घरफिचर्समन्नादा...

मन्नादा…

Subscribe

दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर ही नावं बाजूला काढली तरी तेव्हाच्या सिनेमासंगीताच्या त्या संपूर्ण सुवर्णकाळातच पुरुष गायक म्हणून महंमद रफी, मुकेश आणि किशोरकुमार ही एक अभेद्य तटबंदी होती, पण ती तशी अभेद्य तटबंदी असतानाही मन्ना डेंनी स्वत:च्या गाण्यांचं वेगळं वलय निर्माण केलं आणि आपली गाणी अजरामर केली यातच मन्ना डेंच्या गायकीचं महत्त्व कळून येतं आणि वेगळेपणही कळून येतं.

दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांच्या सिनेसृष्टीतल्या त्रिवेणी साम्राज्याचा तो काळ. या त्रिकुटाने तेव्हा भारतातल्या सिनेमासृष्टीत भक्कमपणे पाय रोवले होते. त्यांचे कथा-पटकथेतले, गाणं बजावण्यातले, कलादिग्दर्शनातले, प्रसिध्दीतंत्रातले खेळगडी ठरलेले असायचे. त्यात दुसर्‍यातिसर्‍याला शिरायला अजिबात वाव नसायचा. उदाहरणच द्यायचं किंवा स्पष्टपणे सांगायचं तर गाणं बजावण्यात महंमद रफी, मुकेश आणि किशोरकुमार ही नावं त्यांच्यासाठी ठरलेली असायची. त्यांच्या नावावर फुली मारून तिसरं कुणीतरी गाणं बजावण्यासाठी बोलावणं हे तेव्हा त्यांच्यासाठी कधीच मंजूर नसायचं. या अशा काळात मन्ना डे नावाच्या गायकाने मन्ना डे अशी स्वत:ची ओळख निर्माण केली होती, मन्ना डे नावाचा स्वत:चा प्रांत निर्माण केला होता हे आवर्जुुन सांगावं लागेल.

दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर ही नावं बाजूला काढली तरी तेव्हाच्या सिनेमासंगीताच्या त्या संपूर्ण सुवर्णकाळातच पुरुष गायक म्हणून महंमद रफी, मुकेश आणि किशोरकुमार ही एक अभेद्य तटबंदी होती, पण ती तशी अभेद्य तटबंदी असतानाही मन्ना डेंनी स्वत:च्या गाण्यांचं वेगळं वलय निर्माण केलं आणि आपली गाणी अजरामर केली यातच मन्ना डेंच्या गायकीचं महत्त्व कळून येतं आणि वेगळेपणही कळून येतं. खरंतर तो जमाना गायकाने एखाद्या अभिनेत्याचा आवाज उर्फ व्हॉइस बनण्याचा, ठरण्याचा होता. जसं की मुकेश हे राज कपूरचा आजन्म व्हॉईस ठरले होते. मन्ना डे असे कधीच कुणाचे व्हॉइस ठरले नाहीत, पण जिथे जिथे काही ना काही कारणामुळे महंमद रफी, मुकेश आणि किशोरकुमार या नावांवर फुली मारली गेली तिथे मन्ना डे हे नाव आपसुक पुढे आलं. त्याला तसंच एक कारण होतं ते म्हणजे मन्ना डेंच्या गाण्यात सामावलेला शास्त्रीय संगीताचा अभिजात बाज. तो त्या वेळी फार फार तर महंमद रफींकडे होता, पण इतरांकडे तसा असण्याचं कारण नव्हतं.

- Advertisement -

साहजिकच अशा वेळेस मन्ना डेंना बोलवण्यावाचून निर्माते-दिग्दर्शकांपुढे दुसरा पर्याय नव्हता. ‘मेरी सुरत तेरी आँखे’मधलं ‘पुछो ना कैसे मैने रैन बितार्ई’ , ‘मेरे हुजूर’मधलं ‘छम छम बाजे रे पायलिया’ , ‘तलाश’मधलं ‘तेरे नैना’ यासारखी गाणी गाण्यासाठी मन्ना डेंच्या नावाला वरची पसंती मिळणं साहजिक होतं. मन्ना डे हे नाव त्या काळात सिनेसंगीतात मशहूर झालं हे खरंच आहे, पण ते तसं झालं नसतं तर ते नाव त्या वेळी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात हमखास पुढे आलं असतं, असं तेव्हा मन्ना डेंच्या बाबतीत सर्रास म्हटलं जायचं. मन्ना डेंच्या बाबतीत हे असं म्हटलं जाणं यातच मन्ना डेंच्या गाण्यातलं सामर्थ्य कळून यायचं. मन्ना डेंनीही जिथे जिथे त्यांना अशी रागदारीवर आधारलेली गाणी गाण्यासाठी पाचारण केलं गेलं तिथे त्यांनी त्या गाण्याचं सोनं केलं. याचं सवार्र्त मोठं आणि सर्वात ठळक उदाहरण द्यायचं ते ‘दिल ही तो हैं’मधल्या ‘लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे’ या गाण्याचं. हे गाणं हा मन्ना डेंच्या सिनेसंगीतातल्या गायकीचा परमोच्च बिंदू ठरावा. रागदारी गायनाचा असाच नजराणा मन्ना डेंनी पेश केला आहे तो मराठीतल्या ‘वरदक्षिणा’ या सिनेमात. या सिनेमातलं ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ हे गाणं मन्ना डेंनी इतक्या ताकदीने गायलं आहे की या कलावंताचा शास्त्रीय संगीताशी घरोबा आहे हे कुणालाही सहज कळून येतं.

मन्ना डेंचा शास्त्रीय संंगीताशी घरोबा होेता हे खरंच होतं. मन्ना डेंना शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यासाठी कुठेही दूर जावं लागलं नाही. ते त्यांना त्यांच्या घरातच मिळालं. कृष्णचंद्र डे म्हणजे के.सी.डे हे त्या काळातले प्रसिध्द गायक हे मन्ना डेंचे काका. त्यांच्याच तालमीत प्रबोधचंद्र पूर्णचंद्र डे म्हणजेच मन्ना डे हा त्यांचा पुतण्या तयार झाला. ते काका-पुतणे होतेच, पण त्या नात्यानंतर त्यांचं आणखी एक नातं होतं ते गुरू-शिष्याचं. सैगलचा दबदबा असलेल्या त्या काळात के.सी.डेंच्या गाण्यांच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नव्हती. त्या काळात मन्ना डेंनी जेव्हा गाणं सुरू केलं तेव्हा के.सी. डेंचा पुतण्या अशी मन्ना डेंची जिथे तिथे ओळख होती, पण पुढे मन्ना डेंनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि ही ओळख पुसली गेली. मन्ना डे हा के.सी.डेंचा पुतण्या ही ओळख के.सी.डे हे मन्ना डेंचे काका अशी नव्वद अंशाच्या कोनात साफ बदलून गेली. मन्ना डेंच्या ओळखीने पार यू-टर्नच घेतला. तोपर्यंत मन्ना डे नावाचा गायक शास्त्रीय संगीतावर आधारलेली सिनेमातली गाणी अतिशय ताकदीने गातो हे मन्ना डेंचं कर्तृत्व सिनेसृष्टीत सर्वदूर पसरलं.

- Advertisement -

मन्ना डेंच्या याच प्रसिध्दीमुळे, ‘बसंतबहार’मधल्या ‘केतकी गुलाब जुही चंपक बन झुले’ या शास्त्रीय संगीतावर आधारलेल्या गाण्यासाठी जेव्हा पंडित भीमसेन जोशींना बोलवण्यात आलं तेव्हा त्यांच्याबरोबर गाण्यासाठी कुणाला बोलवायचं या प्रश्नावर चर्चा सुरू झाली तेव्हा शंकर-जयकिशनना फार विचारात पडावं लागलं नाही. त्यांनी तत्काळ मन्ना डेंच्या नावावर त्या गाण्यासाठी शिक्कामोर्तब करून टाकलं…आणि हे गाणं जेेव्हा प्रत्यक्षात गायलं गेलं तेव्हा पंडित भीमसेन जोशींनी जी प्रतिक्रिया दिली त्यातच मन्ना डेंच्या गाण्याची थोरवी कळून आली. भीमसेन जोशीं म्हणाले, ‘आज एका सच्च्या गायक कलाकाराबरोबर गाणं गायला मिळालं याचा मला नक्कीच आनंद वाटतो आहे!’ मन्ना डे हे भीमसेन जोशींसारख्या सामर्थ्यशाली नावासमोर गाताना कुठेही कमी पडले नव्हते, म्हणूनच भीमसेन जोशींनी त्यांच्या गाण्याची तारीफ केली होती.

मन्ना डेंंंच्या गाण्यावर शास्त्रीय संगीताचा शिक्का जरी बसलेला होता तरी सिनेमातली गाणी गाताना त्यांनी आपल्या गाण्यात वेळप्रसंगी लवचिकताही दाखवली होती. शास्त्रीय संगीताच्या चौकटीत त्यांनी आपलं गाणं बदिस्त करून टाकलं नव्हतं हा मन्ना डेंच्या गाण्याचा विशेष होता. म्हणूनच तर ‘चलती का नाम गाडी’मधल्या गाण्यात मन्ना डे ‘मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा’ असा कातरलेल्या आवाजात गमतीदार प्रश्न करू शकले. म्हणूनच तर ‘तिसरी कसम’मधलं ‘पिंजडेवाली मुनिया’ हे रांगडं आणि कलंदर लोकगीत मन्ना डे तशाच रांगडेपणाने गाऊन लोकप्रिय करू शकले…आणि म्हणूनच तर ‘पडोसन’मधलं ‘एक चतूर नार कर के सिंगार’ हे चतूर गाणं गाताना तितकंच अतरंगी गाऊ शकले.

मन्ना डेंचे काका के.सी.डे कोलकात्याहून मुंबईत आले, पण काही काळानंतर त्यांना कोलकात्याला परतावं लागलं, मन्ना डे मात्र मुंबईतच वास्तव्य करून राहिले, त्यांच्यावर कोलकात्यात परतण्याची बला आली नाही, हे मन्ना डेंच्या या चतुरस्त्र गायकीचं यश होतं हे सांगायला नकोच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -