घरफिचर्ससारांशमेड इन इंडिया मिलिंद

मेड इन इंडिया मिलिंद

Subscribe

मिलिंद हा कुठल्याही ठराविक चौकटीत बसणारा माणूस नाही. तो नेहमीच इतरांपेक्षा काही तरी वेगळे करण्याच्या इराद्याने जीवनाला सामोरे गेलाय. त्यात आपल्याला किती यश मिळाले किंवा कुठल्या अपयशाला सामोरे जावे लागलं याची त्याने कधीच पर्वा केली नाही, तो आपल्या मस्तीत जगत आलाय. मात्र फिटनेसचे महत्व आपल्याला पटवून घ्यायचे असेल तर मिलिंदकडे पाहावे लागेल. आपल्या आईच्या व्यायामाचे फोटो पाठवताना तो महिलांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करत असतो.

माहीमला ‘आपलं महानगर’च्या कार्यालयाखाली एकदा मी आणि आमचे सहकारी चहा घेत होतो. अचानक समोरून एक उंचपुरा, पिळदार आणि देखणा माणूस चालला होता. एकाच वेळी आमची सर्वांची नजर त्याच्यावर गेली. बिनबाह्याचे टी शर्ट आणि त्यामधून डोकावणारी त्याची भरदार छाती, दणकट बाहू आणि विस्तारलेले खांदे. अर्ध्या सुळसुळीत चड्डीच्या बाहेर डोकावणार्‍या मजबूत मांड्या… पण, केस आणि दाढी पूर्ण पिकलेली. तांबूस गोरा रंग असला तरी डोळे, गाल आणि हनुवटीची ठेवण एखाद्या परदेशी मॉडेलसारखी. माहीम-दादरला का बरं हा फॉरेनर फिरतोय असं वाटत असतानाच : अरे, हा तर मिलिंद सोमण! भारताचा पहिला सुपर मॉडेल, राष्ट्रीय जलतरण खेळाडू, मॅरेथॉन धावपटू आणि बॉलिवूड अभिनेता…आमची सर्वांची त्याला भेटायची इच्छा असताना तो चालण्याच्या शर्यतीत उतरल्यासारखा भरभर निघून गेला. थोडी आजूबाजूला चौकशी केली असता तो या भागात नेहमी धावतो, चालतो. शिवाजी पार्कला राहत असल्यानं त्याचा या परिसरात वावर असतो. एकदा त्याला ठरवून भेटायचं, त्याच्याशी बोलायचं असं मनोमनी ठरवले असताना ‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा दिसला…

यावेळी मोदी यांनी मिलिंदशी बोलताना गंमत केली. ‘सोशल मीडियात तुमच्या वयाची फार चर्चा होत असते. तुमचं खरं वय काय आहे?’ यावर मिलिंदचं उत्तर दिलं, पण वय न सांगता. तो म्हणाला : माझ्या आईचं वय 81 वर्षे असून या वयातही ती खूप फिट आहे. माझ्यासाठी ती आदर्श असून मलाही तिच्यासारखं फिट राहायचय. यावेळी स्वतः मोदी यांनी मिलिंदच्या आईचा पुशअप करतानाचा व्हिडीओ आपण पाच वेळा पाहिल्याचं सांगितलं. कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शूटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे 55 वर्षीय मिलिंद. फिटनेसमुळे सतत चर्चेत असणारा मिलिंद आता वेगळ्या कामामुळे चर्चेत आलाय. मिलिंद आता नैसर्गिक पद्धतीने शेती करत असून मुंबईपासून दूर जात त्याने आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, कोबी, मुळा अशा विविध भाज्या आणि पिके घेतलीत.

- Advertisement -

आताच नाही नेहमीच मिलिंद या ना त्या प्रसंगामुळे चर्चेत राहिलाय. तो 23 वर्षांचा असताना त्याला पहिल्या प्रोजेक्टसाठी मोठी रक्कम मिळाली होती. 1989 मध्ये त्याला पहिल्या जाहिरातीसाठी काही तासात काही फोटो शूट करण्यासाठी तब्बल 50 हजार रूपये मिळाले होते आणि ही रक्कम ऐकून तो हैराण झाला होता. कारण पॉकेटमनीसाठी त्यावेळी तो एका हॉटेलमध्ये काम करायचा. नव्वदीच्या दशकात मिलिंद आणि मधू सप्रे यांनी टफ शूजच्या जाहिरातीसाठी मॉडलिंग केले होते. या जाहिरातीसाठी मिलिंद आणि मधूने चक्क न्यूड फोटोशूट केले होते. नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर जाहिरात विश्वात मिलिंदच्या नावाचा मोठा दबदबा होता. देशी आणि परदेशी कंपन्या आपल्या उत्पादनाच्या जाहिरातींसाठी त्याला हवी ती रक्कम मोजण्यास तयार होते.

मधू सप्रेबरोबर त्याच्या प्रेम प्रकरणाची चर्चा असताना त्याने दुसर्‍याच मुलीबरोबर लग्न केलं आणि ते फिस्कटल्यानंतर त्याने दोन वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा 26 वर्षांनी छोट्या असलेल्या अंकिता नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि पुन्हा एकदा तो प्रकाशात आला. तो तिच्या सहवासातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. मिलिंदने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तो त्याच्या पाठीवर 12 किलो वजन ठेवून 2 डिग्री सेल्सिअस थंड पाण्यात चालताना दिसला आहे. हा फोटो शेअर करताना तो सांगतो :आइसलँडमध्ये 10 दिवसांपूर्वी डाइव्हच्या तयारीसाठी 12 किलो बॅगपॅकसोबत अंडर वॉटर रनिंग. आपले ध्येय समजा आणि प्राधान्य ठरवा. तुमचा उद्देश पूर्ण होईल. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या फोर मोअर शॉट्स प्लीझ या वेबसीरिजमध्ये झळकला होता.

- Advertisement -

मिलिंदवर Made in India : A Memoir by Milind Soman with Roopa Rai हे पुस्तक लिहिलं गेलं असून या पुस्तकात मिलिंदच्या आयुष्याशी निगडित अनेक खासगी गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. याच पुस्तकात मिलिंदने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही स्वत:चे विचार मांडलेत ‘त्या काळात आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, माझा संघाच्या शाखेत प्रवेश. आपला मुलगा शाखेत गेल्याने तो शिस्तप्रिय बनेल, त्याचा वळण लागेल, व्यायामाचे महत्त्व कळेल आणि विचारांना योग्य दिशा मिळेल, यावर माझ्या बाबांचा ठाम विश्वास होता. माझ्या आजुबाजुचे अनेक तरूण शाखेत जात. पण, शाखेत प्रवेश केल्यानंतर बराच काळ मी प्रतिभावान लोकांच्या मागे लपलो. मला भीती वाटे. शिवाय मला न विचारता, माझ्या मर्जीविरोधात माझ्या आईवडिलांनी मला शाखेत पाठवलेय, याचा मला संतापही यायचा.’ ‘आज मी माध्यमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या गोष्टी वाचतो, पाहतो तेव्हा काहीसा चकीत होतो.

दर आठवड्याला दर दिवशी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत शाखेत काय शिकवले जायचे, हे आजही मला आठवते. आम्ही खाकी पॅन्टमध्ये मार्च करायचो. योगाभ्यास, व्यायाम करायचो. गाणी गायचो. संस्कृत वचनांचे पठण करायचो. शाखेतील सर्व मुलांना हिल स्टेशनवर ट्रेकिंगसाठी नेले जायचे. आम्ही शरीराने तंदुरूस्त राहावे, शिवाय चांगले नागरिक बनावे म्हणून हे सगळे केले जायचे. शाखेत गेलेल्यांचे हिंदूंबद्दलचे विचार काय होते, हे मला माहीत नाही. पण हो, त्यांनी त्यांचे कुठलेही विचार आमच्यावर लादले नाहीत. माझे वडील संघाचा भाग होते आणि हिंदू असल्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. यात अभिमान करण्यासारखे काय आहे, हे मला कधीच कळले नाही. पण याबद्दल तक्रार करण्यासारखेही काहीही नव्हते’.

मिलिंद हा कुठल्याही ठराविक चौकटीत बसणारा माणूस नाही. तो नेहमीच इतरांपेक्षा काही तरी वेगळे करण्याच्या इराद्याने जीवनाला सामोरे गेलाय. त्यात आपल्याला किती यश मिळाले किंवा कुठल्या अपयशाला सामोरे जावे लागलं याची त्याने कधीच पर्वा केली नाही, तो आपल्या मस्तीत जगत आलाय. मात्र फिटनेसचे महत्व आपल्याला पटवून घ्यायचे असेल तर मिलिंदकडे पाहावे लागेल. आपल्या आईच्या व्यायामाचे फोटो पाठवताना तो महिलांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करत असतो. आज माणसाकडे पैसा आहे, पण सुख नाही. शरीराच्या तक्रारी करत तो जगत असतो आणि जगण्यासाठी जेवणापेक्षा अधिक गोळ्या खातो. आता चाळीशी नंतरच लोकांना शरीर थकून गेल्यासारखे वाटते. सततच्या धावपळीमुळे शारीरिक व्याधींबरोबर तो मानसिकरित्या थकून गेलाय. मग प्रश्न उरतो तो माणूस आपल्या तनमनाची मोठी किंमत मोजून एवढी पळापळ का करतोय. त्यावेळी समोर उभा राहतो मिलिंद. दिवसात किमान एक तास स्वतःच्या शरीराला द्या. ते फिट तर तुम्ही हिट! हे सांगत असताना मिलिंद धावतो, चालतो, पोहतो, व्यायाम करत असतो. आज मिलिंद 55 वयाचा असला तरी तरुण वाटतो. आणखी तीन दशकानंतर तो असाच दिसेल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -