Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश हिरो, देव आणि नेते

हिरो, देव आणि नेते

रजनीकांत यांची ‘मानवी क्षमतांच्या पल्याड कामगिरी करू शकणारा’ अशी पडद्यावरील प्रतिमा असली, तरी वास्तवात त्यांना मानवी मर्यादा आहेतच आणि त्याची रास्त जाणीव असल्याचे त्यांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिले. ‘देव सांगतो आणि मी करतो’ अशा अर्थाचा त्यांचा ‘अरुणाचलम’ या चित्रपटातील संवाद लोकप्रिय आहे. त्याच्याशी इमान राखत त्यांनी आपला आजार हा दैवी संकेत होता, असे सांगत राजकारणातले पाऊल मागे घेतले. रजनीच्या या निर्णयामुळे भविष्यातील संघर्षनाट्यही संपुष्टात आले. अभिजन वर्गात अधिक लोकप्रिय असलेले अभिनेते कमल हासननेही राजकारणात प्रवेश करत, रजनीकांत यांच्याशी हातमिळवणी करण्याचा मार्ग खुला ठेवला होता. द्रमुक अथवा अद्रमुक या दोन्ही पक्षांनी निराशा केली आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांचीही आता पंचाईत होणार आहे.

Related Story

- Advertisement -

दक्षिणेतील राज्यांमध्ये सिनेमा आणि राजकारण हातात हात घालून चालतात असेच आजवरचे चित्र आहे. तमिळ, तेलगू, कन्नड, मल्ल्याळम या सिनेमातील हिरो आणि हिरोइन म्हणजे दक्षिणेकडे जणू देवी-देवता… सिनेमाच्या पडद्यावर ते दिसताच देव स्वर्ग सोडून जणू भूतलावर आल्याचा त्यांना भास होतो. मग तो किंवा ती पडद्यावर येताच एकच गलका होतो. आरत्या ओवाळल्या जातात, फुले, हार, तांदूळ, पैसे हार जे मिळेल त्याचा पडद्यावर भक्तिभावाने वर्षाव केला जातो… त्यांचा देव आलेला असतो! पिपाण्या, ढोल, ताशे वाजवले जातात. यासाठी त्यांना पोलीस, थिएटरचे मालक, डोअरकिपर कोणी म्हणजे कोणी अटकाव करू शकत नाही. सकाळी उपवास धरून, आपल्या हिरोचा मोठा फोटो करून त्याची वाजतगाजत मिरवणूक काढून प्रेषक थिएटरला आलेले असतात. सिनेमा सुरू होताच एकाच वेळी प्रेषक पडद्यावरच्या हिरोप्रमाणे अंगात आल्यासारखा बेफान होतो. तो हसतो, रडतो, चिडतो, जोरजोरात ओरडतो… गुद्दे मारल्याचा अभिनय करतो. भावना व्यक्त करण्याची तो एकही संधी सोडत नाही. आपली दुःख ते एम.जी. रामचंद्रन, गणेशन, एम.करुणानिधी, जयललिता, रजनीकांत, कमल हासन, मामुटी, मोहनलाल, विजय बाबू या सार्‍यांच्या ठायी ठेवून स्वतः वरचा भर कमी करतात आणि तेव्हा हिरोंचे माणूसपण जाऊन त्याला देवरूप आलेले असते.

मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. माटुंग्याच्या खालसा कॉलजमध्ये शिकत असताना आमच्या कॉलेजच्या शेजारी असणार्‍या अरोरा टॉकीजमध्ये हा थरार अनुभवला आहे. दाक्षिणात्य मित्रांबरोबर त्यांच्या देवांचे सिनेमा बघताना तो थरारक अनुभव आजही डोळ्यासमोरून हलत नाही. संवाद कळत नसतील तरी भावनांचा तो एखाद्या धबधब्यासारखा वाहणारा प्रपात चिंब भिजवून टाकणारा होता. हेच पडद्यावरील देव मग राजकीय नेते होतात तेव्हा पुन्हा एकदा दक्षिणेतील जनप्रवाह मतदार होऊन त्यांना डोक्यावर नाचवतात. हेच पुन्हा एकदा होणार होते, पण त्याला ब्रेक लागला आणि एका नव्या नेत्याचा उदय 2021 मध्ये बघण्याची संधी हुकली. अर्थातच हा हिरो म्हणजे सर रजनीकांत. थलायवा. द बॉस! तो काही करू शकतो. राजकारणातही त्याने अशक्य ते शक्य करून दाखवले असते, पण नियतीच्या मनात ते नव्हते. असे तो स्वतःच सांगतो तेव्हा त्याच्यावर प्रेम करणारे करोडो चाहते ती देववाणी समजून शांत होतात. आपल्याला तर एखादा रजनीचा सिनेमा सुरू असल्याचा भास होतो…

- Advertisement -

तामिळनाडूच्या राजकारणात लोकप्रिय कलावंताची जागा रिकामी होती. सुपरस्टार रजनीकांत ही कमतरता भरून काढेल या अपेक्षेने, ते राजकारणात सक्रिय कधी होतात, याकडे मतदार डोळे लावून बसला होता. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे रजनीनाथ नभी उगवलादेखील; परंतु प्रकृतीच्या काळ्या ढगांनी त्याचा प्रकाश रोखला. त्याचबरोबर या चंद्राच्या प्रकाशात आपली वाटचालही शीतल होईल या भाजपच्या अपेक्षांनाही ग्रहण लागले. जानेवारीत आपण पक्षाच्या राजकीय वाटचालीविषयी सविस्तर बोलणार आहोत, अशी घोषणा रजनीकांत यांनी अलीकडेच केली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या ज्या बातम्या येत होत्या त्या लक्षात घेता, ‘रजनी मक्कल मंद्रम’ या त्यांच्या पक्षाचे भवितव्य स्पष्ट झाले होते.

‘मानवी क्षमतांच्या पल्याड कामगिरी करू शकणारा’ अशी त्यांची पडद्यावरील प्रतिमा असली, तरी वास्तवात त्यांना मानवी मर्यादा आहेतच आणि त्याची रास्त जाणीव असल्याचे त्यांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिले. ‘देव सांगतो आणि मी करतो’ अशा अर्थाचा त्यांचा ‘अरुणाचलम’ या चित्रपटातील संवाद लोकप्रिय आहे. त्याच्याशी इमान राखत त्यांनी आपला आजार हा दैवी संकेत होता, असे सांगत राजकारणातले पाऊल मागे घेतले. रजनीच्या या निर्णयामुळे भविष्यातील संघर्षनाट्यही संपुष्टात आले. अभिजन वर्गात अधिक लोकप्रिय असलेले अभिनेते कमल हासननेही राजकारणात प्रवेश करत, रजनीकांत यांच्याशी हातमिळवणी करण्याचा मार्ग खुला ठेवला होता. द्रमुक अथवा अद्रमुक या दोन्ही पक्षांनी निराशा केली आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांचीही आता पंचाईत होणार आहे. एकट्याने लढण्याचे राजकीय बळ नाही आणि दोन्ही प्रस्थापित पक्षांसोबत जायचे नाही, अशा कात्रीत ते आता सापडले आहेत.

- Advertisement -

जयललिता यांच्या निधनानंतर, भाजपने अण्णाद्रमुकचे पालकत्व घेण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे. काही काळापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री पळनीस्वामी आणि त्यांच्या आधी काही काळ मुख्यमंत्री राहिलेले अण्णाद्रमुक पक्षाच्या फुटीर गटाचे नेते ओ. पनीरसेल्वम यांच्यात राजकीय तडजोड घडवून आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला होता, असे सांगितले जात असे. ओ. पनीरसेल्वम हे या तडजोडीनंतर उपमुख्यमंत्री झाले; मात्र सध्याची भाजपची चाल पाहता पनीरसेल्वम हेही नाराज झाले असून, ‘आमच्याशी राजकीय खेळ करण्याच्या फंदात पडू नका,’ असा इशारा भाजपला देत आहेत. एकीकडे, अण्णाद्रमुकच्या नेत्यांना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतानाच, रजनीकांत यांच्या रूपाने तमिळनाडूत तिसरी शक्ती उभी राहते आहे का, याची चाचपणी भाजप गेली काही वर्षे सातत्याने करीत आहे, हे लपून राहिलेले नाही.

पंतप्रधानांनी रजनीकांत यांच्यावर वेळोवेळी उधळलेली स्तुतिसुमने किंवा घेतलेल्या त्यांच्या भेटी, हा सारा याच राजकारणाचा भाग होता; मात्र रजनीकांत यांच्या राजकारणावर कितपत भिस्त ठेवता येईल, याबाबत भाजपलाही शंका असावी. रजनीकांत हे आजही तामिळनाडूत सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते असले आणि त्यांच्या चाहत्यांचे हजारो क्लब जगभर पसरले असले, तरी त्यांना आपली लोकप्रियता आजवर राजकारणात परावर्तित करता आलेली नाही. पुढेही ती हमखास करता येईल, याची काहीही शाश्वती नाही. अशा वेळी, रजनीकांत यांनाही हाताशी ठेवायचे आणि दुसरीकडे, अण्णाद्रमुकच्याही डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवायचा, असा दुहेरी खेळ राजधानीतून खेळला जात आहे. पळनीस्वामी आणि पनीरसेल्वम यांचा ताजा त्रागा हा नेमका त्याच्याच विरोधात आहे आणि तो चूक आहे, असे म्हणता येणार नाही.

तामिळनाडूत सध्या अण्णा द्रमुकचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाने भाजपशी आघाडी केली. 2021 मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी केली, तरी त्या पक्षाला आम्ही सत्तेत वाटा देणार नाही आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सध्याचे मुख्यमंत्री पळनीस्वामी हेच असतील, असे त्या पक्षाने अलीकडेच जाहीर केले. त्यानंतर भाजपला रजनीकांत यांचा आधार वाटू लागला होता. सत्ताधार्‍यांविरुद्धचा असंतोष आणि रजनीकांत यांची लोकप्रियता यांच्या वाहत्या गंगेत आपल्याला हात धुवून घेता येईल, असे भाजपला वाटत होते. रजनीकांत यांच्या घुमजावमुळे त्यांच्या या मनोरथाचा मार्ग भरकटला. भाजपला कर्नाटक वगळता दक्षिणेत फार यश मिळालेले नाही. देशाचा जवळपास 20 टक्के भूभाग व्यापून असलेला दक्षिण प्रदेश हा शतप्रतिशतचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भाजपला दूर होता, तो जवळ येण्याचा एक मार्ग आता बंद झाला.

कर्नाटकमध्ये घोडेबाजार करून सत्ता मिळवली तरी केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप जीवाचे रान करत आहे. मात्र या द्रविडी राज्यांमध्ये भाजपला सध्या तरी प्रवेश दिसत नाही. भाषिक अस्मिता अतिशय तीव्र असणारे दाक्षिणात्य जनप्रवाह प्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान देतील, पण आपल्या भाषा, प्रांत, संस्कृतीशी तडजोड होऊ देणार नाहीत. अशाच अस्स्मितेचा देव असलेला रजनी आज भाजपच्या हातून निसटला आहे. रजनी असता तर कमल हासनची ताकद वाढली असती. पण आज रजनीने राजकीय पटलावरील आपले पाऊल मागे घेतल्यावर कमलची ताकद आपोआप कमी झाली आहे. मुख्य म्हणजे भाजप आणि कमलचे कधी जमणार नाही, हे आणखी एक वास्तव आहे. हिरो देव आणि नेते यामधून दक्षिणेवर राज्य करण्याचे भाजपचे मनसुबे नजीकचा काळात तरी शक्य दिसत नाहीत.

- Advertisement -