घरफिचर्ससारांशहिंदी पडद्यावरील होळीचे रंग !

हिंदी पडद्यावरील होळीचे रंग !

Subscribe

‘शोले’मध्ये बसंती आणि विरुच्या प्रेमाचे रंग होळीतूनच उलगडतात. गब्बरचा रामगढवरील मोठा हल्लाही होळीच्या दिवशीच होतो. शोलेचं संपूर्ण कथानक होळीच्या रंगात रंगून पडद्यावर दाखल झालं होतं. हिंदी पडद्याने होळीचे अनेकविध रंग अनेकदा उधळले आहेत. चित्रपटाच्या कथानकाचा टर्निंग पॉइंट म्हणून होळीचे प्रसंग समोर येतात. मदर इंडिया, शोले, दामिनी, डर ही काही मोजकी उदाहरणं. हिंदी पडद्यावरील चित्रपटांच्या कथानकांना रंगवण्यासाठी होळीचे रंग उधळण्याची ही परंपरा अलिकडच्या पद्मावतपर्यंत आजही सुरू आहे.

‘शोले’मध्ये होळीचे रंग उधळण्यासाठी जीपी सिप्पींनी ‘होली के दिन दिल खिल जाते है’ या गाण्यासाठी चित्रपटात खास जागा केली होती. गब्बरच्या एन्ट्रीतल्या कितने आदमी थे…संवादाचा शेवट टेकाडावर बंदूक घेऊन बसलेल्या सांभाला कब है होली…अशी विचारणा करून झाला होता. गब्बरकडून ठाकूरच्या कुटुंबाची हत्या झाल्यावर ‘राधा’च्या जगण्यातले उडून गेलेले रंग दाखवण्यासाठी होळीचे प्रसंग पडद्यावर एकामागोमाग येत राहतात. तर बसंती आणि विरुच्या प्रेमाचे रंगही होळीतूनच उलगडतात. गब्बरचा रामगढवरील मोठा हल्लाही होळीच्या दिवशीच होतो. शोलेचं संपूर्ण कथानक होळीच्या रंगात रंगून पडद्यावर दाखल झालं होतं. हिंदी पडद्याने होळीचे अनेकविध रंग अनेकदा उधळले आहेत. चित्रपटाच्या कथानकाचा टर्निंग पॉइंट म्हणून होळीचे प्रसंग समोर येतात. मदर इंडिया, शोले, दामिनी, डर ही काही मोजकी उदाहरणं…

यश चोप्रांच्या ‘डर’मध्ये राहुल (शाहरुख), किरन (जुही चावला) हिला होळीच्या रंगात रंगवण्याचं ठरवून तिच्या घरासमोर आपल्या लावाजम्यासह ढोल बडवत दाखल होतो. राहुल किरनच्या चेहर्‍यावर गुलाल लावून पळून जातो. त्यावेळी सुनील (सन्नी देओल)ने केलेला पाठलाग चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारा ठरतो. ऐंशीच्या दशकात यशराज फिल्म्सच्याच ‘मशाल’मध्येही होळीचे रंग पडदाभर उधळले गेलेले असतात. जब्बार पटेलांच्या ‘जैत रे जैत’ मध्ये हृदयनाथ मंगशेकरांकडून ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली…’ गाण्याच्या स्वरातून ‘होली आयी, होली आयी… देखो होली आयी रे’…ही धारावीच्या डोगरभट्टीतली होळी खेळली जाते. सामान्य पत्रकाराच्या हतबल विद्रोहाचं कथानक असलेल्या मशालमध्ये श्रमिक कामगारांच्या वस्तीमध्ये खेळलेल्या होळीचा प्रभाव फिरोज खानच्या दयावानमध्येही पडलेला असतो. ‘हर रंग कच्चा रे कच्चा…म्हणत त्याच धारावीच्या वस्तीत पुन्हा होळी खेळली जाते. ऐंशीच्या दशकात होळीच्या गाण्यात नायिकांना छेडण्याचे प्रकार तुलनेने कमीच होते. शोलेमध्ये वीरूकडून गाण्यात हेमाच्या बाबतीत असे प्रकार धमेंद्रने जाणीवपूर्वक घडवल्याचे किस्से आजही सिनेमाध्यमातल्या पुस्तकांतून चर्चिले जातात.

- Advertisement -

१९७५ मध्ये जख्मी रिलिज झाला. दिल में होली जल रही है…म्हणत सुनील दत्त हातात डफली घेऊन मुंबईतल्या गल्लीबोळात कुणालातरी शोधतोय. त्याच वर्षी शक्ती सामंतांचा अमानुष पडद्यावर दाखल झाला होता. या चित्रपटातल्या मधू चौधरी या नायकाच्या पडद्यावरील अमानुषपणामागे गैरसमजातून (आरती) शर्मिलाने नाकारलेले उत्तम कुमारच्या प्रेमाचे कथानक होते. या चित्रपटातही होळीचे बेरंग झालेले नायकाचे जगण्यातून उडालेल्या होळीचे रंग विद्रोहाच्या कथानकातून समोर आले. शक्ती सामंतांनी होळीच्या रंगांचा वापर जीपी सिप्पींच्या शोलेआधीही कथानकासाठी उत्तमपणे केला होता. १९७० मध्ये आलेल्या ‘कटी पतंग’मध्येही आशा पारेखला पांढर्‍या साडीत पडदाभर वावरायला लावून बेरंग तिच्या जीवनाचे कथानक साकारले होते. त्यानंतर आज ना खेलेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली…म्हणत नायक राजेश खन्ना आशाच्या पांढर्‍याफटक जीवनात रंग भरायला पुन्हा येतो. यश चोप्रांच्या प्रेमत्रिकोणांचा सिलसिला पुन्हा सुरू झाल्यावर चोप्रांनी होळीचा रंग पुन्हा पडद्यावर आणला, रंग बरसे… या होळीच्या गाण्यातून चित्रपटाचं कथानक प्रेम आणि नातेसंबंधातल्या धोकादायक वळणावर जातं. भांगेची नशा, भिजलेल्या नायक नायिकांच्या प्रेमरंगांची रोमँटिक उधळण करण्यापलिकडे होळीच्या गाण्यांचे रंग गेले नाहीत. यश चोप्रांच्या मोहब्बतेपर्यंत जवळपास सर्वच चित्रपटात होळीची पार्श्वभूमी कथानकाला वळण देण्यासाठीच होती.

नव्वदच्या दशकात राजकुमार संतोषींच्या ‘दामिनी’मध्ये होळीचे रंग कमालीचे भीतीदायक भेसूर झाले होते. होळीच्या दिवशी घरकाम करणार्‍या उर्मिवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या खटल्यात निर्ढावलेला वकील इंद्रजित चढ्ढा (अमरिश पुरी) दामिनीची उलटतपासणी करतोय. यावेळी बलात्काराच्या आरोपींचे रंगवलेले कमालीचे भीतीदायक चेहरे कोर्टात दाखल होतात. होळीचे रोमँटीसिझमचे रंग संतोषींनी अचानक भीतीदायक करून टाकले. एका अंधारलेल्या गुहेत अत्याचाराचे रंग अंगावर सोसणार्‍या भेसूर रंगात नखशिखांत भिजलेली उर्मी दामिनी झालेल्या मिनाक्षीच्या स्वप्नात येते. या चित्रपटातही होळीचा वापर कथानकाला भेसूर वळण देण्यासाठीच झाला होता. असंच भेसूर वळण दामिनीनंतर शहारुखच्या ‘बाजीगर’मध्येही होतं. दिलीप ताहील या मदन चोप्रा नावाच्या पातळयंत्री माणसाकडून विकी मल्होत्रा (शहारुख) च्या कुटुंबाच्या फसवणुकीची सुरुवात ही होळीच्या दिवसापासूनच होते.

- Advertisement -

शाहरुख खानने होळीचे प्रेमरंग अनेकदा उधळले. दिवानामध्ये पतीचा मृत्यू झालेल्या पांढर्‍याफटक कपड्यातल्या दिव्या भारतीवर शहारुख गुलाल उधळून आपल्या प्रेमाचं आर्जव करतो, त्यानंतर ‘दिवाना’च्या कथानकातलं दुसरं प्रेमप्रकरण या प्रसंगापासूनच पुढं पडद्यावर साकारलं जातं. सुभाष घईंच्या हिरो, रामलखन, दिलीप कुमार (विरू) आणि राजकुमार (राजू) या संवादांच्या बादशहांची घईंच्या ‘सौदागर’मधली गावभर जपलेली दुष्मनी होळीच्या दिवशीच संपुष्टात येते. हिंदी पडद्यावरील चित्रपटांच्या कथानकांना रंगवण्यासाठी होळीचे रंग उधळण्याची ही परंपरा अलिकडच्या पद्मावतपर्यंत आजही सुरू आहे.

होळीचे पडद्यावरील गीतरंग

जारे हट नटखट (नवरंग)
होली आयी रे (पद्मावत)
ओ गंगा मैया (माहिर)
जोगीजी धिरे धिरे (नदीया के पार)
आवो रे आवो (नदीया के पार)
लहू लग गया ( राम लिला)
होली आई रे कन्हाई ( मदर इंडिया)
एक लडकी ने मुझ पे ( मुकाबला)
बलम पिचकारी ( येह जवानी है दिवानी)
होली खेले रघुवीरा ( बागबान)
लेट्स प्ले होली ( वक्त)
सोनी सोनी आँखो वाली ( मोहब्बतें)
होली रे (मंगल पांडे)
रंग से हुयी (गुलाब गँग)
आला होळीचा सण (लय भारी)
होळीचा रंग धुवून टाक (माऊली)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -