गॉडफादर

Behind Great Fortune there is Crime असं फ्रेंच साहित्यिक होनर बायझॅक यांनी म्हटलंय. ते अगदी तंतोतंत लागू पडतं संजय राऊत यांच्या आयुष्यातील घटना आणि घडामोडींना… विशेषत: गेल्या काही वर्षात सामनाचे संपादक, शिवसेनेचा राज्यसभेतील सदस्य किंवा दिल्ली दरबारातला ठाकरेंचा ’संजय’ म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बायझॅक यांच्या तत्वज्ञानाशी मेळ साधणारीच आहे. बरोबर गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये संजय राऊत जे काय घडवत होते ते एका वेगळ्या राजकारणाची नांदीच होती. संजय राऊत आपल्या वयाची साठी साजरी करतायत त्याच वेळी किंबहुना त्याआधीच त्यांच्या सामनाच्या कार्यकारी संपादक पदानं तिशी साजरी केली आहे. दैनिक सामना सारख्या वर्तमानपत्राच्या संपादकपदी तीन दशकं टिकून राहणं हे येरागबाळ्याचं काम नाही. याचं कारण ’सामना’ हे सामान्यांच्या नोंदी पक्षांचं मुखपत्र असलं तरी त्यातली ’पॉलिटिकल व्हॅल्यू’ तेच जाणू शकतात, जे हाडाचे राजकारणी असतात आणि संजय राऊत तसे आहेत. गेली चार दशकांहून अधिक काळ शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळ राहिलेल्या संजय राऊत यांना ठाकरे ब्रॅन्डची व्हॅल्यू नेमकी कळलेली आहे. मग ते राजकारण महाराष्ट्रातलं असू द्या, दिल्लीतलं असुद्यात किंवा सामनातलंही असू द्या. या राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी आपण कसं राहायचं हेच ज्यांना नीट समजतं त्याला संजय राऊत म्हणतात.

गेल्या चाळीस वर्षात संजय राऊत यांच्या भोवती अनेक विशेषणं निर्माण झाली. त्यातलं प्रत्येक विशेषण त्यांना आणि त्यांच्या प्रियजनांना खूपच आवडतं. आता ती विशेषणं गेल्या वर्षभरापासून मागे पडलीत आणि स्वतः संजय राऊत हाच एक ’ब्रँड’ झालाय. एखादी गोष्ट ब्रँड झाली ही बाजारात त्या त्या काळापुरता त्या वस्तूचा, व्यक्तीचा जलवा असतो, बाजारात त्या वस्तूला स्वत:चा असा अहंकारही अजाणतेपणी चिटकून असतो. तुम्ही एखादा ’अ‍ॅपल’चा नवाकोरा आयफोन हाताळा किंवा मर्सिडीजच्या शोरुममध्ये जाऊन नव्यानं लाँच झालेल्या कारच्या मॉडेलवरुन हळूवार हात फिरवला की ब्रॅण्डचं ’अस्तित्व’ तुमच्या लक्षात येईल. संजय राऊत यांचंही तसंच झालंय. वस्तूंचा बाजार ब्रँडची दखल घेतोच तसंच आज राजकीय बाजारात संजय राऊत नावाचा ब्रॅण्ड तयार झाला आहे तो आजतरी दुर्लक्षिता येणार नाही. माझ्यासाठी सांगायचं तर संजय राऊत हा ब्रँण्ड लाँच होताना आणि त्यानंतर तो नावारूपाला येताना मी तो नुसताच पाहिला नाही तर किंचीतसा समजूनही घेतला. खरंतर संजय राऊत कार्यकारी संपादक म्हणून ’सामना’त येण्याआधी मी तिथे रुजू झालो होतो. मी ९ वर्ष सामनात होतो. तिथे अनेक गोष्टींनी विक्रम करण्याची संधी संजय राऊत यांनी मला मिळवून दिली.

सामनाचा कर्मचारी म्हणून संजय राऊतांच्या सहीनं नोकरीत कायम होणारा पहिला, सामनाचा कर्मचारी म्हणून विमान प्रवास करणारा पहिला पत्रकार, रिपोर्टिंगसाठी पहिल्यांदा परदेशी जाण्याचा मान त्यांनीच मला मिळवून दिला. पुढे संपादक विभागातल्या सर्वाधिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी संजय राऊत यांनीच संधी आणि ऊर्जाही दिली. तेच संजय राऊत गेल्या वर्षी याच दिवसांत रोज सकाळी न चुकता आपल्या राजकीय हेक्याचा रतीब घालत होते. त्यांची ती शैली अनेकांना आवडत नव्हती. राजकीय गप्पा आणि चर्चांमधून संजय राऊत हा चेष्टेचा विषय ठरत होते. कारण स्पष्ट होतं सतत “शिवसेनेचा मुख्यमंत्री” हा त्यांचा हेका आणि घोषा आणि सेनेच्या गाठीशी असलेलं तुटपुंजं आमदारांचं संख्याबळ. पण शेवटी त्यांना हवं ते त्यांनी कसं घडवलं ते सार्‍या जगानं पाहिलं. अर्थात राष्ट्रीय राजकारणात बेभरवश्याचे समजल्या जाणार्‍या पवारांवर त्यांनी मातोश्रीला भरवसा ठेवायला भाग पाडलं हे कौतुकास्पदच…यातली एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोण काय म्हणेल याचा विचार राऊत फार काही करत नाहीत. पत्रकारितेत मोठ्या दैनिकाचा विशेषतः महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्तेत संपादक म्हणून जाण्याचा अनेकांचा मानस असतो. सुरुवातीला काही काळ राऊतांनाही तसं वाटायचं, पण शिवसेनेत मिळालेली महत्वाची पदं, सामनाचं सर्वेसर्वापण आणि ठाकरेंशी जवळीक या गोष्टींमुळे हस्तीदंती मनोर्‍यांवर राऊतांनी काट मारली त्याचा त्यांना फायदाच नव्हे तर ’महाजंबो’ लॉटरीच लागलीय आणि उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदानंतर राऊत स्वत:च अंबारीत जाऊन बसलेत.

या सगळ्या त्यांच्या वाटचालीत एक गोष्ट मला निरिक्षण करताना जाणवली ती म्हणजे आपल्या कोणत्या फटक्यांवर आपली हुकूमत आहे आणि तो कधी किती प्रमाणात मारायचा हे या राजकीय पीचवरच्या बॅटसमनला नीट कळलंय. अर्थात मराठा आरक्षणाबाबतचं एखादं प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याचं सोडलं तर त्यांची खेळी निर्दोष आहे. त्यामुळेच की काय ते मोठं मोठं पल्लेदार, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं क्लीष्ट बौध्दिक लिहीत नाहीत. म्हणूनच आपल्याला सुचलं नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील उचलेगिरी केली म्हणून ते तोंडावर पडून बदनामही झालेले नाहीत. पण त्यांच्यावर संपादक म्हणून वादग्रस्त लिहिल्याबद्दल जेवढे खटले सुरू असतील तेवढे कायदेशीर दावे महाराष्ट्रात क्वचितच कुणा संपादकांवर असतील. पत्रकार, संपादक संजय राऊत हे शिवसेना नेते असले तरी ते काही सेनेची मुलुखमैदानी तोफ नाहीत किंवा श्रवणीय वक्तेही नाहीत. पण तरीही ते स्वत:तला ’ठाकरी’ अंश जागवत कॅमेरा समोर जात असतात. साहजिकच घराघरातल्या टिव्हीवर सेनेचा सर्वाधिक दिसणारा चेहरा म्हणून आपल्याला तेच पहावे लागतात. अर्थात याचं टायमिंग जे त्यांना जमतं त्याच्याशी पक्षातल्या इतरांचा दूरदूर पर्यंत संबंध नसतो.

टायमिंग अर्थात वेळेचं व्यवस्थापन याबाबतीत संजय राऊत यांचं कौशल्य वादातीत आहे. मग ते दहा वाजता भांडूपचा ’मैत्री’ बंगला सोडून अकराच्या ठोक्याला सामनात पोचणं असू द्या किंवा आपल्याला अडगळ ठरू शकणार्‍या एखाद्या व्यक्तीचं ’सामना’त रुजू होणं दुसरीकडे वळवणं असू द्या. राऊत वेळ साधण्यात मास्टर आहेत. अचूक वेळ साधण्यासाठी तुमचं खबर्‍यांचं नेटवर्क नीट लागतं आणि गँगवॉर हा आवडीचा आणि अभ्यासाचाही विषय असलेल्या राऊतांकडे हे नेटवर्क नीट आहे. पण त्यातले काही घटक हे माहिती देताना ’ध’ चा ’मा’ करतच राऊतांच्या कानाला लागतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत त्यांनी काही माणसं नक्कीच दुरावलीत आणि दुखावलीतही… हे नक्कीच टाळता आलं असतं. एरव्ही कुणाला दुखावणं किंवा त्रास देणं हा काही संजय राऊत यांचा स्वभाव नाही त्याकरताचा वेळही त्यांच्याकडे नाही. सिग्नलला थांबलेल्या आपल्या गाडीच्या काचांवर टक टक करून खेळणी, झेंडे किंवा फुलं विकणार्‍या गरीब मुलांकडून गरज नसताना त्यांना दोन पैसे मिळावेत म्हणून वस्तू खरेदी करणारे संजय राऊत, युपीएससीची परीक्षा देणार्‍या राज्यातील विद्यार्थ्यांना दिल्लीत निवासाची सोय करून देण्यासाठी खासदार श्रीनिवास पवार यांच्याबरोबर धडपडणारे संजय राऊत किंवा एखाद्या सहकार्‍याच्या पत्नीला कॅन्सरसारखा आजार झालेला असताना त्याला कार्यालयातून पत्नीच्या शुश्रुषेसाठी पूर्ण मोकळीक देऊन सहकार्य करणारा संपादक इतकंच काय पण ज्येष्ठ सहकारी रवींद्र खोत यांच्या आजारपणात त्यांना नियमाबाहेर जाऊन रजा पगार आणि भत्ते व्यवस्थापनाला देणारा कनवाळू संपादक मी पाहिला आहे.

शिशिर शिंदे यांची आई वृद्धापकाळाने गेल्यानंतर तिच्या इच्छेनुसार नेत्रदान केल्यावर भावनाविवश झालेल्या शिशिर शिंदे यांना सगळ्यात आधी आपल्या मिठीत घेऊन, ’शिशिर तुम्ही एकटे नाहीत. हा संजय नावाचा भाऊ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही स्वत:ला सावरा’. असं सांगणारे राऊत किंवा तळहाताच्या फोडा पेक्षाही हळुवारपणे आपल्या आईला सांभाळत तिचा सहवास मिळावा म्हणून आलिशान घराऐवजी भांडुपच्या घरीच आवर्जून येऊन राहणारे कुटुंबियांचे ’बंधू’ या सगळ्या भूमिका मात्र ते नीट जगतात आणि जपतात. त्यांचा मित्र संग्रह थक्क करणारा आहे. अंडरवर्ल्डचे डॉन ते कीर्तनकारांपर्यंत मित्र गोळा करण्यासाठी संजय राऊत पेज थ्री पार्ट्यांमध्ये फिरतायत गप्पा मारतायत असं काही कधी दिसलं नाही. नाही म्हणायला गेल्या काही वर्षात ते बॉलिवूडच्या प्रेमात आहेत. अर्थात ते स्वत: चित्रपट निर्मितीत उतरलेत हे त्याच एक कारण आहे. पण त्यांनी माणसं नीट जपली. छोटी-मोठी अर्थात त्यांना आपलीशी वाटणारी… मग तो एखादा उद्धवजींच्या डोक्यात बसलेला चित्रपट दिग्दर्शक अभिजीत पानसे असू द्या किंवा आदित्य ठाकरे यांनी नजरेआड केलेला परळचा सुनिल उर्फ बाळा कदम असो. राऊतांनी तुम्हाला आपलं म्हटलं की विरोध कोणाचा आहे हे फार ’मॅटर’ करत नाही. त्यांना निरुपद्रवी असलेल्यांना त्यांनी वाटेल ती मदत केल्याचं मी पाहिलं आहे.

मग त्यांच्या लिखाणात दर्जा नसू द्या की त्यांच्यात नेतृत्वगुण नसू द्यात. ती व्यक्ती फक्त संजय राऊतांच्या मर्जीतली असायला हवी. त्यांना न आवडणार्‍या त्रासदायक वाटणार्‍या व्यक्तीला ते काहीही देत नाहीत. शक्य झाल्यास वातावरणातला ऑक्सिजनही काढून घेतील. पण शक्यतो कुणाशी अमानवी देखील वागत नाहीत. सामनातील एका सहकार्‍यावर त्यांची खप्पा मर्जी होती. त्याला त्यांनी काहीच मिळू दिलं नाही. नोकरीत अक्षरशः पिदवला. त्या सहकार्‍याने मुलीच्या लग्नाचा दिवस-मुहूर्त मात्र राऊतांना विचारूनच 6 महिन्यांपूर्वी ठरवला. नेमकं त्यांना दिल्लीत खूपच महत्त्वाचं काम लागलं. या सहकार्‍याबरोबर अनेकांनी राऊत लग्नाला येणार नाहीत अशा पैजाही घेतल्या. पण त्या मुलीच्या हळदी समारंभाचं टायमिंग साधत संजय राऊत त्या सहकार्‍याच्या बीडीडी चाळीतल्या घरी पोहचले. सगळ्यांनाच ते धक्का देणारं होतं आणि सुखावणारंही…

संजय राऊत हे शिवसेना नेते असले तरी त्यांचा एक गुण मात्र थेट उद्धव ठाकरें सारखा मिळताजुळताच आहे. तो म्हणजे विरोधकांना शांत डोक्याने वाटेला लावणं. राऊत कॅमेरासमोर जरी तिखट वाटत असले तरी आपल्या विरोधकांचा अडसर दूर करण्यामध्ये मात्र त्यांच्यातला ’कोल्ड ब्लडेड’ राजकारणी मला अचंबित करत आलेला आहे. आपल्याला भविष्यात जड होऊ शकेल असा संजय निरुपम सारखा एखादा प्रतिस्पर्धी घरी पाठवणं असू द्या किंवा महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी ते शांत डोक्याने करत असतात. राज्याच्या ’ऑपरेशन सेना सीएम’ नंतर त्यांना मोठी बक्षिसी मिळाली असती. कदाचित त्यांचा लाडका लहान भाऊ सुनील राऊत कॅबिनेट मंत्रीही झाला असता. पण भाजपने मग सगळं बाजूला ठेवून ’राऊत मिशन’ हाती घेतलं असतं हा धोका ओळखून त्यांनी प्रचंड कुटुंबवत्सल असूनही आपल्या कुटुंबियांच्या आकांक्षांना मुरड घातली.

त्याच वेळी पंचतारांकित हॉटेलात जाऊन ज्याला मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवलं त्या देवेंद्र फडणवीसांबरोबर दीड-दोन तास चर्चा करण्याचं कामंही मोठ्या बखुबीनं करतात. हे सगळं करत असताना त्यांचे इतर राजकीय पक्षांमध्ये असलेले मैत्रीसंबंधही उत्तम जपतात आणि जोपासतात. तसा प्रयत्न मात्र पक्षात किंवा सामनात ( त्यांच्या परवानगीशिवाय)जर दुसर्‍या कोणी केला तर त्याचं नामोनिशाणही मिटवतात…अगदी थंड डोक्याच्या गॉडफादर सारखं…ते खासगीत म्हणतात, मला माझा शत्रू आणि हितशत्रूही २०० किमीच्या परिघात नको असतो… आणि ते जसं बोलतात आणि जगतातही मारिओ पुझोच्या ’गॉडफादर’ सारखं… तुम्हाला त्यांचं काय व्हायचंय? मित्र, शत्रू की हितशत्रू यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं…अनेकांच्या या ’गॉडफादर’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!