खोपटीतल्या गजाली…

गरमीच्या दिवसात रात्रीच्या वेळी अनेक जंगली जनावरं भाट्येच्या खाली असणार्‍या नदीवर पाणी प्यायला येत. एका रात्री या खोपटीत गजाली मारत बसलो असता, कोपर्‍यात पाणी परतवण्यासाठी मी आणि सुनील म्हणून एक भिडू, दोघेही खोपटीतून उठलो आणि कोपर्‍यात आलो. कोपर्‍यात पाणी परतवलं आणि पुन्हा खोपटीकडे वळलो. तेवढ्यात खालच्या कोपर्‍यातून कसला आवाज आला म्हणून आम्ही दोघेही त्या नदीकडच्या कोपर्‍याकडे गेलो ...आणि बघतो तर काय.....नदीच्या खाली घळनीच्या दिशेने सात रानडुक्कर एकामागोमाग एक जात होते.

एप्रिल-मे महिन्यात कोकणात काय किंवा देशावर काय उन्हाने पारा ओलांडला असतो. अशाच मोसमात खळ्यात कोण कदम गुरुजीसारखे गप्पिष्ठ जगन्मित्र यायचे आणि ओ, ईनामदार, आसास काय घरात, ह्या हिंबरात जगलय तर तुमच्या शाळेक दोन मास्तर ….नाय तर एकच मास्तर हो …. असं म्हणत शर्टाच्या कॉलरच्या आत दुमडलेला रुमाल काढायचे. खळ्यात ठेवलेल्या गोलीतलं पाणी तांब्यात घेऊन गटागटा प्यायचे आणि चोपाळ्यावर बसून चुलत्यांशी गप्पा मारत बसायचे.
काय गुर्जी, काय झाला एवडा हिंबार लागता ?

….तर ओ ईनामदार ….ह्या हिंब्रात जगान सा वाटत नाय, राती पण निसता गरमीन जीव जाता.
…तुमी याक काम करा गुर्जी. आजपासून ह्या पोरांबरोबर आमच्या भाट्येतल्या खोपटेत झोपाक जावा

आमच्या मोठ्या चुलत्यांचा आणि कदम गुरुजींचा हा संवाद दरवर्षी खळ्यात पार पडे. पण कदम गुरुजी कधी खोपटीत झोपायला आले नाहीत, पण मी एप्रिल, मे महिन्यात एक दोनदा खोपटीत झोपायला गेलो आहे. हा अनुभव काही विलक्षणच ! एप्रिल महिन्यात गावी भुईमुगाचा महिना, भुईमुगाच्या शेंगा तयार झालेल्या असत. त्या शेंगा तयार व्हायला आणि कडाक्याचे उन पडायच्या दिवसांना एकच वेळ.

भुईमुगाला पाणी देण्याच्या निमित्त मी कधी तात्यांबरोबर भाटीयेत रात्री गेलो, तेव्हा खालच्या कोपर्‍यात एक माच घातला होता. माच म्हणजे चार मेढी लावल्या होत्या, जमिनीखालून पाच फुटावर आडव्या फळ्या टाकून त्यावर बसायला नाहीतर झोपायला सोय केली होती. त्यालाच खोपटी म्हणतात. बाजूला पाटाच्या पाण्याचा खळखळाट, त्या पाण्याचा झुळूझुळू वेग कोपर्‍यातल्या भुईमुगाला पाणी झिरपत होतं.

बहुतेक पौर्णिमा होती, त्यामुळे आकाशदेखील निरभ्र होतं. लख्ख चंद्र दिसत होता, त्यामुळे हातात चुडती किंवा बँटरी घेतली नव्हती, चंद्राच्या पाटाच्या पाण्यात पडणार्‍या प्रतिबिंबाचा वेध घेत मी त्या पाटाच्या वरच्या मेरेवरून निघालो होतो. अचल, अविनाशी आणि निस्पृह आनंद घेत मी त्या पाटाच्या पाण्यात काठी टाकत निघालो होतो. थोड्यावेळाने रात्रीचं जेवण आटोपून एकेकजण कुकारे घालत भाट्येत येताना दिसत होते. पूर्वी कोणाकडे मोबाईल नव्हते. गावात भिडू गोळा करायला एकमेकांना विशिष्ट आवाजात कुकारे घालून बोलावले जाई.

ही कुकारे घालायची प्रत्येकाची एक वेगळी ढब होती. त्या कुकार्‍याच्या विशिष्ट लयीवरून हा कुकारा कोणाचा ते ओळखता येईल, एवढी त्या कुकार्‍यात विविधता होती. कुकारे घालत रान जागे करत हे भिडू खोपटीत आले की, गजाली सांगायला सुरुवात व्हायची. पाण्याचा खळखळ, ह्या उन्हाळ्याच्या दिवसातदेखील वारा सुटला होता, त्या वार्‍याच्या त्या झुळकीसरशी अंगात सुटलेला घाम कुठच्या कुठे मुरला गेला. खोपटीत झोपायला लोकांनी सुरुवात का केली असावी ?

ह्या गरमीच्या दिवसात रात्रीच्या वेळी अनेक जंगली जनावरं भाट्येच्या खाली असणार्‍या नदीवर पाणी प्यायला येत. एका रात्री या खोपटीत गजाली मारत बसलो असता, कोपर्‍यात पाणी परतवण्यासाठी मी आणि सुनील म्हणून एक भिडू, दोघेही खोपटीतून उठलो आणि कोपर्‍यात आलो. कोपर्‍यात पाणी परतवलं आणि पुन्हा खोपटीकडे वळलो. तेवढ्यात खालच्या कोपर्‍यातून कसला आवाज आला म्हणून आम्ही दोघेही त्या नदीकडच्या कोपर्‍याकडे गेलो …आणि बघतो तर काय ….!…..नदीच्या खाली घळनीच्या दिशेने सात रानडुक्कर एकामागोमाग एक जात होते. पुढे अटकेचा डुक्कर त्याच्यामागे चार डुक्कर आणि मागे तीन छोटी पिल्लावळ. अशा दुर्मीळ प्राण्याचे इतके सहज दर्शन, तेही अशा वातावरणात, हे तसं बघितलं तर डोळ्यांना सुखच होतं.

मनात धाकधूक होत होती, यातला एखादा जरी माणसाच्या वासाने मागे फिरला तर पळता भुई थोडी व्हायची. आम्ही तसेच मागे वळलो आणि जे बघितलं ते इतरांना सांगू लागलो. आम्ही नक्की काय सांगतो यावर त्यांचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. कारण ह्या दिवसात असले रानडुक्कर बघण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी अनेक रात्री अख्खी राने उठवावी लागतात.

रात्रीच्या त्या किट्ट अंधारात रानडुक्करांच्या गजालींना उत यायचा. ह्या रात्रीच्या अंधारात गणूने कधीतरी आकाशात ध्रुव तारा दाखवला. त्या समोरच्या निबिड अंधारात नारळाची आणि पोफळीची झाडं डोलताना दिसत होती. मागची बांबूची झाडंदेखील तशीच डोलत होती. त्या कुंद वातावरणात पुन्हा गजालींना सुरुवात झाली, मघाशी डुकरांची गोष्ट सांगितली. त्यावरून त्या रात्री गणूने अशी एक गजाल सांगितली की, हसून हसून बेजार झालो.

गणू सांगू लागला, भुईमुग लावून आठ दिवस झाले होते. नुकतीच खोपटी बांधली होती. नेहमीच्या सवयीनुसार एकेकजण कुकारे घालत भाट्येत आले, पहिला पहिला मोसमाचा जोश होता. त्यामुळे वाडीतले सात आठजण जमले. बाहेर नोव्हेबर-डिसेंबरची थंडी पडली होती. सगळ्यांनी अंगावर कांबळी घेतली होती. रात्री जागरण होऊ नये म्हणून कोण डबे वाजवत होते. कोण इकडच्या तिकडच्या गजाली सांगत होतं ….रात्रीच्या त्या कडाक्याच्या थंडीत सगळे झोपले.

रात्रीचे बहुतेक दोन अडीच वाजले. पाटाच्या पाण्याचा प्रवाह चालू होता. तेवढ्यात गणूला कसली जाग आली. त्याने कसला तरी कानोसा घेतला. त्याला पाटाच्या वरच्या मेरेवर कोणीतरी पाटात पाणी पीत आहे असे दिसले. त्याने बाकीच्या सगळ्यांना उठवले आणि पाटाच्या वरच्या बाजूला कोणी तरी जनावर आलं आहे, असं सगळ्यांना सांगितलं. त्यावर सगळे हातात काठ्या घेऊन दबक्या पावलांनी पाटाकडे निघाले. जर डुक्कर असेल तर मागे उधळू नये म्हणून हातात वाला घेतला आणि मेरेवर उभे राहून मागच्या बाजूने हातातल्या दांड्याने त्या जनावराला दोन रट्टे मारले, दोन रट्टे पडल्यावर अरे कोण हा रे ….कशाक मारतास ? असा आवाज आला. त्यावर सगळे स्तब्ध झाले.

तेव्हा कळलं, ते कोणी जनावर नव्हतं. तर वाडीतला संदीप अंगावर कांबळं घेऊन पाणी परतवत होता. त्या किट्ट अंधारात डोक्यापासून कांबळ ओढून घेतल्यामुळे ते कोणी जनावर वाटत होतं. ही गजाल सांगता सांगता रात्र सरत आली. गजाली मागून गजाली चालू होत्या, तशी रात्र पुन्हा कधी आली नाही. खोपटीत पुन्हा कधी झोपायला गेलो नाही, पण त्या खोपटीतल्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात. पुन्हा एकदा एखादा स्नेह गर्द दरवळू लागतो. एखादी रात्र तशी खोपटीत काढावी. पुन्हा त्या गजाली ऐकाव्यात म्हणून जीव आतुर होतो, पण आता भाट्येत दूरवर खोपटी दिसत नाही….