सावधान तुम्ही ट्रोलच्या कक्षेत आहात…!

वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा आजही विश्वास वाटतो. ती मुद्रित तर असतेच, पण कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात आपण ती देतोय याचे भान ठेवून ती छापली जाते. मुख्य म्हणजे त्याला नियमांची चौकट आहे. म्हणून आजही लोकांचा या पत्रकारितेवर विश्वास आहे. मात्र टीव्ही वाहिनीच्या जगताने पत्रकारांवरील विश्वासाला नख लावले... ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली बातमीचा आशय-विषय मारत नेत तिचा चेहरा हरवत नेला. नंतरच्या वेबसाईट आणि यु ट्यूब चॅनेलने कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधताना पत्रकारितेचे निकष पायदळी तुडवले आणि पत्रकारांची किंमत सब घोडे बारा टक्के झाली... सोबत मोबाईलमुळे जग हातात आल्याने सोशल मीडियाच्या नावाखाली तर नंगा नाच सुरु झालाय. ठरवून बदनाम करण्याचं ते हुकमी अस्त्र झालय. भुलभुलैयाच्या या जगाचा हा पंचनामा...

Social Media

राजकीय क्षेत्रात ट्रोलर्स आणि ट्रोलिंगने मोठा धुमाकूळ घातला आहे. विरोधक सत्ताधार्‍यांवर व सत्ताधारी विरोधकांवर रोज हल्ला चढवतात. जे सुशिक्षित आणि संघटित आहेत त्यांचे वेगळे कार्यालय, हजारो पगारी कर्मचारी आहेत. जे देशभर दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. उद्या कोणत्या राजकीय व्यक्तीला ट्रोल करायचे हे आजच्या रात्री ठरवले जाते. दोन ते तीन ओळींच्या दहा ते पंधरा पोस्ट किंवा मेसेज तयार करून त्या व्यक्तीच्या संदर्भात फोटोसह पाठवल्या जातात. देशभरातील पेड (प्रती पोस्ट 40 पैसे) कार्यकर्ते त्या पोस्टमध्ये थोडाफार बदल करून वारंवार ट्वीट आणि रिट्विट करतात. तसेच फेसबुकवर व्हायरल करतात. त्यातील एखाद्या पोस्टला उत्तर दिले की, प्रतिहल्ला म्हणून गलिच्छ शिव्यांचा भडीमार सुरू होतो. यातून मग कुणीही सुटत नाही. त्या संबंधित व्यक्तीला बदनाम करण्याचे षङ्यंत्र इथे नियोजन करून रचले जाते.

अश्मयुगातील मानवाने प्रगती करायला सुरुवात केली. दगडापासून हत्यारे बनवली, लाकडापासून शिकारीसाठी भाले तयार केले. त्यानंतर चाकाचा शोध लावला व दळणवळणाचा विकास झाला. अशा प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत-करत मानवाने स्वतःला सिद्ध केले. विकासाचा पाया रोवला गेला. आणि त्यातूनच वरचढ होण्याच्या इर्षेपाई एकमेकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. टोळी करून राहणार्‍यांनी इतरांवर हल्ले केले. जो जिंकला तो राजा झाला. त्याचे पाठीराखे त्याच्या बाजूने आले. एकमेकांचे उणेदुणे काढता-काढता एक दुसर्‍याचे विरोधक होण्यास वेळ लागला नाही. आज तंत्रज्ञानाने विकसित एकविसाव्या शतकात प्रत्यक्ष एकमेकांवर हल्ले होत नसले तरी नवमाध्यमाद्वारे पुढारलेले लोक समाज माध्यमांचा वापर करुन सुधारित टोळीयुद्ध लढतात किंवा लढायला भाग पाडतात. यालाच आज आपण सोशल मीडियाच्या भाषेत ‘ट्रोल’, ‘ट्रोलींग’ असे संबोधतो. ट्रोल हा शब्द सोशल मीडियाच्या संदर्भात असून, त्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर केलेली आक्षेपार्ह टीका, अपमानजनक भाषा वापरून एकदम खालच्या दर्जाचा विनोद, धमकी किंवा अर्थहीन कमेंट असा होतो. आणि जे लोक अशाप्रकारे कमेंट करतात त्यांना ‘ट्रॉल्स’ म्हणतात. जे एक वापरकर्ता असतात. इंस्टाग्राम,फेसबुक ट्विटर इत्यादी सोशल मीडियाच्या विविध अ‍ॅप आणि साइटवर भेट देऊन उत्तेजक पोस्ट, फोटो किंवा कमेंट करतात. आणि या कृतीला जो बळी ठरतो तो ट्रोल होतो.

भारतात सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर 2012 किंबहुना 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाला. 2014 ची लोकसभा निवडणूक सोशल मीडियाच्या आधारावर आणि त्याचा खुबीने वापर करून जिंकली असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. काँग्रेस पक्षाशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे, कार्यकर्त्यांची अनागोंदी, राजकीय धोरणातील अनिश्चितता, आणि काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी (आज संबंध सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांनी त्यांना पप्पू ठरवले.) या सर्वांचा अभ्यास करून भाजपाने सोशल मीडियावर विशिष्ट अशी मोहीम राबवली. या सर्वांना बळी पडला तो मतदार… विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेत येणार्‍या भाजपा सरकारने ट्रोलिंग हीच आपली जाहिरात मानली व मोठ्या फरकाने लोकसभा निवडणूक जिंकली. तेच समीकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. राजकीय दृष्टीने आज सोशल मीडियाचा वापर ज्याप्रमाणे होत आहे त्याप्रमाणे नैतिकता मात्र हरवत चालली आहे. विरोधकांवर हल्ला चढवताना अत्यंत खालच्या पातळीवरचे मीम्स आणि विनोद तयार करून सोशल मीडियावर त्याला खतपाणी घातले जात आहे. एखाद्या व्यक्तीने विरोध केलाच तर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात व अशा सोशल मीडिया वापरकर्त्याना सत्तेत असणारे फॉलो करतात. अशावेळी लोकशाही असणार्‍या देशात राहात असताना आपण नेमके कोणत्या मार्गावर आहोत..? हा प्रश्न पडतो.

राजकीय क्षेत्रात ट्रोलर्स आणि ट्रोलींगने मोठा धुमाकूळ घातला आहे. विरोधक सत्ताधार्‍यांवर व सत्ताधारी विरोधकांवर रोज हल्ला चढवतात. जे सुशिक्षित आणि संघटित आहेत त्यांचे वेगळे कार्यालय, हजारो पगारी कर्मचारी आहेत. जे देशभर दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. उद्या कोणत्या राजकीय व्यक्तीला ट्रोल करायचे हे आजच्या रात्री ठरवले जाते. दोन ते तीन ओळींच्या दहा ते पंधरा पोस्ट किंवा मेसेज तयार करून त्या व्यक्तीच्या संदर्भात फोटोसह पाठवल्या जातात. देशभरातील पेड (प्रती पोस्ट 40 पैसे) कार्यकर्ते त्या पोस्टमध्ये थोडाफार बदल करून वारंवार ट्वीट आणि रिट्विट करतात. तसेच फेसबुकवर व्हायरल करतात. त्यातील एखाद्या पोस्टला उत्तर दिले की, प्रतिहल्ला म्हणून गलिच्छ शिव्यांचा भडीमार सुरू होतो. यातून मग कुणीही सुटत नाही. त्या संबंधित व्यक्तीला बदनाम करण्याचे षङ्यंत्र इथे नियोजन करून रचले जाते. या सर्व घडामोडींवर त्यांच्या वेगळ्या कार्यालयातून बारीक लक्ष असते. एक प्रकारे त्यांना रसद पुरवली जाते. मोदी सरकारच्या विरोधात प्रश्न विचारला म्हणजे तो गुन्हेगार आहे. भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्याला देशद्रोही ठरवून लगेच प्रमाणपत्र बहाल केले जाते. या आणि अशा ट्रोलिंगमुळे अनेकांनी सोशल मीडिया वापरणे सोडले असले तरी ट्रोल होणे कमी झालेले नाही.

सद्य:स्थितीत या सर्व गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही आणि मतसुद्धा व्यक्त करू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण केली जाते. यातून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभसुद्धा सुटलेला नाही. अनेक नामवंत पत्रकारांना जीवे मारण्याच्या, त्यांच्यावर कौटुंबिक हल्ला करण्याच्या, कुटुंबातील स्त्रियांवर बलात्कार करण्याच्या धमक्या रोजच्यारोज मिळत आहेत. यातून आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस तरी कसा सुटेल. या सर्वांच्या पाठीशी कोण आहे. आज, उद्या किंवा आठवड्यात कोणाला टार्गेट करायचे, कोणत्या प्रकारच्या कमेंट असायला हव्यात, या सर्वांना पैसा कोण पुरवतो. याला राजकीय पाठबळ कोणाचे आहे. या सर्व गोष्टींचे संशोधन स्वतः अनुभवून लेखिका स्वाती चतुर्वेदी यांनी ‘आय एम ट्रोल’ या पुस्तकात मांडले आहे. कोण कशा प्रकारे ट्विट करतो, त्याला फॉलो कोण करतो, आणि योजना कशी आखली जाते हे उदाहरणांसह आणि सर्वांच्या ट्विटसह त्यांनी त्या पुस्तकात मांडले आहे. अशा ट्रॉल्स टोळीमध्ये संघटित आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारे तरुण आहेत. जे नामवंत आयटी कंपनीतले इंजिनियर आहेत. त्यांना पैसा देऊन आयटी सेल कार्यरत ठेवला गेलाय. जो फक्त सावज शोधतो आणि त्यांची शिकार करतो.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री घरीच बसल्याचे फोटो आणि व्यंगात्मक टिपणीसह शेरेबाजी सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. उत्तरादाखल प्रतिहल्ला सुद्धा होतो. कंगना राणावत आणि महानगरपालिका यांच्यातला वाद थेट आघाडी सरकारपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळाला. तर कधी इतर सेलिब्रिटीजना घेऊन यावर वेगळा रंग चढवला जातो. या आठवड्यात सर्वाधिक प्रमाणात दस्तुरखुद्द राज्यपाल महोदयांना सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी धारेवर धरले. आणि हॅशटॅग सुरू केला. एसआयएमसेक्युलर.. घटनात्मक पदावरील व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही सेक्युलर कसे..? हा प्रश्न जर विचारत असेल तर या देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे तपासावे लागेल. म्हणूनच #yesIamsecular या मोहिमेत राज्यातील सर्वच तरुण एकवटले आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ही एक चांगली बाब आहे. अन्यथा प्रवाहासोबत जाणारा तरुण फक्त सत्ताधार्‍यांचे गोडवे गाण्यात धन्यता मानतो. असा अनागोंदीचा कारभार सुरू राहिला तर सांस्कृतिक दहशतवादाची पाळेमुळे एवढी घट्ट रोवली जातील की त्यातून बाहेर पडणे अवघड होईल. यासाठी सत्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे आणि हे नेटकर्‍यांना समजणे तितकेच क्रमप्राप्त….

या सगळ्यात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे तो महिलांना..ज्या राजकारण प्रसारमाध्यमे, साहित्य, अभिनय आणि इतर क्षेत्रात काम करतात. एखाद्या महिलेने स्वतःच्या फेसबूक वॉलवर अथवा ट्विटरवर पोस्ट केली की, लचके तोडावे त्याप्रमाणं तिच्या पोस्टवर अर्वाच्च आणि गलिच्छ भाषेत कमेंट केल्या जातात. 2014 ते अलीकडच्या काळात अ‍ॅमनेस्टी इंडियाने केलेल्या राजकीय अभ्यासानुसार इतर कोणापेक्षाही महिलांना जास्तीत जास्त ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागला. त्यातही मुस्लीम महिला राजकारणी असेल तर विचारायलाच नको. याच अहवालात भाजपा नेत्या शाजिया इल्मी यांनी सांगितल्याप्रमाणे मुस्लीम पुरुषांपेक्षा आम्हा महिलांना राजकीय काम करताना ऑनलाइन छळ आणि ट्रोलिंगची खूप मोठी किंमत मोजावी लागते. यात काँग्रेसच्या सोशल मीडिया संयोजक हसीबा अमीन यांचा अनुभवसुद्धा सारखाच आहे.

वृद्ध पुरुषांसोबतचे लैंगिक संबंधाचे फोटो, बलात्काराच्या धमक्या आणि अशा अनेक गोष्टींचा सामना रोज या महिलांना करावा लागतो. यामुळे आज महिला स्वतःला विचारत आहेत की आपण सोशल मीडियावर खरंच व्यक्त व्हायला हवं का..? लोकशाही देशात त्यातही जिथे प्रत्येकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो, त्याच देशात असे प्रकार होत असतील तर आपण फार मोठ्या अग्निदिव्यातून जात आहोत. अमेरिका, रशिया, इंग्लंड युरोपमधील इतर देशातसुद्धा महिलांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. पण भारतापेक्षा ते प्रमाण कमी आहे. आणि जर ती महिला भारतातली अभिनेत्री (सेलिब्रिटी) असेल तर तिला इतरांपेक्षा जास्त त्रास सहन करावा लागतो. स्वरा भास्कर, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण, कंगना राणावत यांना अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर ज्याप्रमाणे ट्रोल केले गेले ती तर हद्दच होती. या सर्व प्रकरणांमध्ये 19 ते 29 वयोगटातील तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त होता, काही प्रकरणात तर 19 वर्षाखालील मुलांचा सहभाग पाहायला मिळाला. अशा काही तरुणांना वेगवेगळ्या शहरातून सायबर गुन्हेगारीच्या कायद्यान्वये अटक करण्यात आले. पण पुन्हा तेच ट्रोलिंगचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. लैंगिक छळ आणि बलात्काराच्या हिंसात्मक विचारांचा जन्म या माध्यमातून होतोय हे थांबणे तितकेच महत्वाचे आहे.

देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रतिमा मलिन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. एकामागून एक चालवला जाणारा ट्रेंड, त्यात एखादा हॅशटॅग वापरून चालवलेली ट्रोलिंगची मोहीम समाजस्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहे. सायबर गुन्हेगारी अंतर्गत युजर्सच्या आयडीवर गुन्हा नोंदवलादेखील जातो, पण गुन्हेगार मात्र सापडत नाही. नेमकी ही मोठी अडचण आपल्या देशात आहे. याचे कारण मल्टी नेटवर्क, वेगळ्या देशाचा आयपी ड्रेस, किंवा व्हर्च्युअल नेटवर्क.. जे वेगवेगळ्या ठिकाणचे नेटवर्क दाखवते. त्यामुळे नेमकी कार्यप्रणाली कोणत्या ठिकाणावरून सुरू आहे याचा मागोवा घेता येत नाही. म्हणून आपल्या जवळ असणारा एखादा ट्रॉलर्स तोच आहे का..? याची ओळख पटवता येत नाही. गुन्हेगारांना पकडण्याचे विकसित तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे या प्रकाराला आळा घालने सध्यातरी अवघडच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा अमेरिका हा देश अशा व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करतो. (जरी ट्रम्प प्रशासन याला खतपाणी घालत असले तरी..) सोशल मीडियाद्वारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी तिथे घेतली जाते, पण भारतात आजही राजकीय पुढारी, वेगवेगळ्या कंपन्यांचे मालक, मोठ्या हुद्यावर असणार्‍या व्यक्ती, रोजच्या रोज नको ते बरळतात. त्यांच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद होत नाही. झालीच तर कारवाई होत नाही. आणि अशा बिनबोभाटपणे वागणार्‍या व्यक्तींना देशातील तेवढ्याच ताकदीच्या पक्षाचे सर्वेसर्वा फॉलो करतात. एवढेच नाही तर आपल्या नेत्याचा प्रोफाइल फोटो लावून एकप्रकारे ते स्वतः बचावाचा मार्ग निवडतात.

ट्रोल करणार्‍यांचे प्रकार लक्षात घेतले असता पहावयास मिळते की, सुरुवातीला मनोरंजनाचा भाग म्हणून काही युजर्स या ठिकाणी भेट देतात. थोड्या कालावधीनंतर मात्र ते एवढे सक्रिय होतात की रोज काही ना काही मुद्दा घेऊन एक तर स्वतः ट्रोल होतात किंवा इतरांना ट्रोल करतात. केवळ गमतीदार गोष्टींवर भाष्य करणे ही काही लोकांची विशेषत: तरुणांची सवय बनली आहे. त्यांना व्यंगात्मक टिपणी करायची असते पण अनेक वेळा ते मर्यादा ओलांडतात. (तसे करण्यास भाग पाडले जाते) मानसिक ताणतणाव असेल आणि कंटाळवाणे वाटत असेल, तर काही लोक इतरांना ट्रोल करतात व बघता बघता स्वतः मानसिक दडपण अनुभवतात. आणखी एक मुद्दा येथे सांगावासा वाटतो तो म्हणजे निराशेचा.. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर आपल्या आवडीचा खेळ असेल आणि खेळाडू चांगला खेळला नसेल तर त्याला टार्गेट केले जाते.

