घरफिचर्ससारांशएक डाव निसर्गाचा !

एक डाव निसर्गाचा !

Subscribe

2020 हे भयाण वर्ष आता संपत आले आहे आणि त्याचसोबत नवीन वर्षाचे धोरणही आपण सर्व ठरवताच असाल. परंतु या धोरणांसोबत काही अजून छोट्या सवयी आपण अंमलात आणल्या तर स्वतःला व त्याचसोबत निसर्गालादेखील फायदा होईल. प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ व प्लास्टिक इयरबड्ससारखे एकदा वापरले जाणारे प्लास्टिक आज पर्यावरणाला सगळ्यात मोठा धोका ठरत आहे. अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळूया. या सरत्या वर्षांने विशेषत: निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. एका जागी बसवून आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावले आहे. आपल्याला सवयी निसर्गस्नेही कराव्या लागतील. अन्यथा मानवासाठी पुढील काळ कठिण आहे.

विनाशाची ठळक रेष दिसूनही माणसाची हाव गती वाढवत चाललेली आहे. सुखसुविधा व पैशांची नव्हे तर निसर्गाकडून ओरबाडून खाण्याची हाव. 9 ते 5 ड्युटी व्यतिरिक्त बाकीच्या महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणाला वेळ आहे? काळजी करणे लांबचे. पण माणूस कमावतोही सुखसुविधा उपभोगण्यासाठी. नक्की दोष कोणाचा? हवा व पाणी प्रदूषण, जंगले व शेती, खाणकाम व हवामान बदल, आरोग्य व स्वच्छता, उद्योगधंदे व ओझोनचे घटते प्रमाण, वने व वन्यजीव याकडे पाहण्याआधीच सुखसुविधा आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधतात हेही तितकेच खरे. ज्या वस्तूची पूजा व्हायला हवी त्या गोष्टीवर आज हक्क मांडले जात आहेत, या गोष्टीचं दुःख.

2020 हे भयाण वर्ष आता संपत आले आहे आणि त्याचसोबत नवीन वर्षाचे धोरणही आपण सर्व ठरवताच असाल. परंतु या धोरणांसोबत काही अजून छोट्या सवयी आपण अंमलात आणल्या तर बहुतेक स्वतःला व त्याचसोबत निसर्गालादेखील फायदा होईल. या गोष्टी इतक्या शुल्लक आहेत की त्यासाठी काही मोठा त्याग करावा लागणार नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक कुटुंब सोलर बसवून नाही घेऊ शकत, पण नको असलेले पंखे व लाईट नक्कीच बंद करू शकतो. 2020 मध्ये पर्यावरणाविषयी झालेले काही प्रमुख मुद्दे पाहून, त्यावर या सवयींचा कसा प्रभाव पडेल हे समजून घेऊया व शाळेत पर्यावरण विषयात शिकलेल्या काही प्रमुख घटकांचा पुन्हा विचार करूया. आणि हो, एकट्याने करून काय होणार? हा वैयक्तिक बुद्धिमत्तेचा अभाव दर्शवणारा साधारण प्रश्न आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन सुरू होताच नद्यांचे पाणी स्वच्छ झालेला व्हायरल विडिओ आपण सर्वांनीच पाहिला. कारखाने बंद झाल्याने हे शक्य झाले याची सर्वांनाच कल्पना आहे, परंतु वाहनांची वर्दळ कमी झाल्यामुळे व कचर्‍याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे प्रदूषण आटोक्यात आणता आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा, पाणी व ध्वनी प्रदूषणाविषयी कितीही देखरेख केली तरी शेवटी ट्रॅफिकमधे हॉर्न आपल्या हातात असतो हे विसरून चालणार नाही. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ व उल्हासनगर शहरांमधील प्रदूषण पातळी 2018-19 च्या तुलनेत या वर्षी कमी आढळली (MPCB रिपोर्ट प्रमाणे), परंतु पुन्हा सुरू झालेल्या उद्योगांमुळे हे प्रमाण इतकंच शिथिल राहणार नाही. इथे मुद्दा उद्योगांचा नसून, निष्काळजी प्रथेचा आहे. कल्याण शहरातील वालधुनी व उल्हास नदीची अवस्था काही वेगळी सांगायला नको. पावसाळ्यात नालेसफाईसाठी भांडण्यापेक्षा आपल्या कचरा-व्यवस्थापनेची जास्त काळजी घेतलेली बरी. स्वच्छता कायम ठेवून रोगराई दूर करण्याचा हा सरळ सोप्पा मार्ग.

दुबळं वन प्रशासन (प्रादेशिक), लाकूड उद्योगांची वाढती मागणी व राखीव वनाच्या सीमेअंतर्गत वाढत जात असलेल्या शेतीमुळे जमीन निकृष्ट होत चालली आहे. खते व कीटकनाशकांमुळे जमिनीची पोत खालावते हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहे, परंतु हे वापरण्याशिवाय पर्याय तरी कुठे आहे? पण प्लास्टिक? एक सोपा प्रयोग करूया. दोन मिनिटे आपल्या आजूबाजूला असणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू पाहूया आणि त्यातल्या रोज लागणार्‍या व खरंच गरजेच्या वस्तू किती आहेत याचा विचार करूया. लगेचच ध्यानात येईल की बर्‍याचशा वस्तू उपयोगी नाहीत व ज्या उपयोगी आहेत त्यासाठी इतर पर्याय ही आहेत. मातीत मिसळून जाण्यासाठी हजारो वर्षे ज्या प्लास्टिकला लागतात, त्याचा आपण किती निष्काळजीपणे उपयोग करतो. कचर्‍याचा डबा धुण्याचा त्रास नको म्हणून गार्बेज बॅग्स आपण वापरतो. निर्माल्यासारखी मातीत लगेचच मिसळून जाणारी फुले आपण प्लास्टिकच्या पिशवीतून पाण्यात सोडतो. दरवाजात उभे असताना ट्रेनमधून मुंब्रा खाडीत फेकल्या जाणार्‍या निर्माल्याच्या पिशव्या मोजून आश्चर्यचकित व्हाल. स्ट्रॉ व प्लास्टिक इयरबड्ससारखे एकदा वापरले जाणारे प्लास्टिक आज पर्यावरणाला सगळ्यात मोठा धोका म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. असे एकदा वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंपासून अंतर ठेऊया.

- Advertisement -

एखाद्या गोष्टीचे अद्ययावतीकरण न केल्याने ती संपूर्णपणे समजून घेता येत नाही. म्हणूनच सरकारच्या पर्यावरण धोरणांविषयी आपल्याला कमी माहिती असते. राजकारणी पक्षांना विकलेल्या वृत्तवाहिन्यांच्या चटकदार बातम्या आपले लक्ष कधी या समस्येंकडे फिरू देत नाहीत. सोलार प्रोजेक्ट्स आणि 2022 पर्यंत भारत ‘सिंगल युस प्लास्टिक’ निर्मूलन करणार्‍या शपथीसाठी पंतप्रधानांना ‘संयुक्त राष्ट्र’ तर्फे सर्वोच्च पर्यावरण सन्मान तर मिळाला, पण हे वचन टिकवण्यासाठी काही खास तरतुदी अद्याप तरी दिसून आल्या नाहीत. उलट सन्मान मिळाल्यानंतर एका वर्षातच आरेच्या वनक्षेत्रात मेट्रोशेडसाठी वृक्षतोडीचा मुद्धा उफळला. विकासाच्या नावावर अजून बरेच काही. 2020 च्या प्रदूषण आवाहलानुसार 111 देशांपैकी भारत 17 व्या स्थानावर आहे. 2018 च्या जागतिक पर्यावरण आवाहलानुसार आपण 180 पैकी 177 व्या स्थानावर आहोत. संख्यात्मक विचार करता पर्यावरणाच्या परीक्षेत आपण 100 पैकी फक्त 26 गुण मिळवले आहेत, तेही एक कृषीप्रधान देश असून. दक्षिण आशियातील छोटे छोटे देश या बाबतीत आपल्या कितीतरी पुढे आहेत. याचा आपल्या निष्काळजीपणाशी नक्कीच संबंध आहे. आणखी लज्जास्पद म्हणजे आशिया खंडाचा विचार करता, हवामान बदलामध्ये आपले दुसरे स्थान आहे. सामान्य नागरिकांनी या विषयांवर प्रश्न उठल्याचे फारच कमी वेळा निदर्शनात आले आहे.

रोजच्या जीवनामधे छोटे बदल आणणे काही कठीण नाही. इंधनाचा, विजेचा व पाण्याचा कमीतकमी वापरामुळे पर्यावरणाला बराच होत असतो. नियमितपणे वापरात असलेल्या विद्युत उपकरणांसाठी रिचार्जेबल बॅटरी वापरल्याने पैसेही वाचतील आणि इ-वेस्टवर ताबाही राहील. रोज पाण्याची बाटली घेऊन फेकण्यापेक्षा एकच बाटली रोज घरून भरून घेतलेली काय वाईट? ऍमेझॉन, फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करताना इको-फ्रेंडली पॅकेजिंग पण मिळवता येते, ज्याने प्लास्टिकचा वाढीव कचरा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. गार्बेज बॅग्स वापरण्यापेक्षा रोज कचर्‍याचा डबा धुण्याची सवय पर्यावरणासाठी कितीतरी पट जास्त फायदेशीर ठरू शकते. भाजी, फळे व किराणा आणण्यासाठी कापडी पिशवी असल्याने रोजच्या शेकडो प्लास्टिक पिशव्यांपासून आपण अंतर ठेऊ शकतो. ओला आणि सुका कचरा तर आपण वेगळा करतोच, पण त्यातही मातीत मिसळणार्‍या कचर्‍याचे आपण घरच्या झाडांसाठी कंपोस्ट तयार केल्यास पर्यावरणाची आपल्याकडून कमी हानी होईल.

2020 हे वर्ष कठीण नक्कीच होते, पण आपणा सर्वांना स्वतःच्या सवयींच्या निरीक्षणासाठी व काही विषयांवर खोलवर विचार करण्यासाठी मुदतही या दरम्यान मिळाली. New year resolution नक्की ठरवूया, पण या छोट्या छोट्या सवयीसुद्धा आत्मसात करूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -