घरफिचर्ससारांशमुंबईवर डोळा : यांचा आणि त्यांचा

मुंबईवर डोळा : यांचा आणि त्यांचा

Subscribe

मुंबईकर मराठी हे महापालिकेच्या कारभारापेक्षा भावनिक मुद्यावर मतदान करतात, हे आजवर अनेकदा दिसले आहे. पालिकेच्या कारभारापेक्षा, मुंबई शिवसेनेकडे राहायला हवी, ही त्यांची मानसिकता असते; मात्र वर्षभरात होणार्‍या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप जोरदार तयारीनिशी उतरेल, असे दिसते. मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार झाल्यास, त्याचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली असली, तरी या दोन्ही पक्षांचा मुंबईतील जनाधार मर्यादित आहे.

मुंबई महानगरपालिका ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असून गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ ही कोंबडी शिवसेनेच्या हातात आहे. आणि आता शिवसेनेच्या कोंबडीच्या जीवावर उठलेल्या भाजपनेही सोर्‍याच्या कोंबडीची अंडी चाखली आहेत. देशातील एका राज्याच्या तिजोरीची म्हणजे सुमारे 40 हजार कोटींचे बजेट असलेली ही श्रीमंत महापालिका कोंबडी आहे. आता ही कोंबडी कुठे अंडी देते, कधी देते, कशी देते, का देते याचा भाजपच्या मुंबईकर नेत्यांना चांगला अभ्यास आहे. कंत्राटे, कंत्राटदार, निधी, वॉर्ड, जमीन, पाणी अशी सर्वत्र ही अंडी देते. आणि यात फक्त राजकारणी लोकांना दोष देऊन चालत नाही, तर प्रशासन आणि अधिकारी त्यांच्या दोन पावले पुढे आहेत. देणार्‍याला टक्का घसरून चालत नाही. पुढे तो घसरलाच समजा. अशा या मिलीजुली कारभारात आता चार एक वर्षे सोबत नाही म्हणून ‘आम्ही नाही त्यातले’ असे होत नाही. युतीच्या यशाचा आनंद घेणार असाल तर अपयशाचे धनी भाजपला व्हावे लागेल. या जगात फक्त आपलाच प्रामाणिक राजकारण करण्यासाठी जन्म झाला आहे आणि आपण सोडून सर्व विरोधक भ्रष्टाचारी आहेत, असा दावा करणार्‍या भाजपचे पाय मातीचे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

आता महाराष्ट्राच्या सत्तेची चावी तुमच्याकडे नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने ते राज्य चालवत आहेत, म्हणून ते लायक नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सोबती करत असतील तर ही सत्तेविना तडफड झाली. पाण्याविना मासा तडफडतो तसा… आज ठाकरे सरकार पडेल, उद्या कोसळेल या आशेवर असलेल्या भाजपला आता राज्याची सत्ता मिळत नाही म्हटल्यावर वेध लागले आहेत ते मुंबई महापालिकेच्या सत्तेचे. या महापालिकेच्या निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना आता भाजपच्या तयारीचे चिंतन शिबीर सुरु झाले असून आता या एका महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांतील मुख्यमंत्री मुंबईत उतरवले जातील. कारण भाजपला माहीत आहे शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिका आहे. तोच संपवला तर राज्यात शिवसेनेला संपवता येईल.

- Advertisement -

फडणवीस-पाटील यांचा मिशन मुंबई महापालिका या नाटकाचा खेळ आता सुरु झाला आहे. आशिष शेलार, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर ही या खेळातील मुख्य पात्रे असतील. आता हा खेळ सुरु झाला म्हटल्यावर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कुठल्याही परिस्थितीत त्यांना मुंबईची सत्ता सोडायची नाही. खरेतर मागच्या वेळी 2017 ला मातोश्रीच्या हातून ही सत्ता जाणार होती. शिवसेना आणि भाजपमध्ये एक दोन नगरसेवकांचा फरक होता. फडणवीस यांनी ठरवले असते तर त्याचवेळी मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात आली असती, पण तोच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म्युला भाजपने वापरला. राज्य आम्ही संभाळतो, मुंबई महापालिका तुम्ही सांभाळा. लोकशाहीत कसे सत्तेचे समसमानीकरण झाले पाहिजे. सत्तेचा वाटा आम्ही चाखतो, तुम्हीही चाखा… जणू तुम्ही, आम्ही जगत राहू!

मराठी माणसांच्या नावाने अश्रू काढणार्‍या शिवसेनेने इतकी वर्षे मुंबईची सत्ता भोगून मुंबईकरांना असे काय चांगले जगणे दिले आहे, हा खरा सवाल आहे. आपला तो बाब्या, दुसर्‍याचा तो कार्टा होऊ शकत नाही. 1982 च्या गिरणी कामगार संपानंतर मराठी माणूस एक एक करून मुंबईतून हद्दपार होऊ लागला. गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहीम, कुर्ला, भांडुप, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवलीचा मराठी माणूस पार बदलापूर, अंबरनाथ, नालासोपारा, विरार, पालघरला फेकला गेला… आणि तरीही आम्ही म्हणणार, ‘अरे आवाज, कुणाचा शिवसेनेचा…’ कुठला आवाज, कुठला मराठी माणूस. आता मुंबईतील मराठी माणसांची संख्या सुमारे 30 टक्क्यांच्या आसपास घसरलीय आणि तरीही यासाठी शिवसेनेला ना खेद, ना खंत. मराठी माणूस मुंबईत टिकून राहावा, कामगार, श्रमिक यांना मुंबईचा आधार वाटावा, असे काय दिवे शिवसेनेने लावले हे एकदा समजू दे लोकांना.

- Advertisement -

निवडणुका आल्या की यांना मराठी माणसांची आठवण येणार? किती हा भंपकपणा! ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी उभारलेल्या गोरेगावच्या नागरी निवार्‍यामुळे गरीब सरीब मराठी माणसांना मुंबईत घरे मिळाली. शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिकेच्या अखंड सत्तेशिवाय 1995 ते 99, 2014 ते 2019 आणि आता एक वर्ष राज्याची सत्ता आहे, मग मराठी माणसे मुंबईत टिकून राहतील, त्यांना आसरा मिळेल असे काय पायाभूत काम केले ते एकदा सांगावे. आज परागंदा झालेल्या मराठी माणसांच्या जागी आज गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, बिहारी माणसांनी हातपाय पसरले आहेत. पुढे मराठी माणूस शोधावा लागणार आहे. म्हणूनच आधी ‘केम छो वरली’ आणि आता ‘मुंबई मा जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी हतबल हाक मारावी लागत आहे. परिणामी आज लोक उघड बोलू लागले आहेत : शिवसेना असो की भाजप- यांचा आणि त्यांचा डोळा आहे मुंबई महापलिककेच्या सत्तेवर. दोघांना मुंबईची काळजी म्हणजे मगरीचे अश्रू आहेत.

गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने हाक मारली असून आता या रविवारपासून मुंबईत ‘आपडा’चे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. भाजपच्या देशभरातील साम्रज्यवादी राजकारणात आज ना उद्या आपणही भरडले जाणार आहोत याचा अंदाज आल्यावर, ‘सेक्युलर’ या शब्दाला तीव्र विरोध असणार्‍या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ‘आपडा’ हा शिवसेनेच्या बदलत्या रंगाचा आणखी एक भाग आहे. राज्यात सरकारही राजकीय भूमिका आणि निवडणुकीच्या आखाड्यातील डावपेच हे अनेकदा परस्परविरोधी असतात; त्यामुळेच आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही किंवा सर्वधर्मसमभाव हाच आमच्या पक्षाचा गाभा आहे म्हणणारे, उमेदवारांची नावे निश्चित करताना जात, धर्म यांचा पहिल्यांदा विचार करतात, हे कटू सत्य आहे.

आणि बिगर मराठी अशी या टक्केवारीची तुलना केल्यास, मराठी भाषक या महानगरात अल्पसंख्य आहे, हे खरे आहे. मराठी भाषकांच्या खालोखाल उत्तर भारतीय हिंदी भाषक आणि गुजराती भाषक यांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या सहा वर्षांत हे दोन्ही मतदार मोदींच्या प्रभावामुळे आपली मते भाजपच्या पारड्यात टाकत आहेत. उत्तर भारतीय मतदारांमधील काँग्रेसचा जनाधार हा बर्‍याच प्रमाणात भाजपकडे सरकला आहे. गुजराती मतदारांचा पूर्वीपासून भाजपकडे ओढा होता; त्यामुळेच गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने राज्यात सरकार असताना, आपली ताकद स्वतंत्रपणे अजमावून पाहिली, तेव्हा सेनेच्या बरोबरीने भाजपच्या जागा आल्या. ऐंशीपेक्षा अधिक नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आणण्याचे हे कसब भाजपला शक्य झाले, याचे कारण गुजराती व हिंदी भाषकांची एकजूट हेच होते. मुंबईकर मराठी हे महापालिकेच्या कारभारापेक्षा भावनिक मुद्यावर मतदान करतात, हे आजवर अनेकदा दिसले आहे. पालिकेच्या कारभारापेक्षा, मुंबई शिवसेनेकडे राहायला हवी, ही त्यांची मानसिकता असते; मात्र वर्षभरात होणार्‍या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप जोरदार तयारीनिशी उतरेल, असे दिसते. मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार झाल्यास, त्याचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली असली, तरी या दोन्ही पक्षांचा मुंबईतील जनाधार मर्यादित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला तर मुंबईत फारसा जनाधार कधीच बांधता आला नाही. काँग्रेसकडे एकेकाळी दलित, मुस्लीम, उत्तर भारतीय ही एकगठ्ठा मते होती; त्यामुळे सहापैकी पाच खासदार व पंधराच्यावर आमदार निवडून आणण्याची किमया साधत होती. मोदी यांच्या उदयानंतर मात्र काँग्रेसकडे मुस्लीम वगळता दुसरा कोणताही हक्काचा मतदार उरलेला दिसत नाही. त्यात एमआयएम हा ओवैसी यांचा पक्ष मुस्लीम मतांमध्ये फूट पाडू शकतो; त्यामुळे या दोन्ही पक्षांशी आघाडी केल्यास त्याचा फायदा झाला, तरी तो फारसा लक्षणीय नसेल. या पार्श्वभूमीवर थेट गुजराती मतदारांना आपलेसे करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल. एका अर्थाने शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्तित्त्वाची लढाई. अशा कार्यक्रमांमुळे गुजराती मतदार लगेच शिवसेनेकडे आकर्षित होतील, असे नाही; मात्र शिवसेनेच्या विरोधात जी तीव्र भावना गुजराती भाषकांमध्ये असते, ती मवाळ व्हावी यासाठीचे हे प्रयत्न आहेत.

या पूर्वीही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी विविध भाषांतील फलक शिवसेनेने लावले होतेच; तसेच उत्तर भारतीय मतदारांमध्ये जनाधार तयार व्हावा यासाठी, ‘लाई चना’ सारखे कार्यक्रमही घेतले होते. त्यातून शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार आकर्षित झाल्याचे चित्र समोर आले नाही, तरीही मुंबईतील प्रमुख हिंदी भाषक मतदारांमध्ये त्यांना अनेक कार्यकर्ते मिळाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता वातावरण तापू लागले आहे. ही लढाई प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांच्यातच होणार, हेदेखील स्पष्ट आहे. साहजिकच या शहरात केवळ मराठी माणसाचाच आवाज चालणार, अशी छाती काढून गर्जना करणारी संघटना आता मवाळ झाली आहे, हेच या निमित्ताने स्पष्ट होते आहे. यापुढच्या काळात जाज्ज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना निवडणुकीच्या राजकारणात इतर धर्मियांमध्येही नवा जनाधार शोधायला लागल्यास आश्चर्य वाटू नये.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -