भारताच्या भोवती धार्मिक धमाके!

Mumbai

श्रीलंकेत लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम या संघटनेेचा अनेक वर्षे सुरु असलेला रक्तरंजित हाहा:कार शांत झाल्यानंतर नुकतेच ईस्टर संडेच्या दिवशी तेथील चर्च आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या हल्ल्याला धार्मिक किनार आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये धर्माच्या आधारावर अस्वस्थता असल्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

भारत विविध क्षेत्रात विकासाचे टप्पे पार करत पुढे जात असताना त्याच्या शेजारी राष्ट्रांमधील अस्वस्थता दुर्लक्षित करून चालणार नाही. या शेजार्‍यांच्या अंतर्गत घडामोडींचा परिणाम भारतावरही होत असतो. तामिळी वाघांच्या हाहा:काराने आपला शेजारी असलेला श्रीलंका हा छोटासा देश अनेक वर्षे अक्षरश: भाजून निघाला होता. श्रीलंकेतील तामिळी वाघांना आवरण्यासाठी भारतीय सैन्य श्रीलंकेत उतरवण्याचा निर्णय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली होती. भारतीय उपखंडात येणारे विविध देश कधी काळी भारताचाच भाग होते. श्रीलंका हा त्यापैकीच एक आहे. त्यामुळेच त्या देशांशी भारताच्या बर्‍याच आंतरिक बाबी जोडलेल्या असतात. या देशांमधील भाषा, संस्कृती, लोकांचे रहाणे आणि खाणे यांच्यामध्ये समानता असते. त्यामुळे त्या देशांमध्ये घडणार्‍या गोष्टीचा परिणाम भारतावर आणि भारतीय राजकारणावर होत असतो. श्रीलंकेत सुरू असलेल्या तामिळी वाघांच्या लढाईमध्ये भारताला उतरावे लागले होते. तरीही तेथे शांतता प्रस्थापित होत नव्हती. शेवटी त्या देशातील लाखो लोकांचे बळी घेतल्यानंतर, अनेकांचे घरसंसार उध्वस्त झाल्यावर, तसेच देशातील मालमत्तेचे अतोनात नुकसान केल्यानंतर या देशाला व्यापणारा तामिळी वाघांच्या दहशतीचा अग्नी अखेर शांत झाला. श्रीलंकेचे सरकार आणि लष्कराने कठोर भूमिका घेऊन तामिळी वाघांची दहशत मोडून काढली. तामिळी वाघांचे असंख्य बळी गेल्यावर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली.

श्रीलंका हा देश आकाराने खूप छोटा असल्यामुळे तसा त्यांचा जागतिक पातळीवर मोठा प्रभाव नव्हता. त्या देशात सुरू असलेला तामिळी आणि सिंहली लोकांच्या भयानक संघर्षामुळे हा देश जगाच्या नकाशावर ओळखला जाऊ लागला. देशातील संघर्ष हीच त्यांची ओळख होती. भारताचा दुसरा शेजारी देश असलेला पकिस्तान हादेखील अंतर्गत तसेच भारताशी सुरू असलेल्या संघर्षासाठी जागतिक पातळीवर ओळखला जात आहे. मुळात पाकिस्तानची निर्मितीच अंतर्गत संघर्षातून झालेली आहे. ब्रिटिशांच्या विरोधात हिंदू आणि मुस्लीम एकत्र लढा देत होते. पण पुढे जसे भारताला स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता दिसू लागली तसे येथील मुस्लीम नेत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ लागली. यातूनच पुढे पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानशी कितीही चर्चेच्या फेर्‍या घेतल्या आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न भारताने केले तरी शांतता निर्माण होऊ शकलेली नाही.

१९७१ साली भारताने पुढाकार घेतल्यानंतर स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. त्यानंतर भारताशी त्यांचे संबंध बर्‍यापैकी असले तरी भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरांची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. कारण त्या देशात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे तेथील लोक पोटापाण्यासाठी घुसखोरी करून भारतात येतात. काही वेळा त्यांच्या माध्यमातून देशविघातक कारवाया घडवून आणल्या जातात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताच्या सुरक्षा यंत्रणांना सजग रहावे लागते. मूळ भारताचा निवासी असलेला आणि सध्या परागंदा झालेला मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांच्या भाषणांनी अनेक मुस्लीम तरूण प्रेरित झालेले आहेत. नाईक याच्या भाषणापासून बांगलादेशमधील काही तरुण प्रेरणा घेऊन त्याच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत झाले होते. पण पुढे भारतीय तपास यंत्रणांनी नाईकच्या नाड्या आवळायला सुुरुवात केल्यानंतर त्याने भारतातून पाय काढणे पसंत केले.

पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू बनला आहे. अमेरिकेचे वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त करण्याच्या कटाचा सूत्रधार अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेन होता. या हल्ल्यामुळे अमेरिकेचे नाक कापले गेले होते. त्यामुळे अमेरिकेच्या तपास यंत्रणा ओसामा बीन लादेनचा कसून शोध घेत होत्या. पण तो त्यांना सापडत नव्हता. शेवटी तो पाकिस्तानमध्येच असल्याचा अमेरिकेला सुगावा लागला. अमेरिका पाकिस्तानला लष्करी सामुग्री आणि आर्थिक मदत करत राहिलेला आहे. पण इतके करूनही पाकिस्तानने अमेरिकेचे चांगलेच पांग फेडले. त्यामुळे अमेरिकेचा पार अपेक्षाभंग झाला होता. पुढे पकिस्तानला कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक हल्ला करून अमेरिकेने ओसामाचा खात्मा केला.

भारतात होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाकिस्तानस्थित जैश- ए-महम्मदच्या दहशतवादी संघटनेने पुलवामा येेथे हल्ला केला. त्यात स्फोटाने भरलेली गाडी सीआरपीएफच्या जवानांच्या वाहनावर धडकवण्यात आली. त्यात ४० जवान शहीद झाले. ईस्टर संडेला श्रीलंकेतील चर्च आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यात २५० लोक ठार झाले. अनेक जखमी झाले. सुरुवातीला हा हल्ला नेमका कुठून आणि कसा झाला हे कुणाला कळत नव्हते. पण नंतर इसिसने त्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्याचा एक एक पैलू उघड होऊ लागला. श्रीलंका हा भारताचा शेजारी देश असल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याविषयीचा तपास सुरू केला. श्रीलंकेत ‘नॅशनल तौहीद जमात’ या संघटनेने बॉम्बस्फोट घडवून आणले. या संघटनेचा विस्तार तामीळनाडू तसेच केरळ या राज्यांमध्ये असल्याचे आढळून आले. एनआयएने केरळमधील तीन तरुक्षणांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांची नावे अबू बकार सिद्धिकी, अहमद अराफत अशी आहेत. श्रीलंकेतील हल्ल्याचा कट रचणारा झहरान हाश्मी याच्या हे दोघे संपर्कात होते. एनआयएने या अगोदरही इसिसच्या संपर्कात असल्यावरून तामीळनाडू आणि केरळ येथील काही तरुणांची चौकशी केली होती.

श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथे विविध कारणांमुळे हत्यासत्र सुरू झाले आहे. याला धार्मिक कारण असल्याचे समोर येत आहे. इसिस ही आंतरराष्ट्रीय मुस्लीम दहशतवाद्यांची संघटना विविध देशात आपला शिरकाव करत आहे. त्यासाठी ते धर्माच्या आधारावर स्थानिक लोकांमधून आपले हस्तक तयार करत असतात. याच हस्तकांच्या माध्यमातून कुठल्याही देशाच्या आतील भागात हल्ले घडवणे त्यांना शक्य होते. भारत आपला शेजारधर्म चांगल्यारिती पालन करू इच्छित असला तरी धर्माच्या आधारवर शेजारी राष्ट्रांमध्ये संघर्ष उसळत आहे. त्यामुळे या अस्वस्थ शेजारधर्मापासून भारतातील सगळ्यांनीच सजग राहण्याची गरज आहे. कारण स्थानिक पातळीवरील समर्थनाशिवाय कुठलाही मोठा हल्ला घडवून आणता येत नाही, हे आजवर भारतात झालेल्या हल्ल्यामधून दिसून आलेले आहे. मग ते १९९३ साली झालेले मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असोत, नाही तर २००८ साली कसाब टोळीने मुंबईवर केलेला हल्ला असो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here