घरफिचर्ससारांशलस आत्मविश्वासाची

लस आत्मविश्वासाची

Subscribe

संपूर्ण जगात मृत्यूचं तांडव घालणार्‍या कोरोनावरची लस एका वर्षाच्या आत विकसित करण्यात आली आहे. बायोटेक आणि मॉर्डनाच्या लशींवर तर लॉकडाऊनमध्ये काम सुरू करण्यात आलं होतं. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करत संशोधकांनी या लशी अपेक्षेहून कमी काळात विकसित केल्या. यामुळे यापुढे जगात कुठलीही महामारी आली तर वर्षभरात त्यावरची लस निर्माण करणे शक्य आहे, असा विश्वास संशोधकांमध्ये निर्माण झाला आहे. अशा अनेक गोष्टी या काळात घडल्या आहेत. तर डॉक्टरांना देव का म्हटलं जात हेदेखील कोरोनाने दाखवून दिलं. नोकर्‍या गेल्याने पैसा जपून खर्च करायची सवय लोकांना लागली.

2020 हे वर्ष सरण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. खरं तर कुठलंही वर्ष जेव्हा सरतं तेव्हा त्या वर्षाला निरोप देताना त्या वर्षभरात घडलेल्या बर्‍यावाईट घटनांची उजळणी केली जाते. सरत्या वर्षाला आनंदाने निरोप दिला जातो. पण हे वर्ष सगळ्याला अपवाद ठरणारं असून आतापर्यंतचं सर्वात वाईट वर्ष म्हणून 2020 ची नोंद इतिहासात होणार आहे. कारण 2020 हे वर्ष धक्कादायक व भयंकर घटनांनी भरलेलं आहे. यात ऑस्ट्रेलियातील वणवे, कोरोना महामारी, कोरोना मृत्यू, लॉकडाऊन, आर्थिक अस्थिरता, बेकारी, नैराश्य, आत्महत्या, महिला अत्याचार, स्थलांतर करताना झालेले मजुरांचे मृत्यू, चक्रीवादळ, पूर, भूकंप विमानदुर्घटना, युद्धसदृश्य परिस्थिती, आग, दंगल, आपटलेले शेअर मार्केट, लसीकरण, मोर्चे, शेतकरी आंदोलने, राजकीय व आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदल यांनीच भरलेले आहे.

पण जसं वाईटामागे काहीतरी चांगलही दडलेलं असतं. तसंच 2020 च्याबाबतीतही आहे. या गडद घटनांनी भरलेल्या वर्षात हलकीशी सुखद घटनांची लकेरही उमटली. लॉकडाऊनमध्ये प्रदूषण घटले, कधी नाही ते आकाश निरभ्र दिसले, हिमालयाच्या रांगांचं दिल्लीकरांना घरातून दर्शन झालं. रस्त्यावर निसर्ग अवतरलेला बघायला मिळाला. मोर, हरिण निरनिराळे प्राणी पक्षी मानवी वस्तीत वावर दिसला. तर मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन अवतरला. तसेच कोरोना हा मानवी संसर्गातून होत असल्याने सण उत्सवच नाही तर अंत्यसंस्कारही कुठल्याही विधीविना व नातलगांशिवाय करता येऊ शकतात हे लोकांना कळले. आतापर्यंत आयुर्वेदाला नाकतोंड मुरडणार्‍यांनी या काळात काढा घेताना आयुर्वेदाचे आभार मानले. तर फास्ट फूडला चटावलेल्या खवय्यांना घरातील पोहे, थालीपीठ याकाळात पंचपक्वांनांचा आस्वाद देऊन गेले. फास्ट फूडच्या काळात हे देखील नसे थोडे. थोडक्यात सांगायचं तर कोरोनाने या वर्षात आपल्याला एकटं फक्त मरता येत नाही तर जगताही येतं हेच दाखवून दिलं आहे.

- Advertisement -

कठीण प्रसंगी दुसर्‍यांकडून मदतीची अपेक्षा न बाळगता स्वत:मध्येच आत्मविश्वास निर्माण करून प्रतिकूल परिस्थितीवरही विजय मिळवता येतो हा अनुभव अनेक कोरोना रुग्णांना यावेळी आला आहे. कोरोनासारख्या महामारीला हरवून जे आज सामान्य आयुष्य जगत आहेत त्या कोरोना योद्ध्यांना या आजाराने बरंच काही शिकवलं आहे. जीवनाचं महत्व आणि मृत्यूची भीतीही त्यांनी याची देही याची डोळा अनुभवली आहे. यामुळे कोरोनाने नात्यागोत्यांपासून जगाकडे बघण्याचा प्रत्येक व्यक्तीचाच दृष्टीकोन बदलला आहे. जीवन जगण्यासाठी ताम झाम न करता साधेपणानेही आयुष्य जगता येतं हे या महामारीने पुन्हा एकदा स्पष्टं केलं आहे. शाळेत न जाताही घरात राहून शिकता येतं. हॉटेलिंग न करता घऱातले जेवणही रुचकर असते हेदेखील पहिल्यांदाच सगळ्यांना कळाले. पण यात किस पडला तो महिलांचा. वर्क फ्रॉम होम करताना संसार सांभाळणे, कोरोनापासून कुटुंबाला दूर ठेवणं, घराची स्वच्छता, महामारीमुळे आलेले खाण्यापिण्याचं पथ्य सांभाळत तिनं अख्ख घरं सांभाळलं. यात तिने स्वत:ला किती जपलं हा प्रश्नच आहे.

लॉकडाऊनमुळे नोकरी गमवणारे अनेक मध्यमवर्गीय आज छोटे मोठे बिझनेसपर्सन झाले आहेत. तर काहीजणांनी कायमची गावची वाट धरली असून मिळेल त्यात जगणं पसंत केलं आहे. तर काहीजणांच्या मते कोरोनामुळे लाईफस्टाईलच बदलली आहे. हे जरी सगळे बदल कोरोनामुळे झालेले असले तरी याबदलांमागे अनेक बदलही जगात घडले व घडत आहेत. त्यात सर्वप्रथम आहे कोरोनावरील लस. कारण आजपर्यंत असा इतिहास आहे की कुठल्याही महामारीची लस तयार करण्यासाठी कमीत कमी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळाचा कालावधी लागतो. पण कोरोनावरील लशीच्या बाबतीत मात्र अप्रुप घडलंय. कारण संपूर्ण जगात मृत्यूचं तांडव घालणार्‍या कोरोनावरची लस एक वर्षाच्या आत विकसित करण्यात आली आहे. बायोटेक आणि मॉर्डनाच्या लशींवर तर लॉकडाऊनमध्ये काम सुरू करण्यात आलं होतं.

- Advertisement -

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करत संशोधकांनी या लशी अपेक्षेहून कमी काळात विकसित केल्या. यामुळे यापुढे जगात कुठलीही महामारी आली तर वर्षभरात त्यावरची लस निर्माण करणे शक्य आहे, असा विश्वास संशोधकांमध्ये निर्माण झाला आहे. अशा अनेक गोष्टी या काळात घडल्या आहेत. तर डॉक्टरांना देव का म्हटलं जात हेदेखील कोरोनाने दाखवून दिलं. नोकर्‍या गेल्याने पैसा जपून खर्च करायची सवय लोकांना लागली. खिशात पैसा नसेल तर काय अवस्था होते ते लॉकडाऊनने दाखवलं. तर देशाच्या सुरक्षेबरोबरच आरोग्ययंत्रणेवरही खर्च करणे गरजेचे असल्याचं यावेळी सरकारला कळालं. अशा बर्‍याच गोष्टींची व आवश्यकतेची जाणीव यावेळी जगाला झाली आहे.

मात्र याकाळात सर्वात जास्त हाल झाले ते बंदिस्त प्राण्यांचे. कारण लॉकडाऊनमध्ये प्राणीसंग्रहालय बंद होती. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न मालकांपुढे पडला. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्राणी दत्तक योजनाही काही देशांमध्ये राबवल्या गेल्या. लॉकडाऊन असल्याने व करमणुकीचे कुठलेच साधन नसल्याने काहीजणांनी एकटेपणा घालवण्यासाठी प्राणी दत्तक घेतले. तर काही देशांमध्ये लॉकडाऊनमुळे कत्तलखानेच बंद असल्याने वृद्ध प्राण्यांना ठार करून त्यांचे मांस तरुण प्राण्यांना खाऊ घालण्यात आले. असे कृत्य याआधी कोणीही केले नव्हते. पण कोरोनामुळे ते घडले. अशा बर्‍याच गोष्टी कोरोनाने घडवल्या. कोरोना माणसांच्या संपर्कामुळेच पसरत असल्याने माणस माणसांनाच घाबरली.

सण उत्सव वाढदिवस साजरे न करताही एकमेकांच्या संपर्कात राहिली. दुसरीकडे आता भारतात तरी कोरोनाचा जोर ओसरू लागल्याची चिन्हे आहेत. यामुळे येणारे वर्ष सामान्य असेल अशी अपेक्षा सगळे करत असतानाच आता ब्रिटनमध्ये व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार अवतरला आहे. यामुळे पुन्हा एकदा ब्रिटनबरोबर काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. हे कमी की काय आता इस्त्रायलमध्येही कोरोनाचा तिसरा प्रकार आल्याची माहिती येत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच हा नवीन कोरोनाचा फेरा आल्याने पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे. यामुळे वर्षाअखेरीचा मोठा सण असलेला ख्रिसमस ख्रिस्ती बांधवांनी परिस्थितीचे भान ठेवून साजरा केला. आता थर्टी फर्स्टबाबतही लोकांकडून अशीच अपेक्षा आहे. हे सोशल डिस्टन्सिंग शेवटचे असेल व येणार्‍या वर्षात सर्व सण सगळ्यांसोबत मिळून मिसळून साजरा करता यावेत, हीच ईश्वरचरणी यावर्षाची शेवटची प्रार्थना…

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -