घरफिचर्सएस.आय.पी.- बचत-वृद्धीचा महामार्ग

एस.आय.पी.- बचत-वृद्धीचा महामार्ग

Subscribe

एस.आय.पी. म्हणजेच सिस्टेमिक इन्व्हेस्टमेंट प्लान.एसआयपी हा एक शब्द अधिक सोपा आणि म्हणून लोकप्रिय आहे. अशा प्रकारच्या संकल्पनेची - पद्धतशीर गुंतवणूक नियोजन - त्यावर आधारित योजनेची वैशिष्ट्ये पाहूया.

म्युच्युअल फंड हे एक नवीन गुंतवणूक साधन आपल्याकडे आता बर्‍यापैकी रुजले-रुळले आहे. जे साधन सर्वसाधारण ग्राहक-गुंतवणूकदार यांच्या हिताचा आणि सोयीचा-समृद्धीचा विचार करते, तेच साधन टिकते आणि त्याला लोकाश्रयदेखील मिळतो. हे पूर्वीदेखील बँक आणि पोस्ट बचत आणि ठेवी योजनांबाबत घडलेले आहे, किंबहुना आजही घडते आहे. कोणतीही बचत-ठेव योजना जाहीर करताना ग्राहक अपेक्षा आणि गरजा यांचा प्राधान्याने विचार केला जातो. बाजारात येणारे कोणतेही उत्पादन घ्या ! ते तुमची-आमची गरज भागवणारे असले, तरच त्याला उत्तम प्रतिसाद मिळून चांगली ‘विक्री’ आणि त्याकारणाने नफा होऊ शकतो. कोणताही उद्योजक वा उद्योगपती स्वतःला हवे म्हणून कोणतेही साधन बाजारात आणत नाही. हाच नियम सेवा-सुविधांबाबत लावला जातो.

एस.आय.पी. म्हणजेच सिस्टेमिक इन्व्हेस्टमेंट प्लान.एसआयपी हा एक शब्द अधिक सोपा आणि म्हणून लोकप्रिय आहे. अशा प्रकारच्या संकल्पनेची – पद्धतशीर गुंतवणूक नियोजन – त्यावर आधारित योजनेची वैशिष्ट्ये पाहूया. ही योजना ठराविक मुदतीने – बहुधा दर महिन्याच्या हिशेबाने आखली जाते. रक्कम सुरुवातीलाच निश्चित केली जाते. मात्र त्यात गुंतवणूकदार फेरबदल करू शकतो. अमुक योजनेसाठी ही गुंतवणूक असते. व्यक्तिगतरित्या संपत्ती निर्माण करण्यासाठी सोयीस्कर असते. ही शेअर्स खरेदी करण्याकरिता उपयोगात येते. किरकोळ म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहे. यात कधीही सुरु करण्याची आणि बंद करण्याची मुभा असते. शिवाय एकदाच घसघशीत रक्कम गुंतवण्याची गरज नाही. फक्तनियमित आणि निश्चित गुंतवणे महत्त्वाचे आहे. बाजारातील चढ-उताराची शंका-धास्ती आणि टेन्शन घेण्याची गरज नाही. व्यवहारिक निकष आणि मूल्यमापनाचा आधार असतो. इथे छोट्या बचतीतून मोठी बचत साधता येते.

- Advertisement -

एसआयपी करण्याचे फायदे :-

१) आपल्या सोयीने प्रतिमाह निश्चित रक्कम गुंतवण्याची सोय.

२) पारंपारिक गुंतवणूक साधनांपेक्षा प्रभावी आणि लाभदायक.

- Advertisement -

३) शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवणे जर का अधिक जोखमीचे वाटत असेल, तर एसआयपी हा तसा सुलभ आणि आपल्याला थेट शेअरबाजाराचा नित्य-नियमित अभ्यास करण्याची जरूर नाही.

४) प्रति महिन्याला निश्चित रक्कम गुंतवण्याची एक शिस्तबद्ध सवय लागते.

५) प्रत्येक महिन्याच्या रकमेतून निश्चित युनिट्सची – शेअर्सची खरेदी.

६) अशी खरेदी करताना चालू न्हाव्ह [NAV]च्या आधारे युनिट्सचे वाटप.

७) एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवण्याची जरुरी नाही, आपल्या पगारातील-उत्पन्नातील ठराविक टक्के रक्कम आपण बाजूला काढून एसआयपीची दर महिन्याची रक्कम ठरवू शकता, अर्थात ती वाढवण्याची किंवा कमी करण्याची सोय असते.

८) दर महिन्याला म्यु.फंडाच्या एसआयपीत गुंतवण्याची रक्कम स्वतः नेवून भरण्याची किंवा कोणामार्फत पाठवण्याची गरज नाही. त्याऐवजी आपल्या बँक-खात्याला तसे पैसे ट्रान्सफर करण्याची -अमुक स्कीममध्ये भरण्याची सूचना -निर्देशन दिले ,तर खात्यातून अमुक तारखेला ठराविक रक्कम थेट एसआयपीमध्ये जमा करण्याची सोय- (AUTO-DEBIT), अर्थात तशी कायमची सूचना बँकेला देणे जरुरीचे असते. (जसे बँक रिकरिंग खाते उघडल्यावर ठरलेले पैसे ठरलेल्या तारखेला ट्रान्सफर केले जातात, तशीच पद्धत येथेही अवलंबली जाते. किंवा ज्याप्रकारे होम लोन किंवा पर्सनल लोनचे हफ्ते दर महिन्याला कसे कापले जातात, तसे होऊ शकते.)

एसआयपीमध्ये आपण पैसे कसे गुंतवावे?

१) एखाद्याला एसआयपीमध्ये पैसे गुंतवून बचत आणि अन्य हेतू साध्य करायचे असतील तर उपलब्ध असलेल्या म्यु.फंड कंपनीच्या अनुरूप अशा एसआयपी योजनेची निवड करता येईल.

त्याकरिता वेबसाईट, जाहिरात आणि अन्य माध्यमातील माहिती तसेच अधिकृत माहितीपत्रक वाचावे. किंवा गुंतवणूक तज्ज्ञ सल्लागार किंवा कंपनीच्या अधिकृत मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घ्यावे.
वाटल्यास अन्य म्यु.फंडाची तशाच प्रकारची समांतर योजना असल्यास पडताळून पहावे. सुदैवाने हल्ली वर्तमानपत्र-मासिके ह्यातून सातत्याने ताजी माहिती उपलब्ध होत असते, तिचा जरूर वापर करावा.

२) ह्यात आधी सांगितल्याप्रमाणे एकरकमी पैसे गुंतवावे लागत नाहीत. आपल्याला जी रक्कम बचतीसाठी बाजूला काढायची आहे, तो आकडा निश्चित करून प्रति महिन्याची एसआयपीची रक्कम निश्चित करता येते. एसआयपीचा मासिक आकडा नक्की करताना तुमची मासिक कमाई आणि नित्य खर्च ह्याचे आकडे मांडून बघा. सगळे खर्च बाजूला काढून किती पैसे शिल्लक राहू शकतात आणि तितकेच पैसे प्रत्येक महिन्याला बाजूला राहतील का?याचा पक्का अंदाज घ्या आणि नंतरच एसआयपीची रक्कम ठरवा.

३) कोणत्याही गुंतवणुकीच्यावेळी जसा आपण जोखीम, लाभ आणि सुरक्षितता ह्यांचा समग्र विचार करतो, तसा करून योग्य म्यु.फंड कंपनी आणि त्यांची योजना निवडावी.

४) एसआयपी ही शक्यतो दीर्घकाळासाठी असावी. किमान कालावधी ६ महिने असावा. किमान रक्कम -रु. ५०००/च्यावर

५) तुमची एसआयपी योजना दर महिन्याच्या कोणत्या तारखेला असावी याचा विचार करा. कारण त्या तारखेला तुमच्या खात्यात तितकी रक्कम असली पाहिजे शिवाय बँकेच्या नियमानुसार किमान रक्कम. सोबत तुम्हाला जे नियमित मासिक उत्पन्न (पगार/उद्योग उत्पन्न/व्याज किंवा अन्य प्रकारचे उत्पन्न) येत असेल, ती तारीख जर निश्चित आणि नेमकी असेल, तर त्यानंतरची एखादी तारीख तुम्ही एसआयपीचा हफ्ता कापून घेण्यासाठी ठरवू शकता. दोन्ही तारखांमध्ये थोडी ग्याप – अंतर ठेवले तर कधी पैसे येण्यास उशीर झाला, म्हणून पंचाईत नको व्हायला. अशा काही प्रॅटिकल गोष्टीची काळजी आपल्याला घ्यावी लागते. उदाहरणार्थ :- तुमचा पगार जर दर महिन्याला ५ तारखेला होत असेल तर तुम्ही एसआयपीसाठी ७ किंवा १० तारीख देणे सोयीचे असेल.

६] के.वाय.सी.ची पूर्तता – हल्ली बँक खाते असो, कीनवीन गुंतवणूक, त्याकरिता व्यक्ती म्हणून तुमची ओळख, पत्ता ह्याबाबत पुरावा देणारी कायदेशीर कागदपत्र देणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ – पॅनकार्ड, आधारकार्ड, फोटोज, बँकेत खाते असल्याचा पुरावा, राहण्याच्या जागेबाबत पुरावा.

के.वाय.सी.ची कागदपत्रे बँक – म्युच्युअल फंड किंवा तत्सम अर्थ आणि गुंतवणूकविषयक संस्थांना देणे हे आपण गुंतवणूकदार म्हणून आपल्याच हिताचे असते. कारण पुढे-मागे कोणी बनावट कागदपत्रे देवून आपल्या खात्याचा-गुंतवणुकीचा गैरफायदा घेवू शकतो. फसवणूक किंवा काळ्या पैशातील गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार होण्यापासून प्रतिबंधक उपाय म्हणून अशी व्यक्तिगत कागदपत्र देणे जरुरीचे असते. पुढील भागात एस.आय.पी.बाबत अधिक माहिती आणि के.वाय.सी तपशीलात पाहूया.

 


– राजीव जोशी

(लेखक बँकिंग आणि अर्थविषयक अभ्यासक आहेत)

————————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -