सोशल मीडिया ऑनर किलिंग थांबवेल?

भारताच्या समाजव्यवस्थेची तुलना जगातील कोणत्याही समाजाशी करा. पण तुम्हाला इतकी किचकट, कुजकट, दांभिक, भंपक आणि भ्रष्ट समाजव्यवस्था कुठेही पाहायला, वाचायला मिळणार नाही. आपण राहतो त्या समाजाबद्दल इतक्या हीन पातळीवर ऐकण्याची आपल्याला सवय नाही. मात्र हीच खरी परिस्थिती आहे. जातीव्यवस्थेने बरबटलेली आपली समाजव्यवस्था जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत तरी स्वच्छ होणार नाही. ‘आता कुठं राहिल्यात जाती न पाती’, हे वाक्य सतत आपल्या कानावर पडत राहतं आणि आपण वास्तवापासून दूर जात राहतो. खासकरून शहरात राहणारी अभिजन वैगरे मंडळी चार-चौघात मखलाशी करण्यासाठी हे सुप्रसिद्ध वाक्य उच्चारून आपली लाल करून घेतात. ग्रामीण भागातील जातीय व्यवस्थेशी त्यांचं घेणंदेणं नसतं. मात्र जातीय अत्याचार हे आता फक्त गावातच नाहीत. तर शहरातसुद्धा व्हायला लागलेत आणि त्याची सुरुवात झालीये आपल्याच मुलीचा गळा घोटून...

Mumbai
Honour killing

ऑनर किलिंग… हा शब्द गेल्या काही काळापासून चांगलाच रुढ झालाय. मराठीत ‘सैराट’ आणि हिंदीत ‘एनएच १०’ सारखे चित्रपटही त्यावर आलेत. एकदा चित्रपट आला की तो विषय आमच्या शहरी लोकांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण ठरतं. तोपर्यंत त्याची ग्रॅव्हीटी आम्ही विचारत घेत नसतो. समाजातील वास्तववादी घटनांवर चित्रपट येत नसतो, तोपर्यंत त्याची चर्चा होत नसते. मग ते ‘आर्टिकल १५’ भले १९५० सालीच संविधानात लिहिलं गेलेलं का असेना. वकील, कोर्ट आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सोडून सर्वांना त्याची माहिती चित्रपट आल्यानंतरच होत असते. तोपर्यंत आपण मध्ययुगीन कायद्याप्रमाणे वागत असतो. त्यातही तो चित्रपटच मग त्याची स्मृती तरी केवढी दांडगी. पुढचा चित्रपट आला की मागचं सपाट. असो

तर ऑनर किलिंगसारखा महाभयंकर रोग आता शहरातही वाढायला लागला आहे. शहर आणि ग्रामीण अशी काही दरी जातीव्यवस्थेसाठी तरी नाही. पण शहरात जातीभेदापलीकडे जाण्याची जी काही सहिष्णुता होती, ती सुद्धा गेल्या काही वर्षांपासून संपुष्टात आलीये. सध्या माध्यमांमध्ये साक्षी मिश्रा नामक मुलीचं प्रकरण गाजतेय. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची ती कन्या. अजितेश नावाच्या एका दलित मुलाबरोबर पळून जाऊन तिने लग्न केलंय. लग्नानंतर आपला बाप, भाऊ आणि त्यांचे गुंड आपल्या जीवावर उठले असल्याचं कळताच साक्षीने एक व्हिडिओ शूट करत तो सोशल मीडियावर टाकला आणि एकच खळबळ उडाली. नाईलाजाने पोलिसांना आणि आमदार मिश्रांना माध्यमांसोर प्रतिक्रिया द्यावी लागली. या प्रकरणात रोज नवनवीन दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.

साक्षीच्या प्रकरणावर पडदा पडत नाही तोपर्यंतच आणखी एक व्हिडिओ समोर आला. यावेळी प्रयागराजचे माजी उप महापौर आणि भाजपचे नेते मुरारी लाल अग्रवाल यांची नात दिक्षा अग्रवालने व्हिडिओ काढलाय. प्रकरण तेच जातीबाहेर लग्न. दिक्षाने व्हिडिओ काढून आम्हाला सुखाने जगू द्या, जीवे मारण्याची धमकी देऊ नका, असं आवाहन आपल्या आजोबांना केलंय. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे आपल्याला धमकी येत असल्याचं दोन्ही मुली सांगतात. बरं या प्रकरणात मुलगा समाजाने ठरवलेल्या खालच्या जातीतील नाही, तरीही आपल्या जातीबाहेरचं लग्न मुलींच्या घरच्यांना पचवता आलेलं नाही.

आता ऑनर किलिंग या विषयाकडे पुन्हा येऊयात. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या घाटकोपर येथे दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या मीनाक्षी चौरसिया या २१ वर्षीय मुलीचा तिच्याच वडीलांनी गळा चिरून खून केला. मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध दुसर्‍या जातीत लग्न केलं, एवढंच खूनाचे कारण. फक्त परजातीतील मुलाबरोबर लग्न केल्याने आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय, ही भावना इतकी तीव्र असू शकते? असा प्रश्न उपस्थितीत होतो. ही भावना इतकी क्लेषदायक आहे का? की एक बाप आपल्या पोटच्या मुलीचा तिच्या पोटच्या बाळासहीत खून करू शकतो? एक माणूस म्हणून विचार केल्यास ही माणुसकीला कलंक लावणारी घटना वाटेल. मात्र आपल्या समाजव्यवस्थेत जातीय अस्मितेने कुजलेल्या मनासाठी ती फार मोठी घटना नाही.

साक्षी आणि दिक्षा प्रमाणे जर मीनाक्षीनेही सोशल मीडियावर आपला व्हिडिओ पोस्ट केला असता तर… तिचाही जीव वाचला असता का? सोशल मीडियावर मुलींनी आपली कैफियत मांडल्यावर पोलीस यंत्रणा जागी होते. काही चांगल्या लोकांचा नैतिक दबाव वाढतो आणि त्यातून खुनासारखे अरिष्ट दूर होतं का? हे आता आणखी काही प्रकरणांनंतर कळेलच. पण आपण खून केल्यानंतर तुरुंगात जाणारच आहोत, हे माहीत असूनही जेव्हा एखादा बाप आपल्याच मुलीचा गळा घोटण्याचं नीच कृत्य करतो, तो या सोशल मीडियावरील एका व्हिडिओने शांत बसेल का? असाही प्रश्न आहेच.

काहीही असलं तरी सोशल मीडियामुळे अशा प्रकरणांची चर्चा होत आहे. याआधी देखील अशी अनेक प्रकरणं घडली आहेत. काही प्रकरणं दाबली गेली. काहींच्या बातम्या झाल्या. मात्र याच्या मुळाशी जायला कुणालाही सवड नाही. सध्या ताज्या प्रकरणातील सर्वात घातक गोष्ट अशी की, ज्या पक्षावर लोकशाही वाचविण्याची जबाबदारी आहे, त्याच पक्षातील नेत्यांच्या घरातील मुली आम्हाला जगू द्या, अशी हाक देतायत. कदाचित हा योगायोग देखील असू शकतो. मात्र तो योगायोग एकाच पक्षाच्या बाबतीत दिसून येतोय, हे तितकंच खरं. एरवी लव्ह जिहादच्या नावाने शंख फुकणारे जेव्हा आपल्याच घरातील मुलगा-मुलगी हिंदू धर्मातीलच वेगळ्या जातीमध्ये लग्न करते किंवा करतो. तेव्हा या लोकांना जातीमधील उतरंड दिसू लागते. तोपर्यंत आपण सगळेच हिंदू असतो.

सध्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवरील लैला ही वेबसिरीज गाजतेय. लैला या प्रयाग अकबर यांच्या कांदबरीवर ही वेबसिरीज आहे. यातील शालिनी पाठक नावाचे ब्राह्मण समाजीतल स्त्री पात्र मध्यवर्ती भूमिकेत आहे. शालिनीने मुस्लिम युवकासोबत लग्न केल्याची तिला आणि तिच्या परिवाराला शिक्षा भोगावी लागते. लेखक प्रयाग अकबर यांनी कल्पनेवर आधारीत २०५० सालातील भारताचं चित्र लैलात शब्दबद्ध केलंय. खरंतर २०५० साली भारताची समाज आणि राजकीय व्यवस्था नेमकी कशी असेल? हे जरी सांगणं कठीण असलं तरी आपल्या समाजव्यवस्थेने हजारो वर्षांपासून पोसलेली जातीयव्यवस्था समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत तरी पुढील अनेक पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल असू शकणार नाही.