घरफिचर्ससारांश‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं उपकथानक

‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं उपकथानक

Subscribe

‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची निर्मिती करण्याचं जेव्हा राज कपूर यांच्या मनात घोळू लागलं तेव्हा त्या सिनेमात शास्त्रीय संगीताला वाव असणार हे लक्षात घेऊन त्यासाठी त्या पध्दतीचा, तसा खास बाज असणारा संगीतकार हवा असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं कथानक पुढे घेऊन जाणारं संगीत कोण देईल असा विचार करत असतानाच त्यांना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताची आठवण झाली. ती आठवण होताच त्यांनी थेट लता मंगेशकरांचं घर गाठलं.

‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची निर्मिती करण्याच्या तयारीत राज कपूर गुंतले होते. ‘मेरा नाम जोकर’सारख्या महत्वाकांक्षी सिनेमात मार खाल्ल्यामुळे नंतर ‘बॉबी’ पडद्यावर आणताना काही गोष्टीत राज कपूरनी सावध पावलं टाकली होती. उदाहरणच द्यायचं तर ‘बॉबी’चं संगीत त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलालवर सोपवली होती. ‘बॉबी’सकट ‘बॉबी’तली गाणीही सुपरडुपर चालल्यामुळे राज कपूरचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ करताना राज कपूर त्या सिनेमाचीही जबाबदारी पुन्हा लक्ष्मीकांत-प्यारेलालवरच सोपवणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असणार होतं. राज कपूर ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ करायला घेताहेत ही बातमी जेव्हा कानोकानी झाली तेव्हा लक्ष्मीकांत-प्यारेलालच्या सहाय्यकांनीही राज कपूर त्या सिनेमासाठी त्यांनाच बोलवणार हे पैजेवर सांगायला सुरूवात केली.
असो, पण तरीही ह्या सगळ्या कथानकाला एक उपकथानक होतं…

झालं होतं असं की राज कपूर जातिवंत कलाकार होते, तसंच काव्य, साहित्य, संगीत, विनोद अशा सगळ्या कलाप्रकारांचे खोल आस्वादक होते. ह्या सगळ्या कलाप्रकारांच्या समकालिन नोंदी स्वत:कडे ठेवण्याची त्यांना आस असायची. निरनिराळ्या भाषेतलं साहित्य, कथा, कविता, गाणी ह्याचा ते जातीने धांडोळा घेत. मराठीत पुलं काय लिहिताहेत, विजय तेंडुलकरांची कोणती नाटकं चालू आहेत, बंगालीत काय घडतंय, मल्याळीमध्ये काय होतंय ह्याची ते आपल्या पध्दतीने चाचपणी करत. ‘अर्धसत्य’ ह्या सिनेमाच्या तुफान यशानंतर त्यांनी विजय तेंडुलकरांना गाठलं होतं आणि अशी एखादी पटकथा तुम्ही मला लिहून द्याल का, असा सरळ प्रश्न केला होता. पुढे त्याबाबतीत तसं काही घडलं नाही हा भाग सोडा, पण तसा प्रयत्न तरी केला होता. राज कपूरनी श्रीनिवास खळेंची मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकली होती. खळेंचं ‘भेटीलागे जीवा’ हे गाणं त्यांना खूप आवडलं होतं. एकदा सुरेश वाडकरसोबत खळेंना ते भेटले तेव्हा त्यांनी खळेंकडे हटकून ह्या गाण्याची आठवण काढली होती.

- Advertisement -

…तर कलेच्या क्षेत्रातल्या सगळ्या प्रकारच्या हालचालींची नोंद ठेवणार्‍या राज कपूरनी मराठीतल्या आणखी एका संगीत दिग्दर्शकाच्या कलेची नोंद घेतली होती…आणि त्या संगीत दिग्दर्शकाच्या कलाकुसरीवर ते लक्ष ठेवून होते. ह्या संगीतकाराचं नाव होतं हृदयनाथ मंगेशकर! ह्या संगीतकाराची संगीतातली वाट नेहमीच्या संगीतकारांसारखी मळलेली नाही हे राज कपूरच्या दर्दी मनाला त्यांचं संगीत ऐकताना केव्हाच लक्षात आलं होतं. लता मंगेशकरांकडे त्याबद्दल त्यांनी अगदी मुक्त कंठाने तारीफ केली होती. राज कपूरसारखा दर्दी माणूस आपल्या भावाच्या संगीताची तारीफ करतो म्हणून लता मंगेशकरांचं मनही सुखावलं होतं.

ह्याच्या पुढचा भाग असा की ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची निर्मिती करण्याचं जेव्हा राज कपूर यांच्या मनात घोळू लागलं तेव्हा त्या सिनेमात शास्त्रीय संगीताला वाव असणार हे लक्षात घेऊन त्यासाठी त्या पध्दतीचा, तसा खास बाज असणारा संगीतकार हवा असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं कथानक पुढे घेऊन जाणारं संगीत कोण देईल असा विचार करत असतानाच त्यांना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताची आठवण झाली. ती आठवण होताच त्यांनी थेट लता मंगेशकरांचं घर गाठलं. लतादिदींनाही त्यांच्या त्या येण्याचं आश्चर्यही वाटलं आणि कौतुकही. आश्चर्य अशासाठी वाटलं की राज कपूर हे हिंदी सिनेमातलं हिमालयाएवढं मोठं नाव होतं आणि त्यांनी तोपर्यंत शंकर-जयकिशन, सलील चौधरींसारख्या इंडस्ट्रीतल्या तगड्या संगीतकारांकडून आपल्या सिनेमांचं संगीत करून घेतलं होतं, शिवाय संगीत ह्या विषयाचा तो अभ्यासक असलेला कलाकार होता. अशा माणसाने त्याच्या आगामी सिनेमाच्या संगीतासाठी आपल्या लहान भावाची निवड करावी ह्याचं त्यांना कौतुकही वाटलं होतं…आपला कलावंत भाऊ राज कपूरसारख्या कलावंताने केलेल्या निवडीसाठी पात्र ठरावा ह्याने त्या सुखावणं साहजिक होतं.

- Advertisement -

लता मंगेशकर त्या संपूर्ण काळात प्रचंड बिझी असायच्या. रेकॉर्डिंग्जमागून रेकॉडिंर्र्ंग्ज, परदेश दौरे ह्यातून त्यांना फार सवड सहसा मिळायची नाही. ह्या अशा त्यांच्या बहराच्या काळात साक्षात राज कपूरसारखा माणूस त्यांच्या घरी आला होता आणि त्यांच्या भावाने आपल्या सिनेमासाठी संगीत द्यावं म्हणून प्रस्ताव ठेवत होता ह्याचं त्यांना आणखी एका गोष्टीसाठी कौतुक वाटत होतं. हृदयनाथ मंगेशकर हे तोपर्यंत मराठी संगीतात एक नाव झालेलं असलं तरी त्यांचं काही तत्व होतं. लता मंगेशकर ह्या स्वरसम्राज्ञी म्हणून अढळ स्थानापर्यंत पोहोचलेल्या असल्या तरी संगीत क्षेत्रात आपण पुढचा पल्ला गाठावा म्हणून आपल्या ह्या बहिणीच्या नावाचा उपयोग करणं हे त्यांच्या तत्वात बसणारं नव्हतं. संगीत क्षेत्रातली माझी कामगिरी पहा आणि त्या निकषावर मला काम द्या असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आपण राज कपूरकडे आपल्या भावाची कसलीही शिफारस न करता स्वत: राज कपूर त्याचं काम पाहून घरी आले आहेत ह्या गोष्टीचं लता मंगेशकरांना एक वेगळंच समाधान होतं.

पण पुढे लता मंगेशकर परदेश दौर्‍यावर गेल्या आणि ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’च्या बाबतीत राज कपूरच्या मनात वेगळाच विचार आला. त्यांनी आपला आधीचा निर्णय फिरवला आणि ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’च्या संगीताची जबाबदारी लक्ष्मीकांत-प्यारेलालवरच सोपवली. हृदयनाथ मंगेशकरांचा त्यामुळे काही हिरमोड झाला नाही, पण लता मंगेशकर परदेशातून आल्यावर त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्या नाराज झाल्या. कारण स्वत: हृदयनाथ मंगेशकर राज कपूरकडे काही काम मागायला गेले नव्हते तर खुद्द राज कपूरच कामाचा प्रस्ताव घेऊन हृदयनाथांच्या घरी आले होते. त्याला काम द्यायचंच नव्हतं तर तुम्ही मुळात आलातच कशाला, असा लता मंगेशकरांचा सवाल होता.

झालं, लता मंगेशकरांनी ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’साठी आपण गाणार नसल्याचं कळवून टाकलं. मग लक्ष्मीकांतनीही, लतादिदी गाणार नसतील तर आम्हालाही ह्या सिनेमासाठी संगीत करण्यात रस नाही असं सांगून टाकलं. सिनेमाचे गीतकार पंडित नरेंद्र शर्मांनाही लता मंगेशकरांनी आपली गाणी न गाणं पटणारं नव्हतं. शेवटी हृदयनाथनी लता मंगेशकरांना समजावलं. ते म्हणाले, ‘दिदी माझ्यासाठी हा सिनेमा तू सोडू नयेस असं मला वाटतं, कदाचित मला ह्या सिनेमासाठी न घेण्यामागे त्यांचीही काहीतरी बाजू असेल!’ लता मंगेशकरांना आपल्या भावाचं हे म्हणणं पटलं आणि त्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं गाणं गाण्यासाठी राजी झाल्या. पण ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं गाणं त्या गायल्या आणि तिथे कुणाशी काहीही न बोलता घरी आल्या!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -