घरफिचर्ससर्चिंग : मांडणीच्या नव्या शक्यतांचा शोध

सर्चिंग : मांडणीच्या नव्या शक्यतांचा शोध

Subscribe

‘सर्चिंग’च्या मध्यवर्ती कल्पनेबाबत अगदी थोडक्यात बोलायचं झाल्यास त्याचं कथानक- एक बाप आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेत आहे, असं पारंपरिक रहस्य-थरारपटाच्या धाटणीचं आहे. चित्रपटातील घटनाक्रम अशा प्रकारे दाखवला आणि उलगडत नेला जातो की दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा समावेश, आपल्या आयुष्यातील माणसांपेक्षा व्हर्च्युअल जगाला आपल्या आयुष्यात मिळणारं महत्त्वाचं स्थान अशा बर्‍याच गोष्टी अधोरेखित केल्या जातात.

चित्रपट हे माध्यम त्याच्या उदयापासूनच अगदी वेळोवेळी विकसित होत राहिलेलं आहे. त्यामुळे वरवर पाहता कथनाचे प्रकार किंवा मांडणी अशा गोष्टी समांतर मार्गांवरून जाताना दिसत असल्या तरी दर काही काळाने एखादा चित्रपट सदर माध्यमाकडे पाहण्याच्या किंवा अगदी ते हाताळण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देत नव्या शक्यतांचा मागोवा घेऊ पाहतो. कथाकथनाचे आणि मांडणीचे नवनवीन मार्ग शोधताना दिसतो. २०१८ मध्ये आलेल्या ‘सर्चिंग’ या चित्रपटाने नेमकं हेच करत एरवी इतर कुठल्याही पारंपरिक रहस्य-थरारपटाप्रमाणे होऊ शकणार्‍या कथेला नावीन्यपूर्ण अंगाने समोर आणलं.

‘सर्चिंग’च्या मध्यवर्ती कल्पनेबाबत अगदी थोडक्यात बोलायचं झाल्यास त्याचं कथानक- एक बाप आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेत आहे, असं पारंपरिक रहस्य-थरारपटाच्या धाटणीचं आहे. फक्त फरक इतकाच की या विशिष्ट चित्रपटात हा थरारक घटनाक्रम केवळ त्यातील पात्रांच्या मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीन्सच्या माध्यमातून दिसतो. ज्यामुळे सदर चित्रपटाला मांडणीच्या पातळीवर लिएम नीसन मध्यवर्ती भूमिकेत असलेली ‘टेकन’ चित्रपट मालिका (२००८-२०१४) किंवा डेव्हिड फिंचर दिग्दर्शित ‘गॉन गर्ल’ (२०१४) आणि तत्सम चित्रपटांहून काहीसे वेगळे स्वरूप प्राप्त होते. शिवाय, चित्रपटातील घटनाक्रम अशा प्रकारे दाखवला आणि उलगडत नेला जातो की दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा समावेश, आपल्या आयुष्यातील माणसांपेक्षा व्हर्च्युअल जगाला आपल्या आयुष्यात मिळणारं महत्त्वाचं स्थान अशा बर्‍याच गोष्टी अधोरेखित केल्या जातात.

- Advertisement -

चित्रपट सुरू होताच साधारण संगणकावरील हरकतींच्या एका मोन्टाज-वजा व्हिडिओच्या माध्यमातून मार्गोट किमच्या (मिशेल ला) जन्मापासून ते डेव्हिडची (जॉन चो) पत्नी आणि मार्गोटची आई, पामेलाच्या मृत्यूपर्यंत सर्व घटना पडद्यावर दिसून किम कुटुंबाची ओळख होते. पामेलाच्या मृत्यूनंतरही वरवर पाहता सगळं काही सुरळीत सुरू आहे असं भासणार्‍या या चित्रातील अंडरकरंट्स कालांतराने उलगडत जातात. मार्गोट हरवली असल्याचे संकेत डेव्हिडला मिळाल्यानंतर तिचा प्रत्यक्ष शोध घेत असताना किंवा डिटेक्टिव्ह रोजमेरी व्हिकला (डेब्रा मेसिंग) तपासात मदत करत असताना एका घरात राहूनही त्याला त्या दोघांमध्ये आजवर न जाणवलेला दुरावा दिसून येऊ लागतो. कुटुंबातील सदस्यांनी एका मर्यादित संवादाखेरीज एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करणं, मात्र त्यामुळे एकमेकांच्या आंतरिक कोलाहलाबद्दल अनभिज्ञ असणं इथे दिसून येतं. या गोष्टी इथे संकल्पनात्मक पातळीवर अस्तित्त्वात असल्या तरी चित्रपटाचा मूळ सूर साधारण थरारपटाचाच राहील हे पाहिलं जातं. कारण वर उल्लेखलेल्या गोष्टींचा अधिक खोलवर जाऊन वेध घेतील असे त्याच वर्षी आलेले ‘एट्थ ग्रेड’सारखे (२०१८) चित्रपट अस्तित्त्वात आहेतच. त्यामुळे ‘सर्चिंग’चा मूळ उद्देश हे इतर सामाजिक अंडरकरंट्स सोबत घेऊन केवळ कॉम्प्युटर स्क्रीन्सच्या माध्यमातून एक थरारक कथानक समोर उभं करणं हा आहे.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक एक गोष्ट अगदी सहजतेने साध्य करतात, ती म्हणजे या पारंपरिक प्रकारच्या थरारपटाच्या चौकटीत राहून पडद्यावरील आणि पडद्यामागील घटनाक्रमाला रंजक स्वरूप प्राप्त करून देणं. हे करत असताना अविश्वासाचा त्याग (सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ) करण्याची गरज अगदीच मोजक्या वेळा भासते. ज्यामुळे शेवटाकडील जरासा अतिशयोक्तीपूर्ण भाग वगळता इतरवेळी सगळं काही विश्वासार्ह आणि थरारक वाटत राहतं.

- Advertisement -

डेव्हिड तपासात सक्रिय सहभाग घेत असताना झालेल्या प्रत्येक गैरसमजाच्या निमित्ताने त्याचा आणि डिटेक्टिव्ह व्हिकचा सोशल मीडिया अकाऊंट्सवरील माहितीकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन दिसून येतो. ज्याद्वारे डेव्हिडची होणारी घालमेल पडद्यावर समर्पकपणे दिसेल हे पाहिलं जातं. त्याची प्रत्येक कृती आणि तिच्यामागील भावना प्रेक्षकाला कळते. ज्यामुळे त्याच्या आपल्या मुलीला शोधण्याच्या भावनेमागील आततायीपणा स्पष्टपणे जाणवतो. त्यातूनच चित्रपटातील ट्विस्ट्सची उत्पत्ती होते, जे त्यातील रहस्य आणि थराराच्या कोनाला नवीन आयाम प्राप्त करून देतात.

अर्थात संपूर्ण चित्रपट कॉम्प्युटर स्क्रीनवर घडतो असं दाखवणारा हा काही पहिला चित्रपट नसला तरी तो या प्रकारात यापूर्वीच्या प्रयत्नांहून अगदीच परिणामकारक अशी कामगिरी करतो. याखेरीज तो या प्रकाराला काहीतरी वेगळं करण्याचा ओढूनताणून केलेला प्रयत्न भासणारी गिमीक म्हणून वापरत नाही, तर कथनाला पूरक अशा पद्धतीने तिची मांडणी केली जाईल हे पाहतो. ज्याद्वारे त्याला डेव्हिड आणि मार्गोटमधील नातेसंबंध, पालकत्वाची भावना, अलीकडील काळात लोकांचं स्वतःभोवतीच केंद्रित असणारं एककल्ली आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन अशा संकल्पनांचा वेध घेता येणं शक्य होतं. शिवाय, या गोष्टींमुळे त्याला रहस्य-थरार या चित्रपट प्रकारातील क्लिशेज टाळून, पारंपरिक स्वरूपाच्या कथेचं अपारंपरिक प्रकारे चित्रण करता येणं शक्य होतं. आणि यामुळेच तो अलीकडील काळात आलेल्या काही उत्तम चित्रपटांमध्ये जाऊन बसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -