घरफिचर्सयुतीची ‘डबल बारी’

युतीची ‘डबल बारी’

Subscribe

डबल बारीवर भाजपकडून पेटीवर चंद्रकांत पाटील उर्फ दादा बसले आहेत. आणि समोर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी पेटी वाजवायला घेतली आहे. आता दादांच्या सोबत मुख्यमंत्री आहेत; पण सवाल जबाब दिल्लीहून अमित शहा यांनी लिहून पाठवले आहेत. ते ठरवणार हा खेळ पहाटेपर्यंत रंगवायचा की रात्रीच संपवायचा. उद्धव यांच्या सोबतीला आदित्य ठाकरे आणि पडद्यामागून मिलिंद नार्वेकर आहेत. आता मुख्यमंत्री आणि आदित्य हे यात्रा काढून नाटकाआधीचे नमन करत आहेत आणि त्यात घडाभर पाणी ओतताना युती कशी होणार याची पदे गात आहेत.

दिवस गणेशोत्सवाचे आहेत. घरगुती आणि सार्वजनिक गणपती घरी, दारी आणण्याची लगबग सुरू झाली आहे. आगमन, सजावट, मूर्ती, कार्यक्रम आणि विसर्जनाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. आता पुढचे अकरा दिवस बाप्पाच्या चर्चा असतील. पण, यात आणखी एकाची भर असेल, युतीचे काय होणार? गणपतीत कोकणात आरत्या, भजन, फुगड्या, बाल्या डान्स आणि डबल बारीचा एकच नाद घुमणार आहे. तबला आणि मृदुंगावर जोरात थाप पडण्यापूर्वी एक जोरात आवाज युतीत घुमला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा!

खरे तर स्वतःला कोकण सम्राट समजणार्‍या राणे यांची ताकद वैभववाडीपर्यंत मर्यादित आहे. रत्नागिरीतही त्यांना आणि त्यांच्या स्वाभिमान पक्षाला जनाधार नव्हता. तीच गोष्ट मुंबईची आहे. याआधीच्या सर्व निवडणुकांमधील राणेंच्या पराभवात ते दिसून आले आहे. मुख्य म्हणजे त्यांचे अनेक विश्वासू साथीदार आज त्यांच्याबरोबर नाहीत. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास एकेकाळच्या त्यांच्या आक्रमक राजकारणाची अगतिकता दाखवणारा आहे. मुख्य म्हणजे राजकारणात आवश्यक असणारा संयम हा गुण त्यांच्या स्वभावात नसल्याने प्रचंड क्षमता असूनही त्यांनी आपणहून स्वतःला मर्यादा घालून घेतल्या. राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांचा त्यांच्याबद्दल भाषणाचा सूर हा हीच बाब अधोरेखित करणारा होता. आताही त्यांनी आपला स्वाभिमान गुंडाळून भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

- Advertisement -

खरेतर या लेखाचा विषय हा राणे नसून युतीच्या डबल बारी खेळाला मृदुंगावर पडलेली थाप हा आहे. खरा रंग आता भरेल. दीपक केसरकर, वैभव नाईक या तळकोकणातील आमदारांना तर आतापासून आपल्या भविष्याची चिंता लागली असून गणपतीत आता त्यांना नेवर्‍या (करंज्या) गोड लागणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत येऊ पाहणार्‍या भास्कर जाधव यांचीही गोची होणार आहे. तीच गोष्ट राजन तेली, संदेश पारकर या माजी राणे समर्थकांची असून प्रमोद जठार यांची तर अवस्था ना घरका, ना घाटका अशी झाली आहे. नाणार प्रकल्प राजापूरमधून गेल्यापासून ते प्रचंड अस्वस्थ झाले असून ग्रीन रिफायनरीच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयांचा प्रकल्प नाणारमधून गेल्याने त्यांच्या हाताला आता रोजगार नाही. ते अधेमधे नाणार समर्थक मोर्चा, रिफायनरीची आरती ओवाळणार्‍या पत्रकार परिषदेला हवा भरून वातावरण निर्माण करण्याचा हास्यास्पद प्रयोग करत असतात. आता राणे भाजपमध्ये आले तर जठार, तेली आणि पारकर भाजप सोडून जाणार आहेत, असे बोलले जाते. आता हे तिघे सोडून गेले तर भाजपच्या दर्यात खसखसही होणार नाही.

डबल बारीच्या खेळात बुवा म्हणजे पेटीवरच्या सुत्रधाराला खूप महत्त्व आहे. तो खेळ पुढे नेत असतो, सवाल जबाबातून. पौराणिक, इतिहासाचे संदर्भ गाण्यातून मांडत तो हा खेळ रंगवतो आणि त्या रंगात शेकडो रसिक नादावून जातात. मध्यरात्रीचा प्रहर उलटून गेल्यानंतरही खेळातील गंमत कमी होत नाही, रात्र चढत जाईल तसा खेळाला रंग चढतो. जो जास्त खेळ रंगवेल त्याची सुपारी (मानधन) मोठी. त्याचा दबदबा मोठा. आता डबल बारीवर भाजपकडून पेटीवर चंद्रकांत पाटील उर्फ दादा बसले आहेत. आणि समोर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी पेटी वाजवायला घेतली आहे. आता दादांच्या सोबत मुख्यमंत्री आहेत; पण सवाल जबाब दिल्लीहून अमित शहा यांनी लिहून पाठवले आहेत. ते ठरवणार हा खेळ पहाटेपर्यंत रंगवायचा की रात्रीच संपवायचा. उद्धव यांच्या सोबतीला आदित्य ठाकरे आणि पडद्यामागून मिलिंद नार्वेकर आहेत. आता मुख्यमंत्री आणि आदित्य हे यात्रा काढून नाटकाआधीचे नमन करत आहेत आणि त्यात घडाभर पाणी ओतताना युती कशी होणार याची पदे गात आहेत. युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल, लोकांनी त्याची, विशेषतः पत्रकारांनी त्याची काळजी करू नये, असे पद गाताना फडणवीस आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी टिकून राहील, याची काळजी करत आहेत. त्यांना मनातून वाटत आहे की युती झाली पाहिजे आणि पुढची पाच वर्षे आपणच एक नंबरच्या खुर्चीवर बसले पाहिजे. तर दुसर्‍या बाजूला आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसायचे आहे. पण, यात्रेत पद आळवताना मात्र ते मी अजून लहान आहे, असे बालगीत गाताना दिसत आहेत.

- Advertisement -

आधीच टीव्हीवरचा ‘रात्रीस खेळ’ पाहून लोकांच्या डोक्याचा भुगा आणि कोकणाच्या देव भूमीची अंधश्रद्धेच्या नावाखाली माती झाली असताना गणपतीत सुरू झालेला हा खेळ आता पुढचे काही दिवस पाहण्याचे आपल्या नशिबी असेल. या खेळात शहा आणि चंद्रकांतदादा यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. शहा यांच्या शब्दापुढे दादा नाहीत आणि मोदीही त्यांच्या शब्दाबाहेर जातील, असे वाटत नाही. शहा यांची भाजप पक्षावरची घट्ट पकड पाहता मोदींनी त्यांना फ्री हॅन्ड दिला आहे. गोवा, कर्नाटकात सत्ता आणताना ताकद आणि पैशाचा जो खेळ झाला तो लोकांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर इतक्या वर्षात कधी पाहिला नव्हता. कोटी कोटींचा खेळ झाला. कर्नाटकात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या एका आमदाराकडे नुकतीच 11 कोटींची चकचकीत गाडी आली… आता बोला! नोटबंदी आणि जागतिक मंदी ही तुमच्या आमच्यासाठी. भाजपसाठी थोडी आहे. हात लावेन तिथे सोने असे त्यांचे सध्या दिवस आहेत. त्यांचे हे सुगीचे दिवस असल्याने ते आता प्रादेशिक पक्षांना किंमत द्यायला तयार नाहीत. नितीशकुमारांना ते समजले, पण उद्धव यांना अजून समजत नाही. 18 खासदार निवडून येऊनही शहा बिनकामाचे अवजड खाते देऊन शिवसेनेची गोची करत असतील तर ते मातोश्रीच्या ध्यानात यायला हवे; पण तसे होताना दिसत नाही.

राणे यांच्यासारखी उद्धव यांची अगतिकता यातून दिसून येते. मुख्यमंत्री आणि उद्धव हे युती होईल, असे चित्र रंगवत असताना दुसर्‍या बाजूला चंद्रकांतदादा कोणाला किती जागा यावर बोलत आहेत. आणखी कोणाला युतीवर बोलण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री, शहा आणि मला आहे, असे उद्धव बजावत असले तरी त्यात दम दिसत नाही. आता मातोश्रीच्या हातात काही एक उरलेले नाही. एकतर भाजप मागून फरफटत जायचे किंवा युती तोडायची. हेच दोन पर्याय बाकी आहेत. शिवसेनेला जागा किती द्यायच्या हे भाजप ठरवणार आहे, उद्धव नाहीत. मान्य असेल तर सोबत राहा, नाही तर सोडून जा… भाजपचा फंडा क्लिअर आहे. ‘भाजपमध्ये येता का जेलमध्ये जाता’, अशी विरोधकांची हालत, करणार्‍या मोदी-शहा यांनी शिवसेनेची नखे आधीच कट केली आहेत, ती पूर्ण काढून टाकायला फार वेळ लागणार नाही. 288 पैकी 100-110 पेक्षा अधिक जागा शिवसेनेला द्यायला भाजप तयार नाही.

2014 साली भाजपचे 123 आमदार तर शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले आहेत आणि आता भाजपमध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादीमधून आलेल्या आमदारांची संख्या बघता ते शिवसेनेला जास्त जागा सोडणार नाहीत. निम्म्या जागा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या अटींवर लोकसभेत युती झाली असली तरी या आणाभाका पाळायची भाजपला गरज वाटत नाही. कारण युतीत ते आता मोठे भाऊ असून छोट्या भावाने घरात निमूट राहावे, नाही तर सोडून जावे, असे शहा- चंद्रकांतदादा यांनी आधीच ठरवले आहे. आता मोठ्या संख्येने सुरू असलेल्या विरोधकांच्या इनकमिंगसोबत रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत असल्याने भाजपला सेनेची गरज नाही. शिवाय निवडून येणार्‍या अपक्षांना शेवटच्या क्षणी आपल्या बाजूला वळवून घेण्याची मसल आणि मनी पॉवर त्यांच्याकडे आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचे एकट्याने स्वतःच्या ताकदीवर बहुमत येऊ शकेल, असे त्यांचा सर्व्हे सांगतो. आता हा सर्व्हे फुगवलेल्या लोकप्रियतेचा आहे की ईव्हीएमचा आहे, हे सांगता येणार नाही आणि मग लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजप बहुमताने निवडून आल्यास राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला अनाकलनीय असा एकच शब्द बोलण्यावाचून हाती काही लागणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णवेळ संघटक म्हणून काम केलेल्या चंद्रकांतदादांना प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटले आहेत. त्यांच्या स्वप्नात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आहे आणि सर्वसाधारण रिवाजाप्रमाणे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री होतात. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर कदाचित काही महिन्यांनी फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाईल आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे पद देण्याचा मोदींचा कधीपासूनचा विचार सुरू आहे. दादांना मुख्यमंत्री करून शहा त्यांंना संधी देऊ शकतात. अनंतकुमार, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज्य आणि अरुण जेटली यांच्या निधनाने भाजपमध्ये पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती फडणवीस यांना दिल्लीत बोलावून भरली जाऊ शकते. हे कारण फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्यासाठी संयुक्तिक ठरू शकते. 2014 साली राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा हासभास नसलेले दादा सार्वजनिक बांधकामासारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री झाले तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. पण, शहा यांच्या सासुरवाडीचे म्हणजे कोल्हापूरचे असणार्‍या दादा यांचे सूर चांगले जुळलेले असून संघ प्रचारक म्हणून त्यांना जवळून ओळ्खताना योग्य वेळी त्यांनी पाच वर्षांपूर्वी मुख्य प्रवाहात आणले आहे. आता विषय त्यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती देण्याची. ती योग्य संधी पाहून दिली जाईल.

आता दादा युती तोडून स्वबळावर भाजपची सत्ता आणत असतील त्याचे बक्षीस म्हणून पुढे शहा त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवतीलही, हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे. मात्र या डबल बारीतून शिवसेनेचे मोठे हसे होणार आहे. शहा आणि फडणवीस यांनी मातोश्रीला शब्द दिला असला तरी तो पाळण्याचे त्यांच्यावर बंधन नाही. 2014 साली त्यांनी तो पाळला नव्हता. यावेळी लोकसभेला भाजपला गरज होती म्हणून त्यांनी शिवसेनेला जवळ केले. आता त्यांची गरज संपली आहे. आणाभाका हवेत विरल्यात. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी पंचवीस एक वर्षांपूर्वी शिवसेनेशी युती करून आपली वाढ खुंटवली अन्यथा भाजप कधीच स्वतंत्रपणे सत्तेवर आली असती, असे मोदी आणि शहा यांचे म्हणणे आहे. हा प्रकार म्हणजे आसरा घेतल्या घराचे वाशे मोजण्याचा आहे. इतका अप्रामाणिकपणा जगात दुसरा नसेल. अशा कधीही विश्वासघातकी मित्रावर आणखी किती विश्वास ठेवायचा हे एकदा उद्धव यांनी ठरवायला हवे. भाजप हा भस्मासूर आहे. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही… आता सुरू झालेल्या डबल बारीच्या खेळातून भाजपरूपी भस्मासूर जन्माला येणार आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -