सोशल अ‍ॅपची अशीही फसवाफसवी

अलिकडच्या काळात अशा फसव्या (फेक) वेबसाईट, अ‍ॅप व जाहिरातींचा सुळसुळाट वाढतोय. सायबर क्राईम विभागाकडून वारंवार सूचना येऊनसुद्धा युवक अशा फेक जाहिरातींच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. या सर्व जाहिरातींच्या आधारे मोठमोठ्या कंपन्या कोट्यवधी रुपयाचा नफा कमावतात आणि वापरकर्त्यांना मात्र त्याचा कोणताही फायदा होत नाही. वस्तुस्थिती लक्षात घेतली असता हे दिसून येते की सोशल मीडियाचे अनेक अ‍ॅप आहेत. जे वापरण्यासाठी मोफत दिले जातात. नंतर मात्र आपल्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पैसा वसूल करतात.

Social Apps

एकटे आहात तर सुंदर तरुणी शोधा, आमचे अ‍ॅप डाऊनलोड करा… तरुण आहात..? लग्न होत नाही, सुंदर तरुणी शोधा अमुक अ‍ॅप डाऊनलोड करा.. यश मिळवायचे आहे तर डाऊनलोड करा यशस्वी अ‍ॅप.. गरिबीला करा बाय-बाय आणि डाऊनलोड करा ट्रेडिंग अ‍ॅप.. फक्त एक रुपया गुंतवा आणि घरबसल्या कमवा लाखो रुपये..पन्नास हजार रुपयांची वस्तू फक्त पाच हजार रुपयात… दिलेल्या लिंक वर क्लिक करा व मिळवा आपल्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे… हल्ली अशा फसव्या जाहिराती आपण रोजच्या रोज आपल्या मोबाईलमधील विविध समाज माध्यमांच्या अ‍ॅपवर बघतो. आणि या फसव्या जाहिरातींना अनेक युवक-युवती बळी पडत आहेत. लिंकवर क्लिक करून अ‍ॅप डाऊनलोड करत आहेत. भविष्यात याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त पाहायला मिळतोय. एवढे कमी म्हणून की काय व्हॉट्सअ‍ॅपने घर बसल्या पाचशे रुपये कमवण्याची संधी दिली आहे. लवकरात लवकर नोंदणी करा, आणि मित्रांना पाठवा व तीस स्टेटस पाहिल्यानंतर आपल्या खात्यात जमा होतील रोज पाचशे रुपये.. अशी पोस्ट अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपला सध्या पाहायला मिळत आहे. पण या पाठीमागचा हेतू किंवा सत्यता मात्र कुणीच तपासली नाही. याची शहानिशा केली असता असे दिसून आले की, फक्त जाहिरातींच्या माध्यमातून गल्ला भरण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.

अलिकडच्या काळात अशा फसव्या (फेक) वेबसाईट, अ‍ॅप व जाहिरातींचा सुळसुळाट वाढतोय. सायबर क्राईम विभागाकडून वारंवार सूचना येऊनसुद्धा युवक अशा फेक जाहिरातींच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. या सर्व जाहिरातींच्या आधारे मोठमोठ्या कंपन्या कोट्यवधी रुपयाचा नफा कमावतात आणि वापरकर्त्यांना मात्र त्याचा कोणताही फायदा होत नाही. वस्तुस्थिती लक्षात घेतली असता हे दिसून येते की सोशल मीडियाचे अनेक अ‍ॅप आहेत. जे वापरण्यासाठी मोफत दिले जातात. नंतर मात्र आपल्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पैसा वसूल करतात.

टाळेबंदीच्या काळात माझ्या काही मित्रांना अशा खोट्या जाहिरातींचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. झाले असे की फेसबुकवर लॉग इन केल्यानंतर त्यांना सोनी एलईडीची जाहिरात नामांकित कंपनीच्या वेबसाईट्सह दिसत होती. पंचवीस हजार रुपयाचा एलईडी.. फक्त पाच हजार रुपयात…ऑफर फक्त एका तासासाठी. या प्रकारची ती जाहिरात, मित्राने तात्काळ तो एलईडी बुक केला. खात्यातून ऑनलाइन ओटीपी वगैरे देऊन पैसे भरले. पण समोरच्या काही मिनिटात मात्र ती जाहिरात तिथून काढून टाकण्यात आली. ना तिथे वेबसाईट ना कोणताही संपर्क. मोबाईलवर आलेल्या मेसेजच्या आधारे ट्रॅक करायचा प्रयत्न केला. पण शोध काही लागला नाही. असाच प्रकार एका मैत्रिणीसोबत ही झाला. हा झाला आर्थिक भुर्दंड.. पण ज्यावेळी अशीच जाहिरात किंवा जाहिरातीत दिसणारे अ‍ॅप आपण डाऊनलोड करतो, त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये असणारी खाजगी माहितीसुद्धा त्यांच्याकडे जमा होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. नंतर त्या प्रकरणाची चौकशीसुद्धा होत नाही. एवढेच काय केससुद्धा दाखल होत नाही. यासाठी कोणतेही संकेतस्थळ अथवा सोशल मीडिया अ‍ॅप वापरताना तिथे येणार्‍या जाहिरातींवर क्लिक न करता आपण फक्त आपले काम करावे. आणि ती ऑफर खरी आहे की खोटी आहे हे तपासून पाहण्यासाठी त्यांच्या मूळ वेबसाईटवर जाऊनच खात्री करावी. जेणेकरून आपले नुकसान होणार नाही.

सोशल मीडियाच्या प्रायव्हसीबद्दल आपण यापूर्वीच्या लेखात वाचले आहेच. आज त्याच संदर्भाने वेगळा मुद्दा येथे सांगावासा वाटतो. तो असा की, एखादे सोशल मीडिया अ‍ॅप (टिक टॉकसारखे) आपण सर्रास वापरतो. म्हणजेच कधी कधी आपण ट्रेंडच्या नावाखाली त्या-त्यावेळी फोटोज, व्हिडिओ व काही म्युझिक अथवा गाण्यांवर तीस सेकंदाचे व्हिडिओ/ऑडिओ तयार करून पोस्ट करतो. पण या सर्व गोष्टींचा एका वेळेनंतर आपल्याला मानसिक त्रास होतो. म्हणजेच सुरुवातीला आपण अ‍ॅप डाऊनलोड करतो त्याच वेळी ऑडीओ, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट लिस्ट, कॅमेरा, स्टोरेज इत्यादींची परवानगी देतो. त्याच वेळेपासून आपल्या मोबाईलमधील संपूर्ण डाटा त्या अ‍ॅपच्या मॉनिटर स्टोरेजमध्ये जमा होतो. सांगायचा मुद्दा हा की भारतात सोशल मीडियाचे अ‍ॅप वापरताना राईट टू प्रायव्हसी हा कायदा अंमलात आलेला नाही.(याचे कारण राजकीय असू शकते. भविष्यातील राजकीय फायद्यासाठी…) त्यामुळे आपली संपूर्ण खाजगी माहिती भविष्यात आपल्याच विरोधात वापरली जाऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. ‘राईट टू प्रायव्हसी’सारखा कायदा इतर देशांमध्ये जास्तीत जास्त सक्रिय आहे. एखादा व्हिडिओ अथवा फोटो अनवधानाने पोस्ट झालेला असेल, एवढेच नाही तर आपला खाजगी डाटा एखाद्या अ‍ॅपकडे जमा होत असेल. आणि हे जर ग्राहकाला समजले तर तो रीतसर त्या कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतो. पोस्ट झालेले फोटो /व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश देऊ शकतो. खाजगी जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा इतर देशांमध्ये सन्मान केला जातो. आपल्याकडे अद्याप असे होत नाही. म्हणून सोशल मीडियाचा वापर करत असताना त्याचा काळजीपूर्वक वापर करावा.

‘दुनिया हमारी मुठ्ठी मे म्हणता म्हणता’ आपण तंत्रज्ञानाच्या हातातले बाहुले कधी झालो हे कळलेच नाही. तंत्रज्ञानाने झेप घ्यायला लावली खरी.., पण जो तोटा झाला तो उशिरा समजला. आपल्या आजूबाजूला अनेक युवक असे पाहायला मिळतात जे समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे मानसिक ताण तणावाने ग्रासलेले आहेत. त्याचे कारण हेच की योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन मिळाले नाही. यासाठी मला असे वाटते की, महाराष्ट्र सायबर विभागातर्फे काही सेमिनार आयोजित केले जातात. किंवा सध्या सायबर क्राईम व ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी काही संस्था पुढाकार घेत आहेत. त्यांना जर युवकांनी सहकार्य केले. किंवा स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली फेक जाहिराती, फेक वेबसाईट, फिशिंग, ब्लॅकमेलिंग, फेक व्हायरल पोस्ट, यावर नियंत्रण ठेवले तर होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल अन्यथा आपण या जाहिरातीच्या युगात इतरांसाठी जाहिरात होऊन बसू. आज सोशल मीडियाच्या युगात वेगवेगळ्या कंपन्यांच्या अ‍ॅप्सचा युवकांनी तंत्रशुद्ध अभ्यास केला. किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रात आपले करिअर करायचे ठरवले. तर स्वतःला रोजगार मिळेल. सोबतच इतरांची फसवणूक होणार नाही याची तो युवक काळजी घेईल. सध्या सायबर क्राईमचे वाढते प्रमाण पाहता, ‘सायबर लॉ’ चे शिक्षण घेतले तरी यामध्ये युवकांचा फायदा आहे. आपल्या जवळ असणार्‍या कौशल्याचा वापर वेगळ्या मार्गाने होऊ शकेल व आपले भविष्यसुद्धा उज्वल असेल याचा विचार युवकांनी केला तर उत्तमच…