भारतातील अतुलनीय वन्यजीवन

भारतात एकूण ५४३ वन्यजीव अभयारण्ये असून १०४ राष्ट्रीय उद्याने आहेत. शेकडो स्थानिक प्रजातींना आश्रय देणारा हा देश जगातील जैवविविधतेच्या यादीचा एक महत्त्वपूर्ण भाग असून येथील प्रत्येक पशु पक्षी संरक्षित आहे. हिरव्या दाट जंगलांपासून उजाड हिमशिखरांमध्ये आढळणार्‍या प्रत्येक प्रजातीचे इथे रक्षण होते. भारताला मिळालेला हा वारसा जपून ठेवण्यातच हुशारी आहे. यूरोपातील मोनोकल्चरड पार्क्स दिसायला जरी देखणे असले तरी त्याची इथल्या जंगलाशी तुलना करणे व्यर्थ आहे. योसेमिटेमधले रस्ते कितीही वेगवान आणि सुंदर असले तरी इथल्या पायवाटेवर चालण्याची मजा और आहे. सध्या सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने भारतातील जंगलांमधील अतुलनीय वन्यजीवनाचा घेतलेला रोमहर्षक आढावा.

२०१९ च्या डिसेंबर महिन्यात अचानक एका मित्राचा फोन आला.
“ड्युड, आय एम गोइंग टू मसाई मारा नेक्स्ट वीक!”, तो सहज म्हणाला.
“मस्तच, ऑल द बेस्ट” म्हणत, मीही त्यास शुभेच्छा दिल्या.
पण माझा उत्साही मित्र तितक्यात काही थांबला नाही. माझ्यासोबत आधी २-३ वेळा प्रवास केल्याने त्याला ‘पायपीट’ शब्दाचा अर्थ कळला असावा. उत्तरांचलमध्ये न जेवता ११ तास चालल्यावर बोबडी कशी वळते याची आम्हा-दोघांना चांगलीच जाण आहे.
“भारतात खूप चालावं लागतं यार, त्यात मोजकी जनावरं दिसतात. तिकडे मी मस्त ६-७ सफार्‍या करून बसून वाइल्ड लाईफ बघणार”.
त्याच्या उत्साहाचा आदर करत मी ही “हो ना” असे वर वरचे उत्तर दिले. पण खस्ता खाल्ल्याशिवाय जंगल फिरण्यात काय मजा? हेही त्याच क्षणी मनात आलं. शेवटी त्याने सीमा ओलांडलीच.
“हा भाई, भारतात मजा नाही” तो म्हणाला, आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात जायला तेवढे पुरे होते.
“व्हॉट डू यु मिन? भारतात मजा नाही?” असे विचारत, शाळा कॉलेजमधील शिकलेला इतिहास व डोळ्याने पाहिलेला भारताचा भूगोल फोनवरूनच तसाच्या तसा त्याच्यासमोर ठेवला.

पूर्वेला सुंदरबन, पश्चिमेला पश्चिम घाट, उत्तरेला दाचीगाम, हेमिससारखी राष्ट्रीय उद्याने, दक्षिणेस पेरियार अभयारण्य, निलगिरी, अनैमलैसारखी जंगले व मध्य भागातील सागवणे भारताला जैवविविधतेने भरून टाकतात. ईशान्य दिशेला आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशची जंगले तर वायव्याला जैसलमेरसारखे वाळवंट. अग्नेय दिशेला समुद्रात स्थित अंदमान व निकोबार बेटे व नैऋत्याला लक्षद्वीप बेटे. सुंदरबनची खारफुटी, बर्फाने सजलेला हिमालय, पश्चिम घाटातील सदाहरित वने, अनैमलैचे समुद्रसपाटीपासून १६०० ते २००० मीटर उंचीवर स्थित शोला गवताळ मैदान व पेंच आणि कान्हासारखी व्याघ्र प्रकल्प भारताची शोभा वाढवतात. गारो, खासीसारख्या दाट जंगलाने नटलेली पर्वतरांग, वाळवंट व समुद्रात स्थित बेटे भारताचे बाह्यरंग अधिक सुरेख बनवतात. जागतिक आकडेवारीच्या अनुसार या देशात ७.६ टक्के स्थनधारी, १२.६ टक्के पक्षी, ६.२ टक्के सरपटणारे प्राणी, ११.७ टक्के मत्स्यजाती व ६ टक्के फुलणारी झाडे आढळतात. सोप्या भाषेत जगातील १० टक्के वन्यजीव इथे आढळतात. एवढी विशाल आपल्या भारताची वन्यसंपदा. त्यातील बर्‍याच प्रजाती दुर्मिळ आणि संरक्षितही आहेत. खरं तर हे आपलं दुर्भाग्य, परंतु जेवढा मोठा प्रदेश तितक्याच मोठ्या जबाबदार्‍या. त्यामुळे संरक्षित प्रदेशांकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही.

प्रत्येक जागेचे आपले वैशिष्ठ्य. प्रत्येक ठिकाणच्या वातावरणात आणि जंगलात तितकाच फरक.
हे ऐकल्यावर जवळपास १० सेकंदांसाठी शांतता कायम राहिली.
“मी तिथून आल्यावर फोन करतो” म्हणत, त्याने फोन ठेवला.
“हॅपी जर्नी” म्हणायचं तेवढं राहिलं.

मनात मात्र हा प्रश्न तसाच राहिला की भारत देश संपूर्ण न पाहता काही लोक विदेश जास्त सुंदर आहे, अशा निष्कर्षावर कसे काय पोहोचतात? वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने, अशा मानसिकतेच्या लोकांसाठी ही एक सफर.

जैवसृष्टीचा आढावा घेत भारत देशाचे १० जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये (२६ जैविक प्रांत) विभाजन
करण्यात आले आहे.
१) ट्रान्स-हिमालय : लडाखी व टिब्बती पर्वतरांग.
२) हिमालय : उत्तर-पश्चिम, पश्चिम, मध्य व पूर्व हिमालय पर्वतरांग.
३) वाळवंटी प्रदेश : थार व कच्छ प्रदेश.
४)अर्ध शुष्क प्रदेश : पंजाबची मैदाने, गुजरात राजपुताना.
५)पश्चिम घाट : मलबारी मैदाने, पश्चिम घाट.
६) दक्खन द्वीपकल्प : मध्य डोंगराळ प्रदेश, छोटा नागपूर व मध्य पाठारे
७) गंगेनजीकची मैदाने.
८) समुद्र किनारपट्टी : पूर्व व पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीप.
९)उत्तर पूर्व : ब्रह्मपुत्र खोरे व उत्तर पूर्वी डोंगररांग.
१०) समुद्री बेटे : अंदमान व निकोबार बेटे.

या प्रत्येक प्रदेशाची आपली वेगळी ओळख.

ट्रान्स-हिमालयातील काही दुर्मिळ प्राण्यांपैकी हिम-बिबट्या, टिब्बती लांडगा व टिब्बती काळवीट यांचा समावेश आहे. मॅग्नेटिक हिलच्या मागच्या बाजूस या प्राण्यांचे उत्तम निवासस्थान. ही हेमिस राष्ट्रीय उद्यानाची मागील बाजू. काळ्या मानेचा क्रौंच हा संरक्षित पक्षी इथे आढळतो. दोन हंब असलेले उंट म्हणजेच बॅक्टरीयन कॅमल या थंड वाळवंटाची खासियत.
नुब्राच्या खोर्‍यात हुन्दर गावात उतरताच या उंटाचे कळप वाळूत चालताना दिसतात.
हिमाचलमधील उरगोस, मियार खोर्‍यात आयबेक्स, तपकिरी कोल्हा व बरेच दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात.

हिमालय पर्वत रांगेच्या काही भागाला इन्व्हर्टेड कोरल रीफ म्हणजेच उलटलेली प्रवाळे असे मानले जाते. इथली जैव विविधता पाहण्यासाठी एक आयुष्य कमी पडेल. उत्तराखंड व पूर्व हिमालय पक्षीप्रेमींचे आवडीचे स्थान. मोनाल व ट्रॅगोपनसारखे देखणे आणि गोल्डन इगलसारखे शिकारी पक्षी इथे पाहायला मिळतात. कस्तुरी मृग, हिमालय थार, घोरलसारख्या हरणाच्या जाती व रेड पांडासारखी दुर्मिळ व संरक्षित प्रजाती चीनचा काही भाग सोडल्यास फक्त इथे
पाहायला मिळते.

राजस्थानमध्ये स्थित थारचे वाळवंट अगदी वैशिष्ठ्यपूर्ण. चिंकारा, वाळवंटी रानमांजर, काळवीट इत्यादी प्राणी इथे हमखास पाहायला मिळतात. इतकेच नव्हे तर काही भागात माळढोकसारखा चिंताजनक व विलुप्त होणारा पक्षी देखील पाहायला मिळतो. कच्छच्या क्षितिजावर भारतीय जंगली गाढवं म्हणजेच इंडियन वाइल्ड ऐस कळपाने धावताना दिसतात.
गुजरातमधील अभयारण्य म्हणताच डोळ्यासमोर गीर राष्ट्रीय उद्यान येते. भारतातील सिंहाचा अधिवास फक्त या एकाच ठिकाणी. यासोबत इथे सागरी (मारिन) उद्यानदेखील आहे. थोलसारखे पाणवठे कित्येक स्थलांतरित पक्ष्यांना आश्रय देते. बदकांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहण्यासाठी ही एक सुरेख जागा आहे.

पश्चिम घाटाला जैविविधतेचे एक मुख्य स्थान मानले जाते. जगातील ३५ महत्वाच्या स्थानांपैकी हे एक. सह्याद्री डोंगररांग याचाच एक भाग. सरपटणार्‍या प्राण्यांच्या शेकडो स्थानिक प्रजाती इथे आढळतात. येथील फुलझाडे, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सगळंच विलक्षण. महाराष्ट्रात शिवरायांनी बांधलेले गड-किल्ले असो किंवा उंच अभेद्य कडे, प्रत्येक अधिवास हा कोणत्या न कोणत्या प्रजातीने व्यापलेला आहे. गोवा व कर्नाटक हा पश्चिम घाटाचा एक भाग. ३७०० चौ. किमी. मध्ये वसलेल्या गोव्यासारख्या एका छोट्या राज्यात जवळपास ७-८ वन्यजीव अभयारण्य असणे हे घनदाट जंगलाच्या अस्थित्वाचे एक उदाहरण.

गंगेनजीकची खुली मैदाने व जंगले हत्तींसाठी अनुकूल निवासस्थान आहे. जलचर जीवांपैकी एक असलेला भारतीय गेंडा जगात चौथ्या क्रमांकावर आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व काही भाग सोडल्यास ही प्रजाती जगात कुठेही आढळत नाही. गोड्या पाण्यातील डॉल्फिन माशांची प्रजाती गंगेत आढळते.

भारताची समुद्र किनारपट्टी पर्यटकांनी जरी भरलेली असली, तरी तेथील जैवविविधता प्रचंड आश्चर्यकारक आहे. वेळास, गलगीबागसारख्या किनार्‍यावर प्रत्येक वर्षी ऑलिव्ह रिडले समुद्री कासव वाळूत घरटी करतात. शेकडो पिल्ले अंड्यातून बाहेर पडताच समुद्राच्या दिशेला प्रवास करण्यास सुरुवात करतात. बर्‍याच माश्यांच्या प्रजाती, समुद्री सर्प व कुरव आणि सुरय पक्षी इथे आढळतात.

ब्रह्मपुत्र खोरे, सुंदरबनचे खारफुटीचे जंगल हे वाघांसाठी अत्यंत महत्वाचे स्थान. त्यासोबत फिशिंग कॅट, ६-७ जातीचे खंड्या पक्षी, पेल कॅप पिजनसारखे दुर्मिळ पशु पक्षी इथे आढळतात. काही भागात तेथील स्थानिक बंगाली

तणमोर आढळतो. खोर्‍याच्या दक्षिणेस स्थित चिलिका तलाव हे स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी एक महत्वाचे स्थान आहे.

भारतात एकूण ५४३ वन्यजीव अभयारण्ये असून १०४ राष्ट्रीय उद्याने आहेत. शेकडो स्थानिक प्रजातींना आश्रय देणारा हा देश जगातील जैवविविधतेच्या यादीचा एक महत्त्वपूर्ण भाग असून येथील प्रत्येक पशु पक्षी संरक्षित आहे. हिरव्या दाट जंगलांपासून उजाड हिमशिखरांमध्ये आढळणार्‍या प्रत्येक प्रजातीचे इथे रक्षण होते. भारताला मिळालेला हा वारसा जपून ठेवण्यातच हुशारी आहे. यूरोपातील मोनोकल्चरड पार्क्स दिसायला जरी देखणे असले तरी त्याची इथल्या जंगलाशी तुलना करणे व्यर्थ आहे. योसेमिटेमधले रस्ते कितीही वेगवान आणि सुंदर असले तरी इथल्या पायवाटेवर चालण्याची मजा और आहे. सिडनीसारख्या मेट्रोपॉलिटिअन सिटीच्या समुद्रकिनार्‍यावर बसण्यापेक्षा एखाद्या ओढ्यात पाय सोडून बसण्याची मजा और आहे.

टुरिस्ट बसच्या छोट्याशा खिडकीतून कॅमेरा काढून फोटो काढण्यापेक्षा मोकळ्या आकाशाखाली बसून निसर्गाचा आस्वाद घेण्याची मजा और आहे.