घरफिचर्सदैवी शक्ती असलेली सरस्वती

दैवी शक्ती असलेली सरस्वती

Subscribe

आपल्या आजुबाजूच्या सृष्टीचे सौंदर्य,नवनवीन गोष्टी आपण आपल्याला दैवी देणगी मिळालेल्या किंबहुना आपल्याला नशिबाने मिळालेल्या डोळ्यांमुळे अनुभवता येतात,शिकता येतात.परंतु हे भाग्य सर्वांच्याच नशिबी नसते.डोळ्यांविना वाट्याला आलेलं आयुष्यामुळे काहींच्या जीवनाचा प्रवास अंधारमय होऊन जातो,तर काही व्यक्ती त्यांच्यात असलेल्या शक्तीच्या जोरावर आयुष्य एका दैदिप्यमान करतात.दृष्टी असलेल्या व्यक्तींपेक्षाही मोठी मजल मारतात.अशा काही दृष्टी नसलेल्या व्यक्तींतील शक्तींपैकी एक म्हणजे योगिता तांबे. आपल्या अंधत्वाचा कधीही बाऊ न करता किंवा न खचता केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने वाद्यांवर आपले प्रस्थ निर्माण केले.योगिता मुळची लांजाची. तिचं बालपण मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये आजी आजोबांकडे गेलं. योगिताला जन्मापासूनच दृष्टीदोष आहे. सुरूवातीला काही अंशी तिला दिसत होतं. मात्र, हळूहळू तिची दृष्टी कमी होत गेली आणि तिला अंधत्व आलं. पण खचून न जाता योगिताने आपला वाद्ये वाजवण्याचा अभ्यास सुरू ठेवला आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. आज योगिता ६० हून अधिक वाद्ये अगदी सहज वाजवते.

योगिताचं खरं सांगितीक शिक्षण सुरू झालं ते दादरच्या ‘कमला मेहता’ अंध शाळेत. तशी योगिताला लहानपणापासूनच वाद्य वाजवण्याची आवड होती. तिची ही आवड शाळेत जोपासली गेली. खास करून तिला तालवाद्य वाजवायला आवडतात. योगिताची ती आवड तिच्या आईवडिलांच्या लक्षात आली, त्यांनी योगिताला वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासूनच तबला शिकवण्यासाठी सतीश पिंपळे यांची नियुक्ती केली. योगिता त्यापूर्वी हाताशी येईल त्यावर ताल धरून वाजवत असे. अगदी टेबल, कपाट, टीपॉय, घरातील भांडीसुध्दा. त्याचप्रमाणे योगिताला शाळेत देखील कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी मिळाली. शाळेत एखादं नवीन वाद्य आलं की ते आधी योगिताला वाजवायला मिळायंच. आज तबला, मृदुंग, ढोलकी, ढोलक, धनगरी ढोल, ताशा, दिमडी, हलगी, नगारा… अशी तालवाद्य योगिता अगदी सहज वाजवते. योगिताचा कल तालवाद्यांकडे अधिक आहे हे शाळेतील शिक्षकांच्याही लक्षात आले होते. त्यामुळेच शाळेने योगिताला सहावी आणि सातवी ही दोन वर्षे ‘अल्लारखाँ इन्स्टिट्यूट’मध्ये तबला शिकण्यासाठी पाठवले होते. योगिताने तेथे तबल्याचे शास्त्रीय शिक्षण घेतले. कमला मेहता शाळेत योगिताचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. योगिताला दहावीला ७०.९२% मार्क मिळाले. पुढे योगिताने अकरावीला रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

- Advertisement -

रूईयात युथ फेस्टिव्हलमधून योगितला आपली कला दाखवायची संधी मिळाली. यावेळी तिची ओळख सुमीत पाटीलशी झाली. सुमित पेशाने आर्ट डायरेक्टर आहे. सुमीत अंधांना ड्रॉईंगशी संबंधित गोष्टी शिकवतो. सुमितच्या मार्गदर्शनाखाली योगिताने चित्रकलेचे धडे गिरवले. याचदरम्यान योगिताने नाटकांना पार्श्वसंगीत देण्यास सुरूवात केली. यावेळी नाट्यशाळा संस्थेने योगिताला बालनाटकांना संगीत देण्याची संधी दिली.

घराच्यांचा पाठिंबा महत्त्वाचा

या योगिताच्या प्रवासामध्ये तिच्या घराच्यांची मोलाची साथ तिला मिळाली. योगिताच्या हातातील कला लहानपणीच योगिताच्या आई वडिलांनी ओळखली आणि वयाच्या ७ व्या वर्षी तिच्या हातात तबला दिला. योगिताने मागितले ते वाद्य तिला वडिलांनी घेऊन दिले. योगिताची मावशी, आजी आजोबा यांनी कायमच तिला यासाठी प्रोत्साहन दिले.

- Advertisement -

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड

योगिताच्या या कलेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. २०१७ मध्ये योगिताने ५० मिनिटांत ५० वाद्ये वाजवण्याचा विक्रम केला. या रेकॉर्डबद्दल सांगताना योगिता म्हणाली,‘हा रेकॉर्ड पूर्ण होईपर्यंत मनावर खूप मोठं दडपण होतं. रेकॉर्डसाठी ५० वाद्य जमवताना खूप दमछाक झाली. कारण महाराष्ट्र संस्कृती अशी माझी थिम होती. या थीमला धरूनच वाद्य जमा करायची होती. यासाठी आम्ही अगदी घरातील पळी भांड, ताटांचाही वापर केला. तरी मनात धाकधूक होती. एखादं वाद्य रद्द तर होणार नाही. पण चांगल्याप्रकारे रेकॉर्ड पार पडला आणि ५० मिनिटांत ५० वाद्ये वाजवण्याचा विक्रम माझ्या नावावर झाला.’

पुरस्कारांनी जगण्याला बळ मिळालं

योगिताला नाटकाला बॅकग्राऊंड म्युझिक देण्यासाठीचा शंकर घाणेकर राज्यस्तरीय पुरस्कार (२००६) मिळाला आहे.तिने ‘फोक ऑर्केस्ट्रा’या इव्हेंटसाठी नॅशनल लेव्हलवरील सांघिक सुवर्णपदक मिळवले आहे. त्यात तिने ढोलकी, दिमडी, हलगी आणि नगारा ही चार वाद्ये वाजवली होती. (२००८-०९). तिला फेब्रुवारी २०१५ मध्ये फिनिक्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.तर योगिताला २०१६ साली राष्ट्रपतींच्या हस्ते ‘दिव्यांग जन पुरस्कार’ मिळाला आहे. या पुरस्कारांमुळे जगण्याला बळ मिळाल्याची भावना योगिताने व्यक्त केली.

#Mee too ची जबाबदारी मुलींचीही

या मोहिमेबददल योगिता म्हणते, यामुळे अनेक चुकीची प्रकरणं पुढे येत आहे ते चांगलचं आहे. मात्र मला वाटतं याची जवाबदारी ही मुलींची देखील आहे. केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी याचा वापर करू नका. पूर्वी मुलींना सातच्या आत घरात बोलवायचे. याचे वैज्ञानिक कारण आहे की रात्री चुंबकीय शक्तीत वाढ होते. त्यामुळे मुलींनी आपली स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. या सगळ्यांशी लढण्याची ताकद मुलींमध्ये तयार व्हायला हवी. १० वर्षांनंतर, २० वर्षांनंतर या प्रकरणावर बोलण्यापेक्षा त्या त्या वेळी विरोध केला पाहिजे. प्रत्येक मुलीच्या अंगात एक दैवी शक्ती आहे. तिचा योग्य वापर केला पाहिजे.

योगिता २०१२ पासून जोगेश्वरीतील ‘अस्मिता विद्यालया’ त संगीतशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिने शाळेत बालवाद्यवृंद बसवला आहे. तिला तीन हजार गाणी तोंडपाठ आहेत. योगिता सध्या ६० हून अधिक तालवाद्य वाजवते. तिची स्मरणशक्तीही दांडगी आहे. योगिताने आपल्या मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह केला नाहीये. तब्बल दोन हजारहून अधिक मोबाईल नंबर तिचे तोंडपाठ आहेत. योगिताच्या या जिद्दीला आपलं महानगरचा सलाम.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -