माणसे अशी तशी!

‘ओ, मुंबईकरांनो तुमका गावात येवन कितके दिस झाले’. कित्याक, मी म्हणालो. त्यावर तिचे उत्तर ऐकून मी गार झालो. ‘तुम्ही 14 दिवस कोणाच्या संपर्कात इल्यास नसात तरच मी तुमका भाजी देयन’. ‘गे, उगाच उद्धव ठाकरे सरकारसारखे माका नियम सांगा नको. मी माझी आणि गावची काळजी घेऊन गावाक इलय. तुका भाजी देवची आसात तर दी, नाय तर रवांदे’. मीसुद्धा कोकणी तिरसट उत्तर दिले. मी रागावलोय हे तिच्या लक्षात आले. ‘नाय ओ तसा नाय. तो कोरोना काय अजून गेलो नाय म्हणान मी बोललय. मीसुद्धा आणखी वाद न घालता तांदूळ, दूध आणि भाजी घेऊन तिची अर्धी टोपली रिकामी केली. वाली, कुरडूची तिच्या भाजीची चव अजूनही कायम आहे.

गे… परबीनी भाजी व्हयी. ती गेटजवळ उभी होती. डोक्यावर भाजीची मोठी टोपली आणि एका हातात पिशवी. त्यात दूध, तांदूळ. दमयंती बाजारात चालली होती हे सारे विकायला. खरेतर तिला बाजारात जाण्याची गरजच लागायची नाही. ताजी मळ्यातील भाजी आणि घरचे दूध, तांदूळ यामुळे गावातच हे सारे संपून जाई. कोकणातील कष्टकरी चिवट महिलांची ती प्रतिनिधी होती. गेल्या दोन एक दशकात चित्र बदलले असेल, पण कोकणातील खर्‍या अर्थाने संसार उभे केले ते महिलांनी. पुरुष माणूस पोट भरायला मुंबईकडे गेले असताना या बाईने पदर खोचून संसार चालवला नाही तर पळवला. फक्त तिने नांगर हाती धरला नाही इतकेच. पण, दादा-भाऊ करत शेती पड राहू दिली नाही. दोनाची चार झाडे करत घराला हात दिला. आहे त्या परिस्थितीत कसं जगायचं याचे धडे तिने आपण गिरवताना आपल्या घरावर तसेच संस्कार केले… आजही तळकोकणात म्हणा किंवा वरच्या कोकणात एक एक बाई कितीतरी घरं चालवतेय. म्हणून मला दमयंतीचे कौतुक वाटतं. आई आत काही करत होती, म्हणून मीच गेटवर गेलो तर दमयंतीच्या तोंडाला मास्क होता… मी मनातल्या मनात म्हटले नियम काटेकोरपणे पाळावे ते कोकणातील माणसांनी.

जरा जास्तीच आणि वर समोरच्या माणसांना काय वाटेल याची पर्वा न करता दोन गोष्टी तोंडावर सुनावण्याची तयारी. मी बाहेर येताच ती म्हणाली, ‘ओ, आई खुय हा’. मी म्हणालो, ‘आत हा काय तरी करता तिच माका म्हणाली तुका आवडता ती भाजी घे’. एक क्षण ती माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘ओ, मुंबईकरांनो तुमका गावात येवन कितके दिस झाले’. कित्याक, मी म्हणालो. त्यावर तिचे उत्तर ऐकून मी गार झालो. ‘तुम्ही 14 दिवस कोणाच्या संपर्कात इल्यास नसात तरच मी तुमका भाजी देयन’. ‘गे, उगाच उद्धव ठाकरे सरकारसारखे माका नियम सांगा नको. मी माझी आणि गावची काळजी घेऊन गावाक इलय. तुका भाजी देवची आसात तर दी, नाय तर रवांदे’. मीसुद्धा कोकणी तिरसट उत्तर दिले. मी रागावलोय हे तिच्या लक्षात आले. ‘नाय ओ तसा नाय. तो कोरोना काय अजून गेलो नाय म्हणान मी बोललय. मीसुद्धा आणखी वाद न घालता तांदूळ, दूध आणि भाजी घेऊन तिची अर्धी टोपली रिकामी केली. वाली, कुरडूची तिच्या भाजीची चव अजूनही कायम आहे.

‘ओ चाकरमान्यांनू गावाक इलास मा. कधी येतास गणपती बघूक’, संजूची ती हाक गणपतीच्या पहिल्या दिवशी आता माझ्या परिचयाची झाली होती. संजू हा आमच्या वेंगुर्ल्यातील मोठा व्यापारी. पण, सामाजिक भान असलेला चांगला माणूस आणि मित्र. त्याने शाळा, कॉलेजपासूनचे मित्र टिकवून ठेवले नाही तर त्याचा एक ग्रुप बनवून चांगली कामे करण्यासाठी कायम पुढाकार घेतला. आज त्याच्या आणि आमचा आणखी एक मित्र मोहनच्या प्रयत्नांमुळे कुडाळमध्ये बांबूवर आधारित एक मोठा उद्योग उभा राहिला असून त्यातून दीडशे दोनशे माणसांना रोजगार मिळाला आहे. कोकणात आयुष्यभर राहूनही संजू आणि मोहनच्या कायम सकारात्मक वृत्तीचे मला कौतुक वाटत आलंय. संजू यावेळीही नेहमीची हाक मारेल असे वाटत होते. खरं तर वेंगुर्ले शहरातील बहुतांशी लोकांचे दीड दिवसाचे गणपती. त्यामुळे चतुर्थीच्या पहिल्या दिवशी संजू सर्वांना हाताला धरून मित्र परिवाराकडे नेणारा आमचा सूत्रधार. पण, तो म्हणाला, ‘संजय यंदा मी कोणाकडे गणपती बघूक जावचय नाय. आपणच नियम पाळूक व्हये. कोणाक ईलव तर आवडात न आवडात. आपण काळजी घेवक व्हयी’. अरे पण संजू, ‘बाजारात बघ मरे कितके जण तोंडाक मास्क लावनत नाय ते. बिनधास्त फिरतत. हॉटेलात चाय, भजी खातत आणि हे बहुतेक गावातले असत. आता खुय गेले नियम. मी नियमावर बोट ठेवताच संजू म्हणाला, ‘कोण काय करता ता माका मायत नाय. मी जावचय नाय’. ठिक तू येव नको. मी तुझ्या गणपतीक इलय तर चलात मा. संजू म्हणालो, चलात.

मग मी मोहनला फोन करून त्याला बोलावून घेतले. संजूच्या घरी गणपतीला गेल्यावर वर्षभर पुरतील एवढ्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गप्पा मारून झाल्या. संजू समोर असला की तो एकटा बोलणार आणि आम्ही ऐकत बसायचे. शांत लयीत, मुद्देसूद त्याचे बोलणे म्हणजे एखाद्या व्याख्यानमालेत बसल्यासारखे वाटते. मुख्य म्हणजे तो नुसता बोलत नाही. खूप लोकांना त्याचा आधार आहे. त्याचा माणसांना पोटापाण्याला लावण्याचा स्वभाव हा मला नेहमी त्याची ओढ लावत आला आहे. निराशा संपून जेथे आशा सुरू होते तेथे कायम मला संजू उभा असल्यासारखा दिसतो. फक्त कागदोपत्री नाही तर हुशार इंजिनियर असून ठरवून तो कोकणात उभा राहिला. सोबत इतरांनाही मोठे करत गेला. हयसर काय एक व्होवचा नाय, ही वृत्ती त्याने बदलून दाखवली. आज भारतच नाही तर जगभर बांबूच्या प्रचार प्रसारासाठी तो फिरत असतो. त्याची बांबू उद्योगावर व्याख्याने सुरू असतात. आज संजू आणि मोहनच्या प्रयत्नांमुळे तळकोकणात मोठ्या संख्येने शेतकरी बांबू लागवडीकडे वळले असून त्यातून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. संजूच्या कामाची टाटा आणि इतर मोठ्या उद्योगपतींनी दखल घेतली आहे. त्याचे हे काम मला मोठ्या राष्ट्रीय पुरस्काराच्या तोडीचे वाटते.

माझी आई गावात एकटी राहते. तिने वयाची ऐंशी पार केली असूनही तिची आपल्या मातीशी मुळे घट्ट रोवली गेलीत. तिला आता मुंबईचा श्वास कोंडल्यासारखा वाटतो. त्यामुळे तिला गावच्या मोकळ्या हवेची ओढ असून आता माझे काही होईल ते येथेच, मी काही तुमच्याकडे मुंबईला येणार नाही, हा तिचा निर्धार बघून तिला जरी बरे वाटत असले तरी आम्हाला तिची काळजी वाटते. रात्री अपरात्री तिच्यासोबत कोण असावे म्हणून यावेळी गणपतीत मी तिच्यासोबत राहणारी बाई किंवा मुलगी मिळेल का याचा शोध घेत असताना विमलचे मला माझ्या एका मित्राने नाव सुचवले. खरेतर ती खात्या पित्या घरची. पण, मुलबाळ होत नाही म्हणून बर्‍याच वर्षांनी तिच्या नवर्‍याने दुसरे लग्न केल्यावर विमलने एका घरात दोन चुली केल्या.

दुसर्‍या बायकोपासून दोन मुले झाल्यावर सवतीची मुले आपली समजण्याचे मोठेपण न दाखवत तिने स्वतःला आणखी कोंडून घेतले. तिचा नवरा तसा पाप्याचं पितर. त्याने दुसरे लग्न केल्यावरही तिला काही कमी पडू दिले नाही. पण, तिला त्याचे काही नको होते. मजुरी करून ती दिवस काढते. म्हणून विमलच्या घरासमोर राहणार्‍या माझ्या मित्राने तिचं मला नाव सुचवलं. आम्ही दोघे तिच्या घरी गेलो. आणि एकाच ठिकाणी राहून तुला चांगला पगार, जेवणखाण मिळेल, असं मित्राने समजावून सांगितले. मलाही आशा होती की ती हो म्हणेल. पण, क्षणाची उसंत न घेता ती म्हणाली, ‘माका जमाचा नाय’. विमलचा नवरा शांत बसून होता. मित्राने पुन्हा एकदा शांतपणे तिला समजावून सांगितले. पण, ती ऐकायला तयार नव्हती. हा माझा मित्र गावचा उपसरपंच. नेहमी लोकांच्या मदतीला धावून जाणारा. विमललाही त्याने मदत केली होती. आपला शब्द खाली पडणार नाही, याची त्याला खात्री होती. मात्र तिच्या उत्तराने तो निराश झाला. ‘हयसर लोका दिसभर बसान रवतीत. पण, काय काम सांगला की त्यांच्यात नायरी भरता. चांगला कोणाक सांगाक नको’. तो आणखी निराश होण्यापेक्षा मी त्याला थांबवत म्हणालो, सोडून दे. दुसरी कोण तरी बघूया. आणि आम्ही विमलच्या घरातून बाहेर पडलो…

-संजय परब