घरफिचर्ससारांश...तू तर चाफेकळी!

…तू तर चाफेकळी!

Subscribe

गर्दसभोती रान साजणी, तू तर चाफेकळी. आशाताईंनी या गाण्यातलं पहिलं अक्षर उच्चारताच अख्खं थिएटर कानात प्राण एकवटून आशाताईंच्या गाण्याकडे लक्ष द्यायचं. अख्खं थिएटर अक्षरश: शांत होऊन जायचं. आशाताईंचा सूरही असा लागायचा की जणू धनुर्धार्‍याने बाण सोडताच तो लक्ष्यस्थळी भिडावा. ‘काय हरवले सांग शोधिशी ह्या यमुनेच्या जळी’ ही पुढची ओळ गाताना तर तो सूर खाली जाताना आणखी मंजुळ, आणखी लाडिक, आणखी लाघवी होत जायचा. पायर्‍या उतरून खोल खोल पोहोचायचा. प्रत्येकाच्या कानात तो सूर साठवला जायचा.

‘देखणी बायको दुसर्‍याची’ नावाचं नाटक मराठी व्यावसायिक रंगमंचावर आलं होतं. विजय चव्हाण, प्रदीप कबरे यांच्यासोबत त्या नाटकाच्या जाहिरातीत नाव होतं ते आशालतांचं. आशालता ह्या जुन्याजाणत्या नावाच्या तुलनेत विजय चव्हाण, प्रदीप कबरे वगैरे नावं जरी गाजलेली असली तरी त्या काळात तशी अलिकडची होती. पण आशालता ह्या नावाला जुनं वलय होतं आणि वजनही होतं. ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. मृच्छकटिक’, ‘सं. शारदा’, ‘सं. मत्स्यगंधा’ ह्यासारख्या मराठी संगीत नाटकांची पार्श्वभूमी त्यांच्या नावामागे होतीच, पण त्याच काळाच्या आसपासच्या पु.ल.देशपांडेंच्या ‘वार्‍यावरची वरात’मधली आशाताईंची कडवेकरमामीही चांगलीच गाजली होती. त्याच्या पुढच्या काळात मराठी सिनेमांमधून त्यांचा सोज्वळ, शालिन चेहरा दिसू लागला होता आणि त्या चेहर्‍याने केवळ आपल्या चेहर्‍याची नव्हे तर आपल्या अभिनय कौशल्याची दखल घ्यायला लावली होती. हिंदी सिनेमात त्या गोविंदा, सलमान खानसारख्या अभिनेत्यांच्या आईच्या भूमिकेत दिसू लागल्या होत्या.

…तर अशी मोठी वलयांकित पार्श्वभूमी असलेल्या आशाताई ‘देखणी बायको दुसर्‍याची’ ह्या नाटकात काम करत होत्या आणि खास त्यांच्यासाठी त्यांचा असा प्रेक्षकवर्ग नाटकाला येत होता. आशाताई केवळ अभिनेत्री नव्हत्या तर गायिकाही होत्या. त्यांच्या त्या प्रेक्षकवर्गाची त्यामुळेच त्यांच्याकडूनच एक अपेक्षा असायची. ही अपेक्षा असायची त्यांच्या गोड गळ्यातल्या लाघवी गाण्याची. आशाताई हे जाणून असायच्या. ‘देखणी बायको दुसर्‍याची’ ह्या नाटकाचे निर्माते-दिग्दर्शक हे नक्की जाणून असावेत म्हणूनच असेल कदाचित, त्या नाटकात दोन ठिकाणी आशाताईंना गाण्यासाठी दोन प्रसंग निर्माण केलेले असावेत. त्यातल्या एका प्रसंगात रंगभूमीवर चारही बाजूंनी अंधार व्हायचा आणि सगळा प्रकाशझोत गोरंपान, देखणं आणि घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या आशाताईंवर स्थिरावायचा. हा प्रकाशझोत स्थिरावला आणि रंगमंचावर फक्त त्या आणि त्याच दिसू लागल्या की त्यांचं गाणं सुरू व्हायचं. पाठीमागे संगीत नाटकासारखी कुणाची तबलापेटी नसायची की हल्ली जो म्युझिक ट्रॅक असतो तसं म्युझिक नसायचं. त्यांच्या गळ्यातल्या गाण्याला तसा तो आधार लागायचाच नाही. पुढच्याच क्षणी त्या गाणं गाऊ लागायच्या. गाण्याचे शब्द असायचे – गर्दसभोती रान साजणी, तू तर चाफेकळी.

- Advertisement -

आशाताईंनी त्या गाण्यातलं पहिलं अक्षर उच्चारताच अख्खं थिएटर कानात प्राण एकवटून आशाताईंच्या गाण्याकडे लक्ष द्यायचं. अख्खं थिएटर अक्षरश: शांत होऊन जायचं. आशाताईंचा सूरही असा लागायचा की जणू धनुर्धार्‍याने बाण सोडताच तो लक्ष्यस्थळी भिडावा. ‘काय हरवले सांग शोधिशी ह्या यमुनेच्या जळी’ ही पुढची ओळ गाताना तर तो सूर खाली जाताना आणखी मंजुळ, आणखी लाडिक, आणखी लाघवी होत जायचा. पायर्‍या उतरून खोल खोल पोहोचायचा. प्रत्येकाच्या कानात तो सूर साठवला जायचा.

अर्ध स्मित तव मंद मोहने पसरे गालांवरी.
भुलले तुजला हृदय साजणी ये चल माझ्या घरी.

- Advertisement -

ह्या अंतर्‍यातले ‘ये चल माझ्या घरी’ हे शब्द गाताना त्यातलं आर्जव तर थिएटरमधल्या रसिकांच्या मनभर पसरून राहायचं. ह्या ‘ये चल माझ्या घरी’वरच त्या बहुतेक वेळा गाण्याची सांगता करायच्या. ती सांगता झाली की संपूर्ण थिएटरातून एकच सरसरून टाळी यायची. कधी कधी तर वन्समोअर, वन्समोअर असा पुकारा करून प्रेक्षक थिएटर दणाणून सोडायचे. मग प्रेक्षकांच्या आग्रहास्तव कधी तरी आशाताई मग एखादा अंतरा गाऊन दाखवायच्याही.

काही जुने लोक ‘देखणी बायको दुसर्‍याची’ हे नाटक तर आशाताईंचं हे गाणं ह्याची देही ह्याची डोळा बघायला, ऐकायला मिळावं म्हणून जायचे. आशाताईंमधल्या गायिकेची ही महती होती. आशाताईंनी अभिनयाबरोबरच आपल्यातलं गाणं जपलं होतं. कोणे एके काळी त्या संगीतकार कल्याणजींच्या ऑर्केस्ट्रात गायच्या, हेमंतकुमारांसोबत गायच्या हे आज कुणाला सांगितलं तर त्यांना आश्चर्य वाटेल!

आशाताईंच्या नावावर गाण्यांच्या फार मोठ्या संख्येची नोंद नाही, पण ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’, ‘स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा’ ह्यासारखी त्यांनी जी काही निवडक गाणी गायली त्यातून त्यांनी आपल्या गाण्याची छाप सोडली. पण त्या सर्वात एक गाणं मात्र दर गणेशोत्सवात हटकून वाजत राहिलं ते ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया, संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया.’ 1965 मध्ये सुधा करमरकरांच्या लिटिल थिएटरतर्फे आलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ ह्या बालनाट्यातलं छोट्या राजकन्येच्या तोंडचं हे गाणं. सुधा करमरकर आणि विजय सोनाळकर ह्या दोघांनी मिळून ह्या गाण्याचे शब्द लिहिले आणि त्याचं संगीतही दोघांनी मिळूनच केलं. सुधा करमरकरांनी एक हिंदी गाणं ऐकलं होतं, त्या चालीवरून ह्या गाण्याची चाल केली गेली. छोट्या राजकन्येच्या तोंडी हे गाणं असणार होतं म्हणून त्यांना तसाच निरागस आवाज हवा होता.

त्यासाठी सुधा करमरकरांनी आशाताईंनाच ते गाणं गाण्याची विनंती केली. आशाताईंनी ती मान्य केली आणि ते गाणं गायलं. त्या काळात ते गाणं कानेकानी झालं. पुढे त्या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन एचएमव्ही कंपनीने त्या गाण्याची ध्वनीमुद्रिका बाजारात आणली. ती ध्वनिमुद्रिकाही खूप गाजली. आशाताईंचं हे गाणं आजही लोकांच्या लक्षात आहे. दर गणेशोत्सवात कुठे ना कुठे ते कानावर पडतंच. खुद्द आशाताई हे गाणं आपल्या देवघरात प्रार्थना करताना गायच्या. नव्या काळातली मंडळी हे गाणं जेव्हा ऐकतात आणि त्यांना जेव्हा हे गाणं जेव्हा आशालता नावाच्या गायिकेने गायलं आहे हे कळतं तेव्हा त्यांच्या भुवया उंचावतात. आशालता गाणंही गायच्या असा प्रश्न त्यांच्या भुवया उंचावण्यामागचं कारण असतं. आशाताई सुंदर दिसायच्या, सुरेख अभिनय करायच्या आणि सुरेल गायच्याही? असं त्या प्रश्नामागचं घरंदाज आश्चर्य असायचं. आशाताई त्यांचं हे घरंदाज दिसणं आणि घरंदाज गाणं आज खरंच मागे ठेेवून गेल्या आहेत हेच खरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -