घरफिचर्ससारांशगावात गडबड झाली पाहिजे!

गावात गडबड झाली पाहिजे!

Subscribe

शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारुन पाहा, ते सांगतील गावात का गडबड झाली पाहिजे. या एका माणसाने गेले दोन महिने एका गावात नाही तर देशात गडबड करून भाजपला सळो की पळो करून सोडलंय. काँग्रेस, डावे, समाजवाद्यांच्या थिंक टँकला जमले नाही ते या एका माणसाने करून दाखवलंय... मोदी आणि शहा यांना दाढीवरून हात फिरवून फिरवून अजूनही कळलेलं नाही, ‘ये राऊत में ऐसी कौनसी बात है, जो हमारे इतने सारे बंदोमें नही’. रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीत चिंतन वर्ग घेऊनही इतकी वर्षे गावात गडबड करणारे नेते तयार न करता आल्यामुळे आता नवीन वर्ग घेऊन यावर भाजपमध्ये चिंतन होणार असल्याचे समजते.

गावात गडबड झाली पाहिजे, गोंधळ झाला पाहिजे. नाही तर तुमचे महत्त्व नाही… असा सध्याचा जमाना आहे, असे सांगतात बुवा! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बोलण्यातून तरी तसे दिसते… सत्तर ऐंशीच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’ या नाटकांनी स्वतःला कुलीन म्हणवून घेणार्‍या समाजात गडबड उडवली होती; पण, ती गडबड समाजाला स्वतःला तपासून घेण्याची होती. माणूसपणाच्या कसोटीवर स्वतःला घासून घ्यायची होती. मुख्य म्हणजे संस्कृतीच्या बेड्या तोडणारी होती. दुसर्‍या बाजूला जॉर्ज फर्नांडिस यांची गडबड रस्त्यावर उतरुन कामगारांना न्याय देण्याची होती. प्रसंगी पोलिसांचा अमानुष मार खाण्याची होती. मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, कमल देसाई यांनी लाटणे पोळपाट, हंडा कळशा घेऊन सरकारला जाब विचारण्याची होती. रक्ताचे पाणी करून मुंबई उभारणार्‍या गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या दत्ता सामंत यांची होती. बजाव पुंगी, हटाव लुंगी करत स्थानिक भूमिपुत्रांना नोकर्‍या देताना, अरे, आवाज कुणाचा म्हणत मराठी माणसांना न्याय देणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांची होती. प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारत बंड उभारणार्‍या नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्या तिसर्‍या दुनियेची व्यथित करणारी कहाणी होती. पण, भारत २१ व्या शतकाकडे जात असताना अचानक या सार्‍या गडबडी थांबल्यात…अशा मग्न तळ्याकाठी वातावरणात गेल्या दोन पिढ्या जगत आहेत. दोन दशकात नवीन काही तरी सांगू पाहणारी अशी गडबड नाही. सगळे कसे शांत शांत… सगळेच प्रश्न संपल्यासारखे. पण, हे म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा होऊन मग्न तळ्याकाठी युगांत लोटल्यासारखे पाहत बसण्यासारखं झालंय. गेल्या आठवड्यात कामगारांचा देशव्यापी संप होता; पण, फार आवाज झाला नाही. शेवटचा श्वास घेणारा श्रमिक आता गिरणी कामगारांच्या वाटेवरून अंधार यात्रेला निघालाय… शिवाय महागाई वाढलीय म्हणून सत्तेला प्रश्न विचारावे, अशीही सध्या काही गडबड नाही. असे सारे अंगावर एकही ओरखडा न पडलेल्या निर्जीव भोवतालात ‘इतना सन्नाटा क्यो है भाई…’ असा जीवघेणा प्रश्न उभा राहतो तेव्हा गावात एक वेगळी गडबड आपल्यापुढे उभी राहते.

शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारून पाहा. ते सांगतील गावात का गडबड झाली पाहिजे. या एका माणसाने गेले दोन महिने एका गावात नाही तर देशात गडबड करून भाजपला सळो की पळो करून सोडलंय. काँग्रेस, डावे, समाजवाद्यांच्या थिंक टँकला जमले नाही ते या एका माणसाने करून दाखवलंय… मोदी आणि शहा यांना दाढीवरून हात फिरवून फिरवून अजूनही कळलेलं नाही, ‘ये राऊत में ऐसी कौनसी बात है, जो हमारे इतने सारे बंदोमें नही’. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत चिंतन वर्ग घेऊनही इतकी वर्षे गावात गडबड करणारे नेते तयार न करता आल्यामुळे आता नवीन वर्ग घेऊन यावर भाजपमध्ये चिंतन होणार असल्याचे समजते… पण, काही म्हणा चार दिवसांपूर्वी एकाच दिवशी गावात तीनवेळा गडबड करत राऊतांनी गल्ली ते दिल्ली, असा सारा माहोल उलटा पालटा करून टाकला.

- Advertisement -

पहिली मोठी गडबड केली ती उदयनराजे भोसले यांना थेट अंगावर घेऊन. ‘उदयन राजे हे माजी खासदार आहेत. तर, शरद पवार हे जाणते राजे असून त्यांना लोकांनी ही उपाधी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाची मालकी असू शकत नाही’, अशी गडबड केली. मुख्य म्हणजे उदयनराजे यांच्याकडे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावाच मागितला. धुरळाच उडवून टाकला. अशी गडबड वंशजांच्या बाबतीत इतर कोणी केली नव्हती. या गडबडीचे पडसाद तर उमटणार होते आणि तसेच झाले. सातारा बंद झाला आणि गाढवाच्या गळ्यात संजय राऊतांच्या नावाची पाटी घालण्यात आली.पण, बंद, गाढव आणि नावाची पाटी या तिन्ही गोष्टी वंशजांचे पुरावे मागण्यापुढे आसपासही उभ्या राहत नव्हत्या. राऊतांची गडबड भारी ठरली. राऊतांची दुसरी गडबड होती ती थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेपनी म्हणण्याची… ‘सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत’. संताप अनावर असणार्‍या अजितदादांनी आपल्या काकांकडे बघून म्हणे आपल्या रागाला प्रचंड आवर घातला. नाही तर सत्ता बित्ता काही न बघता दादांनी राऊतांना बारामतीचे पाणी दाखवले असते. बारामतीत कृषी कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका गाडीत बसून दादा नाराज दिसले. ते स्टेपनीवर काहीच बोलले नाहीत. स्टेपनीचे अनेक अर्थ होतात. कुठला अर्थ काढून त्यावर धाडधाड बोलायचे आणि बरोबर उलटे त्यातून काही वेगळे अर्थ निघायचे, यापेक्षा गप्प बसलेले बरे, अशी जबाबदार भूमिका पहिल्यांदा अजितदादांनी घेतली.

राऊतांची तिसरी गडबड म्हणजे गडबडगुंडाळा होती. ‘मी कुणाला घाबरत नाही. मी दाऊद इब्राहिमला पाहिले आहे. त्याच्याशी बोललो आहे. इतकेच नाही तर त्याला मी दमही दिला आहे’. आता राऊतांनी दाऊदला दम दिला होता की, नाही, याची साक्ष काढायला थेट पाकिस्तानात जावे लागेल आणि गेलो तर जिवंत परत यायची काहीच खात्री नाही, यामुळे अजून तरी यावर कोणी बोललेला नाही. मुख्य म्हणजे दाऊदचा कोणी पीआरओ असण्याची शक्यता नसल्यामुळे स्पष्टीकरणाची भानगडही नाही. आपल्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात राऊत क्राईम रिपोर्टर होते. गुन्हेगारीवरील त्यांच्या लेखमाला गाजल्या होत्या. पोलीस आणि गुन्हेगारी जगताला त्यांनी उलटे पालटे करून तपासले होते. करीम लालाचा अस्त होताना आणि मुंबईवर राज्य मिळवण्यासाठी रमा नाईक, बाबू रेशीम, दाऊद इब्राहिम झगडत असताना या सार्‍यांशी त्यांचा बातमीदारीच्या अंगाने संपर्क नक्कीच आला असेल. बातमीमधील बिटवीन दि लाईन ओळ्खण्याइतके राऊत चलाख आहेत.

- Advertisement -

राऊत यांची ही चलाखी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्यात दिसली होती. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राऊत यांच्या उपस्थितीने कधी नव्हे तो पत्रकारसंघाचा हॉल पूर्ण भरला होता. आपल्यातला माणूस बोलतोय अशी पत्रकारांची भावना होती. टीव्ही मीडियासाठी राऊत तर बातमीतला माणूस आहे. माझ्या बातमीने टीव्ही पत्रकारांचा दिवस मार्गी लागत असेल तर मला आनंद आहे, असे सांगताना राऊतांची तरुण पत्रकारांबरोबर जमलेली गट्टी हा माणूस नेता असला तरी आधी पत्रकार आहे, हे सांगणारी होती. आज सगळ्यात पक्षात मोठमोठे नेते आहेत, पण त्याला खास राऊत टच असलेल्या पत्रकाराची जोड नाही. बातमीत शब्द कुठे चपखल बसले पाहिजेत, हेडिंग कसे चुरचुरीत असावे आणि समोरच्याची सांगता येत नाही, सहनही होत नाही… अशा पत्रकारितेतून कशी कोंडी करावी, यातून गावात गडबड झाली पाहिजेचा उगम होतो. बाकी शिवसेना नेते म्हणून त्यांची भूमिका हा ज्याचा त्याचा प्रश्न उरतो.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -