घरफिचर्ससोशल मीडिया एक ‘करोना’

सोशल मीडिया एक ‘करोना’

Subscribe

सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे एक प्रकारचे व्यसन झाल्यामुळे आपल्यामधील अनेकजण सोशल मीडियाच्या दुष्परिणामांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. सोशल मीडियाचे सध्या दुसरे नाव म्हणजे ट्रोलिंग. तुम्ही केवळ एका फोटोमुळे किंवा एका पोस्टमुळे ट्रोल होऊ शकता. 2014 पर्यंत सोशल मीडियाचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सर्वसामान्यांनी केला नव्हता. मात्र, सोशल मीडिया खर्‍या अर्थाने भारतात रुजवला तो भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोंदी यांनी. त्यावेळी आपण सारेच या नव्या मीडियाला नीट ओळखत नसल्याने मोदी यांनी त्याचा खुबीने वापर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केला. त्याचा फायदा त्यांना मिळाला आणि भाजप पर्यायाने नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र, 2019 नंतर काँग्रेससह इतर पक्षांनी त्याच सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत जो मीडिया मोदी यांनी नावारूपाला आणला तोच त्यांच्यावर उलटवला. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. ती दोन्ही बाजूंनी चालते.

सध्या सर्वत्र सोशल मीडियाचेच जाळे पसरले असून, त्या जाळ्यातून बाहेर पडणे जसे चार वर्षाच्या मुलाला कठीण आहे तशीच काही अवस्था 80 वर्षांच्या आजोबांची झालेली आहे. जेवढे म्हणून काही फायदे सोशल मीडियाचे आहेत तेवढेच तोटे या नव्या माध्यमाचे आपल्यावर बसतात. या अनुभवातून आपण सारेच जण जात आहोत. या अगोदर माहिती मिळण्याची काही मोजकीच साधने होती. पुस्तके, वर्तमानपत्र, परिसंवाद, भाषणे, रेडिओ आणि हल्ली हल्ली टीव्ही, दूरचित्रवाणीतून माहिती मिळते यावर अनेकांची दुमते असू शकतील. मात्र, मनोरंजनात्मक कार्यक्रमातून आपला विरंगुळा होत असतो. आता मात्र शेकडोंनी ते लाखोंनी बाजारात असलेल्या वेबसाईट. कोणत्याही वेळी आणि कुणाचीही परवानगी न घेता आपल्यावर माहिती चहूबाजूंनी आदळत असते. त्यात व्हॉट्सअप, ट्वीटर, इन्स्टाग्र्रॅम, मेल, टीक टॉक आणि बर्‍याच अ‍ॅप्लिकेशन्सने मोबाईलवर उच्छाद मांडला आहे. त्यामुळे येणारी माहिती कुठून मिळाली, सत्य आहे का, फेक न्यूज तर नाही ना यासारख्या अनेक प्रश्नांची घालमेल होण्यापूर्वीच आपणही ती फॉरवर्ड करतो आणि तिथूनच सोशल मीडियाच्या रोगाला आपण बळी पडतो. सोशल मीडियाच्या मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच शक्यता अधिक असते. त्याचाच प्रत्यय आपल्या सर्वांना येतोय.

नुकत्याच जाहीर झालेल्या एका रिसर्चनुसार सोशल मीडियावर वाढत्या ट्रोलिंगमुळं आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकदा चांगला महत्त्वाचा कंटेंट आपल्यासमोर येत नाही. अनेकांचा खूप वेळ अशामुळे वाया तर जातोच शिवाय त्याचे काही मानसिक व सामाजिक दुष्परिणामसुद्धा अनेकांना भोगावे लागत आहेत. या माध्यमाचं अतिरेकी व्यसन लहान मुलं, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना एखाद्या नशेप्रमाणे लागले आहे. आपल्याला हल्ली इतरांसाठी अजिबात वेळ नसतो, पण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, इ-मेल, एसएमएस, व्डिडिओ कॉल्स यांनी आपला बराचसा वेळ व्यापून टाकलेला असतो. दिवसाचे जवळपास 10 ते 12 तास युवा वर्ग सोशल मीडियासाठी खर्च करत आहे. स्वतःच्या आत्महत्येचं चित्रीकरण सोशल मीडियावर करणे, सेल्फी काढण्याच्या नादात मृत्यूला कवटाळणे आणि ब्लू व्हेल चॅलेंज गेम’च्या व्यसनात गुरफटणे हे आता कॉमन झाले आहे.

- Advertisement -

पौंगडावस्थेत मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. तसेच भिन्नलिंगाविषयी शारीरिक आकर्षणही निर्माण होत असतं, पण या काळात होणारे बदल आणि लैंगिकतेबद्दल शाळेतून, कुटुंबीयांकडून शास्त्रीय माहिती मिळत नाही. मात्र, त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमधील इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीतून त्यांना लैंगिकतेबद्दल अवास्तव माहिती मिळते. त्यातून त्यांच्या लैंगिक भावनेला उत्तेजन मिळून त्यांच्याकडून बलात्कारासारखे गुन्हे घडतात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्यांचा हळूहळू घरातील मंडळींशी संवाद कमी होतो आणि पर्यायानं घरातले, बाहेरचे नातेसंबंध बिघडतात. खोटं बोलणं, पैसे चोरणं, काही कारणास्तव इंटरनेटपासून दूर राहावं लागल्यास चिडचिड होणं, अशी मानसिक लक्षणं दिसू लागतात. सोशल मीडिया कंपन्यांचा शक्य तितक्या वेळ वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवणे किंवा वापरण्यास भाग पाडल्यास त्यांना आर्थिक फायदा होईल, हा उद्देश असतो. अनेकदा ह्यूमन सायकॉलॉजी (मानवी मनाच्या) आणि त्याच्या कार्याच्या वैज्ञानिक अभ्यासाची मदत घेऊन त्यांचे डिझाईन व अल्गोरिदम तयार केले जाते. याचीच प्रचिती नुकतीच आली.

गेल्या आठवड्यात विकेंडची संधी साधून बर्‍याच महिन्यांनी आम्ही कॉलेज मैत्रिणींनी गेट टुगेदर केला. सगळ्याचजणी चाळीशी ओलांडलेल्या. त्यामुळे गप्पांचा फडही नवरा, मुलं, संसार, नोकरी आणि तब्येत या विषयांभोवती फिरत होता. तेवढ्यात आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एकीने मेसेज फॉरवर्ड केला. चिकनमध्ये करोना व्हायरस या मथळ्याखाली पोस्ट झालेला हा मेसेज वाचल्यावर मघापासून हसत खेळत चिकन लॉली पॉप आणि चिकन चिलीवर ताव मारणार्‍या मैत्रिणींचे चेहरे पांढरेफटक पडले. ज्यांनी तो मेसेज वाचला नव्हता त्यांच्यासमोर मोबाईल नाचवत काहींनी तो मेसेज त्यांच्या नजरेस आणून दिला. त्यामुळे त्यांनीही हातातला पदार्थ प्लेटमध्ये ठेवला.

- Advertisement -

एव्हाना गेट टुगेदरचा फिल जाऊन सगळ्यांच्याच चेहर्‍यावर करोना व्हायरसची भीती स्थिरावली होती. काहींनी लगेच तो मेसेज ओळखीतल्यांना फॉरवर्ड करण्यास सुरुवात केली. आमच्यातला सोशल मीडिया अव्हेरनेस जागृत झाला होता. चिकनमुळे करोनाची लागण होऊ शकते की नाही याची कसलीही खातरजमा न करता आलेला मेसेज आम्ही पुढे ढकलत होतो. रुटीन विसरून विरंगुळ्यासाठी एकत्र आलेल्या आम्हा मैत्रिणींच्या गप्पा आता करोनावर सुरू झाल्या होत्या. न्यूज चॅनल्स, न्यूज पेपरमधून आदळणार्‍या करोनाची माहिती सगळ्याजणी शेअर करू लागल्या. ज्यांनी चिकनचा आस्वाद घेतला होता. त्या थोड्या डिस्टर्ब झाल्या. काय झाले विचारले तर चिकन खाल्लं गं. असं त्या म्हणाल्या. काहीजणींना तर चिकन आणि करोना हे ऐकल्यापासूनच अनइझी वाटू लागले. त्यामुळे जे गेट टुगेदर रात्री 10 पर्यंत चालणार होते, ते 8 वाजताच संपले. घरी गेल्यावरही ग्रुपवर तेच मेसेज. काहींनी घरातली अंडी फेकून दिल्याचे सांगितले, तर काही मैत्रिणींनी यापुढे घरात चिकन बनणार नाही असे जाहीर केल्याचे ग्रुपवर सांगितले. बघता बघता सगळ्यांनीच एकमेकींना फॉलो केलं. ते ही कसलीही खातरजमा न करता.

दुसर्‍या दिवशी तोच मेसेज वेगवेगळ्या ग्रुपवर फिरत होता. तसतसा मांसाहारी लोकांचा ताण वाढत होता. टीव्ही न्यूजवरही या पोस्टबद्दल चर्चा सुरू झाल्या. करोनाचा उगमपासून त्याच्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या माहितीपर्यंत चर्चांना पेव फुटले होते. त्यानंतर अचानक चिकनमध्ये करोना व्हायरस ही अफवा असल्याचा दावा करणारा मेसेज डॉक्टर अजित रानडे यांच्या नावासहीत व्हायरल झाला. त्यामुळे मांसाहारी रिलॅक्स झाले. डॉक्टर व्यक्तीच दावा करत असल्याने त्यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवला. डॉक्टर रानडे यांच्या मुलाखती व्हायरल झाल्या आणि चिकनमध्ये करोना नाही यावर शिक्कामोर्तब झाले.

या दोन्ही पोस्टमध्ये फार तर 40 ते 72 तासांचे अंतर होते, पण दोन्ही पोस्टवर यूजर्सनी सारखाच विश्वास दाखवला. तो ही कसलीही खातरजमा न करता. चिकनमध्ये करोना व्हायरस हा मेसेज कुठून जन्माला आला ते माहीत नाही किंवा तो कोणी व्हायरल केला त्याचा कोणी शोधही घेतला नाही आणि घेण्याची तसदीही घेणार नाही. कारण पहिला मेसेज हा विश्वसनीय जरी वाटत नसला तरी तो आज जगभरात धुमाकूळ घालणार्‍या करोना व्हायरसशी संबंधित आहे. त्यामुळे लोकांच्या कुतुहलतेचा तो विषय आहे. तसेच तो मेसेज ही अफवा आहे. असा दावा करणारी व्यक्ती ही डॉक्टर असल्याने ती समाजासाठी जितकी सन्मानीय आहे तेवढीच विश्वसनीयदेखील आहे. यामुळे डॉक्टरांच्या पोस्टनंतर चिकनमध्ये करोना ही अफवा असल्याचे जगजाहीर झाले.

पण पहिल्या मेसेजने काही काळासाठी का असेना किती जणांना हादरवले असेल याची काही मोजदाद नाही. ही काही पहिली घटना नाही. ज्यात एका मेसेजमुळे काही काळ का असेना पण समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जेव्हापासून सोशल मीडिया सक्रिय झाला आहे, तेव्हापासून सत्याच्या अगोदर असत्य व बिनबुडाच्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे. कारण समाजात तेढ निर्माण करण्याबरोबरच सेन्सेशन निर्माण करण्याचे काम कपोलकल्पित मेसेज करत असतात.

आता थोडंसं मागे वळून बघितलं की लक्षात येईल की जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक 200 मिलियन मोबाईल यूजर्स असून ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. यामुळे एखादी व्हिडिओ क्लिप, मेसेज हा फास्ट फॉरवर्ड करण्यातही भारतीय अग्रेसर आहेत. संवेदनशील मानसिकता असल्याने धर्माशी, नात्यांशी, सुरक्षा, स्वास्थसेवेशी संबंधित मेसेज व व्हिडिओची खातरजमा न करता ती लवकरात लवकर समाजापर्यंत पोहचावी यासाठी भारतीय सतत धडपडत असल्याने सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जातो.

उदाहरणार्थ 2018 साली जून महिन्यात भारतात एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये एक मोटरबाईकस्वार रस्त्यावर खेळणार्‍या मुलाचे अपहरण केल्याचे दिसत होते. त्यानंतर हा व्हिडिओ खरा आहे की बनावट आहे याची कसलीही चौकशी न करता मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ बंगळुरूमधला असून देशभरात मुले चोरणारे टोळके सक्रिय झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहा. असा मेसेज या व्हिडिओबरोबर समाज माध्यमांवर पसरवला गेला. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली आणि मुले चोरणारे टोळके असल्याच्या संशयावरून देशभरात विविध ठिकाणी 10 जणांची हत्या करण्यात आली, पण नंतर या व्हिडिओचा पाठपुरावा केला असता तो पाकिस्तानचा असून मुले पळवणार्‍या टोळक्यापासून सावध कसे राहावे यासाठी तो तयार करण्यात आला होता. हे स्पष्ट झाले, पण तोपर्यंत 10 निरपराध व्यक्तींना हकनाक जीव गमवावा लागला होता. या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले होते. कारण हत्या करण्यात आलेल्या या व्यक्तींमध्ये काही परदेशी पर्यटक तर काही दुसर्‍या राज्यातील व्यक्ती होत्या.

अशाच फेक व अफवा पसरवणार्‍या मेसेजने 2018 साली विविध 23 घटनांमध्ये 31 जणांचा बळी घेतला. त्यातही फेसबुक, इ्न्स्टाग्राम, ट्विटर व इतर माध्यमांच्या तुलनेत भारतीयांना व्हॉट्सअ‍ॅप हाताळने अधिक सोपे असल्याने त्यावर आलेले मेसेज, व्हिडिओ वेगाने फॉरवर्ड केले जातात. यामुळे भारतात व्हॉट्सअ‍ॅप हा आगीत तेल ओतण्याचेच काम करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे 1 जुलै 2018 साली सोलापूर येथील रेनपाडा येथे व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरणार्‍या अफवेमुळे पाच निरपराध व्यक्तींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. ज्यात त्यांना जीव गमवावा लागला. सोलापूर नजीकच्या एका गावातून हे पाचही जण रविवारी भरणार्‍या आठवडा बाजारासाठी आले होते. त्याचदरम्यान गावात मुलांना पळवणारे टोळके आल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला. हे टोळके मुलांची हत्या करून त्यांच्या किडनी व डोळ्यांची तस्करी करत असल्याच्या अफवा मेसेजच्या माध्यमाने गावभर वार्‍यासारख्या पसरल्या.

त्यामुळे गावात येणार्‍या प्रत्येक नवीन व्यक्तीकडे संशयाने बघितले जात होते. यामुळे गावात हे पाच नवीन चेहरे बघून कुजबुज सुरू झाली. टोळक्यातील एक जण विश्रांतीसाठी म्हणून बाजूला असलेल्या झाडाखाली बसला व भूक लागल्याने बिस्कीट खात होता. त्याचवेळी एक चिमुरडी आपल्याकडे बघत असल्याचे त्याच्या लक्षात आले. यामुळे त्याने तिला जवळील बिस्कीट देऊ केले. हे बघताच तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याला घेरले त्यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. त्यानंतर मुले चोरणारे टोळके गावात आल्याची बातमी काही जणांनी नव्याने व्हायरल केली आणि बघता बघता अख्खा गाव त्या पाच जणांवर लाठ्या काठ्यांनी तुटून पडला. त्यात पाचही जणांचा बळी गेला. त्यानंतर या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले. व्हॉट्सअ‍ॅपवरील फेक मेसेजमुळे भारतात मॉब लिंचिंगच्या घटना होत असल्याने भारत सरकारही खडबडून जागे झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी झाली. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकार्‍यांनी भारतात येऊन त्यातील सत्यता पडताळली व संबंधित सरकारी आयटी विभागातील अधिकार्‍यांची भेटही घेतली. नंतर भारतात सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या आक्षेपार्ह मेसेज व व्हिडिओवर नजर व अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली.

पण त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या आक्षेपार्ह मेसेजेसची संख्या जरी कमी झाली असली तरी ती बंद झालेली नाही. हे चिकनमध्ये करोना व्हायरस सारख्या मेसेजेसवरून सतत स्पष्ट होत असते. त्यातही व्हिडिओतील दृश्ये यूजर्सला अधिक विश्वसनीय वाटत असल्याने मेसेजपेक्षा व्हिडिओत फेरफार करून त्यातील खर्‍याला खोटे रूप देऊन ते व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्याचे प्रमाण भारतात अधिक असल्याचे ट्विटनेही नुकतेच म्हटले आहे. यामागे विशिष्ट प्रकारची मानसिकता असल्याने सोशल मीडियावर येणार्‍या प्रत्येक मेसेज व व्हिडिओची शहानिशा करूनच तो फॉरवर्ड करणे गरजेचे आहे.

कारण समाजाचा एक असा घटक खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करून असे मेसेज व व्हिडिओ व्हायरल करत असतो ज्याला प्रसिद्धीची हाव असते. मग ती कुप्रसिद्धी असो वा सुप्रसिद्धी आपलं नाव चर्चेत राहणं, आपण केलेले काम मग ते योग्य असो वा अयोग्य त्याने समाजात उलथापालथ व्हायला हवी या मागचा मूळ उ्ददेश असतो, हे यूजर्सनी वेळीच ओळखायला हवे. अन्यथा सोशल मीडियावरील फेक न्यूजच्या या पोस्ट करोना व्हायरस सारख्या सगळ्या समाजाला गिळंकृत करतील. त्यामुळे डोळ्याला जे दिसतयं ते योग्य आहे हे मेंदूला जरी पटत असलं तरी त्यातील सत्यता पडताळूनच त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचणं नेहमीच चांगलं.

-(लेखिका आपलं महानगरच्या कोऑर्डीनेटर आहेत)

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -