घरफिचर्ससारांशकरोनाला नारीशक्तीची टक्कर!

करोनाला नारीशक्तीची टक्कर!

Subscribe

कोणत्याही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. त्याचा परिणाम कमी जास्त प्रमाणात समाजातील सर्व घटकांवर होतो. संघर्षाच्या काळात समाजातील स्त्री आणि पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होतो. आरोग्यासंदर्भात बोलायचे तर जागतिक महामारी आणि साथीच्या रोगाच्या वेळीही स्त्री-पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होतो. ‘करोना’ संकटाची ही सुरुवात आहे. यामुळे विविध क्षेत्रांवर होणार्‍या संभाव्य परिणामांचा अंदाज अजून आपल्याला यायचा आहे. आपलं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. महामारीला तोंड देण्यास सज्ज होताना त्यामध्ये स्त्रियांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा अंतर्भाव केला तर ही तयारी अधिक सामर्थ्यशाली बनू शकते.

करोनाच्या संकटाशी चार हात करताना डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि तत्सम कर्मचारी जीवाची बाजी लावताय. प्रत्येकजण आपापल्यापरीने या आजाराला हरवण्यासाठी पूर्ण क्षमतेने लढतोय. त्याचा दृश्य परिणाम आता दिसू लागलाय. हा आजार काही प्रमाणात का असेना नियंत्रणात येताना दिसतोय. लॉकडाऊनच्या काळात देशाचे अर्थकारण पूर्णत: खिळखिळे झाले आहे. सोशल डिस्टन्सने अपसूक माणसांमधले अंतर वाढले. मानसशास्त्रीय दृष्ठ्याही लॉकडाऊनमधील एकटेपणानं आजाराचं रूप धारण केलेय. दूरचित्रवाणी, समाज माध्यमे आणि घरगुती गप्पांमध्ये सातत्याने ‘करोना एकं करोना’च असल्याने अनेकांना नैराश्यानं ग्रासले. लॉकडाऊनमुळे शाळांना काहीशी आधीच सुट्टी मिळाल्याने बालकांच्या आनंदाला पारावर उरला नाही, तर उद्याने आणि खेळाची मैदानेही ‘लॉक’ केल्याने त्यांचा मूड ‘डाऊन’ झाला नसेल तर नवल. एकूणच लॉकडाऊनने माणसाच्या जीवनशैलीवर अभूतपूर्व बदल केला. त्यातही स्त्री आणि पुरुषांवर त्याचा परिणाम वेगवेगळा झालेला दिसतो.

खरं तर कोणत्याही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. त्याचा परिणाम कमी जास्त प्रमाणात समाजातील सर्व घटकांवर होतो. संघर्षाच्या काळात समाजातील स्त्री आणि पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होतो. आरोग्यासंदर्भात बोलायचे तर जागतिक महामारी आणि साथीच्या रोगाच्या वेळीही स्त्री-पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होतो. ‘करोना’ संकटाची ही सुरुवात आहे. यामुळे विविध क्षेत्रांवर होणार्‍या संभाव्य परिणामांचा अंदाज अजून आपल्याला यायचा आहे. आपलं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. महामारीला तोंड देण्यास सज्ज होताना त्यामध्ये स्त्रियांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा अंतर्भाव केला तर ही तयारी अधिक सामर्थ्यशाली बनू शकते.

- Advertisement -

समाजातील सर्वांत असुरक्षित मानले जाणारे घटक, स्त्रिया व मुले यांना कायमच अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. नुकत्याच एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले की आणीबाणी, आर्थिक संकट, साथीचे रोग यांनी वेढलेल्या या टाळेबंदीच्या काळात स्त्रिया व लहान मुले यांच्यावरील हिंसाचाराचे प्रमाण दुपटी-तिपटीने वाढले आहे त्याचप्रमाणे झिका, इबोला, प्लेग अशा साथींच्या रोगाचा इतिहास असे सांगतो की, आपत्तीचा पहिला दूरगामी परिणाम हा कायम गरीब, वंचित, कष्टकरी, कामगार आणि सर्वात जास्त स्त्रियांवर पडलेला दिसतो. कोविड-१९च्या प्रसाराला मिळणार्‍या प्रतिक्रियेमध्ये असुरक्षित नागरिक आणि स्त्रियांवर याचा जो वेगवेगळा परिणाम होणार आहे त्याची दखल घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.

जगभरात आरोग्यसेवा असो की सामाजिक सेवा क्षेत्र यांमध्ये काम करणार्‍या स्त्रियांचे प्रमाण ७० टक्के आहे. स्त्रियांच्या नेतृत्वगुणांकडे आपण पाहिलं, तर काही सामायिक गोष्टी जाणवतील. पहिली म्हणजे झटकन निर्णय घेणे. दुसरी म्हणजे, संकटाचा सामना एकट्याने करणं शक्य नाही, हे मान्य करून सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणं. तिसरी गोष्ट आहे करुणा-ममता-सहानुभूती-अनुकंपा. जगभर या काळात घरातून काम करण्याचे धोरण (वर्क फ्रॉम होम) वाढत आहे आणि जवळपास सगळ्या शाळांनादेखील सुट्ट्या दिल्या आहेत. जणू उन्हाळी सुट्ट्या आधीच सुरू झाल्यात आणि त्या लांबत चालल्यात. परंतु, यामुळे घराची काळजी वाहणार्‍या व्यक्तीवरील ताण वाढतो आहे. साधारणतः अनेक घरात अशी काळजी वाहणार्‍या स्त्रियाच असतात. तसेच करोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरातील स्वच्छता होय. या काळामध्ये घरातील फरशी पुसणे, भांडी, कपडे धुणे, बाहेरून आणला जाणारा भाजीपाला, किराणा स्वच्छ ठेवण्याचे काम स्त्रियांकडे आले. करोनाचा जास्त धोका लहान मुले आणि वृद्धांना असल्यामुळे त्यांच्या स्वास्थ्याकरिता त्यांच्या स्वच्छतेवर स्त्रियांना जास्त लक्ष केंद्रित करावे लागते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यावर निश्चितच परिणाम होतात. सगळे करोनासारख्या संकटामुळे थांबले आहेत. परंतु, घरातली स्त्री मात्र कुटुंबासाठी नेहमीप्रमाणेच कदाचित जास्तच मेहनत करत आहे. जगातल्या काही देशांच्या प्रमुख स्त्रियांचं नेतृत्व ह्यावेळी विशेष परिणामकारक ठरल्याचं दिसतंय. जर्मनीच्या अँजेला मर्केल, नॉर्वेच्या एर्ना सोलबर्ग, न्यूझीलंडच्या जेसीन्दा आर्दन, तैवानच्या प्रमुख साई इंग वेन, फिनलँडच्या सना मारिनही काही ठळक उदाहरणं. ह्या सर्व देशांमध्ये व्हायरसचा शिरकाव झालाच, पण त्याने प्रचंड मनुष्यहानी होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्यात ह्या सर्व स्त्री नेत्यांचं कुशल नेतृत्व दिसलेलं आहे.

- Advertisement -

कोणत्याही साथीच्या रोगाच्या काळात गरोदर महिलांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. तरी प्रत्यक्षात तसं घडतंच असं नाही. सध्या आपण अनेक गर्भवती महिलांच्या उन्हातान्हात मैलोनमैल चालतानाच्या दृष्यफिती सोशल मीडियावर पाहत आहोत. सर्वच स्तरातील महिलांना निरनिराळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचार आणि बाललैंगिक शोषण वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. एकट्या भारतात राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणार्‍या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

कोविड-१९ च्या प्रसाराला मिळणार्‍या प्रतिक्रियेमध्ये असुरक्षित नागरिक आणि स्त्रियांवर याचा जो वेगवेगळा परिणाम होणार आहे त्याची नोंद घेणे गरजेचे आहे. मजूर वर्गातील कष्टकरी स्त्रियांचा सरकारने प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. कौटुंबिक पातळीवर घरातल्या सर्वांनी रोजच्या कामात घरातल्या स्त्रीला सहकार्य करणे अपेक्षित आहे. आता जगातले हजारो बिझनेस ‘वर्क फ्रॉम होम’च्या वेगवेगळ्या सिस्टिम्स स्वीकारत आहेत. येत्या काळात या व्यवस्था काम करण्याचं मुख्य साधन बनतील. यामुळे महिलांना घर आणि काम यांच्यात समतोल साधणं शक्य होईल. मुलांकडे लक्ष देण्यासाठी हजारो महिला आपली नोकरी सोडतात, पण जर त्यांना घरातून काम करणं शक्य झालं तर त्यांना आपल्या करिअरचा बळी द्यावा लागणार नाही अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. जगातली अर्धी लोकसंख्या असणार्‍या स्त्रीचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य टिकले तरच येणार्‍या संकटांना माणूस खंबीरपणे सामोरे जाऊ शकणार आहे.

बेरोजगारीतही महिलाच अग्रेसर

अमेरिकेत केवळ मार्च महिन्यात जवळपास १० लाख ४० हजार लोक बेरोजगार झालेत. १९७५ नंतर बेरोजगारी वाढणारा अमेरिकेतील हा सर्वात मोठा आकडा आहे. यात पुरुषांच्या तुलनेने महिलांच्या नोकर्‍या अधिक गेल्याचेही वेगवेगळे अहवाल सांगतात. याचे मुख्य कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाधिक पुरुष अशा कामांना जोडलेले असतात, जे आर्थिक चक्र चालवण्यासाठी सहाय्यक ठरतात. जसे की, मॅन्यूफॅक्चरिंग वा कंस्ट्रक्शनचे काम. पण महिला अशा क्षेत्राशी जोडलेल्या असतात जे आर्थिक चक्र व्यवस्थितरित्या चालू असेल तरच काम करु शकतात. जसे की, शिक्षण वा आरोग्य सेवा, हॉटेल, रेस्टारंट. आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायातही महिलांचे प्रमाण मोठे आहे. हा व्यवसाय करोनाकाळात पूर्णत: डबघाईस आल्याने त्याचा सरळ परिणाम महिलांच्या अर्थार्जनावर झाला आहे. कामाच्या विभागणीवेळीही बर्‍याच ठिकाणी स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो. कमी जबाबदारीची कामे महिलांच्या वाट्याला येतात. ज्यावेळेला कर्मचारी कपात करण्याचा मुद्दा समोर येतो तेव्हा कमी जबाबदारी असलेले कर्मचारी आधी बाहेर घालवले जातात. त्यामुळे महिलांच्या बेरोजगारीत वाढ झालेली दिसते. कर्तृत्वाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. तरीही तिला कमी लेखण्याची पुरुषी वृत्ती अशा संकटकाळात अधिक धोकादायक ठरते, हे नक्की.

स्त्रियांपेक्षा पुरुषांची प्रतिकारशक्ती कमी?

एकीकडे करोनाने स्त्रियांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम केलेला असताना दुसरीकडे हा आजार लिंगभेद करत असल्याचेही जागतिक आकडेवारीवरून स्पष्ट होते. अमेरिकेत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पुरुषांची संख्या ६९ टक्के आहे. चीनसारख्या देशाचीही हीच अवस्था आहे. करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचा अभ्यास करणारेही या अनोख्या कारणाचा शोध घेण्यात आता व्यस्त आहेत. अर्थात या लिंगभेदाचे कोणतेही ठोस शास्त्रीय कारण अजून पुढे आलेले नाही. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्रा. फिलीप गोल्डर सांगतात की, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक असते. कोणत्याही विषाणूला सक्रिय करण्यासाठी, विशेषत: करोना विषाणूसाठी ज्या प्रथिनांची आवश्यकता असते ते स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात असते. शिवाय स्त्रियांमध्ये ‘एक्स’ गुणसूत्र दोन असतात, तर पुरुषांमध्ये ते एकच असते. यामुळे महिलांमध्ये कोणत्याही विषाणूशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती अधिक असते. व्यसनांचाही मोठा परिणाम करोना विषाणूच्या प्रादुर्भावावर होतो. जे लोक गुटखा, तंबाखू खातात वा सिगारेट पितात त्यांच्यात विषाणूचे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. महिलांच्या तुलनेने पुरुषांमध्ये व्यसनाधीनता अधिक असते. त्यामुळे महिलांना पुरुषांच्या तुलनेने धोका कमी असतो असेही एक अभ्यास सांगतो. असे असले तरीही पुरेशा वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने करोना काळात महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे जगभरात दिसून आले. आहे.

पूजा देविदास गिरी (लेखिका सामाजिक अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -