वेब सीरीजवर सेन्सॉरशिप असायलाच हवी! – अरुण नलावडे

‘माय महानगर’च्या ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये कला, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येतं. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते अरुण नलावडे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सिनेमा, नाटक, मालिका आणि अगदी वेब सीरीज अशा व्हिज्युअल एंटरटेन्मेंटच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये लिलया वावर असल्यामुळे त्यांनी 'माय महानगर'च्या टीमने विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली!

Mumbai
Arun Nalawde
अरुण नलावडे

हल्ली सगळीकडेच ऑनलाईन उपलब्ध होणाऱ्या वेबसीरीजची चलती आहे. सर्व प्रकारचा कंटेंट कोणत्याही आडपडद्याशिवाय वेब सीरीजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यातूनच या वेब सीरीजसाठी सेन्सॉर असायला हवा अशी मागणी पुढे येत आहे. या सेन्सॉरशिपला तरुणांमधून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असला, तरी प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते अरुण नलावडे यांनी मात्र ‘वेबसीरीजसाठी सेन्सॉर बोर्ड असायला हवा’ असं मत व्यक्त केलं आहे. mymahanagar.comच्या फेसबुक लाइव्हवर ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये अरुण नलावडे आले होते. यावेळी त्यांनी दिग्दर्शकाची नजर, अभिनयाचं गुपित आणि ‘श्वास’च्या ऑस्करवारीचं गमक मुलाखतीदरम्यान उलगडून दाखवलं!

वेब सीरीजवर सेन्सॉर असायला हवा

वेबसीरीजमधल्या शिव्या किंवा शिवराळ भाषा यावर अरुण नलावडे यांनी अगदी स्पष्ट आणि रास्त वाटणारी भूमिका यावेळी बोलताना मांडली. ते म्हणाले, ‘मी सुद्धा वेब सीरिज केली आहे. ‘लाखों में एक’ नावाच्या हिंदी वेब सीरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये मी काम केलं आहे. पण त्यातल्या शिव्या मी बदलल्या. महाराष्ट्रानं आत्तापर्यंत एक चांगली संस्कृती जपली आहे. बाहेरचे लोक त्याचं अनुकरण करतायत. पण आपण फक्त बाहेरचं अनुकरण करायला लागलो आहोत. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. अशा कंटेंटच्या माध्यमातून जर आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार केला तर कठीण होईल. ते कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून पाळलं पाहिजे’.

Arun Nalawde
अरुण नलावडे

डायलॉग्जमधल्या शिव्यांचं काय?

दरम्यान, संवादांमध्ये फोर्स येण्यासाठी आणि भूमिका अधिक दमदार होण्यासाठी शिव्या असण्याला काहीही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मी थिएटर केलेला माणूस आहे. मी आल्यानंतर नाटकात वापरल्या जाणाऱ्या शिव्या कमी केल्या. सामान्यपणे बोलीभाषेत शिव्या आल्या की त्या वाक्याला फोर्स येतो. पण जर शिव्या खूप तीक्ष्ण असतील आणि लोकांवर त्याचा परिणाम होणार असेल, तर आम्ही त्या गाळतो. त्यामुळे आपण फार टोकाला जाऊन काही करू नये. १९५४पासून नियमांमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. अनेकदा शिव्यांवर आक्षेप घेतला जातो. पण त्या साध्या शिव्या असतील तर चालतील. पण इतक्याही घाण शिव्या देऊ नका की कानाला त्रास व्हावा’, असं ते म्हणाले.

आणि मंत्रालयासमोरचं कार्यालय बदललं!

दरम्यान, मराठी नाटकांसाठीच्या सेन्सॉरवर अध्यक्ष म्हणून आल्यानंतरच्या पहिल्याच दिवसाच्या अनुभवाविषयी त्यांनी यावेळी सांगितलं. ‘पहिल्याच दिवशी मी जेव्हा मंत्रालयासमोरच्या त्या बिल्डिंगमध्ये गेलो, तेव्हा फायलींच्या गठ्ठ्यांच्या मागे बुडालेली माणसं दिसली. कार्यालयाची भयंकर दुरवस्था दिसली. दुसऱ्या दिवशी जेव्हा विनोद तावडे भेटले, तेव्हा ऑफिसला भेटायची विनंती केली. त्यांनी ऑफिस पाहिल्यानंतर ताबडतोब तिथल्या डागडुजीचे आदेश दिले. त्यानंतर फिल्मसिटीमध्ये २ हजार स्क्वेअर फीटची जागा दिली. तिथल्या सगळ्या जुन्या संहितांचं स्कॅनिंग सुरू केलं. आता ते काम अंतिम टप्प्यात आलं आहे’, अशी माहिती यावेळी त्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये दिली.

पहिल्या नाटकात झालेली फजिती!

दरम्यान, यावेळी अरुण नलावडे यांनी त्यांच्या लहानपणी केलेल्या पहिल्या नाटकात झालेली फजिती सांगितली. ‘गिरगावच्या युनियन हायस्कूलमध्ये गॅदरिंगमध्ये छोट्या नाटिकेचा प्रॉम्प्टर म्हणून काम करत होतो. पण दुसरा मुलगा आला नाही म्हणून ऐन वेळी मला उभं केलं. पहिल्याच प्रयोगात बोलायला सुरुवात करण्याआधीच स्टेजवर माझा पायजामा सुटला. तेव्हा जाणवून द्यायचं नाही म्हणून अॅडजस्ट केलं. तेव्हा माझे सर म्हणाले होते तुझ्याकडे प्रसंगावधान आहे. तू चांगला नट होशील’, असं ते यावेळी म्हणाले.

शाळेला दांड्या मारून सिनेमा!

‘वयाच्या पाचव्या वर्षी पहिला इंग्रजी सिनेमा पाहिला. मला सिनेमाचं व्यसन लागलं होतं. दांड्या मारून सिनेमा पाहायचो’, अशी आठवण नलावडेंनी यावेळी सांगितली. ते पुढे म्हणाले, ‘आता २५ वर्षांनी मला जाणवतं की तेव्हा सिनेमा पाहिला म्हणून आज सिनेमा समजायला लागला. माझे काका आणि मी चोरून सिनेमा पाहायचो. पुढे माझ्या मामांमुळे माझं व्यसन वाढलं. तेव्हा आपल्याकडे हॉलिवूडसारखा सिनेमा का होत नाही? असा प्रश्न पडला. हॉलिवूडमधलं वातावरण (अॅम्बियन्स) खरं असतं. तसं आणायचा प्रयत्न मग मी ‘श्वास’मध्ये केला. त्या खऱ्या वातावरणात तुम्ही लोकांना नेलं तर ते भावतं’.

उंचीमुळे भूमिका मिळत नव्हती

सुरुवातीला बेस्टमध्ये काम करत असताना तिथल्या नाटकांमध्ये उंचीमुळेच भूमिका मिळत नव्हती असं नलावडेंनी सांगितलं. त्यांच्या त्या अनुभवाविषयी ते म्हणाले, ‘बीएसटीकडून नाटक करताना राज्य नाट्य स्पर्धेतून दरवर्षी मला सिलेक्ट करायचे आणि काही दिवस तालीम केल्यानंतर मला काढून टाकायचे. माझी उंची कमी असल्याचं कारण द्यायचे. मग मी त्या नाटकांचं बॅकस्टेज करायला लागलो. माझ्या कामाबद्दल कुणाची तक्रार नव्हती. पण मी लहान वाटतो असं सांगायचे. ४ वर्षांनंतर ‘वस्त्रहरण’चे दिग्दर्शक रमेश रणदिवे सेक्रेटरी झाले. त्यांनी दुसरा पेशवा नाटक निवडलं. मला भूमिका मिळणार नाही ही तयारी मी केली होती. पण रणदिवेंनी त्या नाटकातल्या ८० वर्षांच्या म्हाताऱ्या माणसाची विनोदी भूमिका मला दिली. त्यावेळी इतर कुणालाच पुरस्कार मिळाला नाही. पण मला रौप्यपदक मिळालं. तुमच्याकडे असलेली क्वालिटी कशी वापरायची हे तुम्हाला कळायला हवं’.

‘अथ मानूस जगन हं’साठी डॉ. लागूंचा आग्रह!

‘अथ मानूस जगन हं’ हे नाटक डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलं होतं. त्यांनी पैसे देऊन नाटकाचे ५० प्रयोग करायला लावले होते. त्यानंतर लागूंनी तेंडुलकरांना सांगितलं होतं ते नाटक बघायला. लागूंनी एकदा मला सांगितलं होतं की तुझं डिक्शन खूप चांगलं आहे. ती एक छान कॉम्प्लिमेंट होती. पण या नाटकाविषयी म्हणाल तर हे नाटक खरंतर लोकांनी छतावर उभं राहून पाहायला हवं. युद्ध हवं की शांती असा त्याचा विषय होता. त्यामुळे ते नाटक खूप महत्त्वाचं ठरलं. आणि श्रीराम लागूंसोबत ‘अग्निपंख’ नावाचं आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक केलं. त्यामुळे मी लागूंना खूप मानतो’, अशी आठवण अरुण नलावडेंनी यावेळी सांगितली.

Arun Nalawde
अरुण नलावडे

‘प्रशांत दामलेकडून मी टायमिंग शिकलो’

दरम्यान, आपण ‘प्रशांत दामलेकडून टायमिंग शिकलो’, असं नलावडेंनी न विसरता सांगितलं. प्रशांत दामलेंबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘आम्ही दोघं बेस्टमध्ये काम करत असताना मी प्रशांतकडून टायमिंग शिकलो. तो सतत मला काम करायला सांगतो. माझा रोल खुलवण्यासाठी तो सल्ले द्यायचा. त्याला अॅडिशन आवडतात. मग तो मला सांगायचा त्या घ्यायला. आमचं नाटक ‘चार दिवस प्रेमाचे’मध्ये शेवटचा गंभीर सीन होता. प्रशांतने तो करावा असं मला वाटलं. त्याला सांगितलं तर त्याची चलबिचल झाली. पण त्याने तो केला. नंतर त्यालाच वाटलं की आपण काहीतरी वेगळं करू शकलो.’

‘१३ दिवस प्रेमाचे’ची ब्लॅक कॉमेडी!

‘ब्लॅक कॉमेडी असल्यामुळे मला ती आवडली. त्यात मला मिळालेला रोल मला फार आवडला. हा रोल थोडा निगेटिव्ह पण हिलेरियस आहे. त्यामुळे ते नाटक चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. ब्लॅक कॉमेडी कळणं हे फार महत्त्वाचं असतं. ती करणाऱ्याला कळलं पाहिजे. कारण त्यातला स्वर सापडला नाही, तर ते नॉर्मल नाटक वाटतं. अलिकडच्या काळात अशा ब्लॅक कॉमेडी फार कमी आहेत’, अशी खंत यावेळी अरुण नलावडेंनी बोलून दाखवली.

तर ‘सिम्बा’मध्ये अरुण नलावडे दिसलेच नसते!

सुरुवातीला ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंगसोबत काम करण्याची आलेली ऑफर अरुण नलावडेंनी नाकारील होती. त्याचा किस्सी सांगताना ते थेट ‘सिम्बा’च्या सेटवर जाऊन पोहोचले. ‘अतिशय अचानक आलेलं काम होतं ते. आणि मी आल्या आल्या सांगितलं होतं मला जमणार नाही. पण परत १५ मिनिटांनी तिकडून पुन्हा फोन आला आणि त्याने आग्रह केला. ते भाव खाऊन जाणारं कॅरेक्टर होतं. मग मी इथलं शूटिंग अॅडजस्ट केलं. त्यानुसार मी दिवसा इथे मुंबईत शूट करायचो आणि रात्री हैदराबादला जाऊन शूट करायचो. फ्लाइटने ५ दिवस मी तसंच करायचो’ असं त्यांनी सांगितलं.

‘मराठी थिएटर हे तर माझं माहेर’

मराठी थिएटरविषयी बोलताना अरुण नलावडे म्हणाले, ‘याआधीही मला हिंदीमध्ये बोलावलं. पण रोल न आवडल्यामुळे मी केले नाहीत. सिम्बामध्ये मला तसा रोल मिळाला. त्यामुळे मी तो केला. पण हिंदीत जरी गेलं तरी मराठी थिएटर करत राहिलं पाहिजे. कारण तो माझा व्यायाम आहे. तो मला प्रोत्साहन देतो. त्यामुळे मी हिंदीत जाईन, पण माझी मराठी रंगभूमीशी नाळ तुटणार नाही. मराठी हे माझं माहेर आहे आणि हिंदी हे माझं सासर आहे’.

ऑस्करमध्ये ज्युरीने दिलेली वेगळी दाद!

यावेळी अरुण नलावडेंनी ऑस्करमध्ये एका ज्युरीने दिलेली वेगळी दाद सांगितली. ते म्हणाले, ‘शेवटच्या शोच्या वेळी एका १५० लोकांच्या थिएटरमध्ये शो लागला होता. आम्ही थांबलो तिथून एका लॉबीमधून सगळे जात होते. त्याच्याच पलिकडे एक जपानी महिला आणि वयस्कर अमेरिकी महिला उभी होती. त्यातून ती जपानी महिला आमच्याकडे येऊन गुपचूप म्हणाली ‘मी सांगेन त्यावर काहीही रिअॅक्ट करू नका. माझ्यासोबत उभी असलेली अमेरिकी महिला ज्युरी आहे आणि तिला तो सिनेमा आवडला असल्याचं तिने मला तुम्हाला सांगायला सांगितलं आहे!’ एवढं बोलून ती निघून गेली’.

‘श्वास’साठी बूट पॉलिशवाल्यानंही मदत केली!

‘श्वास’ सिनेमा ऑस्करसाठी गेला तेव्हाच्या आठवणी यावेळी अरुण नलावडेंनी शेअर केल्या. ‘श्वास’ ऑस्करसाठी नेला तेव्हा पहिली अडचण आर्थिक आली. तेव्हा समाजातल्या अनेक लोकांनी मदत केली. अगदी शाळेत कंदील बनवणारे शाळकरी विद्यार्थी, कलर पेंटिंग करणारे ते अगदी बूट पॉलिश करणाऱ्या लोकांनी देखील मदत केली. आम्ही कुठेही सांगितलं नव्हतं की आम्हाला मदत करा. पण माध्यमांनी आम्हाला केलेल्या सपोर्टमुळे वातावरण तयार झालं. संपूर्ण अमेरिकेत ४८ आणि त्यातले हॉलिवूडच्या थिएटरमध्ये ११ शो केले. ३ फेस्टिव्हलमधल्या एका फेस्टिव्हलला आम्हाला ऑडियन्सचा पोल देखील मिळाला’.

‘श्वास’साठी लोकांनी दिलेले पैसे गरीबांना वाटले!

‘तेव्हा आम्हाला वाटलं की जमा झालेला पैसा सिनेमासाठी आहे. त्यातून नवीन सिनेमा बनवू. पण मला नाही वाटलं असं. मला वाटलं हा लोकांनी दिलेला पैसा लोकांपर्यंतच गेला पाहिजे. मग ज्यांना खरंच आर्थिक गरज आहे त्यांना शोधून पैसे वाटूयात. मग आम्ही २२ सामाजिक संस्थांची यादी बनवली. त्या संस्थांना निळू फुलेंच्या हस्ते निधी दिला. त्यातला सर्वात मोठा निधी ३५ लाख रुपये शासनाच्या चित्रपट विभागाला दिला. तेव्हा निळू फुले म्हणाले होते की ‘शासनाला लाज वाटली पाहिजे. शासनाने लोकांना पैसे द्यायला हवेत, तर लोकांनीच शासनाला पैसे दिले’!

चिमुरडीला दिलं ३ वर्षांचं आयुष्य!

यावेळी नलावडेंनी एक भावूक करणारी आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘ज्या गावात ‘श्वास’चं शूट केलं, तिथे एक अडीच वर्षांची मुलगी होती. तिच्या डोळ्याला इजा होती. तिचे वडील तिच्यावर उपचार करायला तयार नव्हता. तेव्हा त्या मुलीच्या नावाने ३ लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट केले. नायर हॉस्पिटलच्या डीनसोबत बोलून ऑपरेशन केलं. मुलीचा एक डोळा वाचवला. त्यानंतर ती अडीच-तीन वर्ष जगली. पण मुलीच्या घरच्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे डोळ्याचं इन्फेक्शन दुसऱ्या डोळ्याकडे सरकलं. आणि त्यामध्ये ती गेली. पण आम्ही तिला ३ वर्षांचं आयुष्य देऊ शकलो जे फक्त २ ते अडीच महिने होतं. याचंच आम्हाला समाधान आहे’.

‘बाईमाणूस’ सिनेमा कुठे अडकला?

‘बाईमाणूस’ सिनेमाविषयी अरुण नलावडेंनी निर्मात्यांविषयी नाराजी बोलून दाखवली. ‘तो सिनेमा अजून रिलीज झालेला नाही. कविता महाजनांच्या ब्र कादंबरीवर आधारीत आहे. त्याला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. पण निर्मात्यांचं म्हणणं आहे ते तुम्हीच पाहा. प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. ती जबाबदारी निर्मात्यांची आहे. त्यामुळे एक चांगला सिनेमा मागे राहिला आहे. आता तो चॅनेलच्या माध्यमातून सर्वांसमोर येईल’, असं ते म्हणाले.

‘श्वास’च्याही एक पाऊल पुढे ‘वारसा’

‘श्वास’च्याही पुढे एक पाऊल टाकून वारसा या सिनेमावर आता काम केलं आहे. नागपूरला रामभाऊ इंगळे म्हणून आहेत. वेश्यांच्या मुलांवर संस्कार करण्याचं काम ते करतात. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या सिनेमात आहे. तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फिरतोय. पुढच्या वर्षीपर्यंत येईल तो कदाचित थिएटरमध्ये’, असं ते म्हणाले.

‘पु. ल. नव्या पिढीत राहायला हवेत’

यावेळी पु. ल. देशपांडे यांचं साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘पु. ल. देशपांडेंसोबत असणाऱ्या मधु गानू यांनी पु.लं.च्या कार्यक्रमाबाबत मला सांगितलं होतं. त्यांनी संहिता लिहिली होती. तेव्हा पुण्यात यशवंतरावमध्ये मी तो ३ तासांचा कार्यक्रम केला होता. त्याच्या एका प्रयोगादरम्यान एक महिला तिच्या छोट्या मुलीला घेऊन आली होती. तिच्या मुलीला पु.ल. माहीत नव्हते. कार्यक्रम पाहिल्यानंतर ती छोटी मुलगी भारावून गेली आणि पु.लं.चं सगळं साहित्य वाचण्याचा हट्ट तिने धरला. त्यामुळे या नव्या पिढीमध्ये पु.ल. राहावेत असं मला वाटतं. आणि ती आजच्या तरूण पिढीची जबाबदारी आहे’, असं ते म्हणाले.

‘माझ्या मुंबईत कधीकाळी शिस्त होती!’

यावेळी अरुण नलावडे यांनी मुंबईत वाढत असलेल्या बेशिस्तीवर देखील भाष्य केलं. ‘मुंबईने मला कुटुंबच दिलं आहे एक. मला मुंबईत सुरक्षितपणे भटकता येतं. बाहेर फिरल्यावर मुंबई किती सुरक्षित आहे हे कळतं. शिवाय मुंबईत मला कुठेही आणि कधीही बाहेर खायला मिळतं. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने स्वच्छंदी जीवन जगता येतं. पण हल्ली मुंबईत बेशिस्त खूप वाढली आहे. कारण १० वर्षांपूर्वी माझ्या शहरातल खूप शिस्त होती. शिवाय आपल्याकडे कायदे असून ते पाळले जात नाही. आपण जर अमेरिकेत शिस्तीने वागत असू, तर मग मला माझ्या देशात का नाही शिस्तीने वागता येत?’, असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.

पाहा संपूर्ण मुलाखत:

'वादळवाट', 'श्वास'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अरूण नलावडे…

#Live : 'वादळवाट', 'श्वास'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अरूण नलावडे…एक अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, निर्माते म्हणून कसे घडले अरूण नलावडे? विचारा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आणि घ्या थेट उत्तरं! | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, January 11, 2019

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here