घरफिचर्सशिवसेना- भाजप युती जनताच ठरवणार...

शिवसेना- भाजप युती जनताच ठरवणार…

Subscribe

अरे, व्वा! घरोबा तुम्ही करणार, पोरं लोकांच्या कडेवर कशाला?

2018 वर्षाला निरोप देत असताना सर्व देशाचे लक्ष लागले आहे ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर आणि महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत त्या 2019 वर्ष अखेरीस होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर. आगामी वर्ष हे निवडणुकीचे असल्याने सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही, हा कळीचा मुद्दा आहे. आता या घडीला युतीचे काही खरे दिसत नाही, असे चित्र शिवसेनेकडून निर्माण केले जात असले तरी युती ही होणारच. याची गरज जशी भाजपला आहे, तेवढीच शिवसेनेलाही आहे. प्रश्न फक्त युतीचा निर्णय कधी जाहीर करायचा एवढाच आहे. तो पडद्यामागे जागावाटपाचे गणित निम्मे निम्मे ठरल्यानंतर घोषित करण्यात येईल… आता फक्त शिवसेनेचा दशावतार सुरू आहे. एक खेळ अयोध्येला झाला आणि दुसरा नुकताच पंढरपूरला पार पडला.

नाटक छान सुरू आहे. चंद्रभागेच्या तीरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नावाने शिमगा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून पहारेकरी चोर असल्याचे म्हटले… काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींसारखा हा सूर होता. पण, तो खोटा होता! कारण देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणताना त्यांनी अशा चोरांच्या सत्तेत सहभागी होणार नाही, असेही ठणकावून सांगायला हवे होते. पण ते न सांगता दशावतारी खेळात राजाचा प्रवेश झाल्यानंतर तो राज्याचा हालहवाल प्रधानाकडून जसे विचारून घेतो तसेच उद्धव यांनी कर्जमाफी, आत्महत्या असा लांबलचक डायलॉग मारला आणि युती म्हणे जनता ठरवेल, अशी लोणकढी थाप मारली… अरे, व्वा. भाजपबरोबर घरोबा करायचे तुमचे आधीच ठरले आहे. मग, पोरं लोकांच्या कडेवर कशाला देता? हा आमचा तुम्हाला सवाल आहे. लोकांना मूर्ख बनवू नका. हे पब्लिक है, सब जानती है!

- Advertisement -

शिवसेनेला 2014 चा वचपा आता काढायचा आहे. पाच वर्षांपूर्वी लोकसभेत युती केल्यानंतर भाजपने उपयोग करून शिवसेनेला फेकून दिले होते. विधानसभेच्या जागावाटपात काडीची किंमत न देता स्वबळावर निवडणुका लढवत भाजपने आपला मुख्यमंत्री बसवला आणि शिवसेना मग केंद्रात आणि राज्यात त्यांच्या मागून फरफटत गेली. केंद्रात एक अवजड उद्योग सारखे दुय्यम खाते मिळाले आणि इकडे राज्यात कमी दर्जाची खाती देऊन बोळवण करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर अशा सत्तेला मी लाथ मारतो, असे सांगत त्यांनी कमळाबाईबरोबरचा संसार मोडला असता आणि मोदी-फडणवीस यांना उठता बसता नाकात दम आणला असता… बाळासाहेब ते बाळासाहेब. दिल्या शब्दाला पक्के! आणि त्यांचा हल्लाबोलही हटके!! भाजपवाल्यांच्या नाकात दम आणून मातोश्रीच्या पायर्‍या त्यांना झिजवायला लावल्या असत्या… पण तसे उद्धव यांचे नाही. त्यांचा सर्व सावध खेळ आहे. उलट गेली चार वर्षे सत्तेवर लाथ मारली तर शिवसेनेचे आपले आमदार फुटतील की काय अशी सतत भीती होती.

आज देशभरात मोदी लाटेचा प्रभाव कमी झाला म्हणून उद्धव हे पहारेकरी चोर असल्याचे म्हणतायत, पण हीच परिस्थिती उलटी असती आणि मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगडला भाजपची सत्ता कायम राहिली असती तर शिवसेना पक्षप्रमुखांना एवढा वरचा सूर लावण्याची हिंमत तरी झाली असती का, हा प्रश्न उभा राहतो. राजकारणात कधीच एखादी गोष्ट स्थिर राहत नाही. देशात आणीबाणी आणून लोकशाही हक्क हिरावून घेणार्‍या इंदिरा गांधी यांना भारतीय जनतेने धडा शिकवला होता आणि मोठ्या आशेने जनता पक्षाला सत्ता दिली. ‘अंधेरे में एकही प्रकाश, जय प्रकाश, जय प्रकाश…’ असा नारा देत देशात संपूर्ण क्रांतीचे वारे पसरणार्‍या जयप्रकाश नारायण यांच्या वारसदारांनी घोर निराशा केली. पंतप्रधान मोदी यांनीही तेच केले. प्रचंड घोषणा, प्रत्यक्षात चित्र उलटे. लोक एकदा फसतील, पुन्हा पुन्हा नाही. आज मोदी लाट ओसरल्यामुळेच उद्धव यांना कंठ फुटला आहे.

- Advertisement -

भाजपसाठी या घटकेला पहिले लक्ष्य आहे ते केंद्रात सत्ता टिकवण्याचे. यासाठी त्यांना उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही चार राज्ये महत्त्वाची वाटतात. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये त्यांना मित्र पक्षांची मोठी गरज नसली तरी बिहार आणि महाराष्ट्रात आहे. बिहारमध्ये नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांच्याबरोबर समसमान जागांवर आघाडी करून अमित शहा यांनी एक पाऊल पुढे टाकले असले तरी महाराष्ट्रात त्यांना वाटते तितके युतीसाठी सोपे गणित जाणार नाही आणि उद्धव हे बरोबर ओळखून आहेत. म्हणूनच युती जनता ठरवेल, असे फालतू डायलॉग मारून ते भाजपला झुलवत आहेत. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 24 आणि विधानसभेसाठी 288 पैकी 144 जागा देत असाल तर बोला, बाकी काही आम्हाला गोष्टी सांगू नका. युती आम्ही करणार आहोत; पण युतीचा फॉर्म्युला आम्ही सांगू तसा असेल… गरज भाजपला आहे, शिवसेनेला नाही! शिवसेनेच्या डावपेचामुळे भाजपची सध्या दातखिळी बसली आहे. लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेना स्वबळावर लढल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे. आता असलेल्या त्यांच्या 23 जागा कमी निम्म्यापेक्षा कमी होण्याची त्यांना भीती आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, मुस्लीम हा सगळा वर्ग त्यांच्या विरोधात गेला आहे. या उलट बदलत्या परिस्थितीत शिवसेनेला फार काही गमवावे लागेल, असे चित्र दिसत नाही.

लोकसभेत त्यांना 2014 ला 18 जागा मिळाल्या होत्या. त्या दोन चारने कमी झाल्या तरी उद्धव यांना फरक पडत नाही. मात्र युती तुटल्याने शिवसेनेच्या जागा कमी तर होतील; पण त्यापेक्षा अधिक फटका हा भाजपला बसणार आहे आणि देशातील मोदी विरोधी लाट पाहता केंद्रात भाजपला बहुमताचा आकडा गाठताना धाप लागणार आहे. त्यामुळेच आता लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजप चिडीचूप आहे. शिवसेनेचे सगळे हल्ले निमूटपणे सहन करत आहे. लोकसभेसाठी त्यांना शिवसेना हवी आहे. एकदा का केंद्रात सत्तेचे गणित जमले की मग विधानसभेत स्वबळावर लढून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवायचा, ही भाजपची कुटनीती सेनेला पक्की ठाऊक आहे. आता सर्व काही शिवसेना ठरवणार आहे, भाजप नाही… जनतेच्या दरबारात युतीचा निर्णय होईल, या सर्व फालतू बाता झाल्या. लोकांना उल्लू बनवण्याच्या!

अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात युती हा धर्म होता. ते खरे मित्रपक्ष होते. बाळासाहेब भाजपला कमळाबाई बोलले किंवा मित्रपक्षाची काही पिसे काढली तरी वाजपेयी आणि महाजन हे मोठे नेते मोठ्या मनाचे होते. राजकारण आणि मैत्री यांच्यातील रेषा ओळखण्याएवढा दिलदारपणा या सर्वांमध्ये होता. बाळासाहेब बोलले तरी दिल्या शब्दाला हा माणूस पक्का आहे, याची खात्री भाजपला होती. युतीचा मैत्रीभाव दोन्ही बाजूंनी होता. पण, आता तसे चित्र राहिले नाही. मोदी नामक महान नेत्याने 2014 साली या देशात जन्म घेतल्यानंतर मित्रपक्ष लहान झाले. इतकेच कशाला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी केली नाही इतकी प्रचंड देशसेवा ही मोदींनी केली असा भास निर्माण केला गेला… 56 इंचाच्या छातीवर जॅकेट चढली आणि मेकओव्हरसाठी काही कोटी खर्च करून प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असल्याचा भास निर्माण करण्यात आला.

साडेचार वर्षांपूर्वी जन्माला घातलेला विकास गायब होऊनही मोदी भक्तांच्या आरत्या ओवाळण्याचा कार्यक्रम आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्याइतका निष्ठेने सुरू आहे. देशापेशा व्यक्ती प्रेमात पक्ष पडला की त्याची काय दशा होते, हे आताची भाजप हे त्याचे उदाहरण आहे. वाजपेयी, अडवाणी, महाजन यांची भाजप तशी नव्हती. म्हणूनच आपल्या आणि दुसर्‍याच्या पक्षातील नेत्यांना किंमत होती. एकेकाळी खाली वाकून आणि पायाला हात लावून नमस्कार करणारे मोदी, अडवाणी यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याकडे ढुंकून बघत नाही, एवढा माज आला कुठून? जी आपल्या नेत्यांची हालत केली तीच मित्रपक्षांच्या नेत्यांची आहे. सत्तेत एकत्र असूनही उद्धव ठाकरे यांना राज्यातील प्रमुख कार्यक्रमात मोदी येऊ देत नाही किंवा शिवसेनेला फारशी किंमत देत नाही. हा कुठला आला युती धर्म? आज मोदींचे दिवस फिरले म्हणून भाजपला शिवसेना हवी आहे.

खरे तर भाजपला इंगा दाखवण्याची हीच योग्य वेळ शिवसेनेच्या हाती होती. पण, चार वर्षांत आपणही काय दिवे लावले हे जनता ओळखून आहे, याची उद्धव यांना कल्पना आहे. मुंबई महापालिकेची सत्ता गेली दोन दशके भोगूनही काय दिवे लावले, हे सगळे समोर आहे. पायाभूत सेवांचा पत्ता नाही, अशी परिस्थिती झालीय. बेस्ट हे मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचे उत्तम साधन असताना ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रस्त्यांचे हजारो कोटी खाऊन ढेकर दिले तरी सत्ताधारी आणि बरोबर हातात हात घालून चालणार्‍या प्रशासनाची भूक भागत नाही. ‘धड मुंबई सांभाळता येईना, चालले राम मंदिर बांधायला,’ असे लोक खुलेआम विचारत आहे. पण, शिवसेनेला त्याचे काही वाटत नाही. इतका निगरगट्टपणा त्यांच्यात शिरलाय आणि म्हणूनच राम मंदिराच्या नावाने अयोध्या आणि पंढरपूरला आरत्या ओवाळण्याचे इव्हेंट सुरू आहेत.

मग, त्या प्रभू रामचंद्राला साक्ष ठेवून युती तोडून टाकण्याची घोषणा उद्धव ठाकरे का करत नाहीत? ते होणार नाही. कारण सध्या भाजपचे दिवस फिरलेत आणि शिवसेनेचे दिवस फिरून आलेत… या फिरलेल्या दिवसाचे महत्त्व ओळखून निवडणुकांसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या हेच सत्तेजवळ जाण्याचे गणित आहे. शिवसेनेचा डोळा आहे तो मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर…घरोबा तर होणारच. जनतेच्या दरबारात युतीचा निर्णय होईल हे सगळे खोटे आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -