घरमहाराष्ट्रनाशिकमानवी आरोग्याचे षडरिपू

मानवी आरोग्याचे षडरिपू

Subscribe

बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे आणि मृत्यूचेही प्रमाण वाढते आहे. त्यात हृदयविकार, मधुमेह, किडनी विकार, कर्करोग, संसर्ग आणि अपघात ही सहा मृत्यूची प्रमुख कारणं मानली जातात. आज (७ मार्च) जागतिक आरोग्य दिनानिमित्त या आजारांचा, त्यांच्या कारणांसह लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधच्या अनुषंगाने घेतलेला हा वेध...

किडनी विकार (डॉ. नागेश अघोर)

इंडियन क्रॉनिक किडनी डिसिज रजिस्ट्रीनुसार ‘किडनी फेल्युअर’च्या प्रमुख कारणांमध्ये ३३ टक्के वाटा मधुमेहाचा व १५ टक्के वाटा उच्च रक्तदाबाचा आहे. हे सारे बदललेल्या जीवनशैलीशी निगडित आहे. रक्त आणि लघवीच्या साध्या तपासण्या मूत्रपिंड विकारासाठी खूप महत्त्वाच्या. त्यात युरिया, क्रिएटिनिन, हिमोग्लोबिन व युरिक अ‍ॅसिड या तपासण्या प्रामुख्याने करतात. किडनी विकारांचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक ५ व्यक्तींमागे एकाला किडनीचा त्रास आढळून येतो.

- Advertisement -

कारण : * वेदनाशामक औषधांचे अतिसेवन * व्यसनी, मधुमेही आणि ६० वर्षांवरील व्यक्ती *  उच्च रक्तदाबाचे रुग्ण * मुतखडा वारंवार होणार्‍या व्यक्ती * मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा होता असे रुग्ण * लहानपणी मूत्रपिंड विकार झालेले वा मूत्रपिंड विकाराची आनुवंशिकता * उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रुग्ण * अ‍ॅनिमिया व उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी असलेल्या व्यक्ती.

लक्षणे : * हळूहळू थकवा येणे * अशक्तपणा * वजन कमी होणे * भूक कमी लागणे * रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे * सारखे लघवीला जावे लागणे * काही जणांमध्ये अंगावर व चेहऱ्यावर थोडी सूज येणे * लघवीचा रंग लाल दिसणे * कोरड्या उलट्या होणे.

- Advertisement -

उपचार : * मूत्रपिंड विकार झालेल्या प्रत्येक रुग्णाला डायलिसिस करावाच लागतो असे नाही परंतु या रुग्णांना उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे इतर आजार, जंतूसंसर्ग यादृष्टीने काळजी घ्यावी लागते * मूत्रपिंड विकार लवकर लक्षात आले व वैद्यकीय काळजी घेतली तर आजार नियंत्रणात राहून डायलिसिस लांबवणे शक्य होते * लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत मूत्रपिंडाच्या कार्यावर दुष्पपरिणाम झालेला असतो * औषधोपचार

प्रतिबंध : * दररोज तीन लिटरपेक्षा अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी पिणे * नियमित व्यायाम * वजन नियंत्रणात ठेवणे *जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे * मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी मधुमेह वा उच्च रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवा * घरात मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा लहानपणी मूत्रपिंड विकार होऊन गेला असेल, मुतखडा, लघवीचा जंतूसंसर्ग असेल किंवा अंगावर सूज येत असेल तर वर्षातून एकदा तरी मूत्रपिंडाचे कार्य तपासणे * समतोल आहार व पुरेसे पाणी पिणे * वजन वाढू न देणे * धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहणे * स्वत:च्या मनाने डोकेदुखी, अंगदुखी, अॅसिडिटीसाठी दीर्घकाळ वेदनाशामक गोळ्या न घेणे.


मधुमेह (डॉ. तुषार गोडबोले)

मधुमेह हा सुरुवातीला लक्षात न येणारा आजार आहे. त्याची कोणतीही लक्षणे नसतात. मधुमेह झाला म्हणून घाबरुन न जाता त्याचा सामना केला पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून वेळच्या वेळी तपासण्या, जीवनशैलीमध्ये बदल त्याचबरोबर धावणे, चालणे, सायकलिंग यांसारखे व्यायाम नियमित करुन या मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

कारणे : * टाईप-१ मधुमेहात शर्करा नियंत्रणासाठी फक्त इन्सुलिन काम करते. गोळ्या निष्प्रभ ठरतात. * टाईप-२ मध्ये जीवनशैलीत बदल करणे * तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घेणे  * टाइप -१ मधुमेह शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे होतो. * टाइप-२ मधुमेह इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम झाल्याने उद्भवतो * लठ्ठपणा हे टाइप-२ मधुमेहाचे प्रमुख कारण * स्थुलतेमुळे इन्सुलिन निर्मितीस बाधा पोहोचून मधुमेहाचे प्रमाण वाढते * अनुवांशिकता (कुटुंबात आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहीण यांपैकी कुणाला मधुमेह असल्यास) * अयोग्य आहाराचे सेवन (अधिक कॅलरीयुक्त आहार, फास्टफूड, जंकफूड, मिठाई, बेकरीचे पदार्थ, शीतपेये, तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन * भरपेट जेवण्याची सवय * भूक नसतानाही सतत खात राहणे * बैठे जीवनशैली * व्यायामाचा अभाव * मानसिक ताणतणाव * ज्या स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह झाला असल्यास त्यांना पुढील ५ ते १५ वर्षांत मधुमेहाची शक्यता असते. * जन्मतः साडेतीन किलोपेक्षा अधइक वजनाच्या बाळाला जन्म देणाऱ्या महिलांमध्ये मधुमेहाची शक्यता असते.

लक्षणे : * रक्तातील साखरेची चाचणी * वारंवार लघवीला जावे लागणे * तहान लागल्यासारखे वाटणे * अचानक वजन घटणे * अशक्तपणा, चक्कर येणे * अधिक भूक लागणे * हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे * डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे * मुत्रमार्गात संसर्ग * जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे * मळमळ व उलटी होणे.

उपचार : * रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे, मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून रुग्णाचा बचाव करणे, वजन आटोक्यात ठेवणे* उच्चरक्तदाब, हृद्यविकारासारखे विकार होऊ न देणे * त्यासाठी कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे * संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचारामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

प्रतिबंध : * नियमित व्यायाम आणि संतुलित आहार * दररोज किमान ४० ते ४५ मिनिट आवडीचा व्यायाम * आहाराच्या वेळांमध्ये नियमितता आवश्यक असते. * आहारात ताजी फळे, भाज्या, कडधान्ये यांचा समावेश * दोन जेवणांत फार अंतर नको * वजनावर नियंत्रण आणि पुरेशी झोप * मानसिक ताणतणाव असल्यास संगीत, वाचन, ध्यानधारणेचा आधार घ्यावा.


हृदयविकार (डॉ. मनोज चोपडा)

हृदयविकार हा श्रीमंतांचा आजार आहे, अशी आजही अनेकांमध्ये समजूत आहे. प्रत्यक्षात भारतात हृदयरोग्यांची संख्या मोठी असून, जगात सर्वाधिक आहे. भारतातील ३५ ते ५५ या वयोगटातील व्यक्तिंमध्ये हृदयविकाराचा त्रास जास्त संभवतो. निदान आणि उपचार पद्धती दिवसेंदिवस उच्च दर्जाच्या उपलब्ध होत असल्या तरीही, त्रास उद्भवल्यास जगण्यावर काही बंधनं येतात. त्यामुळे हृदयविकार होण्यापूर्वीच हृदयाची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी आहार आणि जीवनशैलीत बदल केले पाहिजेत.

कारणे : * प्लाक कोलेस्ट्रोल, फायबर टिशू, पांढऱ्या पेशींचे मिश्रण होते आणि शिरांच्या आत हळू हळू रक्त गोठू लागते. परिणामी योग्य पद्धतीने रक्ताभिसरण होत नाही. * त्यातून हृदयाच्या कार्यात अवरोध निर्माण होऊन हृदयाचे कार्य थांबते.

लक्षणे : * छातीत जोरात दुखणे * छातीत दुखण्याने रुग्णाला श्वास घ्यायला त्रास * साधारण काम करतानाही लवकर थकवा येणे * डोकेदुखी, चक्कर येणे, अचानक बेशुद्ध होणे * छातीत दुखणे, दाह होणे, जडपणा जाणवणे * अस्वस्थता * तोंड कोरडे पडणे * थोडे चालल्यास दम लागणे * कोणतेही कारण नसताना हृदयाची गती वाढणे * छातीत जळजळ, वारंवार अॅसिडीटी, गॅसेस, जबड्यात वेदना होणे अशी लक्षणे आढळतात. अनेकदा ही लक्षणे पूर्वसंकेत ठरतात.

उपचार : * हृदयरोगाचा झटका आल्यानंतर शॉक देऊन हृदयाचे कार्य पूर्ववत होऊन रुग्ण वाचू शकतो *कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स किंवा आयसीसीयूची मदत वेळीच मिळाली तर रुग्णासाठी ही मदत जीवनदायी ठरते * हृदयविकार झाल्यास त्याचे परिणाम व उपचार अवघड असतात * कधी रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून द्यावी लागते किंवा आतील चरबी खरवडून काढण्याचाही पर्याय असतो * पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घ्याव्या लागतात.

प्रतिबंध : * सफेद रंगाच्या पदार्थांपासून (दूध, साखर, मीठ, तेल) दूर राहा * अधिकाधिक मोसमी फळे, भाजीपाला आहारात असावा किमान सात तास पुरेशी झोप घ्या *  आठवड्यातून निदान पाच दिवस दररोज ४५ मिनिट जॉगिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग यापैकी कोणताही एक व्यायाम करा * महत्त्वाचे म्हणजे ताणतणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा * ताणतणावाचे वेळीच व्यवस्थापन केल्यास आनंदी जीवन जगता येते * धूम्रपान करू नका * वेळेवर जेवण करा * पौष्टिक तत्वांचा समावेश असू द्या * वजन नियंत्रित ठेवा.


कर्करोग (डॉ. राज नगरकर)

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते.

कारणे : * कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची ठोस कारणे सापडलेली नाहीत. * अर्सेनिक असलेले घटक * तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन * गर्भाशयमुखातील संसर्ग * बदलती जीवनशैली * शेतीमधील किटकनाशकांचा अंश अन्नावाटे सातत्याने शरीरात जाणे * अति तेलकट आहाराने मोठे आतडे, गर्भाशय व प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते * अती मद्यपान, धुम्रपान.

लक्षणे : * शरीराच्या ज्या भागाला कर्करोगग्रस्त पेशींची बाधा होते, त्यानुसार त्याची लक्षणे दिसू लागतात * महिलांमध्ये स्तन, गर्भाशयमुखाचा कर्करोग अधिक आढळतो * मुख, पोट, मेंदू, फुफ्फुस, रक्ताचाही कर्करोग सामान्यपणे दिसून येतो * रक्ताभिसरणातून योग्य त्या जागी कर्ककोशिका पोहोचताच तेथील केशवाहिन्यांच्या भित्तींना चिकटून राहतात. त्या भित्तीतून बाजूच्या ऊतकांमध्ये त्या शिरतात आणि तेथे वाढीसाठी संधी मिळताच अर्बुद (गाठ अथवा पेशींचा समूह) तयार होतो * कर्करोगाचे स्थानिक आक्रमण सुरू असतानाच कर्कपेशी रसवाहिन्यांवाटे व रक्तावाटे पसरत जातात.

उपचार : * कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात * शस्त्रक्रिया आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी या प्रमुख पद्धती * अचूक, वेळेवर निदान आणि नव्या औषधांच्या वापरामुळे ५८ टक्के कर्करोग बरे होतात किंवा नियंत्रणात राहतात * ६३ टक्के कर्करोगग्रस्त रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात.

प्रतिबंध : * वेळेवर व संतुलित आहार * नियमित व्यायाम * तेलकट व बाहेरील पदार्थांचा अतिरेक टाळणे * नियमित आरोग्य तपासणी * शरीरावर गाठ दिसून येताच डॉक्टरांशी संपर्क साधणे * सेंद्रीय पदार्थांना प्राधान्य देणे * मद्यपान, धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे * आहारात ताजी फळे-भाजीपाल्याचा वापर करावा * शितपेयांऐवजी ताज्या फळांचा रस घ्यावा * लठ्ठपणा असल्यास वजन कमी केलेले हितावह.


संसर्ग (डॉ. वैभव पाटील)

प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विषाणुंची लागण होऊन शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व त्यातून वेगवेगळ्या व्याधींची उत्पत्ती होते, अशा स्थितीला संसर्ग म्हणतात. अन्न-पाणी, हवा अथवा प्रत्यक्ष संपर्काद्वारे जे आजार जडतात, त्यांचे स्वरुप हे त्या-त्या विषाणुंनुसार ठरते.

कारण : * एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास त्याला चटकन बाधा होत नाही * दूषित वातावरणाच्या सानिध्यात जाणे * दुषित अन्न-पाणी * डासांद्वारे पसरणारे आजार * दूषित हवेशी संपर्क * हस्तांदोलन * दूषित घटकांशी थेट संपर्क.

लक्षणे : * संसर्गजन्य बाधित रुग्णांमध्ये आजारांनुसार वेगवेगळी लक्षणे * ताप, अंगदुखी सर्वसाधारण लक्षणे * जुलाब, उलट्या * ताप * मूत्रसंसर्ग * श्वासोच्छ्वासास त्रास.

उपचार : * विविध तपासण्यांतून रोगनिदान * विषाणुजन्य बाधेचे नेमके कारण आणि कोणता अवयव प्रभावित झाला त्याचे निदान व उपचार * अधिक गुंतागुंत निर्माण झाल्यास सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची मदत.

प्रतिबंध : * व्यापक जनजागृतीची गरज * रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबाबत लोकांना माहिती दिली जावी * स्वाइन फ्लूसारख्या परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे * हस्तांदोलन टाळणे * संशयित रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे पाठवणे.


अपघात (डॉ. कुणाल जाधव)

भारतात अन्य कोणत्याही कारणापेक्षा रस्ते अपघातांत बळी जाणाऱ्यांचे प्रमाण हे जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे. कधी वाहनचालकांची बेपर्वाई, कधी वाहतूक नियमांचे उल्लंघन, तर कधी रस्त्यांच्या सदोष रचनेमुळे प्रवाशांचे बळी जातात. अशावेळी सावधपणे, नियंत्रित वेगात वाहन चालवणे, अपघातग्रस्त व्यक्तीला गोल्डन अवर्समध्ये मिळवून देणे आपल्या सर्वांची जबाबदारी असते.

कारण : * वाहतूक नियमांचे उल्लंघन * मद्य पिऊन वाहन चालवणे * सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर न करणे * रस्त्यांची सदोष रचना * बेफिकीरपणे वाहन चालवणे * सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव.

उपचार : * अपघातग्रस्त झालेल्या जखमी बाबतीत एबीसी (एअरवे, ब्रिदींग व सर्क्युलेशन) या तीन बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर पुढील उपचार सुरू केले जातात * रक्तस्त्राव होत असल्यास तो थांबवून, सिटी स्कॅन, सोनोग्राफी अशा चाचण्या केल्या जातात * अपघातात मेंदू, फुफ्फुस, लिव्हर यांना मार लागलेला असेल तर अशा रुग्णांवर तातडीने उपचार सुरू होणे गरजेचे असते * अपघातग्रस्त व्यक्तीला कमीत कमी वेळात रुग्णालयापर्यंत नेणे.

प्रतिबंध : * दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहनात सीटबेल्टचा वापर * वाहतूक नियमांचे काटेकोर पालन * वाहन चालवताना आजूबाजूच्या परिस्थितीबाबत सजगता * मद्य पिऊन वाहन न चालवणे * रस्त्यांची रचना व दर्जानुसार वाहनाची गती राखणे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -