दिन दिन ऑनलाईन दिवाळी

नकारात्मकतेच्या अंध:कारातून सकारात्मकतेकडे नेणारा दिवाळसण सुरू झाला आहे. मात्र यंदाची दिवाळी सगळ्यांसाठीच खास आहे. या दिवाळीवर नाही म्हटलं तरी कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा इफेक्ट आहेच. याच पार्श्वभूमीवर काहीजणांनी इतर सणांप्रमाणेच दिवाळी, भाऊबीज ऑनलाईनच साजरी करण्याचं ठरवलंय. जे सद्य:स्थितीत तरी नक्कीच स्तुत्य आहे. सध्या सोशल मीडियावरही दिवाळीच्या शुभेच्छांपेक्षा दिवाळी कशी सुरक्षितपणे साजरी करावयास हवी याचेच मेसेज व्हायरल होत आहेत. ही एक चांगली गोष्ट असून नागरिक जागरुक होत आहेत.

सध्या जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. यामुळे कोरोना देशातून गेला असा अर्थ कोणीही काढू नये. तर आपण योग्य ती काळजी घेत कोरोनाला चकवा देतोय असे समजायला हरकत नाही. कारण अजूनही ही महामारी संपलेली नाही. कोरोना व्हायरस अद्यापही आहे. हेच भान ठेऊन आतापर्यंत आपण तब्बल ९ महिने काढलेत आणि अजून किती महिने काढायचेत ते माहीत नाही. हेच भान ठेवत आपण आपल्या पांरपरिक सणउत्सवाला फाटा देत ते ऑनलाईन साजरे केले. काही लग्नही कॅन्सल झाली तर काही पुढे ढकलली गेली. रक्षाबंधन ते गणपती व नवरात्रौत्सवही घराघरात ऑनलाईनच साजरे झाले. कोरोनामुळे सगळंच ऑनलाईन झालं. नातेवाईकांच्या भेटीगाठीपासून आजारी व घरातील ज्येष्ठांची विचारपूसही ऑनलाईन झाली. पण नशीब, कोरोनाकाळात या डिजिटल प्लॅटफॉर्मने तरी माणसांना एकमेकांना जोडून ठेवलं. ज्या कोणी हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्याचे कोटी कोटी आभार. नाहीतर एव्हाना सगळेच एकमेकांना विसरले तरी असते नाहीतर वेडे तरी झाले असते.

माझ्या शेजारी राहणार्‍या नाडकर्णी काकू एकट्याच राहतात. वरचेवर नातेवाईकमंडळी यायची त्यांच्याकडे. आम्ही तर असतोच. पण कोरोना लॉकडाऊनमध्येही त्या अगदी एकट्या झाल्या. कारण सुरुवातीला कोणीच कोणाकडे येत जात नव्हते. दरवाजाच्या फटीतून नाहीतर इंटरकॉमवरून शेजार्‍या पाजार्‍यांची चौकशी करायचो. कारण एकतर काकू ज्येष्ठ. कोरोनाचा धोका ज्येष्ठांना त्यामुळे त्याआमच्याकडे यायला आणि आम्ही त्यांच्याकडे जायला जवळ जवळ मागेपुढे करायचो. कोणामुळे कोणाला संसर्ग होईल माहीत नाही. हीच काय ती भीती.. पण या ऑनलाईनने काकूंसारख्या असंख्य एकट्यांना आधार दिला. कधी झूम तर कधी कॉनकॉल तर कधी व्हिडीओ कॉलमुळे कमीत कमी आपली माणसं कशी आहेत ते तरी कळतं व दिसत होतं. यामुळे धीर आला व सणही लोकांनी आनंदाने ऑनलाईनपद्धतीने साजरे केले. अगदी आमच्या नाडकर्णी काकूंनी देखील.

परवा त्यांनी मेसेज केला व तुला नातेवाईक व मित्रमंडळींना गोळा करून त्यांची उठबस करायची भारी हौस. बाई ती थांबव यावर्षी असा मेसेज त्यांनी केला. सध्या परिस्थिती निवळत असल्याने शेजार्‍यापाजार्‍यांकडे ये जा सुरू आहे. यामुळे मी त्यांना जाऊन सहज मेसेजबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी जे काही उत्तर दिलं ते योग्य होतं. ही दिवाळी नेहमीसारखी नाही. त्यामागे कोरोनाचं संकट आहेच. कावळा बसायला आणि फांदी तुटायला सारखी वेळ नको. म्हणून तुला सावध केलं गं. त्यापेक्षा ऑनलाईन भेटा. कारण जर आपल्यामुळे कोणाला किंवा दुसर्‍यामुळे आपल्याला या महामारीने गाठलं तर दोष तरी कोणी कोणाला द्यावा. कारण सगळी आपलीच माणसं. अजून श्वास घेतोय. हेच पुष्कळ आहे. दिवाळीला हेच देवाचे आभार मानायचे. सगळ्यांना सुरक्षित व सुदृढ ठेव. एवढेच मागायचं. हीच यावर्षाची दिवाळी.. काकूंचे हे बोल आणि समज खूप काही सांगणारी तर होतीच पण कोरोनाचा विसर म्हणा किंवा युज टू झाल्याच्या फिलवरून भानावर आणणारी होती. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले मेसेज दाखवले. ते मेसेजही यावेळची दिवाळी का वेगळी आहे हे सांगणारेच होते.

सगळ्यांच्या मनात दिवाळी साजरी करण्याचा मोह जरी असला तरी त्यावर आवर घालणे महत्वाचे आहे हेच प्रत्येक मेसेज सांगतोय. आजही मेसेज येत आहेत. कुठल्याही मेसेजमध्ये कोणीही दिवाळी दणक्यात साजरी करा असे म्हटलेले नाही. तर दिवाळी सुरक्षित व सावध राहून साजरी करा. ऑनलाईन भेटीगाठी घ्या हेच सांगत आहेत. या दिवाळीत तुम्ही काय शॉपिंग केली हे सोशल मीडियावर न टाकता तुम्ही दिवाळी किती सुरक्षितपणे साजरी करत आहात ते सांगा असे अनेकांनी सुचवले आहे. तर काहींनी लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेले काहीजण पणत्या घेऊन रस्त्यावर बसले आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन करत आहेत. तर कोणी गरीबांना जुने व फाटके कपडे न देता यावेळी पैशांची मदत करण्याचे आवाहन करत आहेत. एकंदर ही दिवाळी नवीन कपडे, रोषणाई, आतषबाजी व फराळाच्या गप्पांचे फड रंगवण्याची नाही तर सजगतेची आहे. एकमेकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची, स्वत:बरोबरच दुसर्‍याचं आरोग्य जपण्याची आहे. असेही यावर्षीची सगळेच सण ज्याने त्याने घरातच नाहीतर ऑनलाईन साजरे केले आहेत. यामुळे वर्षाचा शेवटचा असलेला हा सण देखील घरात राहूनच सुरक्षितपणे साजरा करायला हवा. कारण कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे हे बघून गाफील राहून चालणार नाही. कारण इतिहास पण हेच सांगतो की गाफील असतानाच शत्रू हल्ला करतो. यामुळे दिवाळी साजरी तर करायचीच पण डोळे उघडे ठेवूनच.

कारण जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आपल्याकडेही ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तज्ज्ञांच्या मते ते सर्वस्वी आपल्याच हातात आहे. आपण लोकांशी जितका कमी संपर्क करू तेवढे चांगले आहे. कारण संपर्क वाढला तर कोरोनाही वाढेल. राज्य सरकारने आरोग्य मंत्रालयाने ऐन सणावेळी अनेक अटी शर्थी लागू केल्या आहेत. त्यामुळेच राज्यात कोरोनाग्रस्तांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्याही झपाट्याने वाढतेय. ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. पण संयम बाळगल्यानेच हे शक्य झाले आहे. यामुळे या सणालाही असाच संयम बाळगूया आणि नातेवाईक व कुटुंबीयांसोबत पण दिन दिन ऑनलाईन दिवाळी साजरी करुया आणि कोरोनाला हरवूया.