समजा क्रिकेटमध्ये कोहलीने चांगली खेळी साकारली नाही तर अनुष्का शर्माला समोर ठेवून त्याला ट्रोल करणे. असेच पाठीमागच्या आठवड्यात धोनीने खेळपट्टीवर चांगले रन्स काढले नाही म्हणून त्याच्या पत्नीसह मुलीला गलिच्छ भाषेत बोलणारे ट्रॉल्स आपण पाहिले. यात सहभागी असणारे ट्रॉल्स हे अल्पवयीन असतात आणि ट्रोल करताना विषय सोडून आपले मत मांडतात. त्याचा वाईट परिणाम इतर अनेकांवर होत असतो याचे भान आज तरुणांनी ठेवले पाहिजे. आपण पाहतो की ट्विटर आणि फेसबुक हे वापरण्यात सोपे आणि मोफत आहेत. स्वतःचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी म्हणजेच स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी विषयाला सोडून विधाने केली जातात, आणि यातून सवंग लोकप्रियता मिळवली जाते. या आभासी जगात अशी लोकप्रियता मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय.

भारतात ट्रॉलिंग हा मोठा विषय आहे. सोशल मीडिया वापरणार्‍यांचे प्रमाण पाहता अनेकांनी हिंसात्मक आणि ट्रोलिंगद्वारे गुंडगिरीचा अनुभव घेतला आहे. किंवा त्यात सहभागी झाले आहेत. अनेक किशोरवयीन मुले साथीदारांच्या दबावामुळे त्यांची खाजगी गोष्ट सार्वजनिक करतात. आणि याचा त्रास सहन न झाल्यामुळे दरवर्षी 20 टक्के मुले आत्महत्या करतात. असा ‘प्यू रिसर्चचा अहवाल’ सांगतो. यात ट्रोलिंग चा परिणाम पुरुषांवर देखील होतो. ब्रिटिश थिंक टँक डेमोस यांच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, पुरुषांना सोशल मीडियावर जेवढ्या प्रमाणात अपमानजनक संदेश मिळतात त्याच्या तीन चतुर्थांश पुरुष त्याच भाषेत उत्तर देतात. सोबतच एलजीबीटी समुदायातील व्यक्तींना तर रोजच्यारोज मानहानीकारक संदेश पाठवले जातात. त्यांनासुद्धा तेवढाच त्रास सहन करावा लागतो.

अवतीभोवतीचे वातावरण पाहता ट्रोल होण्यापासून आपण वाचू शकत नाही असेच वाटते. कारण वर उल्लेख केला त्याप्रमाणे मानवाच्या उत्क्रांती पासूनच ट्रोलिंग सुरू झालेलं आहे, फक्त फरक एवढाच की साधने बदलली आहेत. त्या साधनांचा वापरही तितकाच वाढला आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितल्याप्रमाणे भावना क्रमविकासातून निर्माण होतात, जीवन जगत असताना प्रयत्नामागचा आवेग टिकवायचा असेल तर सुखाची भावना आवश्यक आहे. पण जे वर्तन जीवन धोक्यात आणते, त्या वर्तनासोबत दुःख येत असते. म्हणून मला वाटते की आपण आपले सामाजिक वर्तन बदलायला हवे. सम्यक विचारांचा वापर करून आपण इतरांप्रती सोशल मीडियावर आदर व्यक्त केला तर तंत्रज्ञानाच्या युगात आपण बुद्धीने पुढारलेले असू. अखेर ट्रोलिंग हा व्यवसायाचा भाग झाला आहे. मोठमोठ्या कंपन्या आणि राजकीय पक्ष स्वतःचा विकास करण्यासाठी ट्रोलिंगला आपल्या जाहिरातीचा भाग बनवत आहेत. यात सेलिब्रिटी, राजकारणी सर्वसामान्य लोक, युवक-युवती व महिलासर्वांचा सहभाग वाढतोय. कोणत्याही काळात एखाद्या व्यक्तीला अपमानजनक वागणूक देणे परवडणारे नाही. ट्रोलिंगपासून ब्लॉक आणि अनब्लॉक करून सुटका मिळणार नाही. यासाठी सुज्ञ युवकांनी तंत्रज्ञानाच्या युगातील काही मूल्ये पाळावी लागणार आहेत. लोकशाही मार्गाने सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. अन्यथा या तंत्रज्ञानाच्या युगात आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावून बसू.. आणि सर्वांच्याच मनात एक भीती घर करून राहील. ती भीती म्हणजे ही की, सावधान तुम्ही ट्रोलच्या कक्षेत आहात…!

–धम्मपाल जाधव