घरफिचर्ससारांशउघडले नाट्यगृहाचे दार!

उघडले नाट्यगृहाचे दार!

Subscribe

पाहता पाहता कोरोना लॉकडाऊनचे सात महिने केव्हा सरले ते कळलेसुद्धा नाही. आता चित्रपट आणि नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सात महिने बंद असलेले दार आता उघडले आहे. या सात महिन्यांत सांस्कृतिक घडामोडी जवळ जवळ नाहीशाच झाल्या होत्या, त्या आता सुरू होतील. त्यामुळे कुठेच काही घडत नसताना कशाचा आढावा घ्यायचा, कशाची शिफारस करायची हे प्रश्न आपोआपच बाजूला पडले. माणसांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवरच अशी संक्रांत आल्यावर त्यांच्यातले सांस्कृतिक आदानप्रदान थांबले, ते आता सुरु होईल.

सांस्कृतिक जीवनाच्या साचलेपणाची भरपाई ऑनलाईन माध्यमांतून करण्याचे प्रयत्न झाले तरी, तो प्रत्यक्ष भेटीगाठींना आणि त्यातून होणा-या सांस्कृतिक देवघेवींना कायमचा पर्याय होऊ शकत नाही, हे माझे मत कालही होते आणि आज ते अधिकच घट्ट झाले आहे. मग अशा आणीबाणीच्या परिस्थितीत माणसांना अंतर्मुख होण्याची संधी मिळते. त्या अर्थाने लॉकडाऊनसारखी आपत्ती म्हणजे इष्टापत्तीच! याच अंतर्मुखतेतून भविष्यातील कल्पनाचित्र डोळ्यांसमोर उभे राहू लागले. ते चित्र या लेखातून शब्दांवाटे रेखाटावेसे वाटले. हे चित्र खोटं ठरो हीच रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना….

एक आटपाट गाव होतं. गावात दोन सख्खे मित्र राहत होते. इतके सख्खे की सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्री अंथरूणावर पडेपर्यंत एकमेकांशी ठराविक अंतराने सतत बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नसे. बरं…बोलणं म्हणजे काय ? सतत एकमेकांची जीवापाड काळजी करत राहायचं. एकमेकांची ख्यालीखुशाली तपासत राहायची. जरा कुठे खुट्ट झालं तरी आपल्या मित्राला त्याची झळ नाही ना पोहचली, हे पाहायचं. असं गेली कित्येक वर्षे सुरू होतं. हे असं जगणं हा त्या दोघांच्याही जगण्याचा नित्यक्रम होता. त्यांनी या जगण्याला इतके गृहीत धरले होते की, कधीतरी काहीतरी अनपेक्षित घडेल आणि आपल्या या जगण्यात खंड पडेल असा विचारही त्यांच्या ध्यानीमनी नव्हता. गावातल्या इतर माणसांचेही असेच सगळे वरकरणी सुरळीत सुरू होते. व्यवहार घडत होते. स्थावर जंगमांची बोलणी होत होती. उंचच उंच माड्या रचत होते लोक. शिवाय घरोघरी बारसे, मुंजी, लग्नसमांरभ, मयती नेमाने घडतच होत्या. लोक आवर्जून या सगळ्याला हजर राहत होते. एकूणातच…आहे हे असंच सुरू राहील अनंतापर्यंत, याबद्दल गावातला प्रत्येक माणूस खात्री बाळगून होता.

- Advertisement -

एक दिवस काय झालं…गावात कसलीतरी एक साथ आली. साथ इतकी जालीम होती की त्यामुळे गावातलं रहाटगाडगं थांबतंय की काय, अशी शंका यावी. लोकांनी आपल्या लेकराबाळांची लग्नं स्थगित केली. बारसे, मुंजी असले खिटुकपिटुक समारंभ राहू द्या…अगदी मयतालासुद्धा चार खांदे मिळू नयेत अशी परिस्थिती गावातल्या माणसांवर ओढवली. साथ होतीच तशी विचित्र….माणसांनी एकमेकांच्या संपर्कात आल्याने तिचा फैलाव जास्त प्रमाणात होतो, असा एक निष्कर्ष गावातल्या जाणत्यांनी काढल्याने माणसांच्या एकत्र येण्यावरच त्यांनी बंदी घातली होती. एकत्र येणं ही माणसांची पूर्वापार असलेली गरज होती. आता या एकत्र येण्यावरच बंदी घातल्यामुळे झालं काय की, सुरुवातीला लोक एकमेकांची दुरून का होईना पण सवयीने काळजीपेटी विचारपूस करत. एकमेकांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न करत. पण जसंजसं हा एकत्र न येण्याचा काळ वाढत गेला, तसंतसं कालांतराने माणसंही एकमेकांची चौकशी करणं विसरून गेली. विसरून गेली म्हणण्यापेक्षा त्यांनी ते सोडून दिलं. साहजिकच होतं ते. आपल्या भोवतालचा कोळी विलगतेचं जाळं धाग्याधाग्याने विणत होता. त्या जाळ्यात एक अशा प्रकारचं गुंगी आणणारं रसायन स्त्रवत असे की माणसं दिवसच्या दिवस धुंद राहत. शिवाय, रोज मरे त्याला कोण रडे, असंही कुठल्या जाणत्यांनी म्हणून ठेवले होते. त्याप्रमाणे खरोखरीच माणसं एकमेकांना विसरून गेली.

कुणी म्हणायचं हे दिवस काही फार काळ राहणार नाहीत. लवकरच या साथीवर काहीतरी अक्सीर इलाज कुणीतरी जाणता शोधून काढीलच. तोपर्यंत थोडी कळ सोसावी. एकदा ही साथ ओसरली की गाव पुन्हा पहिल्यासारखं नांदत होईल. पण तो दिवस कधी उजाडेल याचं उत्तर मात्र कुणाजवळच नव्हतं. जो तो फक्त अंदाज करी आणि आपल्या घरात निपचित पडून राही. हळुहळू झालं काय की, घरात कोंडून घातली गेलेली माणसं घराच्याही पलीकडे आपल्या कोषात जायला सुरूवात झाली. कोषात गेलेली माणसं त्यातून बाहेर कशी काढायची, हा मोठाच प्रश्न ज्याच्या त्याच्या मनाला पडू लागला. एखाद्याला कोषातून बाहेर काढायचं तर त्याला चारचौघांत वावरायला लावलं पाहिजे. पण घोडं इथेच तर पेंड खात होतं. चारचौघांना एकत्र वावरण्यालाच जिथे मज्जाव होता तिथे एकट्याचं एकटेपण कसं निस्तरायचं ? आता गाव पहिल्यासारखं गाव राहिलं नव्हतं. माणसं गावातच होती. पण शेजारीपाजारी दुसरं कुणीच नसल्यागत घराच्या खिडकी उंबरठ्यावर घुटमळायची आणि पुन्हा आपल्या कोषात जायची. आता हा गावातल्या माणसांचा नित्यक्रम झाला होता.

- Advertisement -

या अशा दिवसांत गावातले ते दोन सख्खे मित्रसुद्धा जगत होते. त्या दोघांना एकमेकांची आठवण येई. अधूनमधून जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळे, तेव्हा ते दोघे एकमेकांची चौकशी करत. आधी ज्या उमाळ्याने एकमेकांसोबत बोलत, तो उमाळा त्यांच्या बोलण्यात जाणवायचा…नाही असं नाही. पण त्या उमाळ्याला औपचारिकतेचा वास जाणवायचा. आपल्यातल्या उमाळ्याची जागा हळुहळू एक औपचारिकता घेऊ पाहतेय याची जाणीव होऊन त्या दोघांपैकी एक मित्र फार अस्वस्थ होऊ लागला. ही जी साथ सबंध गावात पसरली आहे, तिचा नेमका परिणाम काय आहे ? ती सरसकट माणूसच जीवानिशी मारून टाकणार आहे की असं कणाकणाने माणूस संपवत जाणार आहे?

गोष्ट अजून संपलेली नाहीय. त्यामुळे तिचा शेवट नेमका काय असेल, हे अजून कळत नाहीय. जसजसा काळ पुढे जात राहील, तसतसं माणसांच्या वर्तणुकीचे नवीन आणि वेगवेगळे आयाम दिसतील. तोपर्यंत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ हा एकच पर्याय उपलब्ध आहे. गोष्ट संपेपर्यंत कदाचित या प्रश्नाचं उत्तर मित्राला मिळालेलं असेल. ती ऐकायला आतुर असलेले कान मात्र उरलेले नसतील. आपल्याचभोवती अजगरासारखा तृप्त विळखा घालून कोषात गेलेली माणसं नजरेस पडण्याचा काळ तेव्हा आम असेल. अफसोस..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -