घरफिचर्ससंपादकीय : दोन मुख्यमंत्री

संपादकीय : दोन मुख्यमंत्री

Subscribe

सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध महाराष्ट्राला लागले आहेत. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोर बैठकांना सुरुवात झाली आहे. छायाचित्रांमध्ये तरी दोन्ही उभयपक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी एकत्र गोलाकार बसलेली दिसतात. मात्र, चर्चेचा सूर सुमधूर असतो का, हे अजून काही उमगलेले नाही. थोडक्यात काय तर दोन्ही काँग्रेसने आघाडी जाहीर केली असली तरी लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वासघात काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज आहे. जोवर दोन्ही काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीचा शास्वत संसार दिसत नाही, तोवर हे सत्य मानायचे का, हा खरा प्रश्न आहे. दोन्ही काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीसाठीचे मार्गक्रमण अशाप्रकारे काहीसे धीम्यागतीने सुरू असताना दुसरीकडे मात्र शिवसेना-भाजप यांच्या दोन एक्स्प्रेस स्वतंत्रपणे धावत सुटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली. दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक युती धर्म पाळून लढवली. भरघोस यश संपादन केले. दिल्लीत नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले, मंत्रिमंडळाची स्थापना झाली, पुन्हा शिवसेनेने अवजड उद्योग मंत्रालयावरच समाधान बाळगले. अशाप्रकारे लोकसभेचा धुरळा खाली बसला आणि महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली युती विधानसभेतही कायम राहणार असेही त्यावेळी घोषित करण्यात आले होते. नुसती युतीचीच घोषणा झाली नव्हती, तर सत्तेचे विभाजनही करण्यात आले होते. कुणाला कितीही जागा मिळो, सत्ता अर्धी-अर्धी वाटून घ्यायची, अशी बोली झाली होती. त्यानुसार शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे वाटून घेतले जाणार, अशा चर्चेला उधाण आले. मात्र, आता अवघ्या दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असताना भाजपचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप यांच्यात जागावाटप झालेले नाही, असे सांगत मुख्यमंत्री भाजपचाच होणार असेही जाहीर केले आणि युतीत मीठाचा खडा पडला. तसे तर युतीत बिब्बा घालण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत महिनाभरापूर्वीच केले होते. जेव्हा महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती, तेव्हाच त्यांनी स्वबळाची भाषा केली होती. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांची भाषा ही त्याची पुढची री होती, असे म्हणायला हरकत नाही. म्हणून शिवसेना-भाजपच्या युतीचेही काही खरे दिसत नाही, असे चित्र आहे. रविवारी मुंबईत भाजपच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आता शिवसेनेचाही मीच मुख्यमंत्री’ अशी वक्तव्य करून शिवसेनेचा ‘मुख्यमंत्री’पदासाठीचा दावा एकप्रकारे खोडून काढला आहे. तसेच ‘युतीचा विचार करू नका २८८ जागांसाठी तयारी करा’, असेही जाहीर करून स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला शिवसेनेशी युतीधर्माबाबत चर्चा करायची आणि दुसरीकडे स्वबळाची तयारी सुरू करायची, असे सध्या भाजपचे सुरू झाले आहे. दुसरीकडे शिवसेनेनेदेखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी आकाश-पाताळ एक करायला सुुरुवात केली आहे. कालपर्यंत युवा सेना अध्यक्ष म्हणून विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांमध्ये सक्रिय असणारे आदित्य ठाकरे या पावसात मात्र जेव्हा मुंबई तुंबली तेव्हा मुंबईत फेरफटका मारताना दिसले, जेथे जेथे पाणी तुंबले तिथे जाऊन पाहणी करत होते. प्रसारमाध्यमांसमोर येऊन कारणमीमांसा करताना दिसले. पाऊस पुराण संपत नाही तोच आदित्य ठाकरे जनाशीर्वाद यात्रेवर निघाले, सध्या ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राज्यात ग्रामीण भागात जावून ते जनतेचे आशीर्वाद घेत आहेत. जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात काय तर ते जनतेमध्ये मिसळत आहेत. अशाप्रकारे शिवसेना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत आहे. ‘जनतेचा आशीर्वाद असेल, तर राज्याचे नेतृत्त्व करायला तयार आहे’, असेही आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांचे जनता सिंहावलोकन करू लागली आहे. राजकारण, समाजकारण यात त्यांचा सहभाग किती आहे, अनुभव किती आहे, अशा विषयांवर चर्चा ऐकू येऊ लागल्या आहेत. अशाप्रकारे शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा करण्यास बर्‍यापैकी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. मात्र, ही चर्चा किती सकारात्मक आणि किती नकारात्मक आहे, हा वेगळा विषय आहे. अशारितीने सध्या महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राज्यात फिरताना दिसत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेली टीका मार्मिक आहे. ‘भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पुढे केला जात आहे. आजपर्यंत राज्यात आपण दोन मुख्यमंत्री पाहिले नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी सेना-भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दावा-प्रतिदाव्यावर भाष्य केले. सध्या भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष वाढीच्या दृष्टीकोनातून कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार इनकमिंगला सुरुवात केली आहे. ‘जो जे वांच्छिल तो ते लाभो’, अशी भूमिका घेऊन भाजपवाले दोन्ही काँग्रेसमधून येणार्‍यांचे त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे आश्वासने देत स्वागत करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भाजप पक्ष जेवढा निवडणुकीच्या आधी दिसत आहे, तो प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक सुरू होईल, तेव्हा २८८ जागांवर उमेदवार उभा करेपर्यंत व्यापलेला दिसला तर आश्चर्य वाटायला नको. भाजपचे ‘मिशन मुख्यमंत्री’ सध्या जोरदार आहे. त्या तुलनेत शिवसेना किती ताकदीने ‘मुख्यमंत्री’ पदावर ठाम राहते हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच ‘मुख्यमंत्री’ पदासाठीची शिवसेनेची महत्त्वाकांक्षा किती आहे, हेही यानिमित्ताने दिसून येईल. त्यासाठी शिवसेना पुन्हा २०१४ चा मार्ग अनुसरून स्वबळाचा नारा देते का, हेदेखील पहायला मिळेल की सेना-भाजप या दोन्ही पक्षांनी त्यांचा त्यांचा ‘मुख्यमंत्री’ पदाचा उमेदवार घोषित करून कार्यकर्त्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवून दोघांनी अधिकाधिक जागा जिंकून आणायच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रसला चर्चेतच न आणता त्यांचा सुपडा साफ करायचा, असा हेतू या खेळीमागे आहे का, हेदेखील सुस्पष्ट होईल. शिवसेना, भाजप यांचा हा विधानसभा निवडणुकीचा खेळ किती खरा आणि किती खोटा हे जनता ओळखून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -