घरफिचर्सनिवडणूक गावकी-भावकीची...

निवडणूक गावकी-भावकीची…

Subscribe

अशोक आबुज-तिगांवकर

‘निवडणुका म्हणजे लोकशाहीची सर्वोत्तम परीक्षा असं म्हणलं जातं.’ सध्या कर्नाटक निवडणुकांचा माहोल गरम आहे. लोकसभा निवडणुकाही मागोमाग येऊ घातल्यात. अगदी दिल्लीतल्या जनपथपासून ते गावाकडे गली-मोहल्ल्या-चावड्यांवर ‘आता पुढं काय?’ची उत्सुकता शिगेला पोचलीय. अशीच, नव्हे याहूनही जास्त सगळी खुमखुमी-धामधुमी रंगात आणणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा हा मराठवाडी स्टाईल खुमासदार वेध…..

- Advertisement -

कट्टर फाईट करून, फोडा-फोडीचं किंवा जोडा-जोडीचं राजकारण करून, सदाभाऊ पाटील व रामराव पाटील यांच्यामध्ये या सालच्या सरपंचासाठीची ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच झाली व्हती. गावच्या सदाभाऊ पाटलांनंही दर पाच वर्षाच्या सालाबादाप्रमाण यंदाही आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला व्हता. पण गावकी-भावकीच्या राजकारणांत त्याला या साली हार पत्करावी लागली. खालच्या पाटील आळीतल्या सदाभाऊ पाटलाच्या किंवा त्याच्याच जातीतल्या तसंच पाहुण्या-रावळ्याच्या, भावकीपेशाच्या, राहीलंसाहीलं पाटलांनं केलेल्या उपकाराची परतफेड करणाऱ्या गावातल्या लाळघोट्या लोकांच्या, जातीपातीच्या एकगठ्ठा मतदानामुळं सदाभाऊ पाटील गेल्या पंचवीस वर्षांपासून गावातलं पाटील तसंच, एकमेव सरपंच म्हणून खुर्चीला फेवीकॉल लावल्यागत चिकटून राहीलं व्हत. तसं गावातल्या ग्रामपंचायतीत काय-काय चालतंय, कसं काय चालतंय हे फक्त ग्रामसेवक साहेब व सदाभाऊ सरपंच ह्या दोघांव्यतिरिक्त कोणाला काहीबी म्हणजी काहीबी माहीत नसायचं. कोणती कामं कशी करायची हे सदाभाऊला चांगलंच माहीत व्हतं. सरळ जर एखाद काम झालं नाही तर त्या कामाला वाकड्यात जाऊन कसं करायचं याचा अनुभव सदाभाऊ सारखा गावात काय अख्ख्या पंचक्रोशीत कोणाकडं नव्हता. जवानीत झालेला सरपंच ते आज तोंडात दात नसतानाही सरपंच बनून राहिलेल्या सदाभाऊचा गावात कोणीच नाद करीत नसायचं. तसं आजही कोणी करीत नाही म्हणा. गेल्या पंचवीस वर्षांपासून एकच सरपंच गावानी पाहिला व्हता. आजपस्तोर कसल्याही खेळ्या करून सदाभाऊनं त्याची जागा सोडली नव्हती. गेल्या चारपाच वर्षांपूर्वी सदाभाऊच्याच भावकीतला रामराव पाटील सदाभाऊच्या कामात टांग टाकीत व्हता. सदाभाऊचे ग्रामपंचायतीतले कुटाने लोकांना समजाऊन सांगत व्हता. त्यामुळं सगळ्याच नाही पण बऱ्याच लोकांच्या मनात सदाभाऊविषयी बरंच काहीतरी रामराव पाटलांनं भरून दिलं व्हतं. गेल्या पंचविस वर्षांपासून कसं सदाभाऊनं गावातल्या लोकांना माघं ठेवलं याची कुंडली रामराव पाटील त्याला हुक्की आली, की गावासमोर जाहीर वाचून दाखवायचा. ज्या सदाभाऊचा गेल्या पंचविस वर्षात कुणीही नाद केला नव्हता तो आता त्याच्या भावकीतल्या किंवा पाटील असलेल्या रामरावांनी करायला सुरवात केली व्हती. विरोधक नसल्यावर राज्य करणं हे सदाभाऊला चांगलं जमलं व्हतं. पण आत्ता सख्ख्यातलाच विरोधक म्हणल्यावर रामरावाला सदाभाऊची सगळी गुपीतं किंवा वर्म माहीत असल्याकारणांना कुठं बटन दाबलं की कुठून पाणी निघतंय याचा अंदाज रामराव पाटलालाही आला व्हता. त्यामुळं या पंचवार्षिकला सरपंच होण्याची स्वप्न त्यो पाहू लागला व्हता. आणि झालंही अगदी तसंच. सदाभाऊला निवडणुकीत कसं धोबीपछाड करून चारीमुंड्या चित करायचं याच्या त्यो बऱ्याच दिवसांपासून आखण्या करीत व्हता. त्ये गावातल्या काही जाणकार लोकांच्या ध्यानातही यायचं. पण ‘आपलं काम भलं आन् आपुन भलं’या सरळ आणि साध्या जगण्याच्या रोजच्या शैलीत लोकांना रामराव पाटलाच्या नादी लागायला वेळ नसायचा. सक्काळी-सक्काळी अंघोळ केली की, लोक मार गंद-फिंद लावून मारतीच्या पाराजवळ चावडीत येऊन बसायचे. कवळ्या-कवळ्या उन्हाचा फायदा घेत-घेत त्यांचा राजकीय फड तयार व्हायाचा. गल्लीपसुन तं दिल्लीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्या चावडी नावाच्या मिनी मंत्रालयात डिस्कस व्हयाच्या. त्यातही गावात काहीजण लै इपितर व भयानक डोकं चालवणारी, कधीही शाळेत न गेलेली अंगठाबहाद्दर, पण शिकलेल्यालाही चारदा वड्या-वगळीचं पाणी पाजतील असली आतूनच इनबिल्ट उर्मी असलेली मंडळी त्या चावडीत येऊन आपल्या गप्पा मारायचा राष्ट्रीय कार्यक्रम करायची. तोबी कोणताही पगार-बिगार न घेता अगदी देशसेवा म्हणून फुकटच्या फाकट. त्यातही त्यांचं म्हणं कुणी खोडून काढलं तर त्यांनला लै भयानक राग यायचा, म्हणजी त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढंच दुसऱ्यांनी ऐकायचं. उगाच्या उगाच मधी तोंड खुपसायचं नाही. नाहीतर त्याला यांनी बोलून-बोलून पार गाबन करून येड्यात काढलंच समजा. ह्यो असला चोरावर मोर होण्याचा कार्यक्रम रोजच्या रोज चालायचा. त्याला शनिवार रविवार असला काही निवांत वेळ नसायचा. गावातल्या लोकांना सगळी वारं, तारखा, महिने, साल ही सगळी सारखीच असायची. किंवा आजही असत्यात म्हणा, त्यामुळं रोजच्या रोज काहीही गावात नवीन नसायचं. ह्या साली रामराव पाटलांना सदाभाऊ पाटलाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानं चावडीचं वातावरण चांगलंच पेटलं व्हतं. निवडणुकीच्या तोंडावर म्हणजी अगदी निवडणूक जवळ आल्यानं चावडीतल्या चर्चेला जरा वेगळं वळण लागलं होतं. कोण निवडून येणार हाये याच्या गप्पा चांगल्याच रंगायच्या. त्या गप्पा मारता-मारता कुणी एकमेकांना अशी तंडायची की त्यांच्या तंडण्याचाही नाद खुळा असायचा. हे सगळं प्रकरण पाटलाकडं गेलं की, त्यो त्या प्रकरणाला चांगलं म्यान्युप्लेट करून, त्याला जे साधायचंय ते त्यातून साधून घ्यायचा.

रामराव पाटलांच्या वाड्यावर कचऱ्या, मुसाभाई आण् यदा पाटलाचा परब्या हे तिघंजण थेट ढाळजात जाऊन बसली. विषय अर्थातच यासाली होऊ घातलेल्या निवडणुकांचा. गेल्या महिन्याभरापासून ते आदर्श आचारसंहिता का काय म्हणतात ते संपुस्तर म्हणजी अगदी प्रचाराची शेवटची रात्र येईपर्यंत रोज काहीना काही तरी युक्ती करून आपण सदाभाऊपेक्षा कसे चांगले आहोत हे दाखवून देण्यासाठी रामराव पाटील सतर्क असायचा. त्याच्या प्रत्येक श्वासागणिक निवडणूक जिंकण्याची उर्मी, त्याची तयारी, डोळ्यात निवडणुकीचंच पाणी व डोक्यात निवडणुकीचं वारं असायचं. रामराव पाटील तसा चांगला माणूस. एखादी गोष्ट करायची म्हणजी करायची असं ठरविलं की, ती गोष्ट त्यानी केलीच म्हणून समजा. उभ्या आयुक्षात कुणालाही कधी त्रास दिला नाही की फसवलं नाही किंवा कुणाच्याही कधी डोळ्यात खुपला नाही. साधा आणी सरळ माळकरी माणूस. पण लै महत्वाकांक्षी. सगळ्या पाटलांमधी सरस असा हा गावातला गुणी माणूस, गेल्या पंचविस वर्षांपासून गावचा सरपंच सदाभाऊपेक्षा त्याला केलं असलं तर आज गावाचा आजच्या मानानं चांगला इकास झाला असता. गावाच्या सरपंच पदाचा कारभार यासाली कोणत्याही येन-केन-प्रकारेनं आपल्या ताब्यात घ्यायचा हे त्यांनं ठरविलं व्हतं. गावातल्या प्रत्येक आळीतल्या मोठ्या मोहरक्याला धरून त्याला आपल्याला सरपंच व्हण्यासाठी यंदा ताकत लावयचीय असं सांगून त्याला आपलंसं करून सदाभाऊच्या गोठात जाऊन गावातली त्यांच्या विश्वासातली चांगली-चांगली माणसं रामराव पाटलांनी आपल्या बाजुनं आणून, फोडा-फोडी केली व्हती. गावातली काही येंगराट लोकं व्हती. त्याला गेल्या महिन्याभरापासून येशीवरच्या लिंबाला टांगलेल्या बोकड्याच्या मटनाचं तसंच मुसाभाईच्या मदतीनं कोंबड्या पकडायचं लोन एवढं पसरविलं व्हतं की, त्यातून तसल्या यंगराट लोकांच्या मताची किल्ली नक्कीच रामरावांच्या हातात आली व्हती. हिकडं सदाभाऊ बी काही कमी नव्हता त्यांनही रामराव करील त्याच्या पेक्षा दुप्पट खर्च करून बरं नुसतं मटन, चिकनच नाही तर गावकुसाबाहीर जाऊन त्याच्या मळ्यात वल्ली पार्टीही ठेवली व्हती, त्यात देशी पासून विदेशी पर्यंत अन् हुक्क्यापासून तं गांजा चरस, अफीम असल्या सगळ्या नशा करण्याची सोय निवडणुकीच्या निमित्तान करण्यात आली व्हती. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नव्हतं. जामखेडाहून एक नाचणाऱ्या बायांचीही टीम आणून तमाशा टाईप नाचगाण्याचा कार्यक्रमही ठेवला व्हता. मग काय ही असली सगळी अलीशान स्वरगातली ऐश करण्याची संधी दिल्यावर गावातल्या येंगराट लोकांची मतं सदाभाऊ पाटलालाच मिळणार असं एक वातावरण झालं व्हतं. ‘सदाभाऊलाच मत द्यावा लागतंय’ अशी काही हवा-हवा केली व्हती. त्यामुळं रामराव पाटील तसा आपला साधा सरळ पण अतिशय करळ माणूस लै परेशान झाला व्हता. गावातल्या चांगल्या लोकांच्या मदतीनं त्यानं त्याचं पॅनल उभं केलं व्हतं. पॅनलमध्यीबी एैऱ्या-गैऱ्या नथ्थु-खैऱ्याला संधी दिली नव्हती. त्यातही सगळी किर्तन-भजन करणारी चांगली मंडळी व्हती. मोठ्या पक्षाच्या नावाखाली जरी ग्रामपंचायत लढवायची ठरली तरी गावात लोक पक्ष म्हणून मत देत नाहीत तर लोक व्यक्ती म्हणूनच मत देतात याची रामरावला चांगलीच माहिती व्हती. त्यामुळं कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेत त्यो अपक्ष म्हणूनच हे सगळं करीत व्हता. गावातल्या सरपंचीकरता दोघांमध्ये एवढी फाईट झाली की, इच्चारु नका. गेल्या पंचविस वर्षांपासून चालत आलेल्या सदाभाऊ पाटलाच्या सरपंचकीला रामराव पाटलांनी धक्का देत स्वतः जनतेतून सरपंच होण्याचा गावातून पहिला मान मिळवला. आख्खं पॅनलही निवडून आलं. अपक्ष असूनही एकहाती सत्ता येणं हे तालुक्याच्या तसंच जिल्ह्याच्या राजकारण्यांनी हेरलं आण रामरावांना त्यांच्या पक्षात येऊन त्यांच्या पार्टीला सपोर्ट करण्यासाठी निमंत्रित केलं. कुणी-कुणी दबावही आणला, पण रामराव सरपंच डगमगले नाहीत, मोठ्या पक्षाकडं त्यांनी गावाच्या विकास आराखड्यासह सपोर्ट केला. आणि त्यो गावाचा विकास आराखडा आमलातही आणला. आता गेल्या पंचविस वर्षांपासून जे झालं ते झालं आत्ता मात्र गावातल्या लोकांच्या हिताच्या हिशोबानं रामराव पाटलांचं काम करणं चालूय. गावच्या चावडीवर आत्ता सदाभाऊ पुढच्या येळच्या सरपंचासाठीची तयारी करीत आहेत.

- Advertisement -

मुसाभाई, चंदर आणि इलास ह्ये चावडीत याच विषयावर चर्चा करीत व्हते. राजकारणांमध्ये इमानदार विरोधक असल्याशिवाय कुठलीही प्रगती होणं शक्य नाही, असा चंदर सांगत व्हता. गावातच काय देशभरातही असंच असलं पाहिजे असंही सांगत व्हता. चंदर हा गावातला सगळ्यात जास्त शिकलेला माणूसय. त्यो सहसा गावात नसतुय, त्यो पुण्याला का मंबईला कुठंतरी चांगला कसला तरी धंदा करतुय म्हणं, पण लै हुशारय असं सगळ्या गावाचं म्हणणंय. एकीकडं सत्ता गेली की त्याचाही दुरुपयोग होतुय, हुशार व इमानदार लोकांना संधी दिली पाहिजे असंही त्यो चावडीतल्या दोन-चार टकुच्यांना सांगत व्हता.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -