घरफिचर्ससारांशपरखड न्यायदाता : रामशास्त्री

परखड न्यायदाता : रामशास्त्री

Subscribe

राघोबादादा पुरावा मागतात. तेव्हा ते पत्र रामशास्त्री सर्वांना दाखवतात. राघोबा गुन्हा कबूल करतात आणि याला शास्त्राप्रमाणे शासन सांगा असे म्हणतात. रामशास्त्री त्यांना देहांत शासनाशिवाय पर्याय नाही, असे सांगतात. सर्वजण थक्क होतात. पण नंतर रामशास्त्री आता अशा ठिकाणी राहणे अशक्य असल्याचे सांगून पुन्हा गावी जायला निघतात. प्रेक्षकही सुन्न होऊन जातात. त्यामुळेच ‘रामशास्त्री’ हा चित्रपट सार्वकालिक आहे.

पंचाहत्तर वर्षांपूर्वी न्यायपालिकेची महती सांगणारा हा चित्रपट ‘प्रभात’ने निर्मिला होता. पेशवाईतील न्यायाधीश रामशास्त्री यांनी परिणामांची तमा न बाळगता न्यायशास्त्राला धरून राघोबादादा पेशव्यांनी त्यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल न्यायशास्त्रात असेल ते शासन सांगायला सांगितले, त्यावेळी राम शास्त्री यांनी काढलेले परखड उद्गार आजही सर्वांच्या परिचयाचे आहेत. राघोबादादाला शासन सांगताना ते म्हणाले होते, या गुन्ह्याला देहांत शासनाखेरीज अन्य शासन नाही!
आजच्या ‘क्लीन चिट’च्या युगात या घटनेचे महत्त्व आणखीच वाटत राहते. कारण सध्या न्यायालयाकडे लोक तक्रारी घेऊन जात असले तरीही, त्यातल्या ज्या तक्रारी राजकीय व्यक्तींच्या, विशेषतः सत्ताधार्‍यांबाबत असतात, त्याबाबत संपूर्ण न्याय मिळेल की नाही, अशी शंका मनात घर करून असते. वाचकांना उदाहरणे देऊन सांगण्याची गरज नाही. पण अनेक प्रकरणांमध्ये न्याय देताना, इमान राखायचे कुणाशी, न्यायदेवतेशी की सांप्रतच्या सत्ताधार्‍यांशी, असा अवघड प्रश्न न्यायाधीशांना पडत असावा, असे लोकांना वाटायला लागले आहे.

अशा अवघड पेचप्रसंगातून मार्ग काढणे अवघडच असते. कारण आत्ता आपण न्याय देऊ, पण नंतर आपले काय? असा प्रश्न त्यांना पडत असणार. या प्रकारच्या अस्वस्थ करणार्‍या प्रश्नाचा परिणाम त्यांच्या निर्णयावरही होत असण्याची शक्यता सर्वांनाच अस्वस्थ करणारी असते. त्यातही काहीजण खरोखरच रामशास्त्री बाण्याने निर्णय देतात, त्यामुळे लोकांच्या आदराला पात्र ठरतात. यामुळेच पाऊण शतकापूर्वीचा हा चित्रपट आजही कालबाह्य न वाटता उलट विचारांना चालना देतो आणि न्यायालयाच्या आदेशांचा ते सोयीचे असतील तर गौरव आणि अडचणीत आणणारे वाटले तर सर्रास अनादर करणार्‍यांविषयी तिटकारा निर्माण करतो. या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात होण्याआधीच प्रभात कंपनीत फाटफूट झाली. व्ही. शांताराम-शांतारामबापू कंपनीतून बाहेर पडले. त्यांनी मुंबईला जाऊन स्वतःची राजकमल ही कंपनी स्थापन केली. कंपनीचा दिग्दर्शकच सोडून गेल्यामुळे पेच निर्माण झाला. आणि गजानन जहागीरदार यांची दिग्दर्शक म्हणून नेमणूक केली गेली. ‘रामशास्त्री’ हा चित्रपट करण्याचे ठरलेच होते.

- Advertisement -

कथा व्ही. व्ही. एस. सुखटणकर यांची होती. विश्राम बेडेकर यांनी तयार केलेली पटकथाही तयार होती. बाकी सर्व तंत्रज्ञ नेहमीचेच होते. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे कामाला सुरुवात झाली. काही अडचणींतून मार्ग काढत चित्रपट पूर्ण झाला. कथा सर्वांच्या परिचयाची आहे. सातार्‍याजवळील माहुली या गावात लहानगा राम आईबरोबर मामाकडे राहात आहे. लहानपणीच लग्न झाल्याने त्याची बायको त्याच्याबरोबरच आहे. ते दोघे वयानुसारच बागडत असतात. तो काहीच शिकलेला नसतो. मामा लोभी, त्यामुळे रामला शिक्षण नाही. तरीही तो पेशव्यांच्या रमण्यात दक्षिणेसाठी रामला घेऊन जातो.पण तेथे प्रत्येकाचे शिक्षण विचारून दक्षिणा दिली जात आहे. आपल्याला शिक्षण नाही, याची जाणीव असलेल्या रामला त्याचा सत्यनिष्ठ स्वभाव रांगेत उभे राहू देत नाही. त्यामुळे तो बाजूला जातो. त्यामुळे त्याचा मामा त्याला धरून सक्तीने रांगेत उभा करतो. दक्षिणा घेण्याची वेळ येताच, रामला तो काय शिकला हे विचारले जाते. तो गप्प राहतो. त्यातून तो काहीच शिकलेला नाही, हे लक्षात येते. पण मामा त्याला बोलता येत नाही, असे सांगतो. रामच्या हातावर दक्षिणा ठेवण्यात येते. दक्षिणा घेऊन तो जाऊ लागतो, पण त्याचे मन त्याला खात असते. मनाची बोचणी असह्य होऊन तो परत जाऊन, मी काहीही शिकलेला नाही, त्यामुळे मी ही दक्षिणा घेणार नाही, असे सांगून दक्षिणा परत करतो.

चिडलेला मामा घरी येऊन त्याला खूप रागावतो. आईही त्याला बोलू लागते. पण तो नक्की काय झाले व आपण खरेच सांगून त्याप्रमाणेच वागलो असे सांगतो, तेव्हा तिला त्याच्याबद्दल कौतुक वाटते आणि त्याच्या वडिलांवरच तो गेला आहे असे तिला वाटते. पण आता रामलाच अशा प्रकारचे जगणे नकोसे होते आणि तो शिकण्याचा निश्चय करून कुणालाही न सांगता रात्रीच काशीला जाऊन शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडतो. आईला त्याप्रमाणे तुळशीवृंदावनापुढेच रांगोळीने तसे लिहून ठेवतो. आई आणि त्याची बायको जानकी दुःखाने चूर होतात पण तो म्हटल्याप्रमाणे करेल, असे म्हणून समाधान मानतात.
काशीला आल्यावर त्याची पाटी कोरीच आहे, असे कळल्यानंतर तेथील गुरुजी त्याला शिकवायला नकार देतात. पण तो तेथे गुरुजी इतर शिष्यांना जे शिकवत असतात ते ऐकून, रात्रंदिवस घोकंपट्टी करून शिकत असतो. एके रात्री तो अशाच प्रकारे पाठ म्हणत असतो. तो आवाज ऐकून गुरुजी जागे होतात. आवाजाच्या दिशेने गेल्यावर त्यांना राम पाठ म्हणताना दिसतो. त्यांना कौतुक वाटते. तू कोणाकडे शिकलास, असे विचारतात. तो तुमच्याकडेच शिकलो असे सांगून त्यांना नमस्कार करतो. ते त्याला शिकवायचे मान्य करतात. त्यानुसार रामचे शिक्षण बारा वर्षे चालते. तेव्हा सर्व शिष्यांसमोर गुरुजी त्याचा गौरव करतात. आजपासून हा शास्त्री झाला, असे सांगतात. तेव्हापासून तो राम प्रभुणे ऐवजी रामशास्त्री या नावाने ओळखला जाऊ लागतो.

- Advertisement -

घरी एकाकी आई आजारी असते. जानकी तिची सेवा करत असते. मरणाचे वेध लागल्याने आई रामचा ध्यास घेते. अगदी अखेरच्या क्षणी मायलेकांची भेट होते. नंतर काही काळ गावातच राहिल्यानंतर राम बायको मुलासह पुण्याला येतो. तेथे त्याला पेशवे शास्त्री म्हणून देवपूजेचे काम देतात. पण एका प्रसंगातून त्याच्या सत्यप्रियतेची ओळख पेशवे माधवराव यांना पटते. ते त्याची नेमणून न्यायाधीश म्हणून करतात. त्या काळी चालत असलेल्या गुलामाच्या बाजारात एका तरुणीचा लिलाव चालू असतो. तिला दासी म्हणून विकत घेण्यासाठी लोक जमलेले असतात. एक शिपाई हातातली कडी देईन असे सांगतो. त्याची ही बोली मान्य होते. पण तेवढ्यात एका धनाढ्याचा नोकर पैशाची थैली घेऊन बोली लावतो आणि लिलाववाला शब्द फिरवून त्याला तिला घेऊन जायला सांगतो.

पण तो शिपाई आणि ती तरुणी पळून जातात आणि नेमकी रामशास्त्र्यांच्या घरीच आश्रय मागतात. जानकी त्यांना आश्रय देते. तिला धरून नेण्यासाठी आलेल्या शिपायांना परत धाडते. रामशास्त्री आल्यावर त्यांच्या कानावर हे घालते. त्यांचे ताबडतोब लग्न लावायचे ठरवते. त्याप्रमाणे लग्न पार पडत असतानाच पुन्हा शिपाई येतात, तेव्हा घाईघाईत सप्तपदी पार पाडली जाते. तरी अरेरावी करून शिपाई त्यांना धरू पाहतात. त्यावेळी रामशास्त्री त्यांना अडवतात. लग्न झालेल्या तरुणीला तुम्हाला नेता येणार नाही असे बजावतात. या निर्णयामुळेच त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक होते.नंतर एकदा परकियांचा माल त्यांनी जकात भरलेली असूनही जप्त करून, तो सरकारजमा न करता स्वतःकडेच ठेवण्याचा गुन्हा करणार्‍या विसाजीपंत लेल्यांना ते शिक्षा फर्मावतात. जेरबंद करायला सांगतात. विसाजीपंत राघोबांना हे सांगून निघून जातात. राघोबांची पत्नी आनंदीबाई त्यांना, या माधवाने या शास्त्र्याला डोक्यावर चढवून ठेवले आहे, म्हणून तो असे वागत आहे, असे त्याच्या मनात भरवते. पण ते काहीच बोलत नाहीत. माधवराव खूपच आजारी असून त्यांची अखेरची इच्छा काकाला भेटण्याची आहे असे सांगायला जासूद येतो. राघोबांना थोपवण्याचा आनंदीबाईचा प्रयत्न फोल ठरतो. ते माधवरावांच्या भेटीला जातात. तेथे शेवटची इच्छा म्हणून, नारायणाचा सांभाळ करा, असे राघेबांना विनवतात. मोठ्या विनवणीअखेर राघोबा माधवाला वचन देतात की, मी याचा मुलाप्रमाणेच सांभाळ करीन. निश्चिंत होऊन माधवराव प्राण सोडतात.

अतिमहत्त्वाकांक्षी आनंदीबाई राघोबांना नारायणरावाला पेशवा म्हणून मुजरा करावा लागल्याने संतापते. आणि नारायणाचा काटा काढण्यासाठी, राघोबांनीे गारद्यांसाठी तयार केलेल्या पत्रात ‘धरावे’च्या जागी ‘मारावे’ असा बदल करते. गारदी मागे लागल्याने नारायणराव ‘काका मला वाचवा’, असे विनवून त्यांचे पाय धरतो. पण आता गारदी राघेबांचे ऐकत नाहीत. नारायणरावाला ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा राघोबांच्या कपाळाला लावतात. बक्षीस घेऊन जातात. आनंदीबाई आता आपण पेशवीण होणार म्हणून सुखावते. पण राघोबाला तख्ताकडे घेऊन जाण्याचा मान न्यायाधीशाचा आहे, असे सांगून रामशास्त्री त्याला तेथपर्यंत नेतात. पण ते रक्तलांच्छित आहे, तेथे आपण बसणार का, असे विचारतात. राघोबा रागावून, हे कसे असे विचारतो त्यावर रामशास्त्री ते नारायणरावाच्या रक्ताने माखले आहे आणि त्याला तुम्हीच जबाबदार आहात, असे सुनावतात.

राघोबादादा पुरावा मागतात. तेव्हा ते पत्र रामशास्त्री सर्वांना दाखवतात. राघोबा गुन्हा कबूल करतात आणि याला शास्त्राप्रमाणे शासन सांगा असे म्हणतात. रामशास्त्री त्यांना देहांत शासनाशिवाय पर्याय नाही, असे सांगतात. सर्वजण थक्क होतात. पण नंतर रामशास्त्री आता अशा ठिकाणी राहणे अशक्य असल्याचे सांगून पुन्हा गावी जायला निघतात. प्रेक्षकही सुन्न होऊन जातात. लहान राम आणि जानकी अनंत मराठे आणि बेबी शकुंतला यांनी प्रभावी केली. त्यांचे दोन घडीचा डाव, हे गीत आजही आठवते. मोठे रामशास्त्री गजानन जागिरदार यांनी असे प्रभावी केले की, तीच त्यांची ओळख बनली. जानकीच्या भूमिकेत मीनाक्षीही आपली छाप पाडून जातात. शिपाई आणि लिलावातील तरुणी यांच्या भूमिका मास्टर विठ्ठल आणि हंसा वाडकर यांनी केल्या आहेत. ललिता पवार यांची आनंदीबाईची लहान भूमिका असली तरी अविस्मरणीय आहे. तिच्या स्वभावाच्या छटा त्यांनी हुबेहूब वाटाव्या अशा रंगवल्या आहेत. अन्य भूमिकांत मधू आपटे, मास्टर छोटू, बाळकोबा गोखले, गौरी, गणपतराव तांबट, मानाजीराव, भागवत इत्यादींच्या आहेत. संगीत केशवराव भोळे यांचे आहे.

थोडे चित्रीकरण झाल्यावर जागिरदार यांना काही जमेना. त्यांनी तसे सांगितल्यावर दिग्दर्शनाची सूत्रे बेडेकरांकडे आली आणि त्यांनी राजा नेने यांच्या सहाय्याने चित्रपट पूर्ण केला. ई. महंमद आणि पांडुरंग नाईक यांनी केलेले छायाचित्रण आजही वाखाणावे या दर्जाचे आहे. असा हा रामशास्त्री आजही बघावा असा आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -