नाटकाच्या ताळेबंदाला चकवा

साल 2020 च्या शेवटाकडे आता आपली वाटचाल सुरू झाली आहे. वर्षाच्या शेवटाकडे जसजसा प्रवास सुरू होतो, तसतसा माणूस गतवर्षात काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडू पाहतो. या वर्षाने मात्र तसा हिशोब मांडायची संधी दिलीच नाही. तेव्हा यावर्षी नाट्यसृष्टीत काय घडलं, कसं घडलं, काय मिळालं आणि काय गमावलं याची चर्चा करायची संधी लाभलीच नाही. पण पुरेसा मोकळा वेळ मिळाल्याने नाटकाच्या तसंच कुठल्याही लिखित संहितेच्या प्रमुख घटकांवर मनन करता आले, ही एक दिलासा देणारी गोष्ट घडली. त्या घटकांपैकी प्रमुख अशा लेखन आणि वाचन या दोन घटकांवरचे माझे अभिप्राय हा या लेखाचा हेतू आहे.

मी लिहीतो. मी रुढार्थाने लेखक नाही. माझ्या लिखाणाचं कुठलंही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. पण त्या सगळ्याहूनही महत्वाचं आहे ते म्हणजे हे की मी लिहितो. स्वान्तसुखाय लिहितो. खरंतर प्रत्येकाने लिहावं. प्रत्येकात लिहिण्याचा एक स्पार्क असतो. इतकंच की त्या स्पार्कला आपण जगण्याच्या धावपळीत जपलेलं नसतं किंवा जगण्यातल्या इतर गोष्टींपुढे लिहिण्यासारख्या गोष्टीचे आपल्याला महत्व वाटत नसतं किंवा लिहिण्यात आपल्याला रसच नसतो. हरकत नाही. लिहिणं न लिहिणं हे व्यक्तीसापेक्ष आहे. ज्याला लिहावंसं वाटतं, तो किंवा ती लिहिते. ज्याला लिहावंसं वाटत नाही, तो किंवा ती लिहीत नाही. हे इतकं साधं आणि सोपं समीकरण आहे.

लिहिणं ही लिहिणार्‍याची सर्वप्रथम आंतरिक गरज असते. आपल्या रोजच्या संपर्कात येणार्‍या माणसांसकट आपल्या भोवतालच्या वातावरणाशी आणि परिस्थितीशी कुठल्याही माणसाचा रोज आमनासामना होत असतो. तो कुणालाच चुकलेला नसतो. मग तो लिहिणारा माणूस असो वा नसो. त्या वातावरणाशी, परिस्थितीशी आणि माणसांशी झालेल्या रोजच्या सामन्यातून आपल्या मनात एक प्रतिक्रियात्मक असा संवादाचा ऐवज कणाकणाने साचत असतो. काही वेळा त्याला परिस्थितीशी एकरूप व्हावंसं वाटतं, तर कधी सभोवतालाविषयी, त्यातल्या माणसांविषयी त्याच्या मनात प्रश्नही पडलेले असतात. आता दिवसाच्या शेवटी मनात साचलेलं व्यक्त करता येईल असं माणूस ज्याच्याजवळ असेल, त्याला या प्रक्रियेचे काही सोयरसुतक किंवा महत्व असण्याचं काही कारण नाही.

पण अशी कित्येक माणसे आहेत ज्यांना हा आऊटव्हॉल्व उपलब्ध नसतो. अशा माणसांसाठी मग ‘लिहिणे’ या गोष्टीचा मोठा आधार असतो. लिहिणं हा त्यांच्यासाठी आत्मसंवादाचाच एक प्रकार असतो. त्यांच्या मनात होत असलेली घुसळण ते कागदावर उतरवू पाहतात. अगदी साध्यासुध्या दैनंदिन जगण्यातल्या नोंदी, निरीक्षणं ते त्यांच्या डायरीवजा उतार्‍यांतून कागदावर लिहून काढत असतात. जगण्यातल्या घटनांना-अनुभवांना टीपकागदासारखं शोषून घेऊन मग त्यांचा अर्थ आपापल्या परीने लावत लिहिणारा लिहीत असतो. घटनांना आणि अनुभवांना प्रतिसाद देण्यातली माणसाची संवेदनशीलता जेवढी तीव्र, तेवढं त्याचं लिखाण कागदावर असोशीने उतरत जातं. त्याच असोशीतून कुणाचं लिखाण मग रोजनिशीतल्या नोंदींचं रूप घेतं, कुणी ते पत्ररूपात लिहून काढतं तर सृजनशील मनाची माणसं त्यातून कविता, कथा, नाटक आणि कादंबरीसारखे लिखाणाचे घाट हाताळतात.

लिहिणं ही अशाप्रकारे लिहित्या माणसाची आत्मसंवादाची आणि त्या घुसळणीतून तयार होणारी एकाच वेळी आनंददायी आणि त्याचवेळेच कष्टदायी अशी प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या साहित्याचे वाचनमूल्य किती आणि त्याची वाचकांच्या दृष्टीने असलेली मौलिकता किती हा नंतरचा भाग झाला.

लिहिणार्‍याने लिहिलेलं वाचकांच्या संपर्कात येतं आणि तो वाचक आपापल्या अनुभवांच्या परीने आणि अनुषंगाने त्या लिखाणाला प्रतिसाद देतो आणि त्याचं असं एक मूल्य ठरवतो. मात्र त्याआधी, लिहिणार्‍याच्या प्रसववेदना केवळ लिहीणार्‍यालाच ठाऊक असतात. कुठल्याही वाचणा-याने लिहिणार्‍याच्या या प्रसववेदनांचं भान आणि जाणीव ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही लिहिणार्‍याचं लिखाण म्हणजे थेटरात दर शुक्रवारी प्रदर्शित होणार्‍या एखाद्या चित्रपटासारखं नसतं, ज्याचा फैसला आपण तो पाहून पहिल्या पाचेक मिनिटांत करत असतो. टुकार जरी झाला तरी तो चित्रपट तयार करायलासुद्धा शेकडो लोकांनी मेहनत घेतलेली असते. इथे लिहिणारासुद्धा महिनोंमहिने वर्षानुवर्षे आपल्या स्वत:शी झुंजत असतो आणि इतके झुंजल्यानंतर काहीएक पानं लिहीत असतो.

आता प्रश्न आहे तो असा की एखाद्या तिसर्‍या माणसाने एखाद्याचं लिखाण कितपत चांगलं आहे किंवा अगदीच टुकार आहे हे ठरवताना पाळावयाची पथ्ये कोणती ? पहिलं म्हणजे त्या तिसर्‍या माणसाने आधी ‘वाचक’ म्हणून स्वत:वर काम करायला पाहिजे, दगड छिन्नी चालवली पाहिजे, स्वत:ला घडवायला पाहिजे. हे कसं होणार ? तर केवळ सतत वाचत राहिल्याने होणार. काहीही वाचा…अगदी वर्तमानपत्रापासून ते थेट कादंबरीपर्यंत. पण वाचक म्हणून घडणार्‍या प्रवासात त्याने अविरत आपले तनमन मोजले पाहिजे. तरच त्याची स्वत:ची अशी एक मुस तयार होते, स्वत:ची भूमी तयार होते. चौफेर वाचन करणारा माणूस मग आपोआपच कुणाच्या लिखाणावर अकारण शेरेबाजी, टिप्पण्या करणं टाळू लागतो. सतत वाचत राहिल्याने तो मुख्यत: ‘घडत’असतो.

यापुढचा टप्पा म्हणजे लिहिणं. उत्तम वाचक हा नेहमीच संभाव्य लेखक असतो. खूप वाचल्यानंतर आता आपलं स्वत:चं असं काही लिहावं, तोडकीमोडकी का होईना-पण आपली एक अभिव्यक्ती असावी, असं प्रत्येक वाचणाकर्‍याला वाटत असतं आणि मग तो एकेदिवशी बाह्या सरसावून लिहायला बसतो. तो क्षण त्या माणसासाठी ‘सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु’ची अनुभूती देणारा असतो. वर्षानुवर्षे वाचक म्हणून केलेल्या तपस्येच्या – साधनेच्या झाडाला लागलेलं ते गोमटं फळ असतं.

आता समाजमाध्यमांची चलती आहे. त्या माध्यमांचं एक वैशिष्ठ्य म्हणजे वर चर्चेत म्हटल्याप्रमाणे लिहिण्यावाचण्याचे अथक परिश्रम न करताच माणसांना तात्काळ वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एक आयता सहजसोपा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अगदी काही मिनिटांत एका क्लिकसरशी शेकडोजणांपर्यंत पोहचण्याची सोय या प्लॅटफॉर्ममुळे झाली आहे. या आयत्या आणि सहज उपलब्ध झालेल्या प्लॅटफॉर्ममुळे आणि लोकांच्या तात्काळ मिळणार्‍या प्रतिसादाच्या (लाइक्स) लोभामुळे लिहिणार्‍याला त्याचं लिखाण, ते अर्धकच्चं असलं तरीही, समाजमाध्यमांच्या भिंतींवर लिहिण्याची घाई होते. आपलं लिखाण लोकांसमोर येण्याची अधीरता त्याच्या छाया उत्पन्न होते. याच्यापुढचा आणि अधिक घातक दुष्परिणाम होतो तो त्या पोस्टस वाचणार्‍या वाचकांवर.

अर्थात काही व्यासंगी वाचक या दुष्परिणामापासून बचावले जात असले तरीसुद्धा अशा व्यासंगी वाचकांची संख्या सध्या समाजमाध्यमांवर दिवसरात्र वावरत असलेल्या नववाचकांपेक्षा तुलनेनं खूपच कमी. या नववाचकांसमोर चार ओळी किंवा एखादा उतारा आकर्षक पद्धतीने, त्यांच्या भावनेला हात घालत मांडला की तेच लिखाण ‘ग्रेट’ असा त्या बापड्या नववाचकांचा समज होतो. मग तशाप्रकारच्या लिखाणालाच ते प्रमाण मानू लागतात. गांभीर्याने, प्रामाणिकपणे लिहिणार्‍या इतर लेखकांच्या लिखाणाला त्यांच्यालेखी प्रमाण झालेल्या लिखाणाशी ताडून पाहू लागतात. तसं ताडून पाहिल्यावर एखाद्याचं लिखाण त्यांना आकर्षक वाटलं नाही, त्यांच्या भावनांना हात घालणारं वाटलं नाही, तर त्याचा निकाल लावायला दोन सेकंदाचाही वेळ या नववाचकांना लागत नाही. त्यांच्यालेखी ते ‘पुचाट लेखन’ असते. चांगला की बेक्कार ते पाचेक मिनिटांत ठरवता येणार्‍या सिनेमासारखे.

समाजमाध्यमांचे काही दुष्परिणाम असतील तर त्यापैकी हा एक पण प्रचंड घातक ! बाकी चुकभूल द्यावी घ्यावी.