Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश वक्काट...वक्काट

वक्काट…वक्काट

भोगीच्या दिवशी येवलेकर पतंग उत्सवाला सुरुवात करतात. यात लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वजण सहकुटुंब घराच्या छतावर जमतात आणि पतंग उडवतात. हलकडी, ढोल ताशा, बेंजो आणि लाऊडस्पीकरच्या तालावर सर्वचजण थिरकतात आणि पतंग उत्सवात नाहून निघतात. रंगीबेरंगी गॉगल्स लावून तरुण, तरुणी मज्जा लुटण्यासाठी घराच्या छतावर गर्दी करतात. सूर्य उगवतीला पतंग आकाशात ढील देत झेपावतात तर मावळतीला खाली येतात. यावेळी पतंगांची कटाकाटी केली जाते. पतंग कटली की, वक्काट...वक्काट...वक्काट... असा एकच आवाज आसमंतात दुमदुमतो. पतंग उत्सवाची ही झिंग संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी करी दिनाला उतरते.

Related Story

- Advertisement -

नववर्षाच्या प्रारंभालाच मकर संक्रांतीचे वेध लागतात. कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे यंदाच्या उत्सवावर त्याचे सावट असणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. उत्साहाच्या भरात आपल्याला कोरोनाचे भान देखील ठेवावे लागणार आहे. हिंदू सणांपैकी महत्वाचा असलेला मकर संक्रांत हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. भारतासह नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश या देशांमध्येदेखील विविध नावाने मकर संक्रांत साजरी होते. भारतात तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये खिचडी व उर्वरित राज्यांत मकर संक्रांत या नावाने हा सण साजरा होतो. हिंदू महिन्याप्रमाणे पौष महिन्यात हा सण येतो. सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.

संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीय एकमेकांना भेटून तिळगुळ देतात. जानेवारी हा महिना थंडीचा असल्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ गुळासोबत खाल्ला जातो. तीळ गुळाचे लाडू बनून एकमेकांना वाटले जातात. तिळगुळातला गोडवा बोलण्यातदेखील टिकून रहावा म्हणून ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ अस म्हटलं जातं. संक्रांतीच्या आदल्या दिवस महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी सर्वप्रकारच्या शेंगभाज्या, फळभाज्या एकत्रित करुन त्यात तिळाचे कूट घालून बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाते. त्यासोबतच मुगाची खिचडी देखील बनवली जाते. संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी करी दिन साजरा करतात.

- Advertisement -

संक्रांतीच्या या तीन दिवसात देशभरात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. देशात सर्वात मोठा पतंग उत्सव गुजरातमधील अहमदाबाद येथे तर दुसरा महाराष्ट्रातील येवला शहरात साजरा होतो. महाराष्ट्रातील पतंगांचे शहर म्हणून येवल्याची ओळख आहे. भोगीच्या दिवशी येथील पतंग उत्सवाला सुरुवात होऊन ती करी दिनाला संपते. या तीन दिवसात आकाश विविध रंगांच्या पतंगांनी व्यापलेले असते. येवल्याच्या पतंगाची विशिष्ट प्रकारची बांधणी, आसारी, मांजा, फिरकी ही वैशिष्ठ्यपूर्ण असल्यामुळे येथील पतंगाला महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही मोठी मागणी असते.

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी येथील सरदार रघुजीबाबा यांनी येवला हे गाव वसवले. गावाची व्यावसायिक वृद्धी व्हावी या दृष्टीकोनातून त्यांनी विविध ठिकाणच्या व्यावसायिकांना आमंत्रित करुन त्यांना व्यवसाय उभारणीत मदत केली. यात प्रामुख्याने विणकर व गुजरातमधील काही बांधव आले. त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन येवला गावात व्यापार वृद्धी करण्यात आली. याच गुजराती बांधवांसोबत तेथील पतंगउत्सव देखील येवल्यात आला आणि मोठ्या उत्साहात साजरा देखील होऊ लागला. येवल्याच्या याच पतंग उत्सवाची ओळख आता सातासमुद्रापार झाली आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराची ओळख पतंगांचे शहर म्हणूनदेखील झाली आहे. पैठणीसाठी लागणारे रेशीम मोकळे करण्यासाठी आसरीचा वापर केला जातो. पुढे याच आसार्‍या मांजा गुंडाळण्यासाठी वापरात येऊ लागल्या.

- Advertisement -

आसारी बनविण्याचे काम येथील बुरुड समाज करतो. आसारी बनविण्यासाठी लागणार मासी आणि चवली जातीचा बांबू कोकणातून आणला जातो. हा बांबू ओला व हिरवागार असल्यामुळे तो योग्य पद्धतीने छिलला जातो आणि त्याला हवा तसा वाक देता येतो. हा बांबू कापून आसारीसाठी लागणारे पाते, फिरकी आणि हातात पकडण्यासाठी गुळगुळीत तासून गोल केलेला दांडा तयार केला जातो. पात्यांना छिद्र पाडून ते फिरकीमध्ये एका बाजूला अडकवले जातात. आणि दुसर्‍या बाजूला दोर्‍याने पक्के बांधले जातात. सहा, आठ, दहा आणि बारा पाती आसारी बनवल्या जातात. जितके जास्त पाते तितकी त्याची किंमत जास्त. साधारण पन्नास ते हजार रुपयेपर्यंतच्या आसारी तयार केल्या जातात. एक आसारी बनविण्यासाठी साधारण अर्धा तासाचा कालावधी लागतो. मांजा तयार करण्यासाठी लागणार दोरा मुंबई, अहमदाबाद, सुरत येथून व्यापारी नोव्हेंबर महिन्यात खरेदी करुन आणतात. आणि हा दोरा घेऊन त्याला भात, रंग, कोरफड, मैदा, अंडी यांच्या मिश्रणात बुडवला जातो. यानंतर काचेच्या बाटलीच्या काचा कुटून त्याची बारीक भुकटी तयार केली जाते. पूर्वी खलबत्त्यात या काचा कुटल्या जायच्या आता ग्राइंडर, कांडपमध्ये काचा कुटल्या जातात.

कुटून तयार झालेली काचेची भुगटी वस्त्रगाळ करुन त्याची बारीक पूड काढली जाते. आणि मिश्रणात बुडून ठेवलेल्या दोर्‍याला ही पूड लावून पक्का मांजा तयार केला जातो. त्याचबरोबर काठभरीव पतंग विशिष्ट प्रकारे तयार केली जाते. प्लास्टिक आणि कागदी अशा दोन्ही प्रकारच्या वैशिष्ठ्यपूर्ण पतंग तयार केल्या जातात. एप्रिल महिन्यापासूनच पतंग बनविण्यासाठीची तयारी सुरू होते. पतंगाच्या मधोमध लावलेल्या काडीला दट्ट्या म्हणतात तर आडव्या वाकवून लावलेल्या काडीला कमान म्हणतात. या दट्ट्या आणि कमान बनविण्यासाठी लागणार्‍या काड्या छिलण्याचे काम सर्वात आधी सुरू होते. यानंतर अर्धा, पाव आणि सव्वा फडकीचा कागद कापून पतंग तयार केला जातो. पतंग उत्सवाच्या निमित्ताने येवला शहरातील साधारण तीन हजार कुटूंबाना यामाध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. त्याचबरोबर पतंग, मांजा, आसारी यांच्या विक्रीतून शहरात कोट्यवधींची उलाढाल दरवर्षी होते. या माध्यमातून अनेक कुटूंबांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटतो. हॉटेल व्यवसाय, पर्यटन याला देखील या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. यावर्षी कोरोनामुळे या व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे. पतंग आणि मांजाची विक्री मंदावली आहे.

भोगीच्या दिवशी येवलेकर पतंग उत्सवाला सुरुवात करतात. यात लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वजण सहकुटुंब घराच्या छतावर जमतात आणि पतंग उडवतात. हलकडी, ढोल ताशा, बेंजो आणि लाऊडस्पीकरच्या तालावर सर्वचजण थिरकतात आणि पतंग उत्सवात नाहून निघतात. रंगीबेरंगी गॉगल्स लावून तरुण, तरुणी मज्जा लुटण्यासाठी घराच्या छतावर गर्दी करतात. याकाळात नातेवाईक बाहेर गावी असलेले सर्वजण येवल्यात येतात. संक्रांतीच्या दिवशीतर या पतंग उत्सवाला अधिकच उधाण येत. परदेशी पर्यटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून आलेले नागरिक, सिलिब्रिटी, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणावर याठिकाणी गर्दी करतात. सूर्य उगवतीला पतंग आकाशात ढील देत झेपावतात तर मावळतीला खाली येतात. यावेळी पतंगांची कटाकाटी केली जाते. पतंग कटली की, वक्काट…वक्काट…वक्काट… असा एकच आवाज आसमंतात दुमदुमतो. पतंग उत्सवाची ही झिंग संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी करी दिनाला उतरते. या उत्सवादरम्यान सर्व व्यापारी आपला व्यापार स्वयंसपूर्तीने बंद ठेऊन पतंग उत्सवात सहभागी होतात.

संक्रांत आणि पतंग उत्सव साजरा करताना आपल्याला यावेळी मोठं गांभीर्य पाळायचं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळून उत्सव साजरा करायचा आहे. त्याचबरोबर नायलॉन मांजाचा वापर टाळून पक्षी, प्राणी आणि माणसांचे जीव वाचवायचे आहेत. जखमी पक्षी प्राण्यांना लागलीच उपचार देऊन त्यांना बरं करायचं आहे. आपल्या उत्साहात कुणाला इजा होणार नाही ना याची काळजी घेऊन मकर संक्रांत साजरी करुया.

– लखन सावंत

- Advertisement -