आमु आखा एक से!

‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा देणारे आपण ते प्रत्यक्षात कधी उतरवणार? परवा एनआरसी- सीएएविरोधातल्या मोर्चामध्ये आमचा तरुण मित्र सुदर्शन चखाले म्हणाला, ‘हम सब-’ आणि आम्ही म्हटलो, ‘-एक है’ आणि मग निमाडी भाषेतली ही घोषणामय म्हण आठवली, ‘आमु आखा एक से’, ‘आपण सारे एकच आहोत!’ निमाडी भाषेमधे तू आणि मी या ‘आपण’मधे विरघळून जातात. तुम्ही आणि आम्ही जिथे संपतं, तिथे ‘आपण’ सुरू होतं. या ‘आपण’पर्यंत पोचावं याच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Mumbai

परवा रायगड जिल्ह्यातील माणगावाजवळच्या वडघरच्या साने गुरुजी स्मारकावर गेलो होतो. महाराष्ट्राच्या विविध भागातील विद्यार्थ्यांसमोर भारतीय संविधानावरील ‘आपलं आयकार्ड’ या पुस्तकाविषयी मी बोललो. भाषण झालं. विद्यार्थ्यांसोबत मस्त गप्पा झाल्या. त्यानंतर राजू सुतार आणि वैशाली ओक हे दोघेही कलाकार मला कला प्रदर्शन दाखवत होते. मांडणीशिल्प (इन्स्टोलेशन्स) देखील तिथे होती. तेव्हा मला एक रंगीत भिंत दिसली. सुंदर चित्रं काढली होती आणि सर्वत्र बॅकग्राऊंड होतं मातीच्या रंगाचं. राजू सुतार मला म्हणाले, तुला गम्मत माहितीय? प्रभाकर कोलते सरांनी मुलांना चित्र काढायला सांगितलं.तर मुलांनी अशी वेगवेगळी चित्रं काढली. कोलते सर म्हणाले, ‘ही चित्रं छान आहेत; पण ही सारी वेगळी वेगळी आहेत, हे एक चित्र नाहीच मुळी. सगळं तुटक तुटक नाही का वाटत तुम्हाला?’

एक 8-9 वर्षांची चिमुरडी म्हणाली, ‘सोपं आहे. या सगळ्यांना एकाच जमिनीवर आणायचं.’ आणि असं म्हणून बाहेर मातीमध्ये पाणी मिसळून त्याचा सुंदर रंग तयार केला या मुलांनी. भिंत माती कलरने रंगवली आणि सारी चित्रं एका जमिनीवर आली! हा प्रसंग ऐकताक्षणी वाटलं, या चिमुरडीला जे कळतंय ते आपल्याला केव्हा कळणार? जमीन एक असतानाही आपण वेगवेगळे का होत आहोत? त्या लहान मुलीनं कुठल्याही चित्राची ‘कागदपत्रं’ न तपासता त्यांना एका जमिनीवर आणलं! आपल्याला जमेल हे?

हा विचार करत घरी पोहोचलो तर माझी आई एका नातेवाईक महिलेशी फोनवर बोलत होती. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून ‘तू आता माझ्यासाठी मेलीस’ या थराला गेलेल्या आईला तिचं समजावून सांगणं सुरू होतं. आपली जात भ्रष्ट झाली, असं त्यांचं म्हणणं. दुसर्‍या जातीविषयी कमाल द्वेष असल्याचं जाणवत होतं. माझी आई तिला म्हणाली, तुझं माझं रक्त लालच ना? त्यावर तिकडून उत्तर आलं- तुम्हा मोठ्या लोकांसाठी हे ठीक आहे, असा विचार करणं वगैरे.
हे सारं सुरू असतानाच माझे मित्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी एक टॉल्स्टॉयचं ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ वाचून सारांशरुपात फेसबुकवर लिहिलं होतं:

खप ऊशरींह ुश रीश रश्रश्र ीेंसशींहशी!
In death we all are together
then why hate in life?

मृत्यू तर अटळ आहे. सर्वांनाच येणार आहे, मग जगताना एवढा द्वेष का? इतकी साधी गोष्ट आपल्याला का कळत नाही?
आपण आपल्या छोट्या छोट्या चौकटीत स्वतःला का बंदिस्त करतो?

माझा एक मित्र मला म्हणाला, आपण इथले मूलनिवासी. हे बाकीचे सगळे बाहेरून आलेत. मी विचारलं, ‘नक्की कोण बाहेरून आलं आहे?’ तो म्हणाला, ‘आर्य.’ म्हटलं, ‘बरं मग आता काय करायचं?’ ‘यांनाच बाहेर हाकलायला पाहिजे. NRC आणि CAA विषयीची त्याची ही तीव्र प्रतिक्रिया होती.

आजच्या केंद्रातल्या सत्ताधार्‍यांना मुस्लीम परके वाटतात. अनेकांना आर्य परके वाटतात. ते स्वतःला मूलनिवासी मानतात. द्रविड आणि आर्य संस्कृतीच्या संघर्षाला तर किती मोठा इतिहास आहे! त्यामुळे सारीकडून मागणी होते डीएनएची साक्ष काढायची. हजारो वर्षांच्या इतिहासात कुठं कुठं कोणकोणत्या प्रकारचे संकर झाले याचं महाभारत खुद्द व्यासही लिहू शकणार नाहीत. डीएनएच्या सूत्रांमधून काय हाती लागणार! पण हे होत राहतं.

अमेरिकेत अनेक श्वेतवर्णीयांना कृष्णवर्णीय परके वाटतात. ब्रिटनला तुर्कस्तान युरोपीय महासंघात नको असतं. अगदी परके कुठचे लोकच नको असतात. म्हणून तर ब्रेक्झिट घडतं. इथल्या राज ठाकरेंना ‘भय्या’ लोक परके वाटतात. आता पुन्हा एकदा ते मूळ मार्गावर आले आहेत. दाक्षिणात्यांना उत्तर भारत हिंदीच्या मुजोरीसह करत असलेला भेदभाव मान्य नाही. महत्त्वाच्या सार्‍या निर्णय प्रक्रियेतून आपल्याला वगळले गेल्याची भावना त्यांच्या मनात आहे. म्हणून तर तिथे ‘द्रविडनाडू’ची चर्चा आहे. ईशान्येकडील राज्यामध्ये तर ही भावना कैक वर्षांपासून आहे. आज तर ही भावना एका टोकाला येऊन पोहोचली आहे. केंद्राने हा भेदभाव केला आहे, हे खरंच आहे. केंद्राचं सोडा अगदी महाराष्ट्रात शिकणार्‍या ईशान्येतील राज्यातील विद्यार्थ्यांना ‘नेपाळी’ म्हणून हेटाळणी करणं किंवा हे सारे गुन्हेगारच असतात अशा प्रकारे त्यांना वागणूक देणं हे प्रकार सर्रास घडतात. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी हे अनुभव शेअर केले आहेत. हिंदू-मुस्लीम-सीख-इसाई प्रत्येक धर्मात किती मोठी खाई! महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र-विदर्भ-मराठवाडा-खान्देश हे वाद तर नेहमीचेच. बॅचलर-मॅरिड, सवाष्ण-विधवा, प्रमाण- बोली, इंग्लिश- नॉन इंग्लिश, मालक- भाडेकरू, शाकाहारी- मांसाहारी, कनिष्ठ- वरिष्ठ असे किती किती आणि काय काय भेद करून ठेवले आहेत आपण! लेस्बियन गे बायसेक्शुल ट्रान्सजेंडर (LGBT) कम्युनिटीविषयी तर बोलायलाच नको. ते जणू माणूसच नाहीत अशा प्रकारे आपण त्यांना वागवतो.

भेदभावाच्या या आदिम प्रवृत्तीचं काय करायचं? ती कशी निर्माण होते? कशी वाढत जाते? ती रोखायची कशी? असे सारे प्रश्न.
विष्णूमय जग
वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम
अमंगळ
असं म्हणायचं आणि ‘तुमचं आडनाव काय’ असं आडवळणाने विचारायचं. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणायचं आणि प्रत्यक्षात ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं’ हे गाणं गायचं. ‘आभाळाची आम्ही लेकरे’ म्हणायचं आणि नंतर ‘तुमचं कुलदैवत कोणतं’ हे विचारायचं. सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा, पण काही बांधव तुकडे तुकडे गँगचे आहेत, ही वल्गना.
जगाच्या निर्मितीच्या एका सिद्धांतानुसार सुरुवातीला एकच भूखंड होता. पुढे भौगोलिक बदलांमुळे भूखंड वेगळे झाले आणि मग नकाशांवर सीमारेषाही आखल्या गेल्या. ‘सब भूमी गोपाल की’ म्हणणारे आपण, ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा देणारे आपण आठ-नऊ वर्षांच्या चिमुरडीला जे कळतं ते प्रत्यक्षात कधी उतरवणार? परवा एनआरसी- सीएएविरोधातल्या मोर्चामध्ये आमचा तरुण मित्र सुदर्शन चखाले म्हणाला, ‘हम सब-’ आणि आम्ही म्हटलो, ‘-एक है’ आणि मग निमाडी भाषेतली ही घोषणामय म्हण आठवली, ‘आमु आखा एक से’, ‘आपण सारे एकच आहोत!’ निमाडी भाषेमधे तू आणि मी या ‘आपण’मधे विरघळून जातात. तुम्ही आणि आम्ही जिथे संपतं, तिथे ‘आपण’ सुरू होतं. या ‘आपण’पर्यंत पोचावं याच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

श्रीरंजन आवटे