कागदावरचे शब्द बघून संगीतकाराने बाजापेटीवरून सर्रकन बोटं फिरवली…की झर्रकन गाणं झालं तयार, असा काही गाण्यांचा सरळसोट मामला नसतो.

कधी कधी गाणं तयार होण्याचे वेगवेगळे किस्से असतात…आणि मग कधी त्याच्या सत्यकथा बाहेर येतात तर कधी दंतकथा. गंमत पहा, संगीतकार ओ.पी.नय्यरनी त्यांच्या उभ्या कारकिर्दीत लता मंगेशकर नावाच्या स्वरसम्राज्ञीच्या स्वर्गीय आवाजाचा वापर केला नाही. पण त्या आवाजाविना त्यांचं संगीत त्यांनी लोकप्रिय करून दाखवलं. त्यांनी आशा भोसलेंना आपली गाणी दिली. आशा भोसलेंच्या गळ्यात चपळाई होती, एक अलौकिक लवचिकता होती. भजनापासून गझलपर्यंत आणि नाट्यसंगीतापासून लावणीपर्यंत, गाण्याच्या प्रत्येक प्रांतात त्यांचा लिलया विहार असायचा. ओ.पींच्या संगीतातली बहुतांश गाणी गाणार्‍या आशा भोसलेंच्या वाट्याला संगीतकार मदनमोहनची गाणी मात्र फार कमी यायची. मदनमोहन त्यांची जास्त गाणी लता मंगेशकरांकडून गाऊन घ्यायचे. मदनमोहनच्या संगीतातल्या गूढ-मधूर सुरांची छटा काही औरच होती. त्या संगीताच्या अनोख्या अवकाशात आपल्या गळ्यातलं गाणंही उजळून निघावं असं आशा भोसलेंनाही वाटायचं म्हणून त्यांनी मदनमोहनना एकदा गंमतीगंमतीत म्हटलं, ‘तुम्ही तुमची छान छान गाणी दिदीला देता आणि मला मात्र तुमचं एखाददुसरं गाणं देता असं का?’

मदनमोहननी आशा भोसलेंचा प्रश्न ऐकला आणि ते अतिशय शांतपणे उत्तरले, ‘तुझं म्हणणं अगदी खरं आहे. माझी जास्तीत जास्त गाणी मी लताकडून गाऊन घेतो, पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लता हा माझ्या गाण्यासाठी फर्स्ट चॉइस राहणार आहे.’ पण त्यानंतर आसपासच्या काळात मदनमोहननी एक गाणं केलं त्यासाठी त्यांना आठवण झाली ती आशा भोसलेंचीच. त्याचं कारण होतं त्या गाण्यातला तसाच फटकळ नखरा. त्या गाण्याचे शब्द होते – झुमका गिरा रे, बरेली के बझार में. तसं पाहिलं तर आशा भोसलेंनी ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘सबा से ये कह दो’ ह्यासारखी गाणी मदनमोहनकडे छान खणखणीतपणे गायली होती. पण ‘झुमका गिरा रे’ ह्या गाण्यात त्यांनी आपल्या आवाजातला असा काही ठसका दाखवला की हे गाणं त्या एका काळात पराकोटीचं लोकप्रिय झालं. ह्या गाण्याने त्यांना किती लोकप्रियता मिळवून दिली ह्याचं उदाहरण देताना दस्तुरखुद्द आशा भोसलेंनीच एका मुलाखतीत फार मोकळेपणाने म्हटलं, ‘हे गाणं पार सातासमुद्रापार पोहोचलं. इतकं दूर दूर पोहोचलं की ह्या एका गाण्याने मला जगभर लाखो रूपये कमावून दिले.’…आणि आशा भोसलेंचं ते म्हणणं खरंही होतं. ह्या गाण्याने केवळ आशा भोसलेंचंच नव्हे तर बरेली ह्या गावाचंही नाव दूरपर्यंत पोहोचवलं होतं. केवळ ह्या गाण्यामुळे आणखी एक विशेष गोष्ट घडली ती म्हणजे बरेलीच्या ह्या गावाच्या मध्यवर्ती भागात ह्या गाण्याची आठवण म्हणून चक्क एक झुमका उभा केला गेला.

ह्या गाण्याबद्दलची आणखी एक अशी खरीखोटी आठवण सांगितली जाते ती म्हणजे ह्या गाण्यापासून स्फूर्ती घेऊन मराठीत ‘बुगडी माझी सांडली गं जाता सातार्‍याला’ हे गाणं आकाराला आलं. ही आठवण सांगणार्‍यांच्या मते हिंदीतला झुमका मराठीत बुगडी झाला आणि मराठीतही तो प्रचंड भाव खाऊन गेला. गीतकार हसरत जयपुरींच्या बाबतीतलीही एक अशीच गंमतीदार आठवण सांगण्यासारखी आहे. ते आणि शंकर-जयकिशन ह्या संगीतकार जोडीतले जयकिशन एका रम्य संध्याकाळी फिरायला बाहेर पडले. फिरता फिरता त्या दोघांना एका रंगीतसंगीत हॉटेलात जाण्याचा मूड आला. हॉटेलात शिरता शिरताच एक नर्तिका त्यांना दिसली. त्या नर्तिकेचं वेगळेपण हे होतं की ती नृत्य सादर करत असताना तिने तिच्या देहावर लखलखत्या दिव्यांच्या माळा परिधान केल्या होत्या. त्या दिव्यांच्या माळा आपल्या अंगावर मिरवत ती एका गाण्यावर आपलं नृत्य पेश करत असल्याचं हे दृश्य हसरत जयपुरी आणि जयकिशन, दोघांनाही नावीन्यपूर्ण वाटत होतं. दोघांनीही हॉटेलात आपली जागा पकडली आणि ते त्या नर्तिकेच्या नृत्याचा आस्वाद घेऊ लागले. ते संपूर्ण गाणं संपताच जयकिशनना एक कल्पना सुचली. त्यांनी हसरत जयपुरींना हळूच कानात काही सांगितलं, म्हटलं, ‘ हे बघ हसरत, आपण आता जे ‘प्रिन्स’ नावाच्या सिनेमासाठी संगीत करतो आहोत त्यात आपण एक जे गाणं करतो आहोत त्यात जवळ जवळ असंच दृश्य असणार आहे, तेव्हा ही नर्तिका डोळ्यांसमोर ठेवून तसं गाणं लिहून मला दे. पुढचं मी बघतो.’

ती संध्याकाळ, ती रात्र संपली. जयकिशन आणि हसरत जयपुरी, दोघंही त्या हॉटेलातून बाहेर पडले. आपापल्या घरी गेले. दुसर्‍या दिवशी हसरत जयपुरींनी जे शब्द जयकिशनना सांगितले ते होते – बदन पे सितारे लपेटे हुए, वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाये. जयकिशन त्या शब्दांवर अक्षरश: फिदा झाले. त्यांनी त्या शब्दांना अशी दिलखेचक चाल लावली की ती ऑल टाइम ग्रेट ठरली. त्या गाण्याचा अंतरा तर मुखड्यापेक्षा धडाकेबाज केला. आजच्या काळातही हे गाणं लोकांनी लक्षात ठेवलं आहे. आजच्या तरूण पिढीलाही हे गाणं फेर धरायला लावतं इतकी झिंग ह्या गाण्यात आजही टिकून आहे.

‘श्री 420’ च्या वेळचा असाच एक किस्सा. ‘प्यार हुवा, इकरार हुवा हैं’ ह्या गाण्याचा मुखडा आणि अंतरा शैलेद्रंनी लिहून दिला. त्याच्या मुखड्याची चाल शंकरनी लावली आणि तो मुखडा लक्षात घेऊन जयकिशननी अंतर्‍याची चाल बांधली. ते गाणं म्हणजे हिंदी सिनेमातलं अजरामर पाऊसगाणं. मुखडा आणि अंतर्‍याच्या त्या चाली जेव्हा राज कपूरनी ऐकल्या तेव्हा ते इतके खूश झाले की त्यांनी तिथल्या तिथे छत्री मागवली. नर्गिस तिथे होतीच. ते त्या गाण्याच्या चालीवर नर्गिससोबत नाचले. कारण त्या गाण्याचं संपूर्ण दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं. हे गाणं ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट सिनेमाच्या काळातलं असलं तरी ते आजच्या रंगरंगिल्या काळावरही आपली चिरंतन छाप सोडून गेलं आहे.

असो, तर रम्य गाण्यांच्या रम्य आठवणी आज जाग्या झाल्या आणि त्या सांगाव्याशा वाटल्या.