घरफिचर्ससारांशनाशिक : भारताचं वाइन कॅपिटल ‘रुद्राक्ष ते द्राक्ष’

नाशिक : भारताचं वाइन कॅपिटल ‘रुद्राक्ष ते द्राक्ष’

Subscribe

एकेकाळी मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं नाशिक आता वाइन कॅपिटल म्हणून ओळखलं जातंय. केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयानं नाशिकला नुकतीच ही ओळख दिलीय. यामुळे वाइन उद्योगाला चालना मिळेलच; शिवाय सर्च इंजिनही वाइन म्हटल्यावर नाशिकवरच येऊन थांबेल. रुद्राक्ष ते द्राक्ष असा हा नाशिकचा प्रवास आता खर्‍या अर्थानं जिल्ह्याला ‘आत्मनिर्भर’ करणारा आहे.

‘नाशिक म्हणजे सुला वायनरी’ असं एक समीकरण झालंय. खरं म्हणजे सुला शिवाय नाशिकमध्ये एकूण ४१ वायनरीज आहेत. त्यांचं उत्पादन, वैशिष्ठ्य, चव, गंध, बॉटलिंग, रंग या सगळ्यांमध्ये वेगळेपण आहे. केवळ नाशिकमधील उद्योजकांनीच नाशिकमध्ये वाइन निर्मिती सुरू केलीय असं नाही तर, त्या सोबत फ्रान्स, इटली या वाईन उद्योगाची संस्कृती असलेल्या देशांतील वाईन उद्योगातील मोठ्या कंपन्यांनीही नाशिकमधील पूरक वातावरण पाहता नाशिकमध्ये वायनर्‍या उभारल्या आहेत. ‘नाशिक व्हॅली वाइन’ला केंद्राकडून महत्वाचं भौगोलिक मानांकनही (जीआय मानांकन) मिळालं आहे. फ्रान्स, इटलीनंतर भारतात नाशिक खोर्‍यातच वाईन उद्योग का वाढला? नाशिकलाच वाईन कॅपिटलचा मान का मिळाला, असे प्रश्न पडणे साहजिकच आहे.

याची जी कारणे आहेत त्यात नाशिक जिल्ह्याचं अनुकूल वातावरण, पाऊस स्थिती आणि शेतकर्‍यांचा आधुनिकतेकडे असलेला कल. मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरापासून अवघ्या दोन अडीचशे किलोमीटर अंतर हे कारण देखील महत्वाचं आहे. नेहमी हलकं उबदार वाटावं असं तापमान इथे असतं. हिवाळ्याच्या काळात दिवसाचं सरासरी तापमान २६ अंश सेल्सियस तर रात्रीची थंडी जाणवणारं तापमान ७ ते ८ अंशा दरम्यानचं असतं. ही जी काही भौगोलिक स्थिती आहे ती वाइन द्राक्षांच्या वाढीसाठी आणि वाईन तयार होत असताना त्यात होणार्‍या हव्याहव्याशा गंध निर्मितीसाठी (फ्लेवर येण्यासाठी) आदर्श अशी मानली गेली आहेत. चांगला निचरा होणारी, जिची रासायनिक गुणवत्ताही वाइन द्राक्षवेलीच्या वाढीसाठी अनुकूल आहे अशी जमीन तसेच येथील पाण्याची गुणवत्ताही तशीच पूरक राहिली आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात साधारणपणे दीड लाख एकरावर द्राक्षशेती केली जाते. त्यात १० हजार एकरावर फक्त वाइनसाठीच्या द्राक्षांची शेती होतेय. यातील ५ हजार एकरांवर शेतकर्‍यांमधून वाइन द्राक्ष शेती केली जाते. उर्वरित ५ हजार एकर क्षेत्र हे वायनर्‍यांचे स्वत:चे आहे. मागील दहा वीस वर्षांपासून वाइन द्राक्षशेतीने आणि वाइन निर्मिती उद्योगाने अनेक चढउतार पाहिले आहेत. यात नाशिकमधील वायनर्‍यांची संख्या मात्र वाढतच गेली आहे. आजमितीस नाशिकमध्ये लहान मोठ्या ४२ वायनर्‍या आहेत. या सगळ्या मिळून दरवर्षी दोन कोटी लिटर्स वाईन उत्पादन घेतात. यात सर्वाधिक म्हणजे ७० टक्के वाटा एकट्या सुला वायनरीचा आहे.

वाइन उद्योगाचे महत्व लक्षात घेता शासनाने १९९५ मध्ये वाइन धोरण तयार केले. त्यात अनेक प्रशासकीय घोळ झाले असले तरी शासन याकडे सकारात्मकतेने पाहत असल्याचा संदेश यातून संबंधित प्रत्येक घटकांपर्यंत गेला ही जमेची बाजू ठरली. याच काळात अनेक कृषी उद्योजकांनी, वाइन उद्योजकांनी उद्योगातील संधी, धोके, अडथळे यांचा अभ्यास न करता वायनर्‍या उभारल्या. त्यासाठी मोठी कर्जे घेतली. शेतकर्‍यांना जास्त दर देऊन द्राक्षे पळवण्याची स्पर्धा सुरू झाली. करार न करता द्राक्षांची खरेदी झाली. बर्‍याच ठिकाणी करार करूनही ते मोडले गेले. याच काळात २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. या घटनेचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला. ताजसारख्या मोठ्या हॉटेलांमधून वाइनला विशेष मागणी होत होती. नंतरच्या काळात या मागणीत लक्षणीय घट झाली. त्याची झळ थेट नाशिक जिल्ह्यातील वाइन निर्मिती उद्योगापर्यंत पोहोचली. त्यानंतर आता कोरोनामुळे मोठा फटका वाइन उद्योगाला बसला आहे. असं असलं तरीही वाइन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्रयत्न सुरुच आहेत. शासनाच्या वाइन धोरणात निफाड तालुक्यातील ‘विंचूर’ येथे स्वतंत्र ‘विंचूर वाइन पार्क’ हा औद्योगिक वसाहतीच्या धर्तीवर प्रकल्प करण्याचं ठरवण्यात आलंय. वाइन उद्योजकांना इथे वायनरी सुरू करण्यासाठी जागेसह विविध सवलती देण्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

- Advertisement -

पिंपेनने मुहूर्तमेढ रोवली
देशात वाईन उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातही नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात वाइन द्राक्षांचे उत्पादन घेतलं जातं. द्राक्ष हे पीक नाशिक जिल्ह्यात १९५० पासून घेतलं जात असल्याची नाशिक जिल्हा गॅझेटियरमध्ये नोंद आहे. १९८७ मध्ये पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे झुंजार शेतकरी नेते माधवराव मोरे यांनी पिंपेन ही सहकारी तत्वावरील वायनरी सुरू केली. पिंपेनच्या माध्यमातून फ्रान्समधील हार्बल्ट अ‍ॅण्ड फिल्स इपर्नरी या वायनरीसोबत वाईन निर्मिती व विक्रीचा करार झाला. शार्डोनी, पिनॉट नॉयर यासारख्या वाइन द्राक्षांच्या वाणांची हजारो एकरावर लागवड करण्यात आली. अल्पावधीत पिंपेनने ५ लाख बॉटल्स वाइनचे उत्पादन घेतलं. त्यातील तब्बल ३५ हजार बॉटल्सची फ्रान्ससह इतर युरोपीय देशांत निर्यात करण्यात आली. दरम्यान नंतर द्राक्ष काढणी, वाइन निर्मितीतील यातील व्यवस्थापनाचा मेळ बसवणे पिंपेनला अवघड जाऊ लागलं. परिणामी २००३ पासून वाइनची निर्यात बंद झाली.

वाइन उद्योगाची चळवळ
माधवराव मोरे यांच्यासह हंबीरराव फडतरे, शामराव चौघुले, प्रल्हाद खडांगळे, जयवंत गायकवाड, अशोक गायकवाड या आणि इतरही अनेक कृषी उद्योजकांनी वाइन उद्योगाला चळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. करार शेतीच्या माध्यमातून निश्चित दर देता येईल असा पर्याय म्हणून याकडे पाहिले गेले. नंतरच्या काळात सदाशिव नाठे, जगदीश होळकर, शिवाजी आहेर, राजेश जाधव, हिरामण पेखळे यांनी पुढाकार घेऊन ही उद्यमशीलता शिवारात नेऊन पोहचवली. वाइन उद्योग हा शेतकर्‍यांच्या बांधावरील कृषी उद्योग आहे. त्याला पर्यटनाची जोड देता येणं शक्य आहे. जगभरात वाइन उत्पादक देशांमध्ये शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतात वायनर्‍या उभारल्या आहेत. ते मॉडेल आपल्याकडेही करता येईल. यासाठी केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे स्वतंत्र वाइन धोरण असणे गरजेचे आहे. असा आग्रह वाइन उद्योगात कार्यरत असलेल्या शेतकरी उद्योजकांनी शासनाकडे धरला. दरम्यान, शासकीय स्तरावरही याबाबत हालचाली सुरू झाल्या.

नाशिक : भारताचं वाइन कॅपिटल ‘रुद्राक्ष ते द्राक्ष’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -