Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश सह्याद्री ध्यास... अनादी-अनंत !

सह्याद्री ध्यास… अनादी-अनंत !

‘गिर्यारोहण’ हे एक तंत्र वापरून विविध क्षेत्रात ज्या ज्या तोडीचे नवनवीन संशोधन होतेय, जगापुढे येतेय, याबाबतीत आपण कुठे आहोत? किमान कोणत्या टप्प्यावर आहोत, हा समस्त जुन्या जाणत्या आणि नवीन ‘गिर्यारोहक’ म्हणवून घेणार्‍याना विचार करावयास लावणारा प्रश्न नक्कीच आहे. आणि त्यावर संस्थात्मक, संघटनात्मक ठरवून सुनिश्चित प्रयत्न व्हावयास हवेयत. ही नकारार्थी भावना नसून गिर्यारोहक म्हणून सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवावासा वाटतोय. याचे कारण भारतातील हिमालय, आरवली, विंध्याद्री, आणि अर्थातच सह्याद्री या 4 उत्तुंग तेवढ्याच पुरातन प्राचीन पर्वतमाला आजही संशोधक अभ्यासकांना असंशोधित आव्हान देऊन उभी ठाकलीयत.

Related Story

- Advertisement -

विसाव्या शतकातील सत्तरी-नव्वदीचे दशक निसर्ग भक्तांची मांदियाळी अक्षरशः गडकोट, लेणी-घाटवाटांवर -रानोमाळ भ्रमंती आणि उत्तुंग शिखर सुळक्यांवर प्रस्तरारोहणास आसुसलेली होती. मना हृदयात शिवप्रभु मंत्र उच्चारत अवघड अनवट वाटांची भुकेली होती. बाबासाहेब पुरंदरे, गो.नि.दांडेकर, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानाचा प्रभाव असायचा.

मुंबई पुण्यात तेव्हा काही मोजकेच ग्रुप्स असावेत. आजच्या सारखं उदंड पीक नव्हतं. शुक्रवार-शनिवार उशिराची मुंबई पुणे पेसेंजर ट्रेन, भीमाशंकर खांडस गाठावयास ढेकना मच्छरांच्या सहवासात कर्जत एसटी स्थानकाचे तर तिकडे माळशेज जुन्नर परिसर गाठवयास कल्याण एसटी स्थानकात भटक्यांनी भरलेले फलाट दिसत. अनेक दिव्य होत होती, पण ती आपलीशी होती. सख्या सवंगड्याना भेटायची आसही असायची.

- Advertisement -

पुढे हळूहळू परिमाण बदलू लागलीत तसे परिणाम बदलू लागलेत पण,ते केवळ स्थळावरील गर्दीचे असे म्हणावेसे वाटते. हरिश्चंद्रगडावर जिथे माणूस दिसावयास तेव्हा कठीण तिथे आज चायनीजचे स्टॉल्स म्हणजे जरा अतीच झालेय.

आत्तासारखी त्यावेळेस स्वतःची वाहनं नव्हती, पैसे नव्हते त्यामुळे सॅकसह किंमती वस्तू सोबत आणि शोभतही नसायच्या.
मला आठवतं, कित्येकदा मुंबई पुणे पेसेंजर पकडून पुण्यातला जुना बाजार मी गाठायचो. तिथे 40 रुपयात मिलीटरी पाऊच आणि 100 रुपयात पाठीवरच्या पिट्टू ग्रुपसाठी घ्यायचो आणि सहकार्‍यांना द्यायचो. घाटकोपर सर्वोदयच्या रस्त्यावरील बाजारापासून दिसतील ते जुने बाजार धुंडाळत असायचो तिथे काही अशा वस्तू मिळतील, ज्या मला प्रस्तरारोहण मोहिमेत उपयोगी पडतील. असे ते संघर्षाचे दिवस.
आज, हायकिंग-ट्रेकिंगची एक वेगळी क्रेझ निर्माण झाल्याचे तसे सुखावह चित्रं दिसतेय. भटक्यांसाठी हव्या त्या वस्तू आज दुकानात-मॉलमध्ये सहज उपलब्ध झाल्यायत.
ज्या मी किंवा माझ्या वेळच्या गिर्यारोहकांनी केव्हा पाहिल्या-हाताळल्याही नसतील.
जग जवळ आलेय, त्यामुळे या विज्ञान संगणकाच्या युगात एका क्लिकवर हवं ते क्षणांत घरपोच.
मी तर अजूनही एवढी नको नको ती साधनसामुग्री बघून बावरतो. प्रश्न पडतो यामुळे तर आपलं केव्हाच अडलं वा अवघडल नव्हतं ? तरीही 67 शिखरं सर झालीच ना ?
पण, या आधुनिक साहित्य वस्तू ही या जगाची देण होत. पैसे आहेत तर जरूर घ्या पण,गरजच आहे असं काही नाहीय.
इथे याच अनुषंगाने एक मुद्दा महत्वाचा ठरतोय पाश्चात्य अगदी कोणत्याही देशाचं लेटेस्ट गिर्यारोहण साहित्य इथे उपलब्ध होतेय हे जितकं खरं, तितकंच खरंय की आपण त्या पाश्चात्य गिर्यारोहकांचा आत्ताचा प्रगत ध्यास (creativity) किती स्वीकारला-समजला असू , याचाही प्रश्न पडायलाच हवा.

- Advertisement -

जरा अधिक स्पष्ट करायचे तर, आज डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, ऍनिमल प्लॅनेट आदी चॅनल्सवरच्या माहितीप्रधान डॉक्युमेंटरी आपण ज्या उत्सुकतेने पाहतो तो, त्यांचा बेस पक्क्या गिर्यारोहकाचा असतो. अगदी पूर्ण टीम, मुख्य अँकरपासून मग तो स्क्रिप्ट रायटर असो, डायरेक्टर असो, कॅमेरामन असो, स्पॉट बॉय असो वा वाहन चालक असो.

‘गिर्यारोहण’ हे एक तंत्र वापरून विविध क्षेत्रात ज्या ज्या तोडीचे नवनवीन संशोधन होतेय, जगापुढे येतेय, याबाबतीत आपण कुठे आहोत? किमान कोणत्या टप्प्यावर आहोत, हा समस्त जुन्या जाणत्या आणि नवीन ‘गिर्यारोहक’ म्हणवून घेणार्‍याना विचार करावयास लावणारा प्रश्न नक्कीच आहे. आणि त्यावर संस्थात्मक, संघटनात्मक ठरवून सुनिश्चित प्रयत्न व्हावयास हवेयत. ही नकारार्थी भावना नसून गिर्यारोहक म्हणून सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवावासा वाटतोय.

याचे कारण भारतातील हिमालय, आरवली, विंध्याद्री, आणि अर्थातच सह्याद्री या 4 उत्तुंग तेवढ्याच पुरातन प्राचीन पर्वतमाला आजही संशोधक अभ्यासकांना असंशोधित आव्हान देऊन उभी ठाकलीयत. अजूनही आपण केवळ गडकोट भ्रमंती, शिखर सुळक्यांवरील प्रस्तरारोहण, वॉटरफॉल रॅपलिंग, शिबिरांचे आयोजन इथवरचा कार्यभाग समाधान देण्यापुरता मानायचा का ?

केवळ महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरीही खुद्द सह्याद्री, त्यावरील अनेक कातळ शिल्पे, गडकोट लेणी भुयारे, शीलालेख, ब्राम्ही-पाली-मोडी भाषा सौंदर्य, विस्तीर्ण खोरी अन त्यातील जैविक साधनसंपत्ती, वनस्पती-पशू पक्षी शास्त्र, भूगोल-भौतिकशास्त्र एक ना अनेक विषय आजही अन उद्याही संशोधनास सादावित आहेत. त्यावर प्रचंड काम प्रत्यक्षात ऑन फिल्ड होणे बाकी आहे. किंबहुना काम नाहीय असेही नाहीय पण ते अजूनही सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थे पावेतो केले गेलेले आहे.चारभिंती आत अभ्यास संशोधन करण्यावर शेवटी मर्यादा पडतातच.

आजही 21व्या शतकात नुसत्या इतिहास या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे कठीणच काम होय. आज संशोधकांना फारशी उपलब्ध होऊ न शकलेली साधने नव्याने उपलब्ध झालेली आहेत. संगणक, इंटरनेट, मोबाइल, फोटोग्राफी, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, अनुवाद साधने यामुळे इतिहास संशोधनाचे क्षितिज विस्तारले आहे. याचप्रमाणे इतर विषय-क्षेत्र होत.
संशोधक अभ्यासकांच्या मनात का, कधी, कोणी, कोठे, कसे, केव्हा असे सहा ‘क’कार प्रश्न उभे राहतात. इतिहास संशोधनच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचा पाया हे सहा ‘क’कार असतात. याचे महत्वही आपण आज विविध चॅनेल्स वरील माहितीपटात अनुभवतो आहोत.

मग, यात आम्ही गिर्यारोहक, निसर्ग इतिहास प्रेमींनी या काही दशकात कोणती उल्लेखनीय भर घातली ? हा प्रश्न आपण आपणांस विचारुया.

जगभरात प्रत्येक विषय क्षेत्रात मानवी कृती आणि मनोव्यापार यांचा संबंध ज्या ज्या ठिकाणी होतो तेथे आपणास बदल संभवतो. पुरातन स्वातंत्र्यातमा सह्याद्री हे इथे अधिक अधोरेखित करतोय.

इथे आवाहनांची कमतरता नाहीय.ज्याला ज्या ज्या म्हणून काही विषयावर संशोधन करायचे आहे ती ती क्षेत्र खुली आहेत. ‘गिर्यारोहण’ हे यासाठी सर्वोत्तम माध्यम होय. कारण ज्यास जिथे पोहोचायचे तिथे गिर्यारोहण हे एक तंत्र म्हणून मदत होईल.

गिर्यारोहक, निसर्ग इतिहास प्रेमींच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, हेरिटेज स्थळांचा इतिहास केला जाऊ शकतो. प्राचीन वास्तू अवशेष, किल्ले गडकोट मंदिरे यांचे जतन संवर्धन होऊ शकते. आणि त्यावर अलीकडे खरोखरच काही किल्ल्यांवर उल्लेखनीय काम सुरू आहे. जुन्या दस्तऐवजांची जपणूक, उत्तम दर्जाची संग्रहालये आणि त्यांची जोपासना या गोष्टीही आत्ता होऊ शकतात.

जैवविविधतेच्या बाबतीत तर सर्वाधिक जैवविविधता आढळणार्‍या जगातील 17 देशांच्या यादीत भारताचे 8 वे स्थान. इतर देशांच्या तुलनेत 2.4 इतकाच भूभाग असूनही जगाच्या तुलनेत सुमारे 8 टक्के जैवविविधता एकट्या भारतात सापडते. 350 प्रकारचे सस्तन प्राणी, 1224 पक्षी, 197 उभयचर, 408 सरीसृप, 2564 मासे, 59 हजार कीटक आणि 15 हजार वनस्पतींच्या प्रजाती भारतात सापडतात. याचप्रमाणे पश्चिमी घाटासह चार जैवविविधता हॉटस्पॉट्स आपल्याकडे आहेत. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 23 टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. इतकी प्रचंड समृद्धता असल्याने जैवविविधता जपणे आपल्या व येणार्‍या पिढ्यांसाठी आत्यंतिक गरजेचे आहे. याचा अभ्यास, आणि प्रसार-प्रचार गिर्यारोहक संघटनांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे होऊ शकतो. आज अन उद्या भविष्यात सजीवसृष्टीसमोर अनंत प्रकारची भयंकर मानवनिर्मित आव्हाने आहेत ती समजून सांगून समाजमन भानावर आणण्याचेही पवित्र काम या गिर्यारोहण अर्थातच निसर्ग छंदातून होऊ शकेल ती काळाची गरज आहे.

मुंबई सोडल्यानंतर मी माझ्यापरीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रयत्न करतोय. कालचक्रात हरवलेल्या जिल्ह्यातील काही किल्ल्यांना शोधून लोकांसमोर आणलेय. आत्ता त्यांच्या जतन संवर्धनाचे काम सुरू झालेय. प्रत्येक बाब सरकारच करेल या विचार आणि ऐतिहासिक वास्तूंच्या अनास्थेपोटी अनेक किल्ले आज शेवटची घटका मोजीत आहेत. ते पाहून प्रत्येक गिर्यारोहक हळहळतोय. खूप काही करण्याजोगे आहे. करताही येईल. हे मूळ तत्त्व जाणून, त्यासच प्राधान्य प्राथमिकता देऊन गिर्यारोहक आणि गिर्यारोहण संघटनांनी हे दायित्व निभावणं गरजेचं होय.

शिवप्रभूंनी सह्याद्रीच्याच प्रेरणेने जागोजाग गडकोट उभारलेत. शेतकर्‍यांचे शौर्य जागृत केले, शुरांचे कर्तृत्व स्वातंत्र्योन्मुख केले. महाराष्ट्राला संजीवनी महामंत्र दिला, की ज्यामुळे आत्म समर्पणाला वीर सज्ज झालेत. हा सह्याद्रीचा प्रसाद होय. या प्रसादाचा गंध सुगंध परिमळ पार सातासमुद्रापार जावयास हवा. त्यासाठी ‘गिर्यारोहण’ हा केवळ धाडसी खेळ प्रकारापुरता मर्यादित न राहता हे जणू संशोधन केंद्र व्हावे !

-रामेश्वर सावंत
-(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आणि संशोधक आहेत)

- Advertisement -