घरफिचर्ससारांशआपले निगेटिव्ह हिरो ...

आपले निगेटिव्ह हिरो …

Subscribe

सिनेमा आणि त्याचा नायक या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करतात, ‘तेरे नाम’ बघून एक पिढी केस वाढवते तर ‘गजनी’ बघून टक्कल करते. अशावेळी आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा सिनेमाचा वापर केला जातो. याच इमेज क्लिनिंगच्या प्रकारातून पुढे येतात संजू, शूट आउट अ‍ॅट वडाळा यांसारखे सिनेमे आणि नुकतीच प्रदर्शित झालेली हर्षद मेहता सारखी वेबसिरीज, एक कलाकृती म्हणून किंवा सिनेमा म्हणून हे उत्तम आहेत. पण वाईट गोष्टी आपल्याला लवकर आकर्षित करतात, याप्रमाणे सिनेमातला खलनायक कधी आपल्यासाठी नायक बनायला लागतो हेच आपल्याला कळत नाही आणि मग देशाला लुटणारा हर्षद मेहता आपल्याला योग्य वाटायला लागतो. हे निगेटिव्ह व्हिलन हिरो बनतात कसे? आणि यांना हिरो बनवतं कोण ? याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

राजकारण आणि सिनेमा हे असे दोन क्षेत्रं आहेत, ज्यांच्याबद्दल प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात भारतीयांना रस असतो. राजकारणात आपल्या नेत्याची पोरगी काय करते पासून बॉलिवूडच्या कुठल्या अभिनेत्रीचं कुठल्या राजकारण्याशी अफेयर आहे, इथपर्यंत सगळं आपल्याला माहिती करून घ्यायचं असतं, मागे एकदा तर करीना कपूर प्रेग्नन्सीच्या काळात काय खाते? अशी बातमीसुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणावर शेयर केली होती. एकंदरीत काय तर या दोनही क्षेत्रातील लोकांना आपलं स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी आपली पब्लिक इमेज नेहमी स्वच्छ ठेवावी लागते. या पब्लिक इमेजची ओढ समाजातील गोरखधंदे करणार्‍या, भ्रष्टाचारी आणि गुंड लोकांनादेखील असतेच, म्हणून इमेज सुधारण्यासाठी ही लोक राजकारणाचा मार्ग वापरतात.

गुंडांचा राजकीय प्रवेश होतो आणि अचानक धमक्या देऊन जमिनी बळकावणारा अहिंसेचा नारा द्यायला लागतो, पण इमेज सुधारण्याचा हा मार्ग जुना झाल्याने सध्या एक नवीन उपाय अस्तित्वात आला आहे. सिनेमा आणि त्याचा नायक या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करतात, ‘तेरे नाम’ बघून एक पिढी केस वाढवते तर ‘गजनी’ बघून टक्कल करते. अशावेळी आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा सिनेमाचा वापर केला जातो. याच इमेज क्लिनिंगच्या प्रकारातून पुढे येतात संजू, शूट आउट अ‍ॅट वडाळा यांसारखे सिनेमे आणि नुकतीच प्रदर्शित झालेली हर्षद मेहता सारखी वेबसिरीज, एक कलाकृती म्हणून किंवा सिनेमा म्हणून हे उत्तम आहेत. पण वाईट गोष्टी आपल्याला लवकर आकर्षित करतात, याप्रमाणे सिनेमातला खलनायक कधी आपल्यासाठी नायक बनायला लागतो हेच आपल्याला कळत नाही आणि मग देशाला लुटणारा हर्षद मेहता आपल्याला योग्य वाटायला लागतो. हे निगेटिव्ह व्हिलन हिरो बनतात कसे ? आणि यांना हिरो बनवतं कोण ? याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

- Advertisement -

इमेज क्लिन करण्यासाठी सिनेमाचा वापर केला जातो असा आरोप काहीवेळा सिनेमा निर्मात्यांवर केला गेलाय, यात तथ्य आहे का ? तर हो, काहीवेळा दिग्दर्शक ज्याचा बायोपिक बनवायचा त्याला जे हवं तेच कथेत दाखवतो आणि महत्वाच्या घटना त्यातून वगळून टाकतो. एखादा सिनेमा बनवताना त्याचा लेखक त्याची विचार करण्याची पद्धती आणि दिग्दर्शकाची भूमिका या गोष्टी अतिशय महत्वपूर्ण ठरतात. आपल्याकडे कुठलाही चरित्रपट बनवताना त्याला त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रकाशित झालेल्या पुस्तकावर आधारित सिनेमा म्हणून सांगितलं जातं, कारण आपली कथा जशास तशी सांगण्यात कुणालाच इंटरेस्ट नाही किंवा भावनेच्या दुखण्यामुळे कोणी ते धाडस करू इच्छित नाही. यामुळे अनेकदा खलनायकाच उद्दात्तीकरण केलं जातं, त्याला सक्षम करण्याच्या नादात त्यालाच नायक बनवलं जातं. संजू , वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, शूट आउट अ‍ॅट वडाळा, डॅडी ही त्याचीच काही उदाहरणं. गेल्या काही काळात मात्र हा पॅटर्न थोडा बदलला आहे, सिनेमात खलनायक जितका दमदार तितका सिनेमा चालतो, हा फॉर्मुला अस्तित्वात आल्यापासून आपल्याकडे खलनायकांचं उदात्तीकरण करणं मोठ्या प्रमाणात वाढलंय. ओटीटीवर तर शिव्या देण्याची मुभा असल्यानं असे खलनायक अधिकच जवळचे वाटायला लागतात. यातूनच मग गणेश गायतोंडे, कालीन भैय्या यासारखी निगेटिव्ह पात्र देखील तरुणांचे आदर्श ठरायला लागतात. कदाचित निर्मात्यांचा यामागचा उद्देश वेगळा असू शकतो, पण याचा परिणाम मात्र जो व्हायचा तोच झालाय, हे नाकारून चालणार नाही.

भारतात ओटीटीवर सुपरहिट ठरलेल्या वेबसिरीजची यादी बघा आणि मग त्या वेबसिरींजमधील लोकप्रिय झालेली पात्रं पहा, सर्व वेबसिरीजमध्ये एक गोष्ट कॉमन पाहायला मिळेल ती म्हणजे या सर्व वेबसिरीजमध्ये हिट झालेली पात्रं नकारात्मक होती. सॅक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे, मिर्झापूरमधील कालीन भैय्या,गुड्डू भैय्या, मुन्ना त्रिपाठी आणि स्कॅम 1992 मधील हर्षद मेहता ही सर्व कथेत केंद्रस्थानी असली, तरी निर्मात्यांनी त्यांना कधीच नायक म्हणून दाखवलं नव्हतं. प्रत्येक पात्राची नकारात्मक बाजू दाखवून देखील प्रेक्षकांना तीच पात्रं जास्त भावली, यामागे कारण काय ? तर प्रत्येक कथेचा अर्थ आपण आपल्या परीने घेत असतो. प्रदर्शित झालेल्या वेबसिरीजचा प्रेक्षकवर्ग हा तरुण आहे, असा तरुण ज्याला हिंसा आवडते जो बंड करण्यास तयार आहे, असा तरुण ज्याला सामान्य जीवन जगण्याची इच्छा नाहीये, त्याला मरते वक्त भी सीना चौडा करके मरना पसंत आहे. सध्याच्या तरुणांची ही मानसिकता पाहता त्यांचा कल याच नकारात्मक पात्रांकडे दिसून येतो, ही पात्रं मग त्यांच्या डोक्यावरसुद्धा परिणाम करतात. एक उदाहरण घेऊया, स्कॅम पाहिल्यानंतर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा झालेल्या तरुणांपेक्षा एसबीआयला पुन्हा कसा चुना लावता येईल? याचा विचार करणारे अधिक होते. सोबतच हर्षद मेहताने तर काहीच चुकीचं केलं नाही, त्यापेक्षा जास्त लुबाडणारे लोकं मोकाट होते, तो तर निर्दोष होता अशीही अक्कल पाजळणारे लोक तुम्हाला आसपास पाहायला मिळाले असतील.

- Advertisement -

पडद्यावर दाखविण्यात आलेल्या नकारात्मक पात्रांचा प्रभाव हा केवळ काही दिवसांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स आणि इंस्टास्टोरी पुरता मर्यादित राहत नाही. तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्याचं काम देखील ही पात्रं अप्रत्यक्षपणे करतात, यात चुकी निर्मात्यांची किंवा ती पात्रं लिहिणार्‍यांची नसते. कारण मुळशी पॅटर्न उध्वस्त होत चाललेली खेडी दाखवतो पण आम्हाला त्यात हातात कोयते घेऊन हिंडणारा आणि माणसं कापणारा राहुल्या भावतो. आता कुणाला काय आवडावं ? हे काही निर्मात्यांच्या हातात नाही आणि जसं मी आधीही सांगितलं की, आपल्याला हिंसा आणि वाईट गोष्टी लवकर आकर्षित करतात. आपल्याकडे जे चालतं तेच बनवलं जातं, भारताचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद आमच्या सिनेमात हिरो म्हणून दाखवला जातो आणि लोकांना तोच सिनेमा आवडतो. याचा अर्थ असा नाही की, आपल्याकडे सर्व सिनेमे किंवा वेबसिरीज याच पॅटर्नच्या बनतात, दहामध्ये एक सिनेमा हा या प्रकारातला असतो पण हिटदेखील तोच एक प्रकार होतो. कारण ते प्रेक्षकांना आवडतं. खलनायकाच्या कामाचा सन्मान करणं, त्याच्या कलेला दाद देणं ही एक गोष्ट आहे आणि फक्त त्यालाच फॉलो करणं ही दुसरी गोष्ट आहे. खलनायकाच्या कामाची वाहवा करताना आपण त्याचं उदात्तीकरण करून कथेचा मूळ हेतू बाजूला सारत नाही ना ? याचा विचार प्रेक्षक म्हणून आपणच करायला हवा.

-अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -