घरफिचर्ससारांशपुरुषभानाकडून माणूसपणाकडे

पुरुषभानाकडून माणूसपणाकडे

Subscribe

आपण पोसत असलेली मर्दानगीची, पुरुषत्वाची संकल्पनाच इतकी विषारी आहे की, मर्द म्हणजे काहीतरी अशक्यप्राय अवास्तव क्षमता असलेला कुणीतरी सुपर हिरो. आणि मग मर्द म्हणून मिळालेली ही सत्ता, ताकद आणि त्याचा गर्व टिकवण्यासाठी आणि आपली मर्दानगी सिद्ध करण्यासाठी हवं ते कसंही मिळवणं, मोठमोठे पराक्रम करण्याचं ध्येय ठेऊन ते पूर्ण करणं आणि लोकांची स्तुती आणि कौतुक मिळवणं इतकंच मर्यादित होतं. आणि जर ही विषारी मर्दानगी जोपासली नाही तर काय बाईसारखा रडत, मूळमुळत बसलाय अशी टीका सहन करावी लागते. ही टीका म्हणजे पुन्हा एकदा मर्दानगीच्या केंद्रावरच घाला. आणि नकार म्हणजेसुद्धा असाच मुळावर घाला करणारी घटना.

मागच्या महिन्यात 26 ऑक्टोबरच्या दिवशी हरयाणातल्या एका मुलीची प्रेमसंबंधाला नकार दिला म्हणून भर रस्त्यात गोळी घालून हत्या केली गेली. तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवणार्‍या आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकणार्‍या तरुणाने त्या प्रस्तावाला मिळालेल्या नकाराची प्रतिक्रिया म्हणून ही गोळी चालवली. याच वर्षीच्या जून महिन्यात उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या दोन दिवसांआधी एका कार्यक्रमात स्वतःच्याच घरात मुलीवर आणि तिच्या वडिलांवर गोळ्या चालवून त्यांना ठार मारलं गेलं. कारण पुन्हा तेच, प्रेमाला नकार! 2005 मध्ये दिल्लीच्या भर बाजारात लक्ष्मी अग्रवालच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकून तिला उध्वस्त करण्याचं स्वप्न पाहणार्‍या तरुणाची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहितीची आहे. त्याचंही कारण तेच, प्रेमाला नकार! अशा घटनांची यादी करायला घेतली तर एकाहून एक प्रकारे तरुण मुलींना, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना, जवळच्या माणसांना त्रास दिल्याच्या, ठार मारल्याच्या घटना सरसर समोर येतील. पण अशा घटना ऐकून आताशा काळजात चर्र होत नाही, तात्पुरतं वाईट वाटतं आणि त्याचं समर्थन शोधात आपण स्वतःलाच समजावतो इतकी उदासीनता ह्या अशा हिंसेच्या घटनांबद्दल यायला लागलीय. मानसशास्त्राच्या भाषेत ह्याला compassion fatigue म्हणतात. पुन्हा पुन्हा त्याच त्याच स्वरूपाच्या घटना एकाहून एक अधिक क्रूरतेने पाहताना, ऐकताना असा fatigue नाही येणार तर काय येणार?

खरं पाहिलं तर माणूस म्हणून प्रत्येकाच्या आत खोलवर कुठेतरी नकाराचं भय, असुरक्षितता बसलेली असते. नाकारलं जाणं म्हणजे माणूस म्हणून आपल्या क्षमतांवर प्रश्न उपस्थित होणं हे समीकरण पक्कं आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही नकाराला सामोरं जावं लागत असलं तरीसुद्धा एका नकाराच्या बदल्यात पुरुषांची इतकी आग आग होते की, त्याची परिणती थेट अशा टोकाच्या हिंसेत होते हा मुद्दा अजूनही तसाच आणि तितकाच धारदार आहे. नकार सहन झाल्याने त्यातून येणारी पुरुषांची हिंसकता हा जितका मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे तितकाच तो समाजशास्त्रीय नजरेतून बघण्याचा मुद्दासुद्धा आहे.

- Advertisement -

नकारातून जन्माला येणार्‍या हिंसाचाराच्या घटना भारतात दिवसेंदिवस खूप वाढत आहेत. NCRB (National Crime Record Bureau) च्या अहवालानुसार भारतात खून आणि हत्या होण्याच्या पहिल्या तीन कारणांमध्ये नकाराचा बदला म्हणून होणार्‍या हत्या जास्त आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश या प्रमुख चार राज्यांमध्ये अशा हत्यांचे प्रमाण खूप वाढते आहे. आपल्या आजूबाजूला आरडाओरडा करत तथ्य सांगणारी माध्यमं या घटनांकडे तात्पुरते गुन्हे म्हणून पाहत वरवरची माहिती आपल्यापर्यंत पोहचवतात, पण हा मुद्दा इतका सोपा आणि सरळ नाही आणि म्हणून गुन्हेगारीकडे पाहण्याच्या सर्वसामान्य नजरेतून याकडे पाहता येणार नाही. नकाराच्या बदल्यात हिंसक झालेल्या पुरुषांकडे पाहताना आपल्याला समाज म्हणून आपल्याच आत डोकवावे लागेल.

लहानपणापासूनच घरात, शाळेत, आजूबाजूच्या वातावरणात बायका, मुली ह्यांच्यासोबत होणारा भेदभाव, मुलगा आणि मुलगी ह्यांच्यात नकळतपणे घरात केलेली दुजाभावाची वागणूक, वडील-आजोबा आईला-आजीला देत असलेली दुय्यम वागणूक मुलांच्या मनात स्त्रियांना मान द्यायचा नसतो हा भाव लहानपणीच तयार करतात. घरातल्या सगळ्या पुरुषांना मिळणारा दिला जाणारा आदर आणि मिष्किलपणे बायकांची नेहमी खिल्ली उडवण्याची घरातल्या पुरुषांना असलेली सवय बायका मूर्ख, बावळट आणि वेंधळ्या असतात आणि पुरुष हुशार, बुद्धिमान असतात आणि म्हणून पुरुष बायकांची त्यांच्या मर्जीविरुद्ध चेष्टा मस्करी करू शकतात असा विचार मनात ठसावतात. मग मोठं होत असताना ह्याच मूर्ख असलेल्या बायका आपलं काम करून देण्यासाठी, सेवा करण्यासाठी अर्थात आपल्याला म्हणजे पुरुषांना सर्व्ह करण्यासाठी असतात हे निरीक्षणातून पक्कं होतं. आणि मग जसंजसं बायका वस्तू असतात हे कुठेतरी पटायला लागतं तसतसं मालक म्हणून त्या वस्तूची मालकी कुणाकडे तरी जाऊन तिची रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा मालकावर म्हणजे पुरुषावर असते हे कळत जातं. येते. बायका सेवा असतात, वस्तू असतात आणि त्या सेवेचा आपल्याला गरज असेल तसा उपभोग घेता येऊ शकतो हे गृहीतक इतकं पक्कं मनात बसतं की, नंतर हाच पुरुष मोठं होऊन कितीही आधुनिक आणि एकविसाव्या शतकाचं लेबलं लावलेलं आयुष्य जगात असला तरी, मी भेदभाव करत नाही, स्त्रीपुरुष समानता मानतो असं म्हणत असला तरी जेव्हा वस्तू म्हणून ओळख असलेली एखादी बाई, मुलगी आपल्या ‘मागणी’ला नकार देते तेव्हा त्या पुरुषातला मालक जागा होतो. वस्तूला तर चॉईस नसतो, वस्तूला अधिकार नसतो. आपला मालक घेईल तो निर्णय तिने मान्य करायचा असतो हे इतकं पक्कं भिनलेलं असतं की, अशावेळी विचार करणारी सगळी इंद्रियं बधीर होऊन आत दडलेला आणि लहानपणापासून रुजवून ठेवलेला पुरुष जागा होतो. आधीपासूनच मुलगा असल्याने घरात आणि आजूबाजूच्या वातावरणाने हवं ते विनासायास मिळण्याची सवय लावलेली असते आणि मग कधीच नकार ऐकायची सवय नसलेल्या पुरुषाला तो नकार म्हणजे त्याच्या पुरुषत्वावर झालेला वारच वाटतो. पुरुष म्हणून त्याच्या क्षमतांवर घेतलेला संशय वाटतो. आणि ह्या सगळ्याची परिणती मग त्याच्या प्रतिक्रियेत येणार्‍या हिंसेतून होते. बर्‍याचदा आपल्या आत असा हिंसक पुरुष दडलेला आहे ह्याची साधी जाणीवसुद्धा ह्या पुरुषांना नसते, पण आपल्याच सामाजिकीकरणाने आपल्या आत दडपलेला हा पुरुष एकदा बाहेर आला की, त्याचं कुठलंच नियंत्रण आपल्याकडे उरत नाही आणि त्याचा शेवट अशा टोकाच्या घटनांमध्ये होतो.

- Advertisement -

आपण पोसत असलेली मर्दानगीची, पुरुषत्वाची संकल्पनाच इतकी विषारी आहे की, मर्द म्हणजे काहीतरी अशक्यप्राय अवास्तव क्षमता असलेला कुणीतरी सुपर हिरो. आणि मग मर्द म्हणून मिळालेली ही सत्ता, ताकद आणि त्याचा गर्व टिकवण्यासाठी आणि आपली मर्दानगी सिद्ध करण्यासाठी हवं ते कसंही मिळवणं, मोठमोठे पराक्रम करण्याचं ध्येय ठेऊन ते पूर्ण करणं आणि लोकांची स्तुती आणि कौतुक मिळवणं इतकंच मर्यादित होतं. आणि जर ही विषारी मर्दानगी जोपासली नाही तर काय बाईसारखा रडत, मूळमुळत बसलाय अशी टीका सहन करावी लागते. ही टीका म्हणजे पुन्हा एकदा मर्दानगीच्या केंद्रावरच घाला. आणि नकार म्हणजेसुद्धा असाच मुळावर घाला करणारी घटना.

नकार फक्त पुरुषांना मिळतात का? तर नाही. स्त्रियासुद्धा अशा अनेक नकारांना सामोरं जातात. किंबहुना पुरुषांपेक्षा जास्तच! पण दोघंही नकाराला वेगवेगळं स्वीकारतात. स्त्रियांना जणू नकार पचवण्याचं ट्रेनिंगच जन्मापासून दिलं जातं आणि पुरुषांचं ह्याच्या अगदी उलट. गुपचूप नकार पाचवणारी, त्याविरुद्ध ब्रसुद्धा न उच्चारणारी स्त्री आदर्श आणि संस्कारी म्हणून पहिली जाते, पण असं करणारा पुरुष मात्र अपयशी आणि बायल्या म्हणून हिणवला जातो. कारण नकार म्हणजे पुरुषांच्या सत्तेला, ताकदीला आणि मर्दानगीला दिलेलं आव्हान असतं हे पितृसत्ता सांगते आणि या आव्हानाला सामोरं जात आपली तीच ताकद आणि समाजातील स्थान वापरून बदला घेतल्यानेच आतल्या पुरुषाचं पुरुषत्व सिद्ध होतं.

हा सगळा कचरा डोक्यात भरण्यात जितका कुटुंब, शाळा अशा काही संस्थांचा वाटां आहे तितकाच आपल्या माध्यमांचा आणि विशेषत: बॉलीवूडचा वाटा आहे. बॉलीवूड सिनेमांनी consent इतका फिका केलाय ज्याने नकार मिळण्याची शक्यताच पुसट होते आणि मिळाला जरी नकार तरी ‘लडकी के ना में भी हा होती है!’ ‘तू हा कर या ना कर तू है मेरी किरण’ किंवा मग लैला काहीही म्हणो पण ‘अपुन बोला तू मेरी लैला’ म्हणत ‘ये उसका स्टाईल होएंगा, होठो पे ना दिल में हा होएंगा’ असंच समजायला भाग पाडतात आणि नकाराच आणि नकार मिळण्याच्या शक्यतेचंच अस्तित्व पुसून टाकतात. आणि मग ह्याने खरंच आजच्या रोमिओंना मुलगी नाही म्हणाली तरी उसके हा होएंगाच वाटतं. आणि जेव्हा तो पूर्ण नकारच आहे हे समजत तेव्हा ते त्यांना त्यांच्या स्त्रियांवर असलेल्या अधिकाराचे उल्लंघन वाटते. आणि मग ‘तू मेरी नही तो किसी और की नही हो सकती’ ह्यातून अशा हिंसक प्रतिक्रिया जन्माला येतात.

हे सगळे साचे आणि समाज पितृसत्तेने दिलेले आहेत. पितृसत्ता जसं स्त्रियांना काय करायचं आणि काय करायचं नाही हे शिकवते तसंच ती पुरुषांनासुद्धा काय करायचं आणि काय करायचं नाही हे ठरवून देते. पुरुषांनीसुद्धा त्यांना ठरवून दिलेली रेष ओलांडली की, ते त्या साच्यात बसणारे ‘पुरुष होत नाहीत आणि पितृसत्ता त्यांच्या पुरुषत्वाचे समर्थन करत नाही. म्हणून जितक्या स्त्रिया आहेत तितकेच पुरुषसुद्धा पितृसत्तेचे बळी आहेत. पितृसत्तेने पुरुषांचंही विद्रुपीकरण केलंय. त्यांनाही एका साच्यात बसण्याचा आग्रह आहे. फरक इतकंच की, त्यांच्या साच्याला सत्तेचा, ताकदीचा सोनेरी मुलामा आहे. आणि या मुलाम्याचा मोहच पुरुषांना आपले प्रिव्हिलेजेस सोडून किंवा निदान ओळखून माणूसपणाकडे जाण्यापासून अडवतो. प्रवास अर्थातच अवघड असणार आहे, पण अवघड प्रवासानंतर मिळणारी माणूसपणाची मंजिल प्रवासाच्या वेदना रिझवणारी आणि आनंदप्रद असेल असेल हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -