Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश महानगरीय तरुणांची ‘पटेली’

महानगरीय तरुणांची ‘पटेली’

कादंबरीचा आणि राजकारणाचा जास्त संबंध नाही. पण ‘पटेली’ या कादंबरीत लेखकाने एक गोष्ट अधोरेखित केली आहे ती म्हणजे आपल्या देशाचे राजकारण हे सामाजिक राजकारण नसून जातींवर उभे राहिलेले राजकारण आहे. देशातील मध्यमवर्गीय अस्मितेचा वापर करून हे लोक राजकारण करतात. मुंबईत एका विशिष्ट काळात मिल बंद पडल्या. याचा फायदा स्थानिक पक्षांनी घेतला आणि त्या लोकांना टार्गेट केले. त्यांच्या बळावर हे पक्ष मोठे झाले. यात जे लोक टार्गेट केले ते सामान्य लोक. मग त्यात सर्वच जातीचे लोक आहेत. म्हणजे परत एकदा जातीचा आधार घेऊन स्थानिक पक्ष बळकट झाले. ही आपल्या देशाची स्वातंत्र्यापासून चालत असलेली परंपराच म्हटली तरी चालेल.

Related Story

- Advertisement -

आजच्या वेगवान जगात वावरताना तरुण पिढीला भोगाव्या लागणार्‍या समस्या आणि त्यामुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा, अस्वस्थता व एकाकीपण अविनाश उषा वसंत यांनी त्यांच्या पहिल्याच ‘पटेली’ या कादंबरीत रेखाटले आहे. ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी त्यातून आजच्या युवकाच्या संघर्षाचा नेमका वेध घेतला आहे. सोशल मीडिया, फेसबुक या जंजाळात अडकलेल्या तरुण पिढीचा आरसा कादंबरीच्या रूपाने उभा केलेला आहे.

गावाकडून आलेला तरुण, त्याने अनुभवलेली गावाकडील संस्कृती आणि महानगरीय संस्कृती या दोन्हीच्या कचाट्यात अडकलेला तरुण अविनाश यांनी नेमका चित्रित केलेला आहे. कॉलेज संपता-संपता विशीतच घेतलेले निर्णय, त्यामुळे नात्यात निर्माण झालेला दुरावा, त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि एकूणच आभासी विश्वात अडकलेला तरुण हा या कादंबरीचा केंद्र राहिला आहे.

- Advertisement -

समुद्र हा या कदंबरीचा नायक. चाळीत राहणारा मध्यमवर्गीय तरुण. फेसबुकला नेहमी काही न काही लिहीत असतो. विशेष म्हणजे किती लाईक आल्या कोणी केल्या हेही पाहत असतो. म्हणजे एकंदरीत आजचा सोशल मीडियामध्ये अडकलेला तरुण चित्रित केला आहे.

शाहरुखच्या ‘कुछ कुछ होता है’ मधील लव्ह ट्रायंगलचा फील कादंबरी वाचताना येतो. आजच्या वेगवान जगात तरुण कसा घाईच्या निर्णयाने नात्यांत अडकत जातो याचा प्रत्यय कादंबरीत येतो. तरुण आज आभासी जगातील प्रेमात अडकलेला आहे. या जंजाळात अडकून त्याने घेतलेले निर्णय त्यामुळे आयुष्यात उभी राहिलेली आव्हाने या सगळ्याचा सार कादंबरीत येतो.

- Advertisement -

फेसबुकमुळे आज अनेक तरुणांची मुलींसोबत ओळख होते. प्रेमही होते. दुसरीकडे कॉलेजमध्ये समोरासमोर ही अनेक मुलींसोबत ओळख होते. पण आजचा तरुण आभासी जगातच अडकलेला आहे. त्यामुळे त्याला तिथे जे आहे तेच विश्व वाटू लागते. पण आजचा तरुण त्या जगातील अनेक गोष्टींपासून वंचित आहे. माणसाला आभासी जगात मिळालेले सर्व विश्व कायमचे नसते. मग ते प्रेम का असेना. आपण चॅटिंग करताना खूप छान बोलत असतो. पण प्रत्यक्षात आपलं जगणं, आपले विचार त्यापेक्षा वेगळे असतात. फेसबुकमुळे झालेले प्रेम काही दिवसातच तुटते. पण समोरासमोर झालेल्या भेटीमुळे माणूस आजपण त्यांच्या तितकाच जवळचा मित्र असतो. कारण माणूस आभासी जगात जितका चांगला असल्याचा pretend करत असतो तितका तो वास्तवात नसतो. आभासी जगात आजचा तरुण अडकत चालला आहे. तो ऑनलाइन जगात जगत आहे. त्यामुळे तो अस्वस्थ देखील होत आहे.

मला तर वाटते ऐन उमेदीच्या काळात, वयाच्या विशीतच तरुण अस्वस्थ कसे होतात? याच उत्तर एकच-त्यांचा प्रत्यक्ष जगाशी तुटलेला संपर्क. म्हणून या आभासी जगामुळे माणसाचं असणारे सामाजिक नाते मग ते आई-वडिलांसोबत असेल, मित्र-मैत्रिणी सोबत, गावातील दुकानदारासोबत (म्हणजे आपण जर एखाद्या दुकानात 2-3 वेळा जरी गेलो तरी त्याच्याशी आपली ओळख होते, पण आता ते शक्य नाही ऑनलाइन शॉपिंगमुळे) असणारे नाते उभे राहत नाही. ते वर्तुळ आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणून आजचा तरुण अस्वस्थ होताना दिसत आहे. तो अस्वस्थ होण्यामागचे कारण म्हणजे आभासी जगदेखील कायमचे नसते. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. या जगात एकाच वेळी आभासी जगात मिळालेले प्रेम आणि समोरासमोर झालेली मैत्री या दोन्हीचा अनुभव आपणाला ही कादंबरी वाचताना होतो.

कादंबरीचा आणि राजकारणाचा जास्त संबंध नाही. पण कादंबरीत लेखकाने एक गोष्ट अधोरेखित केली आहे ती म्हणजे आपल्या देशाचे राजकारण हे सामाजिक राजकारण नसून जातींवर उभे राहिलेले राजकारण आहे. देशातील मध्यमवर्गीय अस्मितेचा वापर करून हे लोक राजकारण करतात. मुंबईत एका विशिष्ट काळात मिल बंद पडल्या. याचा फायदा स्थानिक पक्षांनी घेतला आणि त्या लोकांना टार्गेट केले. त्यांच्या बळावर हे पक्ष मोठे झाले. यात जे लोक टार्गेट केले ते सामान्य लोक. मग त्यात सर्वच जातीचे लोक आहेत. म्हणजे परत एकदा जातीचा आधार घेऊन स्थानिक पक्ष बळकट झाले. ही आपल्या देशाची स्वातंत्र्यापासून चालत असलेली परंपराच म्हटली तरी चालेल. एक नजर टाकली तरी प्रत्येक स्थानिक पक्ष एका विशिष्ट जातीच्या आधारामुळे वर आला आणि ते particularly त्याच जातीचे समर्थन करताना दिसतात. हे आजचे वास्तव आहे आणि यात नकळत किती तरी तरुण ओढले जातात. यामुळे त्यांना बेरोजगारीची जाणीव होत नाही त्यामुळे तरुण लोकांचा देश असूनसुद्धा भारत सतत मागे पडत चालला आहे.

समुद्र नेहमी बांद्य्राच्या स्कायवॉकला जातो. अस्वस्थ किंवा बोअर होऊ लागले की तो इथे येतो. वेस्टर्न एक्सप्रेसच्या लांब रास्ता आणि त्यावरील गाड्या न्याहाळत. गावाला रात्री तारे मोजायचे आणि इथे गाड्यांना तारे समजतो. मग असाच विचार करत असताना त्याला घरासमोरील भावकीची घरे आठवतात. कधीतरी गावात दुपारी येणारी एसटी, भैरवनाथाचे मंदिर आठवते. जसा तो आता स्कायवॉकवरून गाड्या बघतो तसे त्याला माळावर दगडावर बसलेले आठवते. यातून नायकाचे एकाकीपण, अस्वस्थपण व्यक्त होत जाते. माणसे असूनसुद्धा तो एकटा पडलेला आहे. हे त्याचे एकाकीपण आजच्या महानगरीयच नव्हे तर अखंड युवा पिढीचे प्रतिनिधित्व करते आहे. गावाकडून शहरात गेलेल्या तरुणांची घालमेल, बदलत चाललेला संस्कृतीचा वसा, आभासी जगाचे आकर्षण आणि त्या जंजाळात अडकलेला तरुण यामुळे तो एकटा पडत चालला आहे. हे आजचे कोलाज चित्र कादंबरीत मांडलेले आहे.

कादंबरीत भाषाशुद्धतेचा आणि राज्यभाषा न वापरता हिंदीचा आयटी क्षेत्रातील वाढत जाणारा प्रादुर्भाव दाखविला आहे. नेमकं झालंय असं की पुणे, मुंबईसारख्या महाराष्ट्रातील अनेक महानगरात लोक बोलतानासुद्धा मराठीचा वापर न करता हिंदीचा वापर करतात. हेच आयटी क्षेत्रात देखील होताना दिसत आहे. लोक ऑफिसमध्ये बोलताना मराठीचा वापर करत नाहीत. स्टाईल मारायची म्हणून लोकं आज हिंदीमध्येच बोलतात. यामुळे गावाकडून शहरात शिकायला आलेल्या मुलांची कोंडी होते. त्यात जर कुठे मराठी बोलली जात असेल तर ती शुद्ध बोलावी, गावठी नाही. हा शुद्धतेचा आग्रह अशा क्षेत्रात वाढत चालला आहे. हेच चित्र आपण दक्षिण भारतात पाहिले म्हणजे चेन्नई, बेंगलोरचे पाहिले तर तिथे लोक एकतर त्यांची प्रादेशिक भाषा किंवा इंग्लिश वापरतात. पण कमाल प्रमाणात प्रादेशिक भाषाच वापरतात. हा मुद्दा कादंबरीत ऊर्जेच्या रूपाने लेखकाने समाजासमोर मांडला आहे. तिला शुद्ध भाषा बोलण्यासाठी केलेला आग्रह कादंबरीत मांडला आहे.

लेखकाने कादंबरीत चाळ हुबेहूब उभारली आहे. चाळीतील चालीरीती, तेथील लोकांची मानसिकता, लोकांचे विचार कादंबरीत परखडपणे मांडले आहेत. चाळीत हरेक कामांचे नेते असतात. मयताचे, सत्यनारायणाचे, गणपतीचे, हॉस्पिटलला ऍडमिट करणारे नेते आणि तेथे गर्दी झाल्यावर येणारे नेते आणि मग स्वतःच सगळ्या सूचना देणार; सगळे त्यांचंच ऐकणार. यावरून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे लोकांनी कामे वाटून घेतली आहेत. जी कामे पूर्वी लोक एकत्र मिळून-मिसळून करत त्याच कामांसाठी आज दलाल आहेत. बाकीच्या कामांचे एकवेळ समजू शकतो पण मयताच्या कामाचेसुद्धा नेते? हा माणसातील बदल फक्त जागतिकीकरण आणि आभासी जगामुळे समोर आलेले वेस्टर्न कल्चरमुळे झालेला आहे. हे फक्त चाळीपुरते मर्यादित नसून सगळीकडे हीच अवस्था आहे. एकूण माणसाच्या जगण्याचे इव्हेंटिकरण झाले आहे.

चाळीचे वर्णन करताना लेखक लिहितात, इथे लोक नाका-डोळ्यावरून दिसण्याची व्याख्या करत नाहीत. दिसण्याची व्याख्या म्हणजे अंगावरचे सोने आणि साडीने केली जाते. त्यात साडी किती महागाची आहे यावरून केली जाते. जेव्हा गझल पहिल्यांदा समुद्रच्या घरी येते तेव्हा चाळीत होणारी तिच्याबद्दलची चर्चा, लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एकंदरीत समुद्रकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन असेल. आजसुद्धा लोक लग्नानंतर असलेल्या पुरुष आणि महिलेच्या मैत्रीच्या नात्याला योग्य नजरेने बघत नाहीत. अशी प्रत्यक्षात असलेली चाळ कादंबरीत हुबेहूब उभारली आहे.

आज माणूस माणसापासून तुटत चालला आहे. माणसातील माणसाप्रति असणारी आत्मीयता हळूहळू संपत चालली आहे. पण याच आधुनिक जगात भटक्या जातीतील लोक एकमेकांना धरून आहेत. झोपडीत राहणारे लोक कुठून मोठ्याने आवाज आला तर लगेच तिकडे जातात आणि एकत्र मिळून ती समस्या सोडवतात. भलेही ते लोक भांडण करतात, जास्त शिकलेले नसतात, पण ते एकत्र असतात. जेव्हा दवाखान्यात त्यांच्यातील कोणीतरी आजारी असेल तरी पन्नास एक जण त्याला दवाखान्यात घालवायला येतात. तो नीट बरा होईपर्यंत तिथेच असतात. पण आपल्यातील कोण आजारी पडलं तरी आपल्याला माहीत होत नाही. तो बरा झाल्यावर त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवरून आपल्याला कळतं. महानगरात तर शेजारच्या लोकांनासुद्धा माहीत नसतं की बाजूला कोणीतरी आजारी पडले आहे. ही बदलत जाणारी व्यवस्था येणार्‍या पिढीसाठी चांगले चित्र उभा करणारी नाहीये. कादंबरीत चाळीचे वर्णन करताना लेखक लिहितात हॉस्पिटलमध्ये होणारी गर्दी आणि गर्दी झाल्यावरच येणारे नेते. यावरून आपणाला आजच्या लोकांची बदललेली मानसिकता दिसून येते म्हणून हे मुद्दाम लिहिले आहे.

कादंबरीचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पूर्ण कादंबरीतील पात्रांच्या स्वभावाचे किंवा राहणीमानाचे वर्णन येत नाही. वाचकाने नायकाला आधीच जज करू नये. संपूर्ण कादंबरीभर वाचक म्हणून पात्रांबद्दल कोणताही ठोकताळा बांधता येत नाही. हे या कादंबरीचे यश आहे.

यालाच जोडून आणखी गोष्टीची नोंद महत्त्वाची ती म्हणजे जेव्हा हेमाला त्या तिघांच्या नात्याबद्दल प्रश्न पडतात तेव्हा निवेदक म्हणतो त्याबद्दल जितके जास्त प्रश्न तितक्या त्याला उत्तराच्या अधिक दिशा असतात आणि एकदा का उत्तर मिळालं की डोकं विचार करणं थांबतं. तेव्हा अधिक प्रश्न पडणे हेच महत्त्वाचे आहे. ही निवेदकाची भूमिका कादंबरीची परिणामकारकता वाढवते. महानगरीय व्यवस्था, आभासी जग आणि प्रत्यक्षातले जग यामध्ये तरुणाईची होणारी घालमेल म्हणजे पटेली होय.

या कादंबरीचा शेवट जसा आपण प्रिडिक्ट करू तसा नाही. शेवटी सगळे जण भेटतात आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगतात. कदाचित शेवटामुळे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात उभे राहतात. पुढे समुद्र व ऊर्जा एकत्र येतील का? गझलचे काय होईल? या प्रश्नांची उत्तर देणे कादंबरीकाराला आवश्यक वाटत नाही. आभासी जगातून बाहेर पडून प्रत्यक्ष जगात वावरण्याचा आणि लढण्याचा जो निर्णय तिघांनी घेतला आहे तो महत्त्वाचा आहे. हे पुढील शब्दात सांगता येईल-

वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा है

लेखकाने त्यांच्या सुरू असलेल्या आयुष्याला पहिल्यासारखं शेवट न करून एक वेगळाच ‘मोड़’ दिला आहे.

आज फायनली अविनाशची पटेली कादंबरी प्रकाशित झाली. पहिलीच कादंबरी आहे पण कादंबरी इतर कादंबर्‍याप्रमाणे न मांडता नवीन पद्धतीने मांडली आहे. नवीन काय आहे हे सर्वांनी वाचल्यावर कळेल.

पटेलीसाठी खूप खूप अभिनंदन अविनाश. अजून अशाच कादंबर्‍या वाचकांच्या भेटीला दे ह्याच शुभेच्छा!!!!!

-प्रतीक कदम

- Advertisement -