घरफिचर्स...बाजे रे मुरलियां बाजे!

…बाजे रे मुरलियां बाजे!

Subscribe

दुकानातून त्या दिवशी त्या कॅसेट्सबरोबर आणखीही काही कॅसेट्स घेतल्या आणि घरी आलो, पण घरी आल्याबरोबर माझ्या टेपरेकार्डरमध्ये मी पहिली कोणती कॅसेट टाकली असेल तर ती ‘राम शाम गुन गान’ हीच. एकेक गाणं मी ऐकत गेलो. राम भजन कर मन, राम का गुन गान करिये, सुमती सीताराम, श्रीराम जयराम, कृपासरोवर कमल मनोहर अशी सगळी गाणी ऐकता ऐकता आता गाणं ऐकत होतो त्या गाण्याचे शब्द होते- अधर धरे मोहन मुरली पर होठ पें माया बिराजे, बाजे रे मुरलियां बाजे.

तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. ध्वनिमुद्रिकांचा काळ कधीच मागे सरला होता आणि कॅसेटचा जमाना सुरू झाला होता. दर आठवड्याला नवी गाणी घेऊन येणार्‍या कॅसेट्सचं नुसतं पीक यायचं. वर्तमानपत्रांतून, मॅगझिन्समधून ह्या नवनव्या कॅसेट्सची, त्यातल्या गाण्यांची ओळख, समिक्षा व्हायची. ह्या अशाच एका काळात कॅसेट्सच्या एका दुकानात मी गेलो आणि कोणत्या नव्या कॅसेट्स आल्या आहेत ह्याचा शोध घेऊ लागलो. हा शोध घेत असतानाच एका कॅसेटवर माझं लक्ष गेलं.

कॅसेटचं नाव होतं ‘राम शाम गुन गान.’ राम आणि कृष्णाची स्तुतीभक्तीपर गाणी त्यात होती. गायली होती भारतीय संगीतातल्या दोन ध्रुवांनी. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशींनी. संगीतातल्या अत्युच्चपदावरच्या दोन व्यक्तीमत्वांनी गायलेल्या गाण्यांची जर ही कॅसेट असेल तर ती निश्चितच अभूतपूर्व असणार अशी माझ्या मनाने खुणगाठ बांधली आणि मागेपुढे न बघता मी ती कॅसेट विकत घेतली. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी अशा दोन ध्रुवांच्या आवाजात जर ही गाणी असतील तर ह्या गाण्यांना संगीत कुणाचं आहे ह्यासाठी मोठ्या कुतुहलाने मी नाव पाहिलं तर ते नाव होतं संगीतकार श्रीनिवास खळेंचं.

- Advertisement -

त्या दिवशी त्या कॅसेट्सबरोबर आणखीही काही कॅसेट्स घेतल्या आणि घरी आलो, पण घरी आल्याबरोबर माझ्या टेपरेकार्डरमध्ये मी पहिली कोणती कॅसेट टाकली असेल तर ती ‘राम शाम गुन गान’ हीच. एकेक गाणं मी ऐकत गेलो. राम भजन कर मन, राम का गुन गान करिये, सुमती सीताराम, श्रीराम जयराम, कृपासरोवर कमल मनोहर अशी सगळी गाणी ऐकता ऐकता आता गाणं ऐकत होतो त्या गाण्याचे शब्द होते- अधर धरे मोहन मुरली पर होठ पें माया बिराजे, बाजे रे मुरलियां बाजे.

एका बाजूला अख्खं अवकाश तल्लीन करून ते कवेत घेणारा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज आणि दुसर्‍या बाजूला त्या आवाजालाच समांतर असा अवघ्या आसमंतालाच पुरून उरणारा पंडित भीमसेन जोशींचा आवाज. त्यात मला माझ्या घरात टेपरेकार्डर मोठ्या आवाजात लावून गाणं ऐकण्याची सवय. त्या शनिवारच्या त्या संध्याकाळी हे गाणं मी ऐकलं आणि मी शब्दश: भारावून गेलो. कॅसेटमध्ये पुढे आणखी तीन गाणी होती. पण त्या गाण्याने, त्या भजनाने मला इतकं दिवाणं करून टाकलं की ते गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो. त्या गाण्याच्या मी आकंठ प्रेमात पडलो, आकंठ प्रेमात बुडालो. नंतर त्या कॅसेटमधली मी पुढची गाणी ऐकली, पण ते ‘बाजे रे मुरलियां बाजे’ हे गाणं काही माझ्या मनातून जाता जाईना. पुढचे पंधरा दिवस, एक महिना ते गाणं मी इतकं आणि इतक्या वेळा ऐकलं की जगात इतर कोणती गाणी जन्माला आलेलीच नसावीत!

- Advertisement -

खरंतर श्रीनिवास खळे हे तसं मराठीतलं आणि तेही त्या भाषेतल्या भावगीताच्या दालनातलं एक अजरामर नाव होतं. ते नाव मराठी सिनेमांमधूनही फार झळकलेलं नाव नव्हतं. मराठी भावगीत-भक्तीगीत ह्या परिघातच, पण तेजाने झळकणारं नाव होतं. त्या परिघापलिकडेही कर्तृत्व करून दाखवण्याची क्षमता, गुणवत्ता ह्या नावात होती, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. हे दुर्दैव जसं त्या प्रतिभावंत संगीतकाराचं होतं, तसंच ते संगीतरसिकांचंही होतं.

पण ‘राम शाम गुन गान’ ह्या कॅसेटच्या निमित्ताने एक गोष्ट घडली होती. ह्या कॅसेटचा खप विक्रमी झाला होता आणि त्या निमित्ताने संगीतकार श्रीनिवास खळे ह्याची संगीतातली मनोवेधक कलाकुसर हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या संगीताला भाषेचा अडसर ओलांडण्याचं नवं क्षितिज प्राप्त झालं होतं. खरंतर श्रीनिवास खळेंचं संगीत एका प्रादेशिक भाषेची मर्यादा पाळून एका परिघापर्यंत सिमित राहण्यासारखं मुळीच नव्हतं. जी अमराठी माणसं त्यांचं संगीत ऐकत असत किंवा त्यांच्या संगीतातली गाणी गात असत त्यांना त्यांच्या संगीतरचनांमधल्या अलौकिक करामतीचा स्पर्श झाल्यावाचून राहत नसे. श्रीनिवास खळेंची श्रावणात घन निळा बरसला, शुक्र तारा, मंद वारा, जाहल्या काही चुका, भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, ही गाणी तर भाषेच्या सीमारेषा ओलांडून दूरवर पोहोचली होती. पण तरीही आज वाटतं की ह्या इतक्या गुणवान संगीतकाराला त्याच्या संगीतासाठी मराठी भाषेच्या पलिकडचाही मुलख मिळायला हवा होता.

वास्तविक त्यांच्या संगिताची नोंद राज कपूरसारख्या एका कसबी कलाकारानेही घेतली होती. एकदा पार्श्वगायक सुरेश वाडकरांसोबत त्यांना आपल्या घरी बोलवलं होतं. त्यांच्याकडून राज कपूरनी त्यांचंच ‘भेटीलागी जीवा, लागलीसी आस’ ऐकलं होतं. तुमची गाणी मी ऐकली आहेत, तुमची गाणी मला आवडली आहेत, असं राज कपूरसारख्या संगीतातल्या खास दर्दी माणसाने त्यांना स्वत:हून सांगितलं होतं. पण त्यापुढे घडावं असं काहीच घडलं नव्हतं.

त्यानंतर मला आठवतंय, क्रीडा आणि संगीत ह्या विषयातले आमचे पत्रकार मित्र राजू भारतन ह्यांच्याशी संगीत वगैरे विषयांवर एकदा बोलत असताना त्यांनी ‘राम शाम गुन गान’ ह्या कॅसेटचा आणि त्या कॅसेटमधल्या ‘बाजे रे मुरलियां बाजे’ ह्या गाण्याचा खास उल्लेख केला होता. त्यांना श्रीनिवास खळेंबद्दल तशी माहिती होती, पण हे गाणं त्यांना खास आवडल्याचं ते मला सांगत होते. धिस पर्टिक्युलर साँग इज व्हेरी स्पेशल, व्हेरी मेलोडियस असं पुन्हा पुन्हा म्हणत होते.

आज श्रीनिवास खळेही राहिले नाहीत, राजू भारतनही राहिले नाहीत, पण त्यांची आठवण ह्या निमित्ताने झाली. मी राजू भारतनना म्हटलं, श्रीनिवास खळेंच्या संगीतात एक अनोखा स्पर्श होता. त्यांचं गाणं शांत, संथ असायचं, पण ते जीवनाची समजूत काढणारं गाणं असायचं.

राजू भारतनना माझं ते म्हणणं पटलं होतं. म्हणूनच तेव्हा ते मला म्हणाले होते, काही संगीतकार हे कवी नसतात, पण त्यांच्या संगीतरचना ह्याच मुळी एक कविता असतात.

राजू भारतनचं म्हणणं कसं खरं होतं ते पहा. श्रीनिवास खळेंची गाणी जेव्हा पु.ल. देशपांडे ऐकत तेव्हा खळेंच्या संगीतरचनांमध्ये त्यांना फक्त सूर दिसत नसत तर एक कविता दिसे. एकदा तर पुलंनी खळेंना सरळ प्रश्न केला, तुम्ही कविता वगैरे करता का हो? तुमचं संगीत ऐकलं की मला हा प्रश्न नेहमी पडतो!

असो, श्रीनिवास खळेंचा परवा स्मृतीदिन होता, म्हणून त्यानिमित्ताने हे सगळं आठवलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -