घरफिचर्सअफजल खानाशी गळा भेट!

अफजल खानाशी गळा भेट!

Subscribe

शिवसेनेने भाजपशी युती केली ही बातमी आता जुनी झाली. सेनेच्या मांजराने स्वबळाचे म्याव म्याव केले खरे, पण भाजपने युतीचे दूध समोर ठेवताच डोळे मिटून त्याने ते प्यायले, हे अख्या देशाने पाहिले. यात नवीन काय तर निष्ठावंत शिवसैनिक गेले पाच एक खिन्न मनाने आणि पडलेल्या चेहर्‍याने बोलत आहेत : भाजपसमोर लोटांगण घालत आमच्या पक्षाने युती केली आणि उरलीसुरली अब्रू रसातळाला गेली!

मी जेथे राहत होतो आणि आता राहतो त्या चुनाभट्टी, विक्रोळी आणि बोरिवली या भागात शिवसेनेचे तळागाळाला खूप चांगले काम आहे. यामुळे प्रत्येक शिवसैनिक भागातील छोट्या मोठ्या प्रत्येक माणसाला ओळखतो. पक्षाच्या पलीकडे या कार्यकर्त्यांचे नाते लोकांशी आहे. यामुळे रात्री अपरात्री कधीही सैनिकांना हाक मारा ते हजर. सामान्य जनतेशी नाळ जुळलेले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले हे सैनिक. मी नेते आणि मोठे पदाधिकारी म्हणत नाही. कारण सेना आजही उभी आहे ती याच सैनिकांमुळे आणि विशेषतः कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अतिशय प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे. पेडणेकर, दळवी, साटम, गावडे, चिपकर, राणे, सावे, चौधरी, पाटील, भोईर नामक मराठा, भंडारी, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी अशा सतरा पगड जातीच्या लोकांमुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठी माणूस म्हणून एकवटलेल्या या जीवाला जीव देणार्‍या सामान्य सैनिकांमुळे शिवसेना मोठी झालीय… पण, हेच सैनिक जेव्हा म्हणतात : आमच्या स्वबळाच्या तलवारी गंजल्या आणि मोडून पडल्या तेव्हा त्यांचे शल्य बोचरे वाटते. त्यांच्या काळजाची जखम भळभळ वाहतेय असे वाटते. मातोश्रीवर दरबारी राजकारण करून स्वतःला चाणक्य म्हणून घेणारे आता युतीचे शिल्पकार म्हणून मिरवतील, पण शिवसैनिकांच्या काळजाला पडलेला घाव ते कसा भरून काढतील? उत्तर आहे? कसे असेल… अफझल खानाची फोज महाराष्ट्रावर चालून आलीय, मात्र शिवसेना त्यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी डरकाळी फोडणार्‍या शिवसेनेच्याच जबड्यात हात घालून भाजपने त्यांचे फक्त दातच मोजले नाहीत तर ते बाहेर काढून तोंड बोडके केले आणि या बोडक्या तोंडानी अफझल खानाची म्हणजेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गळाभेट घेऊन युतीची घोषणा केली… आणि आवाज कुणाचा या पाच दशकाच्या वादळाची शोकांतिका झाली!

गेले पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही भाजपने शिवसेनेला काडीची किंमत दिलेली नाही. 18 खासदार असून एक बिनकामाचे अवजड उदयोग खाते केंद्रात दिलेले आणि राज्यात सर्व दुय्यम खाती. असे असूनही खाली मान घालून सत्तेत सामील झालेले,पण कायम खिशात राजीनामे घेऊन फिरणारे शिवसेनेचे मंत्री आताही बघितले की त्यांचे हसू येते. पहिल्या दिवसांपासून सत्तेत असूनही भाजपवर आग परखड करायची एकही संधी शिवसेनेने सोडली नव्हती. हे म्हणून की काय शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज भाजपचे कोथळे बाहेर काढले जात होतेच. आत बाहेर विराधाचा टीपेचा सूर लागल्यामुळे शिवसेना ही सत्ताधार्‍यांपेक्षा विरोधी पक्ष म्हणून राज्यात नाव लौकिक मिळवून होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करण्याची एकही संधी या दरम्यान शिवसेनेने सोडली नाही. पंतप्रधानांची छाती काढण्यापासून ते त्यांना चौकीदार चोर है… अशी भाषा वापरत शिवसेनेचा घोडा मुलुख मैदान मारत चालला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येत असलेल्या शिवसेनेला त्यांची स्वतःची आणि विरोधकांची मते मिळवण्याची मोठी संधी होती… पण, शेवटी जे पाच एक वर्षे कमावले ते युतीची घोषणा करून गमावले!

- Advertisement -

युतीच्या समर्थनाचे एक कारण सांगितले जात आहे ते म्हणजे शिवसेनेच्या खासदारांना म्हणे निवडून येण्याची शाश्वती नसल्याने ही युती करण्यात आली. मग हे खासदार 5 वर्षे काय करत होते. म्हणजेच 2014 साली ते मोदी लाटेत निवडून आले होते, हे आपसूकच सिद्ध होते. आता लाट बिट काही नाही आणि त्यात युती नाही म्हटल्यावर या 18 खासदारांना घाम फुटला आणि फुटलेल्या घामानिशी ते मातोश्रीवर धावत गेले आणि उद्धव यांच्या समोर हात जोडून : युती करा हो, असे गार्‍हाणे घातले. बाळासाहेब असते तर अशा आत्मविश्वास गमावलेल्या खासदारांची बिनपाण्याने करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असता. पण, तसे झाले नाही. कारण नेतृत्वाला आपणच केलेल्या स्वबळाच्या घोषणेच्या ताकदीचा अंदाज नव्हता. ही घोषणा नव्हती, तर पुढे तडजोडीसाठी टाकलेले एक पाऊल होते, हे आता स्पष्ट झाले आहे.

1995 मध्ये सत्ता आल्यानंतर एक सक्षम प्रादेक्षिक पक्ष म्हणून उभे राहण्याची शिवसेनेला मोठी संधी होती. पण, राजव्यापी विचार करण्याची क्षमता या पक्षात कधीच दिसली नाही. मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग यापुढे महाराष्ट्र आहे, याचा मातोश्रीवरीन कधीच विचार झाला नाही. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा ग्रामीण भाग येथे पक्षाची पाळेमुळे घट्ट करता आली असती, पण तेवढी दूरदृष्टी नेतृत्वाला नव्हती, ती नेते आणि खाली पदाधिकार्‍यांना कुठे असणार? परिणामी शहरी तोंडवळा असणारा हा पक्ष फक्त महापालिकांची सत्ता मिरवण्यापर्यंत मर्यादित राहिला. यामुळे मातोश्रीला भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या वर येतात का खाली? असे शरद पवार विचारत असतील तर त्यांचे काय चुकले… चुकले तर यांचेच आहे. लीलाधर डाके, मनोहर जोशी, संजय राऊत, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे असे शहरी तोंडवळा असलेले नेते दरबारी राजकारणात असतील तर शिवसेनेला ग्रामीण भागात आपले बस्तान बसवता येणार नाही आणि तेच सतत दिसून आले आहे. विशेष म्हणजे यापैकी एक एकनाथ शिंदे सोडले तर मास बेस असलेला आणि कार्यकर्ते जोडून असलेला शिवसेनेकडे दुसरा नेता नाही. हीच शोकांतिका चांदयापासून बांद्यापर्यंतच्या शिवसैनिकांच्या बोलण्यातून जाणवते. शिवसेनेत असताना आधी नारायण राणेंकडे कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून आणि पोटाची काळजी घेऊन लढ म्हणण्याची ताकद होती… उद्धव ठाकरे यांच्या कानाला लागले म्हणजे पक्ष आणि नेतेही मोठे होत नाही, असा पक्ष प्रादेक्षिक पक्षांपेक्षाही छोटा होत जातो.

- Advertisement -

ममता बॅनर्जी, मायावती, मुलायम सिंह, नवीन पटनाईक, चंद्राबाबू नायडू, जयललिता, देवेगौडा आणि अकाली दल यांची एकहाती सत्ता येऊ शकते, मात्र शिवसेनेची येत नाही. याचे कारण म्हणजे कायम कचखाऊ घेतलेल्या भूमिकेमुळे. मराठी सोडून हिंदुत्वाची भूमिका घेतली म्हणून पक्ष मोठा होत नाही. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याची सवय नसली कि शेवटी शरणागती कशी पत्करावी लागते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सेनेने केलेली युतीची घोषणा होय.

मराठी मुद्दा घेऊन सुरुवातीला राजकारण करणार्‍या शिवसेनेने 1980 च्या दशकात गिरणी कामगारांच्या संपात काँग्रेसच्या सोबतीने जे काही राजकारण केले त्याने मुंबईतील दोन लाखांपेक्षा अधिक संख्यने मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. तीच गोष्ट मुंबई, ठाणे परिसरातील मोठ्या कारखान्यांची. कंपन्या बंद पडल्या आणि 90 च्या दशकांनंतर लागलेला मराठी युवक गेल्या दहा वर्षांत बेकार झाला. चाळी मोडून उत्तुंग इमारती उभारल्या जात असताना मराठी माणूस पार बदलापूरपर्यंत फेकला जात असताना 25 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता भोगणा र्‍या शिवसेनेला कनिष्ठ मध्यमवर्गासाठी परवडणारी घरे बांधावी असे कधी वाटले नाही. समाजवादी नेत्या मृणाल गोरे अतिशय मर्यादित ताकद असताना गोरेगावला नागरी निवारा उभारून मराठी माणसांना घरे उभारून देत असताना शिवसेनेला हे कधी सुचू नये. कायम कंत्राटदारांना हाताशी धरून टक्केवारीचा मलिदा खाण्यापूरता यांचा आवाज मर्यादित असेल तर भाजपपुढे लोटांगण घालणे हेच शिवसेनेच्या नशिबी आहे.

एनडीएमधील तेलगू देसम, आसाम गण परिषद, स्वाभिमानी पक्ष, हिंदुस्थान अवाम मोर्चा, नागा पीपल्स फ्रंट, गोरखा जनमुक्ती मोर्चा, राष्ट्रीय लोकसमता पार्टी, पीडीपी असे अनेक पक्ष बाहेर पडले आहेत. या सर्वांच्या तुलनेत बरी ताकद असणार्‍या शिवसेनेला भाजपला धडा शिकवण्याची यावेळी मोठी संधी होती. पण, त्यांनी ती गमावली. भाजप हा ऑक्टोपस आहे, तो सर्वांना गिळंकृत करत पुढे जाणारा आहे. प्रादेक्षिक पक्षांचे अस्तित्वच ज्या पक्षाला मान्य नाही, तो भविष्यात शिवसेनेलाही गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -