घरफिचर्सआदित्यायन... जाणून घ्या, मातोश्रीच्या तिसऱ्या पिढीचे राजकारण

आदित्यायन… जाणून घ्या, मातोश्रीच्या तिसऱ्या पिढीचे राजकारण

Subscribe

२०१० सालच्या ऑक्टोबरमध्ये ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेची व्यवस्थित माहिती असलेल्या एका मोठ्या नेत्याने माझ्याशी पैज लावली. तो नेता म्हणाला, ‘बाळासाहेब त्यांच्या हयातीत युवकांची संघटना,सेना वगैरे, अशा कुठल्याही गोष्टीला परवानगी देणार नाहीत. कारण आपला प्रत्येक शिवसैनिक हा ’युवा’च आहे ही साहेबांची धारणा आहे. त्यामुळे साहेब असले काही करुच देणार नाहीत. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुमचा अनुभव आणि अभ्यास दांडगा आहे. पण येत्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेनेची स्थापना होईल. त्यांनी पैज लावली. त्यानंतर बरोबर १५ दिवसांत दसरा मेळाव्यात दस्तुरखुद्द शिवसेना प्रमुखांनी आपल्या तिसर्‍या पिढीचं ’लाँचिंग’ केलं. आदित्य उद्धव ठाकरे ’युवासेना प्रमुख’ झाले. चॅनेलवर ब्रेकिंग चालली… आणि त्या नेत्याचा फोन मेळाव्याचं कव्हरेज करत असतानाच आला. त्याने खिलाडूवृत्तीनं पैज हरल्याचं कबूल केलं आणि माझ्या ’न्यूज अ‍ॅलर्ट’चं कौतुकही केलं असो.

हे सगळं सांगण्याचं कारण काय तर, आदित्य ठाकरे या युवानेत्याचा राजकीय प्रवास हाच मुळी नियमांना छेद देणारा आणि तरीही लक्षवेधी असाच आहे. येणार्‍या काळात बहुधा तो तसाच होण्याचे संकेत त्यांनी स्वत:चं देऊन टाकलेत. “आदित्य निवडणूक लढवणार” ही बातमी ’आपलं महानगर’ ने ६ जूनला दिली तेव्हा काहींना ती रुचली नाही. पण स्वत: आदित्य यांनी त्याबाबत अवघ्या काही तासांतच ’ठाकरी’ उत्तर दिल्यावर मात्र ज्यांना जे समजायचं ते समजून गेले. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा ’जय महाराष्ट्र’ केला तेव्हा सेनेनं राज यांच्या भारतीय विद्यार्थी सेनेची सूत्रं अभिजीत पानसे यांच्याकडे सोपवली. एका खाजगी दूरचित्र वाहिनीवर हल्ला करण्याच्या कामगिरीचे बक्षिस पानसे यांना मिळाले होते. तेव्हा आदित्य आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. मला वाटतं राज यांच्या जाण्यानंतर भाविसेची सूत्रं ठाकरेंकडून ठाकरेंकडे जायला हवी होती. त्या कार्यकाळाचा खूपच वेगळा अनुभव आदित्य यांना घेता आला असता. अर्थात ही कसर आदित्य यांनी आपल्याकडे सूत्रं आल्यानंतर अल्पावधीतच भरुन काढली. सिनेटच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून त्यांनी सेनेच्या युवाशक्तीचा आवाज विद्यापीठात घुमवला. यंदाचं वर्षं मात्र आदित्य यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरतंय. यंदा २३ जानेवारीलाच आदित्य यांना शिवसेनेत ’नेता’ हा अधिकृत दर्जा देण्यात आला. नेत्याला आपल्या राजकीय वाटचालीत विश्वासू सहकार्‍यांची गरज असते. तसा कमालीचा विश्वासू आणि विलक्षण बुद्धिमान सहकारी म्हणून सूरज चव्हाण यांची साथसोबत याच वर्षी अधिकृतरित्या त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. अनेकजण उद्धव यांच्या पीएच्या कार्यकुशलतेचे गुणगान गात असतात त्याची पोचपावती म्हणून त्यांना जानेवारीतच पक्षसचिव म्हणून नेमण्यात आलं. हाच मौका साधत आदित्य यांनी स्वत:साठीही एक खूपच विश्वासू बिरबल मिळवला.

- Advertisement -

विद्यार्थी सेनेत घडलेला चुनाभट्टीत वाढलेला सूरज चव्हाण हे त्याचं नाव. सूरज चव्हाण हा येणार्‍या काळात ’डार्कहॉर्स’ ठरु शकतो. या टेक्नोसॅव्ही इंजिनिअर सहकार्‍याची सचिव म्हणून नेमणूक आदित्य यांनी आपल्या वडिलांकडून वरळीच्या महामेळाव्याच्या भर सभेत हट्टाने करवून घेतली. ही गोष्ट आदित्य यांच्या यशाला खूपच उपयुक्त ठरलीय.(त्यावर कधीतरी विस्तारानं बोलू) आपलं शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश, अंबानी इंटरनॅशनल स्कूल सारख्या श्रीमंत शाळा आणि झेव्हिअर सारख्या महाविद्यालयात झाल्यामुळे आदित्य यांचं ’सर्कल’ हे खूपच ग्लॅमरस मित्रांनी भरलंय. नेत्यांच्या मुलांना आपल्या कडच्या पैश्याचा, सत्तेचा माज असतो मग पक्ष कुठलाही असो. नगरसेवकांच्या पोरांचा तोरा बघण्यासारखा असतो, त्या तुलनेत सेनेचा हा तरुण नेता खूपच विनम्र आहे. याचं सर्वाधिक श्रेय कशाला द्यायला हवं तर ते रश्मी ठाकरे यांच्या करड्या नजरेला. लक्ष्मीपुत्रांमध्ये दोस्तीयारी करणारी आपली दोन्ही मुलं प्रवाह वाहत जाणार नाहीत याची उद्धव ठाकरेंच्या होममिनिस्टरने व्यवस्थित काळजी घेतलीय. त्यामुळेच अक्षय कुमार, दिनो मोरिया किंवा दिशा पटनी सारखे बॉलिवूड स्टार असू द्या किंवा अंबानी-पिरामल-मेहतांची पोरं दोन्हीकडे बागडून झालं की आदित्य सेनेच्या वर्तुळात वावरताना डोकं खांद्यावर ठेवतात हे विशेष. घराजवळ राहणारा बाबांचा मित्र मिलिंद गुणाजी असोत किंवा घरापासून दूर ३० किमी अंतरावर राहणारा एकनाथ शिंदेंसारखा आपला ’सदिच्छादूत’; दोन्ही नाती आणि बंध सांभाळताना आदित्य कुठे अडखळत नाही हे विशेष. अर्थात बॉलिवूडमध्ये रमण्याचा गुण बहुधा त्यांनी आपल्या ’आज्या’ कडून आणि काकांकडून घेतला असावा. उद्धव ठाकरेंचा जीव कधी या स्टार यार कलाकारांमध्ये रमलाच नाही (किंबहुना स्वत: खूपच मोठा फोटोग्राफर असून उद्धव यांना ’फॅशन’च्या दुनियेची भुरळ पडली नाही). उद्धव यांचे मित्रही खंडीभर नाहीत. जे काही आहेत ते मोजकेच. मात्र तेही उद्धव यांच्या राजकीय निर्णयावर प्रभाव पाडू शकत नाहीत. ही गोष्ट मात्र आदित्य यांच्या बाबतीत काहीशी धाडसी ठरु शकते. त्यांचे काका हेही मित्रांच्या गोतावळ्यात आनंद मानणारे… गप्पांचे फड रंगवणारे… त्यांनी पक्षनिर्मितीत नेतेपदाच्या लक्षणीय माळा मित्रांच्याच गळ्यात घातल्या. निर्णय प्रक्रियेत त्यांनाच महत्वाचं स्थान दिले.

साहजिकच जे व्हायचं तेच झालं. पण त्यांचा आपल्या वाणीच्या करिष्म्यावर विश्वास. त्याबाबतीत आदित्य यांची स्थिती सचिन तेंडुलकर सारखी आहे. सचिन खूपच महान क्रिकेटपटू पण आवाजाची देणगी नसल्यामुळे तो यशस्वी कॉमेंटेटर होऊ शकला नाही. पण परवा तो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात समालोचन करत होता. खेळातले बारकावे तो असे काही मांडत होता की ते ऐकून पहिल्यांदा बॅट हाती धरणारा माणूसही क्रिकेट खेळू शकेल इतका त्याच्याकडे अभ्यास होता. हीच गोष्ट आदित्य यांच्या बाबतीत घडू शकते. आदित्य खरंच खूप अभ्यास करताहेत. फिल्डवर काम करताहेत. प्रश्न किनारा स्वच्छतेचा असो की दुष्काळाचा थेट ग्राउंड लेवलवर उतरणं त्यांनी पसंद केलंय. पर्यावरण, खेळ, तरुणाई, जैवविश्व, आंतरराष्ट्रीय, कलाविश्व, साहित्य, राजकारण, फॅशन यासारख्या सगळ्याच विषयात मुशाफिरी करण्याची संधी आदित्य यांना तिशीच्या आतच मिळाली ह्याचा त्यांना फायदाच होऊ शकतो. ते पक्षाच्या कामात रुची घेताहेत हे पाहिल्यावर त्यांनाही नेपियन्सी रोड ते ठाण्यापर्यंतच्या स्वार्थी खुषमस्कर्‍यांनी घेरलं होतं. हे कमर्शियल वस्ताद नेत्यांना घेरतात तेच मुळी मगरमिठी सारखं. सुदैवानं रश्मी ठाकरेंच्या धाकामुळे युवासेनाध्यक्षांना फारवेळ घेरणं जमलं नाही. आदित्य यांच्याही वेळीच ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी स्वत:ला सावरलं.

- Advertisement -

फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, बॉक्सिंग सारख्या खेळात रुची घेणार्‍या या नेत्याला आंतरराष्ट्रीय सिनेमा, साहित्य, आणि राजकीय घडामोडींबद्दल ’अपडेट’ रहायलाही तितकंच आवडतं. आक्रमक तरुणांच्या शिवसेनेला उद्धव यांनी एक कॉर्पोरेट लूक दिला. त्यात नीटनेटकेपणा आणला. आदित्य यांना आता एक पाऊल पुढे टाकायचंय. बाळासाहेबांची आणि उद्धव यांची शिवसेना पुढे नेताना नवी राजकीय आव्हानं पेलावी लागणार आहेत. त्यासाठी मात्र या तिशीच्या उंबरठ्यावर असणार्‍या नेत्याला शेती, पाणी, पर्यावरण, क्रीडा, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान अशा विषयांच्या वाट्याला शिवसेना ठळकपणे गेलीच नाही. त्यातल्या अभ्यासूमंडळींसोबत त्यांनी काही तास घालवला तर त्याचा त्यांना फायदाच होणार आहे. यातही गेल्या पाच-सात वर्षांत शिवसेनेला राष्ट्रीय कॅनव्हास खुणावतोय. आपल्या ’ठाकरी’ बाण्याच्या पलिकडे जाऊन उद्धवही काही तह करताहेत. त्यामुळे टिकाही होतेय. शिवसेनेतील दिल्लीतल्या काही नेत्यांचा ‘बॅडपॅच’ सुरु आहे. तो कधीच कायम नसतो. चांगल्या आणि विश्वासू प्लेअर्सना घेऊन दिल्लीच्या पीचवर पण युवराजांनी काही नॉक घ्यायला हवेत. ते नव्या व्यवस्थेत खूपच अत्यावश्यक ठरणार आहेत. कारण आता बहुतांश प्रादेशिक घडामोडी या दिल्ली दरबारातून होतील. आदित्य हे आपल्या वडिलांसारखे शीत रक्ताचे राजकारणी आहेत. त्यामुळे आपल्याला न पटणार्‍या आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे पितापुत्र दोघेही तसंच दुर्लक्ष करतात. संपूर्ण ठाकरे कुटुंबात एक गुण सारखा दिसतो तो म्हणजे लवकर कुणाच्याच चुकीला माफ न करण्याचा… सध्या राजकारणात चांगले कार्यकर्ते मिळणे दुर्मिळ झालंय. इनकमिंग-आऊटगोईंग करणार्‍यांनी पक्ष भरलेत. हुजर्‍यांनी तर उच्छाद मांडलाय. ‘इलेक्ट्रोल मेरिट’च्या नावाखाली धुमाकूळ सुरू आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांबाबत उद्धव आणि आदित्य दोघेही नशिबवान आहेत. बाळासाहेबांच्या सैनिकांची फौज त्यांना ‘तयार’ मिळाली आहे. नाहीतर ’सारी दुनिया खरिदेंगे हम’ अशी अल्ट्रामाउंट रोडपासून दिल्लीपर्यंत विंडो शॉपिंग सुरु असताना अरविंद सावंतांसारखा माणूस निवडून येऊच शकला नसता. फाटक्यालाही ’आपला’ समजून निवडून आणणारी तयार सैनिकांची फौज नीट सांभाळण्यात मातोश्रीच्या तिसर्‍या पिढीला यश आलं तर राष्ट्रीय पातळीवरही शिवसेनेला नवं ’आदित्यायन’ लिहीता येईल हे नक्की.



राजेश कोचरेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -