घरफिचर्ससारांशजातीच्या गुलामीवर देश उभा राहत नाही!

जातीच्या गुलामीवर देश उभा राहत नाही!

Subscribe

समाजात दलित, महिला, भटके आदी वर्ग वर्षानुवर्षे पिळवणुकीची साधने मानली गेली आहेत. निम्म्याहून अधिक संख्येने असलेल्या महिला या सार्‍याच्या सार्‍या गुलाम असतील, प्रतिष्ठा हरवलेल्या असतील, जाळण्याचे आणि केवळ भोगण्याचे साधन असतील तर तो समाज कधीच प्रगती करू शकणार नाही. भारत प्रगतीच्या बाबतीत सतत मागे पडला कारण त्याने आपली निम्मी ताकद कुजवली, धर्माच्या नावाने नासवली. गुलाम समजून अडगळीत टाकली. कधी हुंड्यासाठी जाळली तर कधी विधवा झाली म्हणून तिला पतीच्या चितेवर जाळून टाकले. कधी तिचे मुंडन करून तिला अंधारात फेकून दिले. समाजाच्या जडणघडणीत, विकासात प्रत्येक घटकाचा सहभाग असावा लागतो. आणि इथे तर महिलांना पद्धतशीरपणे संपवण्याचा उद्योग वर्षानुवर्षे चालू होता आणि ह्या उद्योगाचे नाव होते धर्म !

मानवतेला काळीमा फासणारी आणि क्रुरतेचा कळस गाठणारी घटना नुकतीच उत्तर प्रदेशातील हाथरस या गावी घडली. कोरोनाच्या भयग्रस्त सामूहिक मानसिकतेत असलेला आपला देश पुन्हा जबरदस्त हळहळला. सामान्य माणसाच्या मनात भयंकर चीड, संताप, वेदना निर्माण झाली. खरंतर, कोरोणाच्या संकटग्रस्त काळात अगोदरच मानसिक पातळीवर दुर्बल झालेल्या मनाला आणखीनच दुर्बलता आली. एकूणच सामाजिक मानसिकता अस्थिर, दुबळी झालेली असताना, अशा क्रूर घटना घडल्या आणि त्यानंतर, त्यावर होत असलेली संथ व बेपर्वाईयुक्त कारवाई याने समाजाचे मन अधिकच अस्वस्थ झाले. अन्यायी, अत्याचारी नराधमांना तातडीने मृत्युदंड द्यावा, ही संतापाची भावना जवळजवळ प्रत्येक भारतीय माणसाच्या मनातच नव्हे तर, ज्याला माणूस म्हणून हृदय आहे, त्याच्या मनात निर्माण झाली. माणुसकीला, मानवतेला अशी खोल जखम करणार्‍या या घटना कधीही, कुणीही स्वीकारणार नाही.

कोणताही प्राणघातक आघात, अपघात, घटना, प्रसंग, अचानक घडत नाहीत. हाथरसची घटनाही असाच अचानक घडलेला प्रकार नाही. नराधमांच्या नियमित सरावाचे ते वाईट, कडू फळ आहे.

- Advertisement -

अशाप्रकारचा कोणताही प्राणघातक अपघात होण्यापूर्वी किमान तीस वेळा त्याप्रकारचे छोटे छोटे अपघात अशा व्यक्तींच्या हातून घडलेले असतात. आणि तत्पूर्वी 300 वेळा अशा प्रकारच्या असुरक्षित कृतीही त्यांनी केलेल्या असतात. ही बाब आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. खरे म्हणजे तेथील किंवा जिथे जिथे असे घडते, तेथील तपासयंत्रणेने लक्षात घेणे आवश्यक असते.

वर म्हटल्याप्रमाणे, समाज प्रवाहपतित, परिवर्तनशील असल्याने प्रासंगिक चिंता, काळजी, दुःख, वेदना, संताप, चीड अशा दुःखदायक भावना समाजमनात खूप काळ तग धरत नाहीत. हळूहळू त्या विस्मरणात जातात. वाईट प्रसंग, घटना सतत मनात टिकवून ठेवणे, ही बाब अत्यंत त्रासदायक ठरणारी असते. म्हणून एक तर अशा त्रासदायक घटना, प्रसंग घडणारच नाहीत याची पूर्ण दक्षता सर्वांनीच घेणे आवश्यक असते. पण समजा अशा घटना घडल्या तर, कायद्याच्या कक्षेत त्यांचा तातडीने निपटारा होणेही आवश्यक असते. मात्र आपल्याकडे तसे घडत नाही. समाजाची व्यावहारिक हतबलता आणि न्यायव्यवस्थेतील अनेक कारणांमुळे न्यायदान प्रक्रियेतील होणारा विलंब, यामुळे अन्यायी, अत्याचारी नराधमांचे फावते. तेच त्यांचे भांडवल ठरते. त्यातून ह्या राक्षसांचे बळ सातत्याने वाढत जाते. अनेक गैरप्रकार अवलंबून ते पुरावे नष्ट करण्यात यशस्वी होतात. याकामी त्यांना अनेक नितीशून्य राजकारणी लोक मदत करतात. अपात्र, लाचखाऊ, कायद्याच्या ज्ञानाचा गैरवापर करणारे आणि जबाबदारीचे भान सुटलेले अनेक अधिकारीगण अशा नराधमांच्या संरक्षणासाठी सोबतीला असतात. याशिवाय त्यांच्या तथाकथित धर्माचे व जातीच्या गुंडांचे कळपही त्यांच्या संरक्षणासाठी, उदोउदो करण्यासाठी दिमतीला असतात.

- Advertisement -

सामान्य माणसांच्या अनेक मर्यादा असल्यामुळे, इच्छा असूनही अनेक जण त्यांच्याविरोधात पुढे येत नाहीत. आणि याचाच गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे अनैतिक वर्तन समाजामध्ये अनेक वेळा घडत असते. मात्र त्यातील अगदी मोजक्याच घटना उघडकीस येतात. ज्या लोकांना अशा अनैतिक, क्रूर घटनांची चीड आहे अशा सज्जन लोकांनी एकत्र येण्याची आणि त्यांची सांघिकशक्ती दाखवण्याची अशावेळी खूप मोठी गरज असते. मात्र तसे घडत नाही. लोक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे अशा घटना हा दररोजच्या जीवनात भाग समजला जातो. ही अतिशय वेदनादायी गोष्ट आहे. आणि म्हणून येथील भय न संपण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

केवळ भावनेने आणि सदिच्छेने असे प्रश्न सुटणारे नसतात. त्यासाठी धाडसाने, संघटितपणे विचार, नियोजन आणि सनदशीर मार्गाचा अवलंब करून, मैदानात म्हणजेच रस्त्यावर उतरण्याची सामान्य माणसाच्या मनाची तयारी होत नाही, तोपर्यंत केवळ दुःख, हळहळ करण्यापलीकडे हा सामान्य माणूस काही करू शकणार नाही. आणि त्याच्या मनातले भय वाढतच जाईल. कारण हीच परिस्थिती त्याच्या घरापर्यंत येऊ शकते, ही अनाहूत भीती कायम त्याच्या मनाचा ठाव घेत असते. सतत त्याला अस्वस्थ करत असते. आपल्या समाजाचे दुर्दैव असे आहे की, अशा प्रकारचे सांघिक धाडस दाखवण्याची तयारी असणारी मनं, माणसं दिवसागणिक कमी कमी होत आहेत. आणि त्यामुळेच अशा घटनांमध्ये आणि ते अवलंबत असलेल्या क्रूर प्रकारांतही वाढ होताना दिसते.

अनेक प्रकारच्या शोषणाला सर्वात जास्त संख्येने बळी पडतात त्या महिला आणि बालके !!! कारण समाजानेच असे जाहीर करून टाकले आहे की, महिला आणि बालके हे दोन्ही घटक जन्मताच दुर्बल असतात. खरंतर त्यांना सबल होण्यासाठीच्या सर्व संधी, सवलती या, या ना त्या कारणाने मुळातच नाकारलेल्या असतात. भले त्या कागदपत्री दिसतात, मात्र व्यावहारिक पातळीवर त्यांचे दुयमत्व ठळकपणे दिसते. महिला आणि बालके यांची, दोघांची मिळून संख्या कुटुंब आणि समाज यामध्ये सर्वात जास्त असते. मात्र प्रत्येक वेळी त्यांना गृहीत धरून, कर्ती माणसंच पुढे पुढे करीत असतात. खूप खोलात विचार केला तर असे लक्षात येते की, माणसाची एकूणच संस्कृती, जीवन हे, महिला आणि मुले, मुली यांनीच समृद्ध केलेले आहे. हे दोन्ही घटक घरात, समाजात नाहीत, अशी केवळ कल्पना केली तरी, मन झटकन निराशेत जाते, खिन्न होते. माणूस नुसता भाकरीवर जगत नाही तर त्याला एक समृद्ध विचार, उत्कटता सतत पुरवावी लागते. त्याचे जीवन आनंदमय, आरोग्यदायी, सुखी, समृद्धीयुक्त,समाधानी होण्यासाठी आणि ते सतत प्रवाही ठेवण्यासाठी कुटुंबातील या दोन्ही घटकांचा समावेश, सहभाग अपरिहार्य आहे. संपूर्ण कुटुंबाला आणि म्हणून एकूणच समाजाला सर्व प्रकारची ऊर्जा केवळ महिला आणि त्या कुटुंबातील मुले, मुलीच पुरवत असतात. हे नाकारून चालणार नाही. कुटुंबात, समाजात हे होत असताना, घडवून आणत असताना महिला आणि बालकांचा त्यात कोणताही स्वार्थ नसतो, ते सहज घडत जाते असेही आपल्या लक्षात येते. अशा महत्त्वपूर्ण सदस्यांची निकोप, निर्भय आणि स्वतंत्र आनंददायी वातावरणात वाढ होणे, त्यांची वृद्धी होणे आणि विकास होणे हे कोणत्याही कुटुंबासाठी, समाजासाठी अत्यंत आवश्यक असते.

अनेक अनिष्ट, अघोरी रूढी प्रथा, परंपरांच्या मार्फत होणार्‍या शोषणाचे मोठ्या प्रमाणात बळी ह्या महिला आणि बालकेच असतात. हे आपल्या लक्षात येईल. या अनिष्ट अघोरी रूढी, प्रथा जतन करण्याच्या नावाखाली बर्‍याच वेळा महिला आणि बालकांचा जीव घेतला जातो किंवा जिवंतपणीच त्यांना मरणयातना भोगाव्या लागतात. कुटुंबात आणि समाजात महिलांच्या व बालकांच्या विचारशीलतेला व स्वयंनिर्णयाला जागा नसते. त्यामुळे त्यांच्या मनात सतत अगतिकता, न्यूनगंड, पराभूतपणा, वैफल्य आणि प्रारब्धवाद घोंगावत असतो. भारतीय समाजाची विभागणी आणि उपविभागनी गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी आहे. त्याचे साधे सोपे स्पष्टीकरण देणे म्हणजे सामाजिक वास्तवाचा विपर्यास करणे होय. धर्मग्रंथ आणि प्राचीन सामाजिक कायदे यांनी या सामाजिक व्यवस्थेचा ढोबळ असा आराखडा दिलेला आहे. पण त्यात ‘काय आहे’ यापेक्षा ‘काय असावे’, याचाच उहापोह जास्त केलेला आहे. प्रत्यक्षात दिसते ते अगदी वेगळे आहे. आदर्शांजवळ घुटमळणे आणि कायद्यांचा सोयीस्कर अर्थ लावणे हे प्रकार आजवर बरेच झाले आहेत. भारतावर लिहिणार्‍या अनेक विद्वानांनी ही परिस्थिती नको तेवढी सोपे करून सांगितली आहे. उदारणार्थ, ‘चातुर्वर्ण्य’ व्यवस्थेविषयी केवळ बोलणे म्हणजे दिशाभूल करणारे आहे. कारण या प्रत्येक वर्णात प्रत्यक्षात असंख्य जाती आहेत.

आणि त्यापैकी अनेक जातींचे वर्गीकरण आणि त्यांचे सामाजिक स्थान यांची स्पष्टपणे व्याख्या झालेली नाही. काही मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांनी काही विशिष्ट प्रदेशातल्या जातिव्यवस्थेचा अभ्यास केला आहे. त्यात जातिव्यवस्थेच्या कामकाजासंबंधी विश्वसनीय माहिती दिलेली आहे. पण राष्ट्रीय पातळीवर अशा अभ्यासांचे निष्कर्ष कुचकामी ठरतात. कारण ही जातीव्यवस्था आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. काही जमाती आणि समूह आपल्या अस्मितेची सतत नवी व्याख्या करीत असतात आणि आपल्या भूतकाळाची पुनर्रचना करीत असतात. त्यामुळे त्यांचे समाजातील स्थान सतत बदलत असते. समाजातील त्यांच्या स्थानाविषयीचा त्यांचा स्वतःचा दृष्टिकोनही सतत बदलत असतो. पण त्यांच्याबद्दल त्या स्थानाला समाजमान्यता मात्र उशिरा मिळते. आपल्या समाजव्यवस्थेत वर्ण हे केवळ संदर्भासाठी आहेत. ते सामाजिक रचनेतील सक्रिय घटक नाहीत. ते केवळ वेगवेगळ्या जातींना समाजात जे स्थान नेमून दिलेले आहे त्यांचा ढोबळ निर्देश करतात. वर्ण हे ईश्वरनिर्मित आहेत, हा सिद्धांत नेहमी पुढे केला जातो. जाती केवळ वर्गीकरणात्मक किंवा विधीवत स्थान दाखवणार्‍या नाहीत तर सामाजिक रचनेतील क्रियाशील आणि परिणामकारक ठरणारे घटक आहेत. ह्या जातींचे काही प्रमुख गुणधर्म आहेत.

एक… जाती हे आपापसातच बेटी व्यवहार करणारे बंदिस्त समूह आहेत. दोन… त्यांची एक उतरंड आहे.
तीन…. त्यांना बहुधा त्या जातीचा असा व्यवसाय असतो.

चार.. वेगवेगळ्या घटकांमधील आंतरप्रक्रिया की शुद्धता आणि प्रदूषण यांच्या कल्पनांवर आधारित असते.

पाच…या जातीच्या सभासदांची समानार्थी संस्कृती असते.
सहा…जातीची उतरंड तिच्या त्या व्यवसायाची संबंधित आहे.

असा हा आपला भारतीय समाज वर्णावर, जातींवर उभा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा तो समर्थक आहे. ही व्यवस्थाच मुळात विषमता निर्माण करणारी आहे. विषमतेचे समर्थन करणारी आणि विषमतेला धर्म मान्यता देणारी आहे. ही विषमता देवाशी, स्वर्गाची, नरकाशी, पुनर्जन्माची जोडली गेलेली आहे. स्वाभाविकच तिच्याविरुद्ध बंड होण्यास कितीतरी वर्षे जावी लागली. ज्यांना याविषयाची झळ बसली त्यांनी बंड करणे स्वाभाविक आहे आणि तसे घडलेही. मात्र ज्यांना स्वतःला या विषमतेची झळ बसण्याची शक्यता नाही, अशांनी बंड करण्याचे कोणतेही कारण नव्हते. मात्र तरीही मानवतेच्या मूल्यांची जपणूक म्हणून, महाराष्ट्रात महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, र.धो.कर्वे, वि .रा .शिंदे आदींनी हे बंड केले. देशपातळीवरही ते प्रेरणादायी ठरले.

समाजात दलित, महिला, भटके आदी वर्ग वर्षानुवर्षे पिळवणुकीची साधने मानली गेली आहेत. निम्म्याहून अधिक संख्येने असलेल्या महिला या सार्‍याच्या सार्‍या गुलाम असतील, प्रतिष्ठा हरवलेल्या असतील, जाळण्याचे आणि केवळ भोगण्याचे साधन असतील तर तो समाज कधीच प्रगती करू शकणार नाही. भारत प्रगतीच्या बाबतीत सतत मागे पडला कारण त्याने आपली निम्मी ताकद कुजवली, धर्माच्या नावाने नासवली. गुलाम समजून अडगळीत टाकली. कधी हुंड्यासाठी जाळली तर कधी विधवा झाली म्हणून तिला पतीच्या चितेवर जाळून टाकले. कधी तिचे मुंडन करून तिला अंधारात फेकून दिले. समाजाच्या जडणघडणीत, विकासात प्रत्येक घटकाचा सहभाग असावा लागतो. आणि इथे तर महिलांना पद्धतशीरपणे संपवण्याचा उद्योग वर्षानुवर्षे चालू होता आणि ह्या उद्योगाचे नाव होते धर्म ! त्याला स्वर्ग-नरक असे नाव देण्यात आले. स्त्री ही एकाच वेळी देवी होती आणि पापयोनीही होती. ती एकाच वेळी युगायुगाची माता होती आणि ‘हाथरस’सारख्या घडलेल्या घटनांमध्ये बलात्काराची साधनही होती.

संस्कृतीच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या आणि धर्माच्या तसेच मनुस्मृतीच्या नखामुळे जखमी झालेल्या या महिलेला वाचवण्यासाठी, तिला तिचे आयुष्य प्रतिष्ठेने जगू देण्यासाठी बुद्धापासून प्रयत्न सुरू झाले. महात्मा फुले यांनी अशा सर्व प्रयत्नांना चळवळीचे रूप दिले. महिलासुद्धा माणूस आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्या संस्कृतीने शेकडो वर्षे खाल्ली आहेत. महिला, तिचे भावविश्व, तिची कर्तबगारी, तिचे जग, तिचे मोठेपण आदींचा फुल्यांनी तपशीलवार विचार केला आणि भारतीय संस्कृतीच्या पोटात सुरूंग उडावा अशी गोष्ट केली ती म्हणजे पुण्यात महिलांसाठी शाळा काढली. व्यवस्थेतील विकृतीने फसवून महिलांना बळजबरीने मातृत्व दिलेल्यांसाठी माहेर म्हणून स्वतःचे घरच खुले केले. महात्मा फुले यांच्याकडे धनसत्ता नव्हती, राजकीय सत्ता नव्हती. समाजाला शहाणे करत करत आणि प्रतिगाम्यांचे घाव झेलत-झेलत त्यांनी महिलांच्या मुक्तीची लढाई पुढे नेली. त्यानंतर आलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी महिलांच्या उद्धारासाठी आपल्या राजसत्तेचा उपयोग करण्याचे ठरविले. सामाजिक चळवळीची पूर्वपीठिका फुले यांनी तयार केलेली होतीच. प्रतिगामी धर्माला उत्तर म्हणून ‘सार्वजनिक सत्यधर्म ’ची स्थापना त्यांनी केली होती. आपल्या असंख्य अखंडातून महिलेची थोरवी फुल्यांनी गायली होती.

हे सर्व सांगण्याचे कारण असे की, हाथरससारख्या घडणार्‍या घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत, त्या एकूणच समाजाच्या काळजीचा भाग बनू नयेत, त्यासाठी महिलांच्या संदर्भात महाराष्ट्रात आणि देशात ज्या संत, समाजसुधारकांनी आपले आयुष्य समर्पित केले ते सर्व आपणास माहीत हवे. जाणीवपूर्वक आपण ते पुढील पिढीत रुजवले पाहिजे. म्हणजे याबाबतचे भय नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

शंभर वर्षांपूर्वी 2 ऑगस्ट, 1919 ला, ‘स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा’ राजर्षी शाहू महाराजांनी केला होता. त्या कायद्याचे नाव असे होते, ‘स्त्रियांना क्रूरपणाने वागवण्याचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेला नियम’ या कायद्याच्या प्रस्तावनेत, क्रुरपणाची वागणूक म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या केलेली आहे. आणि ह्या अपराधाबद्दल त्यावेळी शारीरिक आणि आर्थिक दंड किती असावा हेही स्पष्टपणे नमूद केलेले होते. शिक्षणाच्या सुपरिणामावरच केवळ आपण अवलंबून राहू लागलो तर स्त्री वर्गाची स्थिती सुधारण्याचे काम फारच मंद गतीने चालेल. शिक्षणाचा परिणाम लवकर घडून यावा, या हेतूसाठी मनुष्यास कायद्याच्या दहशतीची मदत पाहिजे. हेही अत्यंत आवश्यक आहे.

घडलेल्या घटनांवरून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, अत्यंत त्रासदायक आणि जुलमी वागणूक अनेकवेळा तथाकथित प्राबल्य असणार्‍या जात वर्गाचे लोक इतरांना देत असतात. स्थानिक पातळीवर हे लोक देशाची घटना, कायदा जुमानत नाहीत. राजकीय लागेबांधे असलेले इतर लोक क्रूर घटनांमधील नराधमांची भलावण करताना दिसतात. पीडितांमध्ये दहशत निर्माण करतात. सांसद नेते असूनही लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवताना दिसतात. त्यामुळे भीती कमी करण्यासाठी अशा बेमुर्वतांनाही कायद्याच्या कक्षेत आणून, सहआरोपी केले पाहिजे.

अनेक राज्यांमध्ये अनेक जातीपोटजातींमध्ये देशाच्या प्रचलीत न्यायव्यवस्थेला समांतर परंतु, पूर्णतः शोषक, जाचक, अन्यायकारक न्यायनिवाडे करणारी छुपी जातपंचायत प्रणाली कार्यरत असल्याचे महाराष्ट्र अंनिसने सात वर्षांपूर्वी समाजापुढे उघड केले. सतत पाठपुरावा करून, महाराष्ट्र शासनाकडून यासाठी, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर करून घेतला. त्यामुळे महिलांच्या विविध प्रकारच्या शोषणाला पायबंद घालण्यासाठी मोठी मदत झाली आहे. मात्र त्याबाबतचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात केले गेले तर, अत्याचाराचे प्रमाण व भय कमी होण्यासाठी मदतच होईल. जाणिवपूर्वक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह घडवून आणले तर, सामाजिक भेदभावाची दरी कमी होण्यास मदत होईल. सामूहिक विश्वास उंचावेल आणि दुर्घटना कमी करण्यासाठी एकोपा कामात येईल.

महिला हिताचे अनेक कायदे आहेत, त्यात कालसुसंगत बदल करणे, समाजप्रबोधन करणे, कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. लैंगिक शिक्षणातून शास्त्रीय माहिती योग्य त्या वयोगटांना देणे आवश्यक आहेच. प्रसारमाध्यमांनी अशा घटनांचे चित्रीकरण व माहितीचे प्रसारण करताना, संबंधित पीडिता, तिचे कुटुंबिय यांच्याबाबत पूर्णतः आस्था बाळगून, कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा आग्रह धरला पाहिजे. कोणत्याही राजकीय व्यक्ती, पक्ष, जात, धर्म यांच्याबाबतीत तटस्थता ठेवली तर लोकांचा विश्वास वाढेल, त्यांच्या मनातील भय कमी होईल. अनेक सामाजिक कार्यकर्ते, चळवळी अशाप्रसंगी अधिक आक्रमक भूमिका घेतात, ते योग्यही आहे. परंतु मुळातच सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळींमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढली, नेत्रूत्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिली गेली तर, घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी मदतच होईल अत्याचारीत, पीडित महिला तक्रार नोंदवण्यासाठी सरसावतील. समाजमनातील भय कमी करण्यासाठी असे करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

— डॉ. ठकसेन गोराणे 
-( लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस आहेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -