घरक्रीडात्रिशतकवीर सर्फराझ

त्रिशतकवीर सर्फराझ

Subscribe

फ्लिकच्या चौकारासह सर्फराझने मुंबईसाठी आपले पहिले वहिले शतक झळकावले. शतक साजरे केल्यावर त्याने दोनदा हलकेच उडी मारली. अन् मुंबई जर्सीचे चुंबन घेत आनंद व्यक्त केला. पण त्याची नजर खिळली होती उत्तरप्रदेशच्या डे्रसिंग रुमवर ! आपल्या बॅटने त्यानेे प्रतिस्पर्धी तसेच जुन्या संघाला सणसणीत जबाब दिला. लाडसोबत सर्फराझच्या द्विशतकी भागीने मुंबईचे आव्हान कायम ठेवले. चौथ्या व अखेरच्या दिवशी त्याने कर्णधार तरे तसेच शम्स मुलानी बरोबर शतकी भागिदार्‍या रचून मुंबईचे तारु सुखरुप किनार्‍याला लावले.

वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर स्टार्सच्या गैरहजेरीत मुंबईने उत्तर प्रदेशच्या 625 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना 7 बाद 688 अशी टोलेजंग धावसंख्या रचली, त्याचे श्रेय त्रिशतकवीर सर्फराझ नौशाद खानला दयावे लागेल. साडेदहा तास खेळपट्टीवर ठाण मांडणार्‍या सर्फराझने एक व्दिशतकी (सिध्देश लाडबरोबर) तसेच दोन मोठ्या शतकी भागीदार्‍या (कर्णधार आदित्य तरे,शम्स मुलानीच्या साथीने) रचल्यामुळे मुंबईने उत्तर प्रदेशविरुध्द पहिल्या डावातील आघाडीचे 3 गुण मिळविले. याआधी घरच्या मैदानातील दोन लढतीत (वानखेडे, बीकेसी) मुंबईने 4 डावात 655 धावा केल्या होत्या परंतु, उत्तरप्रदेश विरुध्द आदित्य तरेच्या तरण्याबांड खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईने आपल्या गतलौकिकाला साजेसा खेळ करत षटकामागे 4 च्या गतीने 167 षटकात 688 धावा कुटल्यावर वानखेडे स्टेडीयमवर हजेरी लावणार्‍या दर्दी मुंबईकर क्रिकेट शौकिनांना वाडेकर-सरदेसाई यांच्या जमान्यातील बोनस गुण पटकावणार्‍या वैभवशाली दिवसांची आठवण झाली.

मुंबई – उत्तरप्रदेश – मुुंबई असा प्रवास करणार्‍या सर्फराझची कहाणी विलक्षण, विस्मयकारक आहे. वडील नौशाद खान यांच्या तालमीत तयार झालेल्या सर्फराजची छोटीशी कारकिर्द अनेक चढउतारांनी भरलेली आहे. हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेत 12 वर्षाच्या सर्फराझने रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळतांना 12 षटकार, 56 चौकारांनिशी 439 धावांची विक्रमी खेळी रचली. परंतु, याच दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर वय चोरीचा ठपका ठेवला. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीबीसीआय) त्याच्यावरील बंदीचा निर्णय उठवला. कूचबिहार करंडक स्पर्धेत छाप पाडणार्‍या सर्फराझची चौरंगी स्पर्धेसाठी (19 वर्षांखालील) भारतीय युवा संघात निवड झाली. निवड सार्थ ठरवणार्‍या सर्फराझने द आफ्रिकेविरुध्द 66 चेंडूत 101 धावा तडकावल्या. 2014 तसेच 2016 ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेत चमक दाखविल्यामुळे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून त्याला 50 लाखांची ऑफर मिळाली. राजस्थान रॉयलविरुध्द 21 चेंडूत 45 धावांची नाबाद खेळी हीच त्याची आयपीएलमधील लक्ष्यवेधक कामगिरी. त्यानंतर त्याचा सूर हरपला, दुखापतीने त्याला ग्रासले. नौशाद खानने सर्फराझला मुंबईऐवजी उत्तर प्रदेशकडून खेळायला लावले, तिथे सर्फराझला फारशी संधी मिळाली नाही. रणजी स्पर्धेत मध्य प्रदेशविरुध्द खेळताना त्याने 155 धावांची झंझावती खेळी केली. हे त्याचेे रणजीतील पहिलेवहिले शतक.गेल्या मोसमात आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. उत्तर प्रदेशकडून झालेल्या उपेक्षेमुळे त्याने मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. कुलिंग ऑफ पिर्यडमुळे त्याला काही वेळ विश्रांती घ्यावी लागली.

- Advertisement -

यंदाच्या मोसमात रणजी स्पर्धेत मुंबईला 2 सलग लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटकविरुध्द बीकेसीवरील सामन्यात त्याने बेडर फलंदाजी करताना 71 धावांची ठणठणीत खेळी केली. साथीदार न उरल्यामुळे 71 धावांवर तो नाबाद राहीला.

अंकित राजपूतच्या उत्तर प्रदेशाविरुध्द खेळताना सर्फराझने आपला जुना हिशोब चुकता केला. साडेचार वर्षांपूर्वी मुंबई सोडून उत्तर प्रदेशची वाट धरताना सर्फराझला अश्रू आवरणे कठीण झाले होते. वडील नौशाद खान इरेला पिटले होते. त्यांनी अनेक स्वप्ने रंगवली होती. परंतु स्वप्नपूर्तीऐवजी अपेक्षाभंगानेच तो मुंबईत परतला. नियमानुसार काही कालावधीनंतर त्याला मुंबई संघात संधी लाभली. सध्याच्या पडझडीच्या परिस्थितीत मुंबई संघात स्थिारवण्याचे मोठे आव्हान त्याच्या समोर होते.

- Advertisement -

कर्नाटकच्या दर्जेदार मार्‍यासमोर झुंजार अर्धशतक झळकावणार्‍या सर्फराझला सूर गवसला. वानखेडे स्टेडियमवर सव्वाशे धावांतच 4 मोहरे गमावल्यावर सिध्देश लाडच्या साथीला मैदानात उतरला. बघता बघता मुंबईच्या पाचव्या जोडीने कुशल, कसबी कामागिराप्रमाणे विटांवर वीट रचावी त्याप्रमाणे डावाची उभारणी करण्याची भूमिका वठवली.

राजपूत प्रभृतींनी सर्फराझला आखूड टप्याचे चेंडू खेळवले. त्यांचा यथेच्छ समाचार घेत त्याने चौकार षटकारांची आतषबाजी केली. लेटकटचा सढळ वापर करत त्याने धावा वसूल केल्या. सौरभ कुमारच्या फिरकीवर प्रखर हल्ला चढवत चौकार, षटकार लगावल्यामुळे वानखेडेवरील त्याचे चाहते तसेच त्याचे वडील नौशाद खानही खुशीत होते. फ्लिकच्या चौकारासह सर्फराझने मुंबईसाठी आपले पहिले वहिले शतक झळकावले. शतक साजरे केल्यावर त्याने दोनदा हलकेच उडी मारली. अन् मुंबई जर्सीचे चुंबन घेत आनंद व्यक्त केला. पण त्याची नजर खिळली होती उत्तरप्रदेशच्या डे्रसिंग रुमवर ! आपल्या बॅटने त्यानेे प्रतिस्पर्धी तसेच जुन्या संघाला सणसणीत जबाब दिला. लाडसोबत सर्फराझच्या द्विशतकी भागीने मुंबईचे आव्हान कायम ठेवले. चौथ्या व अखेरच्या दिवशी त्याने कर्णधार तरे तसेच शम्स मुलानी बरोबर शतकी भागिदार्‍या रचून मुंबईचे तारु सुखरुप किनार्‍याला लावले.

षटकाराने त्रिशतक साजरे करणार्‍या सर्फराझने संजय मांजरेकर, विजय मर्चंट, सुनिल गावस्कर, अजित वाडेकर, वसीम जाफर, रोहित शर्मा या महान मुंबईकर त्रिशतकवीरांच्या मालिकेत बसण्याचा मान संपादला.त्रिशतकी खेळीदरम्यान सर्फराझ तापाने फणफणत होता. मी फलंदाजीदरम्यान काही खाणे टाळतो असे नमूद करुन त्रिशतकवीर म्हणाला, दिर्घकाळ फलंदाजी केल्यामुळे पाय दुखत होते. परंतु, संघासाठी मला खेळपट्टीवर उभे राहणे आवश्यक होते. 250 धावांचा टप्पा गाठल्यावर पुरती दमछाक झाली होती. पॅव्हेलियनमध्ये जाऊन विश्रांतीचे विचार मनात घोळत होते. परंतु संघ सहकार्‍यांच्या प्रोत्साहनामुळे मी नेटाने उभा राहिलो, असे त्याने बोलून दाखविले. धावांच्या उभारणीची क्षमता तसेच खेळाबाबतचे त्याचे भान या त्रिशतकी खेळीदरम्यान प्रकर्षाने जाणवले. कर्णधार आदित्य तरेने आपल्या नौजवान साथीदाराचे कौतुक करताना त्याच्या जिगरबाजी, मेहनतीचा आवर्जून उल्लेख केला. गेल्या 4 वर्षात सर्फराझच्या खेळात विलक्षण सुधारणा झाली असून त्याच्या फटक्यांची विविधता वाखाणण्याजोगीच. सामना जिंकून देण्याची जिगर त्याच्या दाटमध्ये असल्याचे कर्णधार तरेने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -