घरफिचर्सकथा एका नोबेल प्रोफेशनची...

कथा एका नोबेल प्रोफेशनची…

Subscribe

उबेरची गाडी चालवणार्‍या सुभाषच्या प्रश्नांना मी माझ्यापरीने उत्तरे देत होतो. त्याची सरबत्ती सुरू होती. मी म्हणालो, तुम्हाला आमच्या फिल्डची भरपूर माहिती आहे म्हणायचे. त्यानंतर ड्रायव्हर सुभाषने दिलेल्या उत्तराने मला काय बोलावे हे सुचेनाच. तो म्हणाला, अहो तुमचं काय. माझंदेखील फिल्ड शिक्षणाचंच आहे. त्यावर मी आश्चर्याने उद्गारलो, काय, तुम्ही शिक्षक आहात! त्यानंतर माझं कॉलेज येईपर्यंत त्या ड्रायव्हरचा जीवनप्रवास आणि संघर्ष ऐकून माझ्या मनाची विचित्र घालमेल झाली.

रोजच्याप्रमाणे सकाळी उठून कॉलेजला जाण्यासाठी उबेर बुक केली. उबेरच्या अ‍ॅपमध्ये बघितलं तर गाडी येण्यासाठी अजून पंधरा मिनिटांचा अवधी होता. गाडीची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पंधरा मिनिटांच्या आतच गाडी आली. गाडीत बसलो आणि ड्रायव्हरने जाण्याचा पत्ता बघून विचारले, सर, कुठे कॉलेजला जायचे आहे का? त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी हो म्हटले. पुढे पाचेक मिनिटे शांतता. कळव्याच्या ब्रिजवर गाडी आली आणि त्या ड्रायव्हरने पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही रोज उबेरने जाता? त्यावर हो, म्हणजे बहुतेक वेळा सकाळी उशीर झाला की, उबेरशिवाय पर्याय नसतो. आता ड्रायव्हरने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुमची शाळा अनुदानित आहे की, विनाअनुदानित ?…. तुमच्या शाळेत मुलं किती ?… शाळा व्यवस्थित पगार देते का ? ….शाळा लोकांना पर्मनंट करते का ? …असे एकना अनेक प्रश्न…मी माझ्यापरीने त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. तुम्हाला आमच्या फिल्डची भरपूर माहिती आहे म्हणायचे. त्यानंतर त्या ड्रायव्हरने दिलेल्या उत्तराने मला काय बोलावे हे सुचेनाच. तो ड्रायव्हर मला म्हणाला, अहो तुमचं काय. माझंदेखील फिल्ड हेच आहे. त्यावर मी काय, तुम्ही शिक्षक आहात! त्यानंतर माझं कॉलेज येईपर्यंत त्या ड्रायव्हरचा जीवनप्रवास आणि संघर्ष ऐकत होतो.

त्या वीस-बावीस मिनिटांच्या कालावधीत मला त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यावर विश्वास बसेना; पण विश्वास न बसून सांगतो कुणाला? त्या ड्रायव्हरने नव्हे तर शिक्षकाने सांगितलं ते सर्व खरं! या काळातलं एक नागवं सत्य. या उबेर चालवणार्‍या ड्रायव्हरचं नाव सुभाष भिरूड. मुळचा सांगलीचा. एम.ए.करून मुंबईत बी.एड करायला आला. बी.एड करताना सगळ्या शिक्षकांना वाटतं तसं सुभाषला वाटलं. आता बी. एड होईल आणि एकदा शिक्षणसेवकाची तीन वर्षे संपली की, आर्थिकदृष्ठ्या सर्व प्रश्न मार्गी लागतील. सुभाषने बी.एडचं ते वर्ष लीलया पेललं. बी.एडला फर्स्ट क्लास मिळाला आणि मुलाखतीसाठी अर्ज देऊन मुलाखत देण्याला सुरुवात झाली. शाळा मागून शाळा झाल्या. कनिष्ठ महाविद्यालये झाली. पण एकदा मुलाखत झाली की, नंतर कोणी बोलवेना. हे काय चाललंय काय? रोज या शाळेत किंवा त्या कॉलेजात शिक्षकाची भरती सुरू आहे, अशी बातमी येते. मुलाखत चांगली होते. पाठ चांगले होतात. पण कुठेच कसं बोलावणे येत नाही. दोन-तीन महिने गेले आणि एकदाचा तो शुभ दिवस आला. मुंबईच्या कोण्या एका शाळेत बोलावणे आले. मुलाखत झाली होती. पाठ चांगला झाला होता. आता शाळेच्या विश्वस्त मंडळींनी अखेरच्या मुलाखतीसाठी बोलावले होते. म्हणजे आता आमचे काम होणार ..एकदाचा मी शिक्षक होणार ..!

- Advertisement -

सुभाषची मुलाखत झाली आणि त्यानंतर या क्षेत्रातल्या काळ्या बाजूचा एकेक अनुभव यायला सुरुवात झाली. विश्वस्तांनी मुलाखत घेतली. सगळे नियम समजून सांगितले आणि आता गाडी पगारावर आली. हे बघा शाळेने अनुदानासाठी फाईल पाठवली आहे. अजून काही अनुदान आले नाही; पण सध्या संस्था पगार देईल, आतापर्यंत आम्ही हजार रुपये देत होतो, यावर्षीपासून आम्ही बाराशे देऊ. एका शिक्षकाला एवढं भलं मोठ्ठ मासिक वेतन मिळेल याची त्याला कल्पनाच नव्हती. पण आज ना उद्या अनुदान येईल यावर विश्वास ठेऊन त्याने आलेली संधी उचलली. वर्ष झालं ….दोन वर्षे ….तीन वर्षे गेली. तरी संस्थाचालक एकच म्हणत आहेत. यावर्षी अनुदान येईल…..वाट बघू. आता मात्र सुभाषचा धीर सुटला. अजून काही ठिकाणी नोकरीचं होतं का बघू ? जिकडे-तिकडे हीच परिस्थिती. वयाची तिशी आली तरी नोकरीत स्थिरता नाही. मूलभूत गरजा भागतील एवढंदेखील मासिक वेतन नाही. आता खाजगी शिकवण्या घ्याव्यात तर संस्थाचालक त्यालादेखील परवानगी देत नाहीत.

काय विसंगती आहे बघा! स्वतःचं ज्ञान वापरून पैसा कमवायला शिक्षकाला बंदी! मग त्याने हमाली केली तरी चालेल. सुभाषच्या बाबतीत तेच झालं. बारा वर्षे अनुदानाची वाट बघत पगार जेमतेम अडीच हजारापर्यंत पोचलेला. त्यात लग्न करून बसलेला. शेवटी दुपारी शाळा आणि सकाळ-संध्याकाळ उबेर चालवली तर निदान बायको-मुलाचं आणि स्वतःचं पोट तरी भरता येईल. सुभाष त्या दिवशी भेटला आणि शिक्षण क्षेत्रातील एक काळी बाजू डोळ्यासमोर आली. पिढी घडवणारा आधारस्तंभ असा कोलमडतो का आहे? त्याला शिकवायचं सोडून आंदोलन का करावं लागतं? निरनिराळ्या शैक्षणिक बोर्डामुळे मूळ शैक्षणिक धोरण खरंच ढासळत चाललंय का? ही परिस्थिती राहिली तर पुढे येणारा सामाजिक घटक या क्षेत्राकडे पाठ तर फिरवणार नाही ना?

- Advertisement -

या सर्व गोष्टींकडे बघताना नेहमीच वाटतं की, आजच्या या शैक्षणिक व्यवस्थेत शिक्षकाचे नेमके स्थान काय? सुभाषसारखे किती शिक्षक अनुदानाकडे डोळे लावून बसले असतील. हल्ली व्हॉट्सअ‍ॅप सारख्या समाजमाध्यमावर शिक्षकांवर सहजपणे जोक्स पाठवले जातात. आणि पालक हमखास ते मुलांच्यापुढे वाचून दाखवतात. टीव्हीवर एक दंतमंजनाची जाहिरात येते. त्यात एक दहा-बारा वर्षांचा मुलगा शिक्षकाला मास्टरजी नही तो आपके दांत … असं म्हणत शिक्षकाची नाही तर त्या शिक्षकी पेशाची खिल्ली उडवतो असं नाही का वाटत? किंवा मास्तर पळाले…. , मास्तर कोमात …. अशा आशयाचे जोक्स जेव्हा समाजमाध्यमावर फिरतात तेव्हा एक शिक्षक म्हणून त्याकडे बघताना किती यातना होत असतात ?

शिक्षकाला खरंच आजचा समाज दुर्बल मानतो का? मघाशीच सांगितल्याप्रमाणे सुभाषसारखे अनेक निष्ठावान शिक्षक आजही या समाजात वावरताना दिसतात. त्यांना ज्ञान द्यायची लालसा आहे. पण नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक आर्हतेपेक्षा वशिला नावाची आणि मानधनाची रक्कम त्यांच्यापाशी नाही. पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर एम.फील केलंय. पी. एच. डीचे प्रबंध सादर केलेत; पण आजही तासिका तत्वावर सात-सात, आठ-आठ वर्षे घासणारे अनेकजण नोकरीकडे आशा लावून बसले आहेत. त्यांच्या भविष्याचे काय? सुभाष भेटला आणि या सगळ्या प्रश्नाचा नव्याने विचार करायला वाव मिळाला. ज्ञानप्रणाली मालिकेतील विद्यार्थी जेवढा महत्त्वाचा घटक आहे तेवढाच शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मारणे, ओरडणे या गोष्टींना मज्जाव आहे.

जेव्हा जनगणना, निवडणुका या सरकारी कामांना वेग येतो तेव्हा आवर्जून शिक्षकांची आठवण येते. कारण मान मोडून काम करणारा हा एकमेव घटक आहे हे आजही सत्य आहे. तोच शिक्षक जेव्हा आपल्या हक्कासाठी लढत होता तेव्हा त्याच्यावर केलेला लाठीहल्ला हे कसलं प्रतिक आहे?…..ढासळत जात असणार्‍या समाजव्यवस्थेचे! स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनुदानाच्या आशेवर पंधरा वर्षे वाट पाहणारा एक शिक्षक आत्महत्या करतो याचा अर्थ काय घ्यावा? शिक्षक दिनाच्या दिवशी पंधरा-वीस शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवले आणि पाच-सहा टक्के भत्त्यात वाढ दिली म्हणजे शिक्षकांप्रती असणारी आमची जबाबदारी संपली असा आम्ही समज करून घेतला आहे. उच्च महाविद्यालयात सीएचबी म्हणजे तासिका तत्वावर नेमणूक आणि खाली विनाअनुदान नेमणूक ही शिक्षणव्यवस्थेला लागलेली कीड आहे. ती कीड वेळीच काढून टाकली पाहिजे नाहीतर तर हा ढेरेदार वृक्ष कोसळून पडायला वेळ लागणार नाही.

आम्ही वर्षानुवर्षे फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटील यांची उदाहरणे देतो ती त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे. ही क्रांतीची ज्योत समाजातल्या तळागाळात गेली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रचार झाला आहे. पण या व्यवस्थेतील शिक्षक मात्र कुठे गेला हेच कळत नाही. या पेशाला पुन्हा एकदा संजीवनी देण्याची गरज आहे. नाहीतर सुभाषसारखे अनेकजण पोटापाण्यासाठी कोणी टॅक्सी चालवतील, कोणी रिक्षा चालवतील. कोण वडापाव विकत बसतील..आणि जगण्याच्या संघर्षात आपण शिक्षक आहोत, ज्ञानाची पूजा करणारे पूजक आहोत हे विसरून जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